Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

श्री अनघाष्टमी व्रत

श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा, पूजेचा संदर्भ आहे. सांप्रत अनेकांना याची माहिती नसते. अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.

दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महीतले ।
द्वितीयोऽनघो नाम लोकेऽस्मिन् परिश्रुत: ॥
तस्य भार्याऽनघा नाम बभूव सहचारिणी ।
अष्टपुत्राऽतीव वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता ॥
अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्र्चैषाऽनघा स्मृता ॥

जे अष्टदल पद्म यंत्र आहे. त्याच्या एक एक पाकळीत विविध देवतांची नावे लिहिली आहेत. घरांत एक सिंहासन तयार करून तांदूळ, हळद कुंकु, यांचे अष्ट दल पद्म तयार करून, विविधे देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी, विडयाचे पान, तुळशीचे पान, ठेऊन विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावे.

या प्रकारे पिवळा, लाल पांढऱ्या रंगाने युक्त तीन धागे एकत्र करून त्याच्या मध्ये गाठ बांधावी व धागा वेदिकेच्या मधे अनघा दंपति जवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्यांना व्रताची दिक्षा दयावी. आवश्यकता आसल्यास २ किंवा ३ धागे तयार करून पूजा करता येते. धागा बांधताना प्रार्थना करावी.

ब्रह्म विष्णू महेशान
रूपिन त्रिगुण नायक ।
त्रैवर्णिक नमस्तुभ्यं
तोर देवाsनघात्मक ॥

अनघ स्वामींना नैवेद्य रूपांत अनेक फले, व पाच खारीका अर्पित करावीत. या शिवाय महानैवेद्यही दाखवावा.

अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना (पूजा) कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. सामान्यत: प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. काही लोक शुक्ल अष्टमीलाही हे व्रत करू शकतात. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म व्दारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते. अशा पापांना दूर करणारे. जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री गुरुदत्तांचे कृपा पात्र होऊ शकतात.

सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे.
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस (किंवा शुद्धाष्टमीस) “अनघाष्टमी” मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे.
ही अष्टमी ‘अघ म्हणजे पाप’ नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्तीहोते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो.

घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी.यानंतर स्नानकरुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे (आपल्या उजव्या हातास) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे (२ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे.
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा (व्रतसुत्र) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.)
यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥
या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.

श्री अनघाष्टमी व्रत
Tagged on:     

Leave a Reply

Don`t copy text!
%d bloggers like this: