अंगारकी / संकष्टी चतुर्थी व्रत

व्रत - पूजा - कथा Posted at 2018-11-26 18:17:08

अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत

प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी" असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन , रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे. " श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने , व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे. संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळी / रात्रो आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी , तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा प्रतिमा ) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाराने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे. पूजेत उपचार अर्पण करताना, लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरुपाय नम: म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नम: म्हणून पुष्प , सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फ़ळ , शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र , गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र , गजमुखाय नम: म्हणून धूप , मूषकवाहनाय नम: म्हणून दीप , विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर पूढील ध्यानमंत्र म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचे" ध्यान करावे. रक्तांग रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् दोर्भि: पाशांकुशेष्टा भयध्रुतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ध्यायेत् शांत्यर्थमीशं गणपतीममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥ नतंर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. मम समस्तविघ्ननिवृत्त्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थ चतुर्थीव्रतांगत्वेन यथा मीलोतोपचार द्रव्यै: षोडोपचारे पूजां करिष्ये ॥ असे म्हणावे. नंतर पुढे दिलेले " संकष्ट चतुर्थी महात्म्य " वाचावे. २१ मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी.  आरती झाल्यावर -  अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्याहीनं मया कृतम् । तत सर्व पूर्णतां यातु विप्ररुप गणेश्वर ॥  असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चन्द्रदर्शन करुन , चंद्राला अर्घ्य (पाणी) , गंध,अक्षता, फ़ूले वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नम:" म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावे. जेवणांत मोदक असावे,गोड पदार्थ असावेत, खारट आंबट पदार्थ नसावेत. [ चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.] जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करुन मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे. एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!" शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश " भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी " तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत " केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या. संकष्ट चतुर्थी ( अंगारकी संकष्ट चतुर्थी ) माहात्म्य -- श्रीगणेशाय नम: ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना । पाहताच पुरती मनकामना। भवबंधना तोडीतसे ॥१॥ अंगी चर्चित सिंदुर । जो का कृपेचा सागर । भक्तजनांचे माहेर। जो का साचार दीन बंधू ॥२॥ मूषकवाहनी बैसून। हस्ती त्रिशुळादि धारण । करीत विघ्नांचे छेदन । चरणी वंदन तयाच्या॥३॥ जो कं सद्‌गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचे दर्पण । प्रकाशविले आत्मज्ञान । केले समाधान जीवीचें ॥४॥ तयांचे कं न धरावे चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण। हरिले भान जगताचे ॥५॥ तया चरणी माझे मस्तक। जो कां त्रैलोक्याचा नायक । जेथें तो एक मी एक । पूज्यपूजक भाव असे॥६॥ जो यादवकुळीं जन्मोनी स्पष्ट। गोकुळवासी जनांचे कष्ट । हरॊनी केलें संतुष्ट। संहारिले दुष्ट कंसादी ॥७॥ जेणें केले कालियामर्दन। शुद्ध केले यमुना जीवन। तया कृष्ण चरणी माझे नमन । लागले ध्यान मनोभा ॥८॥ तया कृष्णाचे करितां स्मरण । काळ जाय मनी दडपोन । क्षमा दया शांती येवोन । पावती समाधान ते ठायीं ॥९॥ जैसा उदकावरी तरंग । पाहतां पाहतां पावे भंग । तैसा विघ्नांचा प्रसंग। निर्विघ्न सांग करितसे ॥१०॥ जैसी सागराची लहरीयेत जात एक सरी । तैसी संकते नाना परी । येतां निवारी गजवदन ॥११॥ तया गणपतीचे व्रत देख। आधी तिथीनिर्णय ऎक। जो का होय सुखदायक। चालती सकळिक जयारीती ॥१२॥ श्रावण कृष्णामाझारीं । तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी । चंद्रव्यापिनी असेल जरी । तरी व्रताते करावे॥१३॥ दोन्ही दिवस चंद्र व्यापिनी तिथी। असोनी पूर्व दिनी करिती। मातृविध्दा तयास म्हणती । आहे शास्त्र मत ऎसेची ॥१४॥ दुसर्‍यादिनी पंचमीयुक्त । चंद्र व्यापिनी चतुर्थी होत। तरी ते न करावी निश्चित । ऎसें शास्त्रात सांगितले ॥१५॥ तया दिनी काय करावे । पुढे सांगती स्कंद भावे । ते श्रोतेंजनी ऎकावे । व्रत आचरावे तयापरी ॥१६॥ ऋषी अवघे मिळोन ।प्रश्न करिती स्कंदालागूनी । दरिद्र शोक कष्ट नाशन। वैरीजन छ्ळ्ताती ॥१७॥ विद्या काही नसे जयासी । पुत्र न होय स्त्रीयांशी । ऎशा दु:खे पीडा जनांसी । दुर कैसी होय सांगा॥१८॥ ऎसा ऋषींचा ऎकुन प्रश्न । स्कंद पावला समाधान । जनकल्याण व्हावया लागून । तयासी वचन बोलतसे ॥१९॥ सुख प्राप्ती व्हावी सकळीकां । ऎसा उपाय सांगतॊ ऎका । संकष्टी व्रते गणनायका । भजतां होय निर्विघ्न॥२०॥ यथाविधी तया व्रतासी। आचरिता भक्ति भावेसीं । सकळ मनोरथ निश्चयेंसी । पूर्ण होतील तत्कालीक॥२१॥ हें व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत। संकटापासोनी व्हाया मुक्त। गांजिले जे कां पंडुसुत। तया अद्भुत निवेदिलें॥२२॥ पांडवांसी द्यूती जिंकून । कौरवें धाडिलें काननीं। तें दु:ख न साहे म्हणॊनी। सांगे कानीं धर्माच्या॥२३॥ धर्म, भींम, अर्जुन,नकुळ। सहदेव, द्रौपदी मिळोनी। व्रत चालविले अचळ। जेणें तळमळ दुर होय॥२४॥ द्वादश वर्षे अरण्यवास। पुढे एक वर्ष अज्ञातवास। तेथील हरावे संकटास। पुन्हा विपिनास न यावें॥२५॥ हा हेतु धरोनि मनी। करिते झाले व्रतालागूनी। श्रावण वद्य चतुर्थी दिनीं। आरंभ करुनी चालविलें॥२६॥ तया व्रते करोनी जाण । त्रयोदशअब्द पूर्ण नसोन। पुनरुपी अरण्य सेवन। गजाननें जाण दूर केलें॥२७॥ ऎसा व्रताचा महिमा जाण। कृष्णे सांगितला कोठून। तें करावे निवेदन। करविणे श्रवण आम्हां आधी॥२८॥ मग ऋषींचा प्रश्न ऎकोन। स्कंद सांगती तयालागुन। पार्वतीस हेरंब आपण। काय कारण सांगतसे॥२९॥ क्रुतयुगी हिमनगबाळा। टाकोनी निघाला शिवभोला। वियोगजन्य दु:ख ज्वाला। जाळील कळीकाळा वाटतसे॥३०॥ पार्वती झाली उदास। सोडिला सर्व विलास। द्रुढ धरिले वैराग्यास। लिहिले प्राक्तन काय हे॥३१॥ पतीने का केला कोप। काय अन्य जन्मीचे पाप। उभें राहिले आपोआप। मज मायबाप कोण तारी॥३२॥ काय मी चुकल्यें पतिव्रताधर्म। किंवा काय काढले वर्म। किंवा चुकले स्वधर्म। अवघा अधर्म चालविला॥३३॥ वचनाचा केला अनादर। ब्रह्मणा छळिलें निर्धार। घडला होता अनाचार। म्हणोनी मजवर कोप केला॥३४॥ काय भक्तांलांगी छळिलें।काय पूजेतें विध्वंसिले। काय गंगेतें निंदिलें। नंदिसी ताडिलें दंडाने॥३५॥ मुखानें नये रामनाम। अंगी धडाडला काम। ईश्वरीं नाहीं ठेविलें प्रेम। म्हणोनी सुखधाम हरपलें॥३६॥ नाहीं केली देव पूजा। उच्छेदिलें देवद्विजां। तेणें मनोभंग झाला माझा। म्हणोनीं दु:ख पावल्यें॥३७॥ काय विधूची केली निंदा । पन्नगासीं भोगविली आपदा । चिताभस्म लेपन अंगी सदा । हंसल्ये कदा तयासीं ॥ ३८ ॥ स्मशानीं असे सदा वास । गुंडाळिलें व्याघ्रांबरास । जाळुनि टाकिलें मदनास । धरिलें वैराग्यास म्हणवुनी ॥ ३९ ॥ श्वशुरगृहासी वास केला । तेव्हा मायबाप बोलिला । म्हणोनी चित्तीं क्रोध आला । जाऊनि लपला कपाटीं ॥ ४० ॥ ऎसे वदोनि वारंवार । नेत्रीं वाहे दु:खनीर । अंतरामाजी न टिके धीर । न सुचे व्यवहार करावया ॥ ४१ ॥ आतां सेवावें अरण्य । किंवा करावें देहपतन । किंवा तपालागीं जाऊन । घालूनि आसन बसावें ॥ ४२ ॥ पवन आणि चंदन । झोंबे अंगीं अग्निसमान । विधु तापवी देहालागुन । चंडकिरण माध्यान्हीचा ॥ ४३ ॥ वाटॆ मजला वैरी वसंत । सुमन सुवास उग्र भासत । कोकिळास्वर कर्णीं झोंबत । कर्कश काकवत दु:ख देती ॥ ४४ ॥ अग्नीमाजी होमावा काय । कोठें पाहूं पतिराय । काय घडला न कळे अन्याय । काय उपाय करावा ॥ ४५ ॥ धरणीवर अंग टाकी । कोण युक्ती सांगेल सखी । कैशी धुंडूं चतुर्दशलोकीं । हंसती न कीं मजलागीं ॥ ४६ ॥ ऎसी वियोगदु:खें करून । पोळली अंत:करणी जाण । वैराग्यसंपन्न तयालागून । गेली कानन सेवावया ॥ ४७ ॥ वल्कलें करूनि धारण । माथां जटा गुंडाळून । कुंकुम मळवट भरून । घालून आसनीं बैसली ॥ ४८ ॥ कांहीं दिवस वायु भक्षण । कांहीं दिवस फळें सेवन । कांहीं दिवस पर्णे जाण । सेवन दुर्वांचें ॥ ४९ ॥ कांहीं दिवस जलपान । कांहीं दिवस कंदमूळ भक्षण । कांहीं दिवस निराहार राहून । कांहीं सेवन करीना ॥ ५० ॥ कांहीं काळ ऊर्ध्व बाहू करून । कांहीं दिवस पंचाग्निसाधन।कांहीदिवसउभेराहून।नाहींशयनबहुकाल॥५१॥ ब्रह्मांडीं प्राण नेऊन । केलें हटायोगाचें साधन । आकर्षण करूनि मन । इंद्रिय दमन बहुकाळ ॥५२॥ राजयोग साधनीं । निमग्न राहे निशिदिनीं । रामनाममंत्रें करोनी । काल वनीं काढिला ॥ ५३ ॥ अष्टांगयोगाच्या साधनीं । देह झिजविला तपें करूनी । परी प्राणेश्वरालागूनीं । दया मनीं नयेचि ॥५४॥ जो भक्तीचा भुकेला । भावें करोनी बांधला गेला । तो हिमनगजेलागीं दुरावला । म्हणोनी झाला खेद चित्तीं ॥ ५५ ॥ आतां काय करावा उपाय । कैसा भेटेल पतिराय । चिंता करोनि झिजली काय ॥ झाली तन्मय वृत्ति ती ॥५६॥ तपें करूनि देह तापला । तीन्ही लोकीं कंप सुटला । इंद्र मनामाजीं दचकला । काय वर्तला अनर्थे ॥५७॥ ऎसें तीव्र तप स्त्रीनें केलें । नाहीं कोठें आयकिलें । शंकरें दर्शन नाहीं दिलें । तरी खचिलें वाटे ब्रह्मांड ॥५८॥ तों पाहिला नारदमुनी । पुसती झाली तयालागुनी । पूजन केलें स्वस्थमनीं । लागली चरणी तयाच्या ॥ ५९ ॥ इतुकियामाजी देवऋषी । पुसता झाला पार्वतीसी । तुझी दशा कां गे ऎसी । आलीस वनीं काय काजें ॥ ६०॥ शरीर झालें जर्जर । सेविलें कानन कां कठोर । पंचवदनाचा पडिला विचार । सांगे उत्तर लवलाहीं ॥ ६१ ॥ मग बोले शैलबाला । मी कांहीं अपराध न केला । परी पतीचा वियोग झाला । उपाय मजला सांगे आतां ॥ ६२॥ दरिद्र्यासी लाभतां चिंतामणि । मग हर्ष न माय गगनीं । तैसें झालें माझे मनीं । तुज नयनी देखतांचि ॥ ६३ ॥ बहूकाल सेविले कानन । तप केलें अनुदिन । परी मजला स्वामी अजून । भेटुनि नयन निवनीना ॥ ६४ ॥ आतां यत्‍न काय करू । मज सांगा जी निर्धारूं ॥ कोण्या कर्में परात्परू । होईल साचारू प्राप्त मज ॥ ६५ ॥ ऎसें बोलतां जगज्जननी । सुचला विचार एक मनीं । म्हणे गणपतीच्या व्रते करूनी । पावेल सदनीं शंकर ॥ ६६ ॥ म्हणें मातें ऎसे बोलतां देवर्षी । जगन्माता म्हणे सांग मजसीं । तो बोले मुनीं तियेसीं । गजाननासी पूजावें ॥ ६७ ॥ मग करूनी गणपती स्तवन । आणिलें मनामाजीं ध्यान । चतुर्भुज रक्तवर्ण । केलें चिंतन तयाचें ॥ ६८ ॥ विशाल दोंदाची शोभा । स्मरतां संकटासरसा उभा । मांड्या कर्दळीचा गाभा । नयन शोभा पद्मावरी ॥ ६९ ॥ माथां शेंदुर शोभत । रत्‍नजडित मुगुट झळकत । पायीं घागरिया वाजत । येत नाचत झडकरी ॥ ७० ॥ मग देउनीं आलिंगन । संतोषविलें तयाचें मन । कां माते सेविले कानन । संकट कवण पडियेलें ॥७१॥ काय काजा । कवणें गांजिला देह तुझा । कां केलासी धावा माझा । सांगे हितगुजा मजपाशीं ॥ ७२ ॥ ऎसें ऎकोनी वचनातें । सांगे पार्वती तयातें । पतीनें त्यागिलें मातें । सेविलें विपिनातें तयालगीं ॥ ७३ ॥ बहुत केलें तपाचरण । न सरे माझें पाप अजुन । वियोग दु:खें सरून । सुख संपादन न होय ॥ ७४ ॥ भेटी न होय माझी । म्हणोनी आस केली तुझी । आतां प्राणपती होय राजी । ऎसें आजी व्रत सांगे ॥ ७५ ॥ "माझे व्रत संपादन। करितां संकट जाय निरसुन । पूर्वी सांगितलें तिथिप्रमाण । मास पक्षजाण सत्य तोचि ॥ ७६ ॥ तया दिनीं व्रतारंभ । करितां भेटेल तुज सांब । पूजाविधान हेरंब । करीं अंबे संतोषें ॥ ७७ ॥ प्रात:काळी दंतधावन । मग करुनि माझे स्मरण । संकल्पें मातें प्रार्थून । व्रतस्थ जाण असावें ॥ ७८ ॥ आजी चंद्रोदयपर्यंत । मी राहोनि उपोषित । पूजन करीन एकचित्त । भोजनीं रत होईन पुढें ॥ ७९ ॥ ऎसी प्रार्थना करून । आंगासीं काळे तीळ लावून । स्नान नित्यनेमें सारून । उपोषित राहे जाण मग ॥८०॥ मोदक करावे एकविंशती । पांच अर्पावे देवाप्रती । पांचांचे वायन ब्राह्मणाहातीं । सेवीं निश्चिती शेष आपण ॥८१॥ धातु, पाषाण, मृत्तिका जाण । तयाची प्रतिमा करून । गणपती नामें तयाचें स्थापन । करील पावन सकळातें ॥ ८२ ॥ मग करावें आवाहन । मनीं आणोनि करावें ध्यान । षोडशोपचारें पूजन । सांग संपादन करावें ॥ ८३ ॥ अथर्वशीर्षाचे पाठ । एकविंशति करावे नीट । अक्षर वटिक म्हणोनि स्पष्ट । करावा संतुष्ट गजानन ॥ ८४॥ वस्त्र उपवस्त्रादि सकळ । चंदन, सिंदूर परिमळ । रूई-मांदार पुष्पें सकळ । दुर्वा कोमळ अर्पाव्या ॥ ८५ ॥ मज दुर्वांची अतिप्रीती । सहस्त्रनामें अर्पावे एकचित्तीं । जयाची असेल शुद्धमती । तोचि भक्ति करि ऎशी ॥ ८६ ॥ धूप-दीप-नैवेद्य जाण । मोदकादि करूनि पक्वान्न । समर्पूनि, उत्तरापोशन। करूनि, अर्पावा तांबूल ॥ ८७ ॥ मग ठेवी दक्षिणा फळ । प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ । चरणीं ठेवीं शिरकमळ । भावें केवळ प्रार्थावे ॥ ८८ ॥ चंद्रोदय झालियावरी । मग विधूची पूजा करी । अर्ध्य देउनी त्रिवारी । प्रार्थना करी विधूची ॥ ८९॥ मग पंचमोदक वायन । द्यावें ब्राह्मणालागून । दक्षिणा तांबूल समर्पून । करावें वंदन द्बिजातें ॥ ९० ॥ करूनि ब्राह्मण संतपर्ण । पात्री बैसावें आपण" । ऎसें सांगोनि विधान । गेला गजानन स्वस्थाना ॥ ९१ ॥ विनायकें सांगितलें मातेसी । कृष्णें विदित केलें पांडवांसीं । स्कंदें सांगितलें ऋषीश्वरांसीं । पावती कल्याणासीं सकळिक ॥९२॥ पार्वतीनें केलें व्रतासी । मनीं धरोनी निश्चयासी । करितां पावली पतीसीं । स्कंद ऋषींसीं सांगतसें ॥ ९३ ॥ पाहतां नयनीं पंचवदन । चरणीं लागली जाऊन । शिवें गिरिजा उचलोन । वामांकीं बैसवून तोषविली ॥ ९४ ॥ ऎसें व्रताचें महिमान । जाणती पंडुनंदन । स्वयें हिमनगजा आपण । पावली समाधान पतिसंगें ॥ ९५ ॥ हे व्रत जे कोणी करिती । दरिद्र, शोक, तयांचें जाती । केलें कष्ट फळ देती । वैरी सोडिती वैरभाव ॥ ९६ ॥ विद्या प्राप्त होईल जाणा । पूर्ण होईल मनकामना । निपुत्रिक पावेल संताना । पीडितजना सुख होय ॥ ९७ ॥ धन धान्यवृद्धी अमूप । हरपोनी जाईल पापताप । करितां नाममंत्राचा जप । आपेंआप मोक्ष लाधेल ॥९८॥ जयाचा शास्त्रावरी विश्वास । तोचि होईल निर्दोष । शांती दयेनें भरेल मानस । क्षमा ह्रदयास उपजेल ॥ ९९ ॥ असो आतां हा पाल्हाळ । अंगीं असावें भक्तीबळ । कृपा करील गिरिजाबाळ । श्रोतीं सकळ ऎकावें ॥ १०० ॥ ॥ श्री गजानना अर्प् मस्तु ॥

Search

Search here.