श्रीगुरुचरित्र अध्याय ३८ ते ४०

ग्रंथ - पोथी  > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 14:59:18
श्रीगुरुचरित्र अध्याय ३८ गुरुचरित्र अध्याय अडतिसावा श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी । विस्तारावें कृपेंसीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१॥ आर्त झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥२॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । तूं जें जें मज पुससी । संतोष होतो आम्हांसी । गुरुचरित्र आठवितां ॥३॥ तुजकरितां आम्हांसी । लाभ जोडे परियेसीं । आठवली कथा सुरसी । विचित्र एक झालें असे ॥४॥ मागें कथन सांगितलें । जें भक्तीं द्रव्य आणिलें । स्वामीं अंगीकार नाहीं केलें । समाराधना करावी म्हणोनि ॥५॥ नित्य समाराधना देख । करीत होते भक्त अनेक । कधीं नाहीं आराणूक । नाहीं ऐसा दिवस नाहीं ॥६॥ ऐसें होतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं । असे काश्यप-गोत्रेंसीं । नाम तया 'भास्कर ' ॥७॥ अति सुक्षीण ब्राह्मण । आला आपण दर्शना म्हणोन । साष्‍टांगीं नमस्कारुन । भक्तिपूर्वक विनविलें ॥८॥ ते दिवसीं भक्तजन । करीत होते आराधन । उठवितात तया ब्राह्मणा । भोजन करीं म्हणोनियां ॥९॥ संकल्प करोनि तो ब्राह्मण । श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण । सवें सोपस्कार घेऊन । आला होता परियेसा ॥१०॥ त्रिवर्गाच्या पुरते देखा । सवें असे तंडुल-कणिक । वरकड पदार्थ त्या पूर्तिका । सोपस्कार असे त्यापाशीं ॥११॥ सर्व असे वस्त्रीं बांधिलें । नेऊनि मठांत ठेविलें । भक्तें आणिक त्यासी बोलाविलें । गेला तो ब्राह्मण भोजनासी ॥१२॥ भोजन करितां झाली निशी । आपण आला मठासी । गांठोडी ठेवी आपुले उशीं । मग निद्रा करी देखा ॥१३॥ नित्य घडे ऐसेंचि त्यासी । भक्त लोक येती आराधनेसी । आराणूक नव्हे त्यासी । नित्य जेवी समाराधनीं ॥१४॥ समस्त त्यास हांसती । पहा हो समाराधनेची आयती । घेऊनि आला असे भक्तीं । आपण जेवी नित्य समाराधनीं ॥१५॥ एकासी नव्हे पुरें अन्न । श्रीगुरुशिष्य बहु जन । केवीं करील हा ब्राह्मण । समाराधना करीन म्हणतो ॥१६॥ लाज नये त्यासी कैसी । समाराधना म्हणायासी । दे कां स्वयंपाक आम्हांसी । तूं करीं आजि माधुकरी ॥१७॥ ऐसें नाना प्रकारें त्यासी । विनोद करिती ब्राह्मण परियेसीं । ऐशा प्रकारें तीन मासी । क्रमिले त्या ब्राह्मणें तेथेंचि ॥१८॥ नित्य होतसे आराधन । त्यांचे घरीं जेवी आपण । गांठोडी उशाखालीं ठेवून । निद्रा करी प्रतिदिवसीं ॥१९॥ मास तीन क्रमिल्यावरी । समस्त मिळोनि द्विजवरीं । परिहास करिती अपारी । श्रीगुरुमूर्तिं ऐकिलें ॥२०॥ बोलाविती त्या ब्राह्मणासी । आजि भिक्षा करावी आम्हांसी । स्वयंपाक करीं वेगेंसी । म्हणती श्रीगुरु कृपासिंधु ॥२१॥ ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । संतोष अपार द्विजा झाला । चरणावरी माथा ठेविला । हर्षे गेला आइतीसी ॥२२॥ आणिलें द्वय शेर घृत । शाका दोनी त्यापुरत । स्नान करुनि शुचिर्भूत । स्वयंपाक केला तये वेळीं ॥२३॥ समस्त ब्राह्मण तये वेळीं । मिळोन आले श्रीगुरुजवळी । म्हणती आजि आमुची पाळी । यावनाळ-अन्न घरीं ॥२४॥ नित्य होतें समाराधन । आम्ही जेवितों मिष्‍टान्न । कैंचा हा आला ब्राह्मण । आजि राहिली समाराधना ॥२५॥ श्रीगुरु म्हणती द्विजांसी । नका जाऊं घरांसी । शीघ्र जावें आंघोळीसी । येथेंचि जेवा तुम्ही आजि ॥२६॥ ब्राह्मण मनीं विचारिती । मठीं असे सामग्री आयती । स्वयंपाक आतां करविती । आम्हांसी निरोपिती याचिगुणें ॥२७॥ समस्त गेले स्नानासी । श्रीगुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी । शीघ्र करीं गा होईल निशी । ब्राह्मण अपार सांगितले ॥२८॥ स्वयंपाक झाला तत्क्षण । सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण । निरोप देती जा धांवोन । ब्राह्मण समस्त पाचारीं ॥२९॥ ब्राह्मण गेला गंगेसी । बोलावीतसे ब्राह्मणांसी । स्वामीनें बोलाविलें तुम्हांसी । शीघ्र यावें म्हणोनियां ॥३०॥ ब्राह्मण म्हणती तयासी । स्वयंपाक व्हावया होईल निशी । तुवां शीघ्र श्रीगुरुसी । भिक्षा करावी जाय वेगीं ॥३१॥ ऐसें ऐकोनि तो ब्राह्मण । गेला श्रीगुरुजवळी आपण । ब्राह्मण न येती ऐसें म्हणे । आपण जेवूं अपरात्रीं ॥३२॥ श्रीगुरु म्हणती तयासी । नेम असे आजि आम्हांसी । सहपंक्तीनें ब्राह्मणांसी । जेवूं आम्ही निर्धारीं ॥३३॥ ब्राह्मणांसहित आम्हांसी । जेवूं वाढीं गा तूं परियेसीं । जरी अंगीकार न करिसी । न जेवूं तुझे घरीं आम्ही ॥३४॥ ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल आपणासी । तोचि निरोप माझे शिरसीं । ब्राह्मणांसहित जेवूं वाढीन ॥३५॥ ब्राह्मण मनीं विचारी । श्रीगुरु असती पुरुषावतारी । न कळे बोले कवणेंपरी । आपुलें वाक्य सत्य करील ॥३६॥ मग काय करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । मज न येती ब्राह्मण । विनोद करिती माझ्या बोला ॥३७॥ श्रीगुरु आणिक शिष्यासी । निरोपिती जा वेगेंसीं । बोलावूनि आणीं ब्राह्मणांसी । भोजन करा म्हणोनि ॥३८॥ शिष्य गेला धांवत । समस्त ब्राह्मणांतें बोलावीत । स्नानें करोनि आले त्वरित । श्रीगुरु-मठाजवळिक ॥३९॥ श्रीगुरु निरोपिती तयांसी । पत्रावळी करा वेगेंसीं । जेवा आजि सहकुटुंबेसीं । ब्राह्मण करितो आराधना ॥४०॥ चारी सहस्त्र पत्रावळी । कराव्या तुम्हीं तात्काळीं । उभा होता ब्राह्मण जवळी । त्यासी स्वामी निरोपिती ॥४१॥ या समस्त ब्राह्मणांसी । विनंति करावी तुवां ऐसी । तुम्हीं यावें सहकुटुंबेसीं । आपण करितों आराधना ॥४२॥ श्रीगुरुचा निरोप घेऊन । विनवीतसे तो ब्राह्मण । द्विज म्हणती त्यासी हांसोन । काय जेवा म्हणतोस आम्हां ॥४३॥ आम्हां इतुके ब्राह्मणांसी । एकेक शित न ये वांटयासी । आमंत्रण सांगावया न लाजसी । नमस्कारितोसि घडीघडी ॥४४॥ वृद्ध ब्राह्मण ऐसें म्हणती । निंदा न करा श्रीगुरु ऐकती । जैसें श्रीगुरु निरोपिती । तैसें बोलतो ब्राह्मण ॥४५॥ हो कां बरवें बरवें म्हणती । सकळ पत्रावळी करिती । ब्राह्मण श्रीगुरुपूजा त्वरिती । करिता झाला उपचारें ॥४६॥ त्रिकरणपूर्वक करी भक्ति । बरवी केली मंगळारती । तेणें श्रीगुरु संतोषती । ठाय घाला म्हणती वेगें ॥४७॥ स्वयंपाक आणूनि आपणाजवळी । ठेवीं म्हणती तये वेळीं । आणोनियां तात्काळीं । श्रीगुरुजवळी ठेविला ॥४८॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आमुचें वस्त्र घेऊनि अन्नासी । झांकोनी ठेवीं आम्हांपाशीं । म्हणोनि वस्त्र देती तये वेळीं ॥४९॥ झांकिलें वस्त्र अन्नावरी । कमंडलुउदक घेऊनि करीं । श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळीं ॥५०॥ बोलावूनि म्हणती ब्राह्मणासी । उघडों नको अन्नासी । काढूनि नेऊनि समस्तांसी । वाढीं वेगीं म्हणोनियां ॥५१॥ तूप घालूनि घटांत । ओतूनि घे आणिकांत । वाढीं वेगीं ऐसें म्हणत । निरोप देती श्रीगुरु ॥५२॥ ठाय घातले समस्तांसी । वाढीतसे ब्राह्मण परियेसीं । लोक पहाती तटस्थेसीं । महदाश्चर्य म्हणताति ॥५३॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । वाढों लागा या द्विजासी । आणिक उठिले बहुतेसी । वाढूं लागले तये वेळीं ॥५४॥ भरोनि नेती जितुकें अन्न । पुनः मागुती परिपूर्ण । घृत भरलें असे पूर्ण । घट ओतूनि नेताति ॥५५॥ वाढिलें समस्त पंक्तीसी । सहपंक्तीं श्रीगुरुसी । जेवताति अतिहर्षी । द्विजवर पुसतसे ॥५६॥ जो जो मागाल तो पदार्थ । वाढूं वेगें ऐसें म्हणत । भागलेति क्षुधाक्रांत । क्षमा करणें म्हणतसे ॥५७॥ घृत असे आपुले करीं । वाढीतसे महापुरीं । विप्र म्हणती पुरे करीं । आकंठवरी जेविलों ॥५८॥ भक्ष्य परमान्न पत्रशाका । ब्राह्मण वाढिताति अनेका । शर्करा दधि लवणादिका । अनेक परी जेविले ॥५९॥ तृप्त जाहले ब्राह्मण देखा । हस्तप्रक्षालन करिती मुखा । उच्छिष्टें काढिती तात्काळिका । आश्चर्य म्हणती तये वेळीं ॥६०॥ तांबूलादि देती समस्तांसी । श्रीगुरु बोलावूनि तयांसी । बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रांसी । समस्त येऊनि जेवितील ॥६१॥ आलें विप्रकुळ समस्त । जेवून गेलें पंचामृत । श्रीगुरु मागुती निरापित । शूद्रादि ग्रामलोक बोलावा ॥६२॥ त्यांचे स्त्रियापुत्रांसहित । बोलावीं शीघ्र ऐसें म्हणत । पाचारितां आले समस्त । जेवूनि गेले तये वेळीं ॥६३॥ श्रीगुरु पुसती ब्राह्मणांसी । आतां कोण राहिले ग्रामवासी । ते सांगती स्वामियासी । अत्यंज आहेति उरले ॥६४॥ बोलावा त्या समस्तांसी । अन्न द्यावें वाढून त्यांसी । जितुकें मागती तृप्तीसी । तितुकें द्यावें अन्न वेगीं ॥६५॥ तेही तृप्त झाले देखा । प्राणिमात्र नाहीं भुका ।; सांगताति श्रीगुरुनायक । डांगोरा पिटा ग्रामांत ॥६६॥ कोणी असती क्षुधाक्रांत । त्यांसी बोलवावें त्वरित । ऐसें श्रीगुरु निरोपित । हिंडले ग्रामीं तये वेळीं ॥६७॥ प्राणिमात्र नाहीं उपवासी । सर्व जेवले परियेसीं । मग निरोपित त्या द्विजासी । भोजन तुवां करावें ॥६८॥ श्रीगुरुनिरोपें भोजन केलें । मागुति जाऊनि अन्न पाहिलें । आपण जितुकें होतें केलें । तितुकें उरलें असे अन्न ॥६९॥ श्रीगुरु म्हणती तयासी । घेऊनि जावें अन्न त्वरितेसीं । घालावें जळांत जळचरांसी । तृप्त होती तेही जीव ॥७०॥ ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्त्र चारी झाली मिति । भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥७१॥ इतुकें झालियावरी । श्रीगुरु त्या द्विजातें पाचारी । वर देती दरिद्र दुरी । पुत्रपौत्र होती तुज ॥७२॥ समस्त जाहले तटस्थ । देखिलें अति कौतुक म्हणत । अन्न केलें होतें किंचित । चारी सहस्त्र केवीं जेविले ॥७३॥ एक म्हणती श्रीगुरुकरणी । स्मरली असेल अन्नपूर्णी । अवतारपुरुष असे धणी । श्रीनृसिंहसरस्वती ॥७४॥ एक म्हणती अपूर्व देखिलें । पूर्वीं कथानक होतें ऐकिलें । पांडवाघरीं दुर्वास गेले । ऋषीश्वरांसमवेत ॥७५॥ सत्त्वभंग होईल म्हणोन । श्रीकृष्ण आला ठाकून । तेणें केलें अन्न पूर्ण । दुसरें आजि देखिलें ॥७६॥ नर दिसतो दंडधारी । सत्य त्रैमूर्ति-अवतारी । न कळे महिमा असे अपारी । म्हणती लोक अनेक ॥७७॥ यातें नर जे म्हणती । ते जाती अधोगतीं । वर्णावया नाहीं मति । म्हणती हाचि परब्रह्म ॥७८॥ नव्हे हा जरी ईश्वर । केवीं केलें अन्नपूर । होतें तीन अडीच शेर । चारी सहस्त्र जेविले केवीं ॥७९॥ आणिक एक नवल झालें । आम्हीं समस्तीं देखिलें । प्रेतातें जीव आणिलें । शुष्क काष्‍ठासी पल्लव ॥८०॥ आणिक ऐका याची महिमा । कोणासी देऊं आतां साम्या । कुमसीं होता त्रिविक्रमा । त्यासी दाखविलें विश्वरुप ॥८१॥ ग्रामांत होती वांझ महिषी । क्षीर काढविलें आपुले भिक्षेसी । वेद म्हणविले पतितामुखेंसी । अभिमंत्रितां श्रीगुरुमूर्तीं ॥८२॥ आणिक जाहलें एक नवल । कुष्‍ठी आला विप्र केवळ । दर्शनमात्रें झाला निर्मळ । आम्हीं देखिलें दृष्‍टीनें ॥८३॥ विणकरी होता एक भक्त । त्यासी दाखविला श्रीपर्वत । काशीक्षेत्र क्षण न लागत । एका भक्तासी दाखविलें ॥८४॥ आणिक अपार चरित्रता । अमित असे हो सांगतां । क्षितीवरी समस्त दैवतें । तयांचें नव्हे सामर्थ्य ॥८५॥ समस्त देवांतें आराधितां । आलास्यें होय मनकाम्यता । दर्शनमात्रें श्रीगुरुनाथा । सकळाभीष्टें होताति ॥८६॥ ऐसें म्हणती विप्रलोक । अपूर्व जाहलें कवतुक । ख्याति ऐकती समस्त देख । श्रीगुरुचें चरित्र ॥८७॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं । याचि निमित्य बहुवसीं । शिष्य जाहले श्रीगुरुचे ॥८८॥ नाना राष्‍ट्रींचे भक्त येती । श्रीगुरुची सेवा करिती । अंतःकरणीं एकचित्तीं । भजणारांसी प्रसन्न ॥८९॥ गंगाधराचा नंदन । सरस्वती विनवी नमून । ऐका तुम्ही समस्त जन । भजा भजा हो श्रीगुरुसी ॥९०॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतुः-सहस्त्रभोजनं नाम अष्‍टात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३८॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ --------------------------------------------------------------------- अध्याय ३९ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व वर्तलें ऐका । साठी वर्षे वांझेसी एका । पुत्र झाला परियेसा ॥१॥ आपस्तंब-शाखेसी । ब्राह्मण एक परियेसीं । शौनकगोत्र -प्रवरेसी । नाम तया 'सोमनाथ' ॥२॥ 'गंगा' नामें त्याची पत्‍नी । पतिव्रताशिरोमणि । वेदशास्त्रें आचरणी । आपण करी परियेसा ॥३॥ वर्षें साठी झालीं तिसी । पुत्र नाहीं तिचे कुशीं । वांझ म्हणोनि ख्यातेसी । होती तया गाणगापुरीं ॥४॥ पतिसेवा निरंतर । करी भक्तिपुरस्सर । नित्य नेम असे थोर । गुरुदर्शना येत असे ॥५॥ नीरांजन प्रतिदिवसीं । आणोनि करी श्रीगुरुसी । येणेंपरी बहुत दिवसीं । वर्तत होती परियेसा ॥६॥ ऐसें असतां वर्तमानीं । संतुष्‍ट झाले श्रीगुरुमुनि । पृच्छा करिती हांसोनि । तया द्विजस्त्रियेसी ॥७॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । काय अभीष्‍ट असे मानसीं । आणित्येसी प्रतिदिवसीं । नीरांजन परोपरी ॥८॥ तुझ्या मनींची वासना । सांगे त्वरित विस्तारुन । सिद्धि पाववील नारायण । गौरीरमण गुरुप्रसादें ॥९॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । करी साष्‍टांगीं नमन । विनवीतसे कर जोडून । ' अपुत्रस्य लोको नास्ति' ॥१०॥ पुत्राविणें स्त्रियांसी । पाहों नये मुखासी । पापरुपी महादोषी । म्हणती मातें स्वामिया ॥११॥ जिचे पोटीं नाहीं बाळ । तिचा जन्म निर्फळ । वाट पाहती उभयकुळ । बेचाळीस पितृलोकीं ॥१२॥ पितृ चिंतिती मनांत । म्हणती एखादी सती वंशांत । पुत्र व्यालिया आम्हां हित । तो उद्धरील सकळांतें ॥१३॥ पुत्राविणें जें घर । तें सदा असे अघोर । अरण्य नाहीं त्यासी दूर । 'यथारण्य तथा गृह' ॥१४॥ नित्य गंगास्नानासी । आपण जात्यें परियेसीं । घेऊनि येती बाळकांसी । समस्त स्त्रिया कवतुकें ॥१५॥ कडे घेऊनियां बाळा । खेळविताति स्त्रिया सकळा । तैसें नाहीं माझे कपाळा । मंदभाग्य असें देखा ॥१६॥ जळो माझें वक्षस्थळ । कडे घ्यावया नाहीं बाळ । जन्मोनियां संसारीं निष्फळ । नव्हें पुरुष अथवा सती ॥१७॥ पुत्रपौत्र असती जयांसी । परलोक साधे तयांसी । अधोगति निपुत्रिकासी । लुप्तपिंड होय स्वामिया ॥१८॥ आतां पुरे जन्म मज । साठी वर्षें जाहलीं सहज । आम्हां आतां वर दीजे । पुढें उत्तम जन्म होय ॥१९॥ पुत्रवंती व्हावें आपण । अंतःकरण होय पूर्ण । ऐसा वर देणें म्हणोन । विनवीतसे तये वेळीं ॥२०॥ ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । पुढील जन्म जाणेल कवण । तूतें स्मरण कैंचें सांग ॥२१॥ नित्य आरति आम्हांसी । भक्तिपूर्वक भावेंसीं । करितां जाहलों संतोषी । कन्या-पुत्र होतील तुज ॥२२॥ इहजन्मीं तूतें जाण । कन्या पुत्र सुलक्षण । होतील निगुतीं म्हणोन । श्रीगुरु म्हणती तियेसी ॥२३॥ श्रीगुरुवचन ऐकोनि । पालवीं गांठी बांधी ज्ञानी । विनवीतसे कर जोडूनि । ऐका स्वामी कृपासिंधु ॥२४॥ साठी वर्षें जन्मासी । जाहलीं स्वामी परियेसीं । होत नाहीं विटाळसी । मातें कैंचे पुत्र होती ॥२५॥ नाना व्रत नाना तीर्थ । हिंडिन्नल्यें पुत्रार्थ । अनेक ठायीं अश्वत्थ- । पूजा केली स्वामिया ॥२६॥ मज म्हणती सकळै जन । करीं वो अश्वत्थप्रदक्षिणा । तेणें पुरतील मनकामना । होतील पुत्र म्हणोनि ॥२७॥ अश्वत्थसेवा बहुकाळ । करितां माझा जन्म गेला । विश्वास म्यां बहु केला । होतील पुत्र म्हणोनि ॥२८॥ साठी वर्षें येणेंपरी । कष्‍ट केले अपरांपरी । सेवा करित्यें अद्यापिवरी । अश्वत्थाची प्रदक्षिणा ॥२९॥ पुत्र न होती इह जन्मीं । पुढें होतील ऐसे कामीं । सेवा करितसें स्वामी । अश्वत्थाची परियेसा ॥३०॥ आतां स्वामी प्रसन्न होसी । इहजन्मीं पुत्र देसी । अन्यथा नोहे बोलासी । तुमच्या स्वामी नरहरी ॥३१॥ स्वामींनीं दिधला मातें वर । माझे मनीं हा निर्धार । हास्य न करी स्वामी गुरु । शकुनगांठी बांधिली म्यां ॥३२॥ पुढील जन्म-काम्यासी । करित्यें सेवा अश्वत्थासी । स्वामी आतांचि वर देसी । इहजन्मीं कन्या-पुत्र ॥३३॥ अश्वत्थसेवा बहु दिवस । करितां झाले मज प्रयास । काय देईल आम्हांस । अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें ॥३४॥ ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । अश्वत्थसेवा महापुण्य । वृथा नोहे परियेसा ॥३५॥ निंदा न करीं अश्वत्थासी । अनंत पुण्य परियेसीं । सेवा करीं वो आम्हांसरसी । तूतें पुत्र होतील ॥३६॥ आतां आमचे वाक्येंकरी । नित्य जावें संगमातीरीं । अमरजा वाहे निरंतरीं । भीमरथीसमागमांत ॥३७॥ तेथें अश्वत्थ असे गहन । जातों आम्ही अनुष्‍ठाना । सेवा करीं वो एकमनें । आम्हांसहित अश्वत्थाची ॥३८॥ अश्वत्थाचें महिमान । सांगतसें परिपूर्ण । अश्वत्थनाम-नारायण । आमुचा वास तेथें असे ॥३९॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे ते अंगना । अश्वत्थवृक्षाचें महिमान । स्वामी मातें निरोपावें ॥४०॥ कैसी महिमा असे त्यासी । स्वामी सांगावें मजसी । स्थिर होईल माझें मानसी । सेवा करीन भक्तीनें ॥४१॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी । महिमा असे अपार त्यासी । समस्त देव तेथें वसती ॥४२॥ अश्वत्थाचें महिमान । असे ब्रह्मांडपुराणीं निरुपण । नारदमुनीस विस्तारोन । ब्रह्मदेवानें सांगितलें ॥४३॥ ब्रह्मकुमर नारदमुनि । नित्य गमन त्रिभुवनीं । ब्रह्मयासी पुसोनि । आला ऋषि-आश्रमासी ॥४४॥ नारदातें देखोनि । अर्घ्यपाद्य देवोनि । पूजा केली उपचारोनि । पुसते झाले तयेवेळीं ॥४५॥ ऋषि म्हणती नारदासी । विनंति एक परियेसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । विस्तारावें स्वामिया ॥४६॥ ऋषिवचन ऐकोनि । सांगता जाहला नारदमुनि । गेलों होतों आजिचे दिनीं । ब्रह्मलोकीं हिंडत ॥४७॥ आपण पुसे स्वभावेंसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । समस्त मानिती तयासी । विष्णुस्वरुप म्हणोनियां ॥४८॥ ऐसा वृक्ष असे जरी । सेवा करणें कवणेपरी । कैसा महिमा सविस्तारीं । निरोपावें स्वामिया ॥४९॥ ब्रह्मा सांगे आम्हांसी । अश्वत्थमुळीं आपण वासी । मध्यें वास ह्रुषीकेशी । अग्रीं रुद्र वसे जाणा ॥५०॥ शाखापल्लवीं अधिष्‍ठानीं । दक्षिण शाखे शूलपाणि । पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी । आपण उत्तरे वसतसें ॥५१॥ इंद्रादि देव परियेसीं । वसती पूर्वशाखेसी । इत्यादि देव अहर्निशीं । समस्त शाखेसी वसती जाणा ॥५२॥ गोब्राह्मण समस्त ऋषि । वेदादि यज्ञ परियेसीं । समस्त मूळांकुरेसी । असती देखा निरंतर ॥५३॥ समस्त नदीतीर्थें देखा । सप्त-सागर लवणादिका । वसती जाणा पूर्व शाखा । ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा ॥५४॥ अ-कारशब्द मूळस्थान । स्कंध शाखा उ-कार जाण । फळ पुष्प म-कारवर्ण । अश्वत्थमुख अग्निकोणीं असे ॥५५॥ एकादश रुद्रादिक । अष्‍ट वसु आहेत जे का । जे स्थानीं त्रैमूर्तिका । समस्त देव तेथें वसती ॥५६॥ ऐसा अश्वत्थनारायण । महिमा वर्णावया शक्त कवण । कल्पवृक्ष याचि कारण । ब्रह्मा म्हणे नारदासी ॥५७॥ नारद सांगे ऋषेश्वरांसी । त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं । काय महिमा सांगों त्यासी । भजतां काय सिद्धि नोहे ? ॥५८॥ ऐसें ऐकोनि समस्त ऋषि । विनविताति नारदासी । आचारावया विधि कैसी । कवणें रीतीनें भजावें ॥५९॥ पूर्वीं आम्हीं एके दिवसीं । पुसिलें होतें आथर्वणासी । त्याणें सांगितलें आम्हांसी । अश्वत्थसेवा एक रीतीं ॥६०॥ तूं नारद ब्रह्मऋषि । समस्त धर्म ओळखसी । विस्तार करोनि आम्हांसी । विधिपूर्वक निरोपावें ॥६१॥ नारद म्हणे मुनिवरा । त्या व्रताचिया विस्तारा । सांगेन ऐका तत्परा । विधान असे ब्रह्मवचनीं ॥६२॥ आषाढ-पौष-चैत्रमासीं । अस्तंगत गुरुशुक्रेसीं । चंद्रबळ नसते दिवसीं । करुं नये प्रारंभ ॥६३॥ याव्यतिरिक्त आणिक मासीं । बरवे पाहोनियां दिवसीं । प्रारंभ करावा उपवासीं । शुचिर्भूत होऊनि ॥६४॥ भानुभौमवारेसीं । आतळूं नये अश्वत्थासी । भृगुवारीं संक्रांतिदिवसीं । स्पर्शूं नये परियेसा ॥६५॥ संधिरात्रीं रिक्तातिथीं । पर्वणीसी व्यतीपातीं । दुर्दिनादि वैधृतीं । अपराण्हसमयीं स्पर्शूं नये ॥६६॥ अनृत-द्यूतकर्मभेषीं । निंदा-पाखांड-वर्जेसीं । प्रातर्मौनी होवोनि हर्षीं । आरंभावें परियेसा ॥६७॥ सचैल स्नान करुनि । निर्मळ वस्त्र नेसोनि । वृक्षाखालीं जाऊनि । गोमयलिप्त करावें ॥६८॥ स्वस्तिकादि शंखपद्मेसीं । घालावी रंगमाळा परियेसीं । पंचवर्ण चूर्णेसीं । भरावें तेथें पद्मांत ॥६९॥ मागुती स्नान करुनि । श्वेत वस्त्र नेसोनि । गंगा यमुना कलश दोनी । आणोनि ठेवणें पद्मांवरी ॥७०॥ पूजा करावी कलशांसी । पुण्याहवाचनकर्मेंसीं । संकल्पावें विधींसीं । काम्यार्थ आपुलें उच्चारावें ॥७१॥ मग कलश घेवोनि । सात वेळां उदक आणोनि । स्नपन करावें जाणोनि । अश्वत्थ वृक्षासी अवधारा ॥७२॥ पुनरपि करुनियां स्नान । मग करावें वृक्षपूजन । पुरुषसूक्त म्हणोन । पूजा करावी षोडशोपचारें ॥७३॥ मनीं ध्यावी विष्णुमूर्ति । अष्‍टभुजा आहेति ख्याती । शंख-चक्र-वरद-हस्तीं । अभय-हस्त असे जाणा ॥७४॥ खड्ग-खेटक एके करीं । धनुष्य-बाण सविस्तारीं । अष्‍टभुजी येणेंपरी । ध्यावा विष्णु नारायण ॥७५॥ पीतांबर पांघरुण । सदा लक्ष्मी-सन्निधान । ऐसी मूर्ति ध्याऊन । पूजा करणें वृक्षासी ॥७६॥ त्रैमूर्तीचें असें स्थान । शिवशक्तीविणें नाहीं जाण । समस्तांतें आवाहनोन । षोडशोपचारें पूजावें ॥७७॥ वस्त्रें अथवा सुतेसीं । वेष्टावें तया वृक्षासी । पुनरपि संकल्पेसीं । प्रदक्षिणा कराव्या ॥७८॥ मनसा-वाचा-कर्मणेसीं । भक्तिपूर्वक भावेंसीं । प्रदक्षिणा कराव्या हर्षीं । पुरुषसूक्त म्हणत देखा ॥७९॥ अथवा सहस्त्रनामेंसीं । कराव्या प्रदक्षिणा हर्षीं । अथवा कराव्या मौन्येंसीं । त्याचें फळ अमित असे ॥८०॥ चाले जैसी स्त्री गर्भिणी । उदककुंभ घेउनी । तैसे मंद गतींनीं । प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें ॥८१॥ पदोपदीं अश्वमेध । पुण्य जोडे फळप्रद । प्रदक्षिणासमाप्तमध्य । नमस्कार करावा ॥८२॥ ब्रह्महत्यादि पापांसी । प्रायश्चित्त नाहीं परियेसीं । प्रदक्षिणा द्विलक्षांसीं । ब्रह्महत्या पाप जाय ॥८३॥ त्रिमूर्ति वसती जया स्थानीं । फल काय सांगूं प्रदक्षिणीं । समस्त पापा होय धुणी । गुरुतल्पादि पाप जाय ॥८४॥ नाना व्याधि हरती दोष । प्रदक्षिणा करितां होय सुरस । कोटि ऋण असे ज्यास । परिहरत परियेसा ॥८५॥ जन्म मृत्यु जरा जाती । संसारभय नाश होती । ग्रहदोष बाधों न शकती । सहस्त्र प्रदक्षिणा केलिया ॥८६॥ पुत्रकाम्य असे ज्यासी । त्यातें फल होय भरंवसीं । मनोवाक्कायकर्मेंसीं । एकोभावें करावें ॥८७॥ चतुर्विध पुरुषार्थ । देता होय तो अश्वत्थ । पुत्रकाम्य होय त्वरित । न करा अनुमान ऋषी हो ॥८८॥ शनिवारीं वृक्ष धरोनि । जपावें मृत्युंजय-मंत्रानीं । काळमृत्यु जिंकोनि । राहती नर अवधारा ॥८९॥ त्यासी अपमृत्यु न बाधती । पूर्णायुषी होती निश्चितीं । शनिग्रह न पीडिती । प्रार्थावें अश्वत्थासी ॥९०॥ शनिनाम घेवोनि । उच्चारावें आपुले जिव्हेनीं । बभ्रु-पिंगळ म्हणोनि । कोणस्थ-कृष्ण म्हणावें ॥९१॥ अंतक-यम-महारौद्री । मंद-शनैश्वर-सौरि । जप करावा येणेंपरी । शनिपीडा न होय ॥९२॥ ऐसें दृढ करोनि मना । अश्वत्थ सेवितां होय कामना । पुत्रकाम्य तत्क्षणा । होय निरुतें अवधारा ॥९३॥ अमावस्या-गुरुवारेंसी । अश्वत्थछाया-जळेंसीं । स्नान करितां नरासी । ब्रह्महत्या पाप जाय ॥९४॥ अश्वत्थतळीं ब्राह्मणासी । अन्न देतां एकासी । कोटि ब्राह्मणां परियेसीं । भोजन दिल्हें फळ असे ॥९५॥ अश्वत्थतळीं बैसोन । एकदां मंत्र जपतां क्षण । फळें होतील अनेकगुण । वेदपठण केलियाचें ॥९६॥ नर एखादा अश्वत्थासीं । स्थापना करी भक्तींसीं । आपुले पितृ-बेचाळिसी । स्वर्गीं स्थापी परियेसा ॥९७॥ छेदितां अश्वत्थवृक्षासी । महापाप परियेसीं । पितृसहित नरकासी । जाय देखा तो नर ॥९८॥ अश्वत्थातळीं बैसोन । होम करितां महायज्ञ । अक्षय सुकृत असे जाण । पुत्रकाम्य त्वरित होय ॥९९॥ ऐसा अश्वत्थमहिमा । नारदाप्रति सांगे ब्रह्मा । म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम । तया नारदापासोनि ॥१००॥ नारद म्हणे ऋषेश्वरासी । प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं । हवन करावें विशेषीं । आगमोक्त विधानपूर्वक ॥१॥ हवनाचे दहावे अंशीं । ब्राह्मणभोजन करावें हर्षीं । ब्रह्मचर्य हविष्यान्नेंसीं । व्रत आपण करावें ॥२॥ येणेंपरी आचरोन । मग करावें उद्यापन । शक्त्यनुसार सौवर्ण । अश्वत्थवृक्ष करावा ॥३॥ तो द्यावा ब्राह्मणासी । विधिपूर्वक परियेसीं । श्वेतधेनु सवत्सेंसीं । ब्राह्मणातें दान द्यावी ॥४॥ वृक्षातळीं तिळराशी । करावी यथानुशक्तीसीं । श्वेतवस्त्र झांकोनि हर्षीं । सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें ॥५॥ ऐसें अश्वत्थविधान । सांगे नारद ऋषिजना । येणेंपरी आचरोन । सकळाभीष्‍ट लाधले ॥६॥ श्रीगुरु म्हणती वांझ सतीसी । अश्वत्थमहिमा आहे ऐसी । भावभक्ति असे ज्यासी । त्यातें होय फलश्रुति ॥७॥ आचार करीं वो येणेंपरी । संशय अंतःकरणीं न धरीं । वृक्ष असे भीमातीरीं । जेथें अमरजासंगम ॥८॥ तेंचि आमुचें असे स्थान । सेवा करीं वो एकोमनें । होईल तुझी मनकामना । कन्या पुत्र तुज होतील ॥९॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी ते अंगना । विनवीतसे कर जोडूनि । भावभक्तीकरोनियां ॥११०॥ आपण वांझ वर्षें साठी । कैंचे पुत्र आपुले पोटीं । वाक्य असे तुमचें शेवटीं । म्हणोनि आपण अंगीकारीन ॥११॥ गुरुवाक्य म्हणजे कामधेनु । ऐसें बोलती वेदपुराण । आतां नाहीं अनुमान । करीन सेवा स्वामिया ॥१२॥ चाड नाहीं अश्वत्थासी । निर्धार तुमचे बोलासी । सेवा करीन तुमची ऐसी । म्हणोनि चरणीं लागली ॥१३॥ ऐसा निरोप घेवोनि । जावोनि वनिता संगमस्थानीं । षट्‌कूलांत न्हाऊनि । सेवा करी अश्वत्थाची ॥१४॥ श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । तैसी सेवा करी ते नारी । येणेंपरी तीन रात्रीं । आराधिलें परियेसा ॥१५॥ श्रीगुरुसहित अश्वत्थासी । पूजा करितां तिसरे दिवसीं । स्वप्न जाहलें तियेसी । सांगेन ऐका एकचित्तें ॥१६॥ स्वप्नामध्यें विप्र एक । येवोनि देतो तिसी भाक । काम्य झालें तुझें ऐक । सांगेन एक करीं म्हणे ॥१७॥ जाऊनि गाणगापुरांत । तेथें असे श्रीगुरुनाथ । प्रदक्षिणा करीं हो सात । नमन करीं तूं भक्तींसीं ॥१८॥ जें काय देतील तुजसी । भक्षण करीं वो वेगेंसीं । निर्धार धरुनि मानसीं । त्वरित जावें म्हणे विप्र ॥१९॥ ऐसें देखोनि सुषुप्तींत । सवेंचि झाली ते जागृत । कल्पवृक्ष असे अश्वत्थ । कल्पिलें फळ त्वरित होय ॥१२०॥ सेवा करुनि चवथे दिवशीं । आली आपण मठासी । प्रदक्षिणा करुनि हर्षीं । नमन केलें तये वेळीं ॥२१॥ हांसोनियां श्रीगुरुमुनि । फळें देती तिसी दोनी । भक्षण करीं वो संतोषोनि । काम्य झालें आतां तुझें ॥२२॥ भोजन करीं वो तूं आतां त्वरित । काम्य होईल तुझें सत्य । कन्या-पुत्र दोघे तूतें । दिल्हे आजि परियेसा ॥२३॥ पारणें करोनि विधीसीं । मग भक्षावें या फलांसी । दान द्यावें ब्राह्मणांसी । जें काय पूर्वीं निरोपिलें ॥२४॥ व्रत संपूर्ण करोनि । केलें दान ते भामिनीं । तेचि दिवशीं अस्तमानी । झाली आपण विटाळशी ॥२५॥ मौन दिवस तीनवरी । भोजन करी हिरवे खापरीं । श्वेत वस्त्र नेसोनि नारी । कवणाकडे न पाहेचि ॥२६॥ येणेंपरी तिन्ही निशी । क्रमिल्या नारीनें परियेसीं । सुस्नात होवोनि चवथे दिवशीं । आली श्रीगुरुचे दर्शना ॥३७॥ पतीसमवेत येऊनि । पूजा करी ती एकाग्रमनीं । श्रीगुरु म्हणती संतोषोनि । पुत्रवंती व्हावें तुम्हीं ॥२८॥ ऐसें नमूनि श्रीगुरुसी । आली आपुल्या मंदिरासी । ऋतु दिधला पांचवे दिवसीं । म्हणोनि कन्या परियेसा ॥२९॥ येणेंपरी ते नारी । जाहली ऐका गरोदरी । ग्राम सकळ विस्मय करी । काय नवल म्हणतसे ॥१३०॥ म्हणती पहा नवल वर्तलें । वांझेसी गर्भधारण केवीं झालें । सोमनाथ विप्र भले । करीतसे आनंद ॥३१॥ सातवे मासीं ओटी भरिती । अक्षय वाणें ओंवाळिती । श्रीगुरुसी विनोदावरी प्रीति । वाणें देवविती कौतुकें ॥३२॥ आठवे मासीं तो ब्राह्मण । करी सीमंतविधान । गुरुनिरोपें संतोषोन । देती वाणें ग्रामांत ॥३३॥ अभिनव करिती सकळही जन । म्हणती वांझेसी गर्भधारण । पांढरे केश म्हातारपण वाणें देती कौतुकें ॥३४॥ एक म्हणती श्रीगुरुप्रसाद । श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद । त्याची सेवा करितां आनंद । लाधे चारी पुरुषार्थ ॥३५॥ त्रैमूर्तींचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । भक्तजनां मनोहर प्रगटला भूमंडळीं ॥३६॥ ऐसें नानापरी देखा । स्तोत्र करिती गुरुनायका । वाणें देत ते बालिका । अत्योल्हास तिच्या मनीं ॥३७॥ वाणें देऊनि समस्तांसी । येऊनि नमी ती श्रीगुरुसी । भक्तवत्सल परियेसीं । अशीर्वचन देतसे ॥३८॥ संतोषोनि विप्रवनिता । करी साष्‍टांग दंडवता । नानापरी स्तोत्र करितां । विनवीतसे परियेसा ॥३९॥ जय जया परमपुरुषा । तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा । तुझें वाक्य जाहलें परीस । सुवर्ण केला माझा देह ॥१४०॥ तूं तारावया विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । त्रैमूर्ति तूंचि होसी । अन्यथा नव्हे स्वामिया ॥४१॥ तुझी स्तुति करावयासी । अशक्य आपुले जिव्हेसी । अपार तुझ्या महिमेसी । नाहीं साम्य कृपासिंधु ॥४२॥ येणेंपरी स्तोत्र करुनि । श्रीगुरुचरण वंदूनि । गेली निरोप घेऊनि । आपुले गृहा परियेसा ॥४३॥ ऐसे नवमास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । समस्त ज्योतिषी येवोनि । वर्तविती जातकातें ॥४४॥ ज्योतिषी म्हणती तये वेळीं । होईल कन्या मन निर्मळी । अष्‍टपुत्रा वाढेल कुळी । पुत्रपौत्रीं नांदेल ॥४५॥ येणेंपरी ज्योतिषीं । जातक वर्तविलें परियेसीं । सोमनाथ आनंदेंसीं । दानधर्म करिता जाहला ॥४६॥ दहा दिवस क्रमोनि । सुस्नात झाली ते भामिनी । कडिये बाळक घेवोनि । आली श्रीगुरुदर्शनासी ॥४७॥ बाळक आणोनि भक्तींसीं । ठेविलें श्रीगुरुचरणापाशीं । नमन करी साष्‍टांगेंसीं । एकभावेंकरोनियां ॥४८॥ आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति । उठीं बाळे पुत्रवंती । बहुतपरी संतोषविती । प्रेमभावेंकरोनियां ॥४९॥ उठोनि विनवी ती श्रीगुरुसी । पुत्र नाहीं आमुचे कुशीं । सरस्वती आली घरासी । बोल आपुला सांभाळावा ॥१५०॥ ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । न करीं मनीं अनमान । तूतें पुत्र होईल ॥५१॥ म्हणोनि तिये कुमारीसी । कडिये घेती प्रीतींसीं । सांगताति समस्तांसी । तये कन्येचें लक्षण ॥५२॥ पुत्र होतील बहु इसी । होईल आपण शतायुषी । पुत्राचे पौत्र नयनेंसीं । पाहील आपण अहेवपणें ॥५३॥ होईल इसी ज्ञानी पति । त्यातें चारी वेद येती । अष्‍टैश्चर्यें नांदती । प्रख्यात होवोनि भूमंडळीं ॥५४॥ आपण होईल पतिव्रता । पुण्यशील धर्मरता । इची ख्याति होईल बहुता । समस्ता इसी वंदिती ॥५५॥ दक्षिणदेशीं महाराजा । येईल इचे दर्शनकाजा । आणिक पुत्र होईल तुज । म्हणोनि श्रीगुरु बोलती ॥५६॥ येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । कन्यालक्षण सांगती । विप्रवनिता विनयवृत्तीं । म्हणे पुत्र व्हावा मज ॥५७॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । पुत्र व्हावा तुज कैसी । योग्य पाहिजे वर्षें तीसी । अथवा शतायुषी मूर्ख पैं ॥५८॥ ऐकोनि श्रीगुरुच्या वचना । विनवीतसे ते अंगना । योग्य पाहिजे पुत्र आपणा । तयासी पांच पुत्र व्हावे ॥५९॥ भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । वर देती तेणें रीतीं । संतोषोनि घरा जाती । महानंद दंपतीसी ॥१६०॥ पुढें तिसी पुत्र झाला । वेदशास्त्रीं विख्यात भला । पांच पुत्र तो लाधला । नामकरणी श्रीगुरुचा ॥६१॥ कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती । निरोपिलें होतें जेणें रीतीं । प्रख्यात झाली सरस्वती । महानंद प्रवर्तला ॥६२॥ यज्ञ करी तिचा पति । प्रख्यात नाम 'दीक्षिती' । चहूं राष्‍ट्रीं त्याची ख्याती । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥६३॥ साठी वर्षें वांझेसी । पुत्र जाहला परियेसीं । सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कृपा श्रीगुरुची ॥६४॥ निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षणीं । एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥६५॥ म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्‍ट लाधे तुम्हां ॥६६॥ जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं । त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥६७॥ गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु । जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥१६८॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ----------------------------------------------------------- अध्याय ४० श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष होता काष्ठ शुष्का । विचित्र कथा ऐक पा ॥१॥ गाणगापुरी असता श्रीगुरु । आला एक कुष्ठी द्विजवरु । आपस्तंब भार्गवगोत्रु । नाम तयाचे नरहरि ॥२॥ येवोनिया श्रीगुरुमूर्तीसी । नमन करी भक्तीसी । करी स्तोत्र बहुवसी । करसंपुट जोडोनिया ॥३॥ जय जयाजी गुरुमुर्ति । ऐकोनि आलो तुझी कीर्ति । भक्तवत्सला परंज्योती । परमपुरुषा जगद्गुरु ॥४॥ आपण जन्मोनि संसारी । वृथा झालो दगडापरी । निंदा करिताती द्विजवरी । कुष्ठी म्हणोनि स्वामिया ॥५॥ वाचिला वेद यजुःशाखा । निंदा करिताती माझी लोका । ब्राह्मणार्थी न सांगती देखा । अंगहीन म्हणोनिया ॥६॥ प्रातःकाळी उठोनि लोक । आफती माझे मुख । तेणे होते मनात दुःख । जन्म पुरे आता मज ॥७॥ पाप केले आपण बहुत । जन्मांतरी असंख्यात । तेणे हा भोग भोगित । आता न साहे स्वामिया ॥८॥ नाना तीर्थ नाना व्रत । हिंडोनि आलो आचरत । म्या पूजिले देव समस्त । माझी व्याधि न वचेची ॥९॥ आता धरोनि निर्धारु । आलो स्वामीजवळी जगद्गुरु । तुझा न होता कृपावरु । प्राण आपुला त्यजीन ॥१०॥ म्हणोनिया निर्वाणेसी । विनवीतसे श्रीगुरूसी । एकभावे भक्तीसी । करुणा भाकी द्विजवर ॥११॥ म्हणोनि मागुती नमस्कारी । नानापरी स्तुति करी । लोहपरिसा भेटीपरी । तुझ्या दर्शनमात्रेसी ॥१२॥ करुणावचनी ऐकोनि । भक्तवत्सल श्रीगुरु मुनि । निरोप देती कृपा करोनि । ऐक शिष्या नामधारका ॥१३॥ श्रीगुरु म्हणती द्विजासी । पूर्वजन्मी महादोषासी । तुवा केले बहुवसी । म्हणोनि कुष्ठी झालास ॥१४॥ आता सांगेन ते करी । तुझी पापे जाती दुरी । होशील दिव्यशरीरी । एकभावे आचरावे ॥१५॥ इतुकिया अवसरी । काष्ठ एक औदुंबरी । शुष्क होते वर्षे चारी । घेवोनि आले सर्पणासी ॥१६॥ ते देखिले श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती । एकभावे करोनि चित्ती । घेई काष्ठ झडकरी ॥१७॥ काष्ठ घेवोनि संगमासी । त्वरित जाय भावेसी । संगमनाथपूर्वभागेसी । भीमातीरी रोवी पा ॥१८॥ तुवा जावोनिया संगमात । स्नान करोनिया त्वरित । पूजा करोनि अश्वत्थ । पुनरपि जाय स्नानासी ॥१९॥ हाती धरोनिया कलश दोनी । आणी उदक तत्क्षणी । शुष्क काष्ठा वेळ तिन्ही । स्नपन करी मनोभावे ॥२०॥ ज्या दिवसी काष्ठासी । पर्णै येतील संजिवेसी । दोष गेले तुझे परियेसी । अंग तुझे होय बरवे ॥२१॥ येणेपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रासी निरोप देती । विश्वास झाला त्याचे चित्ती । धावत गेला काष्ठाजवळी ॥२२॥ काष्ठ उचलोनि डोईवरी । घेवोनि आला भीमातीरी । संगमेश्वरासमोरी । रोविता झाला द्विजवर ॥२३॥ जेणे रीती श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती । आचरतसे एकचित्ती । भावभक्ति करोनिया ॥२४॥ येणेपरी सात दिवस । द्विजे केले उपवास । तया काष्ठा दोनी कलश । भरोनि घाली वेळोवेळी ॥२५॥ देखोनि म्हणती सकळजन । तया विप्रा बोलावोन । सांगताती विवंचून । गुरुनिरोपलक्षण ॥२६॥ म्हणती तूते काय झाले । शुष काष्ठ का रोविले । याचे तुवा संजीवन योजिले । मग तूते काय होय ॥२७॥ याते तू सजीव करिसी । मागुती काय येतीपल्लव यासी । ऐसे पाहिले नाही भूमिसी । श्रीगुरूची इच्छा कळेना ॥२८॥ श्रीगुरुमूर्ति क्रुपासिंधु । भक्तजना असे वरदु । त्याची कृपा असे अगाधु । समस्ताते कृपा करी ॥२९॥ नसेल निष्कृति तुझिया पापा । म्हणोनि दिधले काष्ठ बापा । वाया कष्ट करिसी का पा । तूते श्रीगुरूंनी निरोपिले ॥३०॥ ऐकोनि तयांचे वचन । विप्रवर करी नमन । गुरुवाक्य मज कामधेनु । अन्यथा केवी होईल ॥३१॥ सत्यसंकल्प श्रीगुरुनाथ । त्याचे वाक्य न होय मिथ्य । माझे मनी निर्धार सत्य । होईल काष्ठ वृक्ष जाणा ॥३२॥ माझ्या मनी निर्धारु । असत्य न होय वाक्यगुरु । प्राण वेचीन साचारु । गुरुवाक्य कारण आपणा ॥३३॥ येणेपरी समस्तांसी । विप्र सांगे परियेसी । सेवा करितो भक्तीसी । तया शुष्क काष्ठासी ॥३४॥ एके दिवशी गुरुमूर्तीसी । शिष्य सांगती परियेसी । स्वामींनी निरोपिले द्विजासी । शुष्क काष्ठा भजे म्हणोनि ॥३५॥ सात दिवस उपवासी । सेवा करितो काष्ठासी । एकभावे भक्तीसी । निर्धार केला गुरुवचनी ॥३६॥ किती रीती आम्ही त्यासी । सांगितले सर्व हितासी । वाया का गा कष्ट करिसी । मूर्खपणे म्हणोनि ॥३७॥ विप्र आम्हाते ऐसे म्हणे । चाड नाही काष्ठाविणे । गुरुवाक्य मजकारणे । करील आपुले बोल साच ॥३८॥ निर्धार धरोनि मानसी । सेवा करितो काष्ठासी । सात दिवस उपवासी । उदक मुखी घेत नाही ॥३९॥ ऐकोनि शिष्यांचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण । जैसा असे भाव अंतःकरण । तैसी सिद्धि पावेल ॥४०॥ गुरुवाक्य शिष्यासी कारण । सर्वथा न होय निर्वाण । जैसे भक्ताचे अंतःकरण । तैशी सिद्धि पावेल ॥४१॥ याकारणे तुम्हांसी । सांगेन कथा इतिहासी । सांगे सूत ऋषीश्वरांसी । स्कंदपुराणी परियेसा ॥४२॥ गुरुभक्तीचा प्रकार । पुसती सूतासी ऋषीश्वर । सांगे सूत सविस्तर । तेचि कथा सांगतसे ॥४३॥ सूत म्हणे ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति असे विशेषी । तारावया संसारासी । आणिक नाही उपाय ॥४४॥ अयोग्य अथवा ज्ञानवंत । म्हणोनि न पाहिजे अंत । गुरुमूर्ति मनी ध्यात । सेवा करणे भक्तिभावे ॥४५॥ दृढ भक्ति असे जयापासी । सर्व धर्म साधती त्यासी । संदेह न धरावा मानसी । एकचित्ते भजावे ॥४६॥ श्रीगुरु नर ऐसा न म्हणावा । त्रैमूर्ति तोचि जाणावा । गुणदोष न विचारावा । म्हणावा तोचि ईश्वर ॥४७॥ येणेपरी धरोनि मनी । जे जे भजती श्रीगुरुचरणी । प्रसन्न होय शूलपाणि । तात्काळिक परियेसा ॥४८॥ श्लोक ॥ मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरौ । यादृशी भावनां कुर्यात्‍ सिद्धिर्भवति तादृशी ॥४९॥ टीका ॥ मंत्रतीर्थद्विजस्थानी । देवभक्ती औषधगुणी । गुरूसी पाहे शिवसमानी । भाविल्यासारखे फल होय ॥५०॥ म्हणे सूत ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी । सांगेन साक्ष तुम्हांसी । अपूर्व एक वर्तलेसे ॥५१॥ पूर्वी पांचाल नगरात । होता राजा सिंहकेत । तयासी होता एक सुत । नाम तयाचे धनंजय ॥५२॥ एके दिवसी राजसुत । गेला पारधीसी अरण्यात । तेथे नसती मनुष्यमात्र । उदकवर्जित स्थळांसी ॥५३॥ राजकुमार तृषाक्रांत । हिंडतसे अरण्यात । संगे होत शबरसुत । श्रमले बहुत अवधारा ॥५४॥ तेथे एक शबरसुत । हिंडत होता वनात । देखता झाला अवचित । जीर्ण एक शिवालय ॥५५॥ भिन्नलिंग तया स्थानी । पडिले होते मेदिनी । शबरे घेतले उचलोनि । म्हणे लिंग बरवे असे ॥५६॥ हाती घेवोनि लिंगासी । पहात होता शबर हर्षी । राजसुत तया संधीसी । आला तया जवळिक ॥५७॥ राजकुमार म्हणे तयासी । भिन्न लिंग काय करिसी । पडिली असती भुमीसी । लिंगाकार अनेक ॥५८॥ शबर म्हणे राजसुताते । माझ्या मनी ऐसे येते । लिंगपूजा करावयाते । म्हणोन घेतले परियेसा ॥५९॥ ऐकोनि तयाचे वचन । राजपुत्र सुहास्यवदन । म्हणे पूजी एकमने । लिंग बरवे असे सत्य ॥६०॥ ऐसे म्हणता राजकुमार । तयासी करी नमस्कार । कोण विधि पूजाप्रकार । निरोपावे म्हणतसे ॥६१॥ तुवा व्हावे माते गुरु । मी तव असे शबरु । नेणे पूजेचा प्रकारु । विस्तारावे म्हणतसे ॥६२॥ राजपुत्रे म्हणे तयासी । न्यावा पाषाण घरासी । पूजा करावी भक्तीसी । पत्रपुष्पे अर्चोनिया ॥६३॥ दंपत्ये दोघेजण । पूजा करणे मने पूर्ण । हेचि लिंग गिरिजारमण । म्हणोनि मनी निर्धारी पा ॥६४॥ नानापरी पुष्पजाती । आणाव्या तुवा शिवाप्रती । धूप दीप नैवेद्य आरती । नैवेद्यासी भस्म जाण ॥६५॥ भस्म असेल जे स्मशानी । आणावे तुवा प्रतिदिनी । द्यावा नैवेद्य सुमनी । प्रसाद आपण भक्षावा ॥६६॥ आणिक जे जे जेवी आपण । तोही द्यावा नैवेद्य जाण । ऐसे आहे पूजाविधान । म्हणोनि सांगे राजकुमारु ॥६७॥ येणेपरी राजकुमारु । तया शबरा झाला गुरु । विश्वासे केला निर्धारु । शबरे आपुले मनात ॥६८॥ संतोषोनि शबर देखा । नेले लिंग गृहांतिका । स्त्रियेसी सांगे कौतुका । म्हणे लिंग प्रसन्न झाले ॥६९॥ गुरुनिरोप जेणे रीती । पूजा करीन एकचित्ती । चिताभस्म अतिप्रीती । आणोनि नैवेद्या देतसे ॥७०॥ क्वचित्काळ येणेपरी । पूजा करी शबरशबरी । एके दिवशी तया नगरी । चिताभस्म न मिळेचि ॥७१॥ हिंडोनि पाहे गावोगावी । चिताभस्म न मिळे काही । येणेपरी सात गावी । हिंडोनि आला घरासी ॥७२॥ चिंता लागली शबरासी । पुसता झाला स्त्रियेसी । काय करू म्हणे तिसी । प्राण आपुला त्यजीन म्हणे ॥७३॥ पूजा राहिली लिंगासी । भस्म न मिळे नैवेद्यासी । हिंडोनि आलो दाही दिशी । चिताभस्म न मिळेचि ॥७४॥ जैसे गुरूंनी आज्ञापिले । त्या विधीने पाहिजे अर्चिले । नाही तरी वृथा गेले । शिवपूजन परियेसा ॥७५॥ गुरूचे वाक्य जो न करी । तो पडेल रौरवघोरी । तयाते पाप नाही दूरी । सदा दरिद्री होय नर ॥७६॥ त्यासी होय अधोगति । अखंड नरकी तया वस्ती । जो करी गुरूची भक्ति । तोचि तरेल भवार्णवी ॥७७॥ सकळ शास्त्रे येणेपरी । बोलताती वेद चारी । याचि कारणे ऐक हो शबरी । प्राण आपुला त्यजीन ॥७८॥ ऐकोनि पतीचे वचन । बोले शबरी हासोन । चिंता करिता किंकारण । चिताभस्म देईन मी ॥७९॥ मज घालोनि गृहांत । अग्नि लावा तुम्ही त्वरित । काष्ठे असती बहुत । दहन करा आपणासी ॥८०॥ तेचि भस्म ईश्वरासी । उपहारावे तुम्ही हर्षी । व्रतभंग न करावा भरवसी । संतोषरूपे बोलतसे ॥८१॥ कधी तरी शरीरासी । नाश असे परियेसी । ऐसे कार्यकारणासी । देह आपुला समर्पीन ॥८२॥ ऐकोनि स्त्रियेचे वचन । शबर झाला मनी खिन्न । प्राणेश्वरी तुझा प्राण । केवी घ्यावा म्हणतसे ॥८३॥ रूपे दिससी रतीसरसी । अद्यापि तू पुर्ववयासी । पुत्रअपत्य न देखिलेसी । या संसारासी येउनी ॥८४॥ मन नाही तुझे धाले । संसारसुख नाही देखिले । तुझे मातापित्याने मज निरविले । प्राणप्रिया रक्ष म्हणोनि ॥८५॥ चंद्रसूर्यसाक्षीसी । तुज वरिले म्या संतोषी । प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी । घेवोनि आलो मंदिरात ॥८६॥ आता दहन करिता तूते । घडती पापे असंख्याते । स्त्रीहत्या महादोषाते। केवी करू म्हणतसे ॥८७॥ तू माझी प्राणेश्वरी । तूते मारू कवणेपरी । कैसा तुष्टेल त्रिपुरारि । पुण्य जावोनि पाप घडे ॥८८॥ दुःखे तुझी मातापिता । माते म्हणती स्त्रीघाता । अजूनि तुझी लावण्यता । दिसतसे प्राणप्रिये ॥८९॥ नाना व्रते नाना भक्ति । या शरीरालागी करिती । दहन करू कवणे रीती । पापे माते घडतील ॥९०॥ ऐकोनि पतीचे वचन । विनवीतसे सती आपण । कैसे असे तुम्हा अज्ञान । मिथ्या बोल बोलतसा ॥९१॥ शरीर म्हणे स्वप्नापरी । जैसा फेण गंगेवरी । स्थिर न राहे क्षणभरी । मरणे सत्य परियेसा ॥९२॥ आमुचे मायबापे जाण । तुम्हा दिधले माते दान । तुमची अर्धांगी मी पूर्ण । भिन्नभावना कोठे दिसे ॥९३॥ मी म्हणजे तुमचा देहे । विचार करोनि मनी पाहे । आपुले अर्ध शरीर आहे । काय दोष दहन करिता ॥९४॥ जे जे उपजे भूमीवरी । ते ते नाश पावे निर्धारी । माझे देहसाफल्य करी । ईश्वराप्रती पावेल ॥९५॥ संदेह सोडोनि आपणासी । दहन करी वो वेगेसी । आपण होवोनि संतोषी । निरोप देते परियेसा ॥९६॥ नानापरी पतीसी । बोधी शबरी परियेसी । घरात जावोनि पतीसी । म्हणे अग्नि लावी आता ॥९७॥ संतोषोनि तो शबर । बांधिता झाला गृहाचे द्वार । अग्नि लाविता थोर । ज्वाळा व्यापिती गगनासी ॥९८॥ दहन झाले शबरीसी । भस्म घेतले परियेसी । पूजा करोनि शिवासी । नैवेद्य दिधला अवधारा ॥९९॥ पूजा करिता ईश्वरासी । आनंद झाला बहुवसी । स्त्री दिधली हुताशी । स्मरण ऐसे त्यास नाही ॥१००॥ ऐसी भक्तिभावेसी । पूजा केली महेश्वरासी । प्रसाद घेवोनि हस्तेसी । पाचारिले स्त्रियेते ॥१॥ जैसी पूजा नित्य करोन । प्रसाद हाती घेऊन । आपुले स्त्रियेते बोलावून । देत असे तो शबर ॥२॥ तया दिवसी त्याचपरी । आपल्या स्त्रियेते पाचारी । कृपासागरी त्रिपुरारि । प्रसन्न झाला परियेसा ॥३॥ तेचि शबरी येवोनि । उभी ठेली सुहास्यवदनी । घेतला प्रसाद मागोनि । घेवोनि गेली घरात ॥४॥ जैसे तैसेचि घर दिसे । शबर विस्मय करीतसे । म्हणे दग्ध केले स्त्रियेसरिसे । घर कैसे दिसताहे ॥५॥ बोलावोनि स्त्रियेसी । शबर पुसतसे तियेसी । दहन केले मी तुजसी । पुनरपि कैसी आलीस ॥६॥ शबरी सांगे पतीसी । आपणास आठवण आहे ऐसी । अग्नि लाविता घरासी । निद्रिस्थ झाल्ये परियेसा ॥७॥ महाशीते पीडित । आपण होत्ये निद्रिस्थ । तुमचे बोल ऐकोन सत्य । उठोनि आल्ये परिय्सा ॥८॥ हे होईल देवकरणी । प्रसन्न झाला शूलपाणि । ऐसे म्हणता तत्क्षणी । निजस्वरूपी उभा ठाकला ॥९॥ नमन करिती लोटांगणी । धावोनि लागती दोघे चरणी । प्रसन्न झाला शूलपाणि । मागा वर म्हणतसे ॥११०॥ होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी । गति होईल त्यानंतरी । कल्पकोटि स्वर्गवास ॥११॥ येणेपरी ऋषीश्वरांसी । सूत सांगे विस्तारेसी । गुरुचरणी विश्वास असे ज्यासी । तैसे फळ होय जाणा ॥१२॥ म्हणोनि श्रीगुरु शिष्यासी । सांगते झाले परियेसी । विश्वासे करोनि द्विज हर्षी । शुष्क काष्ठ सेवितसे ॥१३॥ जैसा भाव तैसी सिद्धि । होईल सत्य हे त्रिशुद्धि । श्रीगुरुनाथ कृपानिधि । सहज निघाले संगमासी ॥१४॥ जावोनि करिती अनुष्ठान । पहावया येती ते ब्राह्मण । देखोनि त्याचे अंतःकरण । प्रसन्न झाले तत्क्षणी ॥१५॥ होता कमंडलु करकमळी । भरला सदा गंगाजळी । उचलोनिया हस्तकमळी । घालिती उदक काष्ठासी ॥१६॥ तेचि क्षणी काष्ठासी । पल्लव आले परियेसी । औंदुबर वृक्ष जनासी । दिसतसे समस्ता ॥१७॥ जैसा चिंतामणिस्पर्श । सुवर्ण करी लोहास । तैसा श्रीगुरु सुधारस । काष्ठ झाला औदुंबर ॥१८॥ काष्ठ दिसे औदुंबर । सुदेही झाला तो विप्र । दिसे सुवर्णकांति नर । गेले कुष्ठ तात्काळी ॥१९॥ संतोषोनि द्विजवर । करी साष्टांग नमस्कार । करिता झाला महास्तोत्र । श्रीगुरूचे तये वेळी ॥१२०॥ श्लोक ॥ इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् । नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् । गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२१॥ मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् । आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम् । सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२२॥ चित्तजादिवर्गषट्‍कमत्तवारणांकुशम् । तत्त्वसारशोभितात्मदत्त-श्रियावल्लभम् । उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२३॥ व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् । कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् । कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२४॥ पुंडरीक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् । चंडुदुरितखंडनार्थ - दंडधारि-श्रीगुरुम् । मंडलीकमौलि-मार्तंडभासिताननं । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२५॥ वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् । नादबिंदुकलातीत-कल्पपादसेव्ययम् । सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२६॥ अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्टज्ञानवारिधिम । कृष्णावेणितीरवासपंचनदीसंगमम् । कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२७॥ नारसिंहसरस्वती-नामअष्टमौक्तिकम् । हारकृत्यशारदेन गंगाधर आत्मजम् । धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितम् । परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥२८॥ नारसिंहसरस्वतीय-अष्टकं च यः पठेत् । घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् । सारज्ञानदीर्घआयुरारोग्यादिसंपदम् । चारुवर्गकाम्यलाभ, वारंवारं यज्जपेत ॥२९॥ स्तोत्र केले येणेपरी । आणिक विनवी परोपरी । म्हणे देवा श्रीहरी । कृपा केली स्वामिया ॥१३०॥ म्हणोनि मागुती नमस्कारी । श्रीगुरुनाथ अभयकरी । उठविता झाला अवधारी । ज्ञानराशि म्हणोनिया ॥३१॥ समस्त लोक विस्मय करिती । श्रीगुरूते नमस्कारिती । नानापरी स्तोत्रे करिती । भक्तिभावेकरोनिया ॥३२॥ मग निघाले मठासी । समस्त शिष्यादि द्विजांसरसी । ग्रामलोक आनंदेसी । घेऊनि येती आरत्या ॥३३॥ जावोनि बैसती मठात । शिष्यांसहित श्रीगुरुनाथ । समाराधना असंख्यात । झाली ऐका ते दिनी ॥३४॥ तया विप्रा बोलावोनि । सद्गुरु म्हणती संतोषोनि । कन्यापुत्रगोधनी । तुझी संतति वाढेल ॥३५॥ तुझे नाम योगेश्वर । आम्ही ठेविले निर्धार । समस्त शिष्यांमाजी थोर । तूचि आमुचा भक्त जाण ॥३६॥ वेदशास्त्री संपन्न । तुझ्या वंशोवंशी जाण । होतील पुरुष निर्माण । म्हणोनि देती निरोप ॥३७॥ श्रीगुरु म्हणती तयासी । जावोनि आणि कलत्रासी । तुम्ही रहावे आम्हापासी । येचि ग्रामी नांदत ॥३८॥ म्हणोनि तया द्विजासी । श्रीगुरु मंत्र उपदेशी । विद्यासरस्वती या मंत्रासी । उपदेशिले परियेसा ॥३९॥ तूते होतील तिघे सुत । एकाचे नाव योगी विख्यात । आमुची सेवा करील बहुत । वंशोवंशी माझे दास ॥१४०॥ जैसे श्रीगुरूंनी निरोपिले । तयापरी त्यासी झाले । म्हणोनि सिद्धे सांगितले । नामधारकशिष्यासी ॥४१॥ म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार । उतरावया पैल पार । कथा ऐका एकचित्ते ॥४२॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । कुष्ठी उद्धरिला भक्त । गुरुमहिमा अत्यद्‍भुत । प्रकट झाला येणेपरी ॥१४३॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शुष्ककाष्ठसंजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

Search

Search here.