श्री गुरुचरित्र अध्याय २९ ते ३४

ग्रंथ - पोथी  > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 15:00:05
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस चौथा अध्याय २९ ते ३४ ।।श्री गणेशाय नमः ।। अध्याय २९ वा भस्म माहात्म्य - ब्रह्मराक्षसाचा उद्धार ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, "पूर्वी त्रिविक्रमभारतींनी श्रीगुरुंना भस्म माहात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी त्रिविक्रमभारतीला काय सांगितले ? ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रमभारतीला म्हणाले, मी तुला आता भस्म माहात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृह-गृहिणी-विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंचवनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहानभुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता. वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला, परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाही. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले, त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान-भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, "स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा." वामदेवांनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? या अरण्यात का हिंडतोस ? " राक्षस म्हणाला, " स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पाप-पुण्यकर्मे मला चांगली आठवत आहेत." वामदेव म्हणाले, "तुला पंचवीस जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर , तू कोणकोणती पापे केलीस होतीस ?ते सविस्तर सांग." राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली. राक्षस म्हणाला, "पंचविसाव्या जन्मापूर्वी मी यवन राजा होतो. मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो. मी रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे. रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो. मी सधवा, विधवा, कुमारी, रजस्वला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला व त्यांच्याशी कुकर्म केले. अशारीतीने विषयभोग आसक्त झालेल्या, मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी अनेक रोग झाले. मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. शेवटी, माझ्या कुकर्मानें मला मृत्यू आला. जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते, त्याला अपयश येते. भाग्य क्षीण होते. तो अत्यंत दुर्गतीला जातो. त्याचे पितरसुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात. मृत्यूनंतर मला यमलोकात नेले. तेथे मला भयंकर अशा नरककुंडात टाकले. हजारो वर्षे मी तेथे पडून होतो. त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचे फळ म्हणून मला यमाने पिशाच्च योनीत जन्म दिला. हजारो वर्षे अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो. यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो.तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, पाचव्यात सरडा झालो. सहाव्या जन्मी कुत्रा, सातव्या जन्मी कोल्हा, आठव्यात गवा, नवव्यात मी वानर झालो. तेराव्या जन्मी बगळा झालो, चौदाव्या जन्मी रानकोंबडा. त्यानंतर गिधाड. मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो. अठराव्या जन्मी मी कासव झालो. त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो. बाविसाव्या जन्मी मी रानहत्ती झालो. त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला. त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो. तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो. मी तुम्हाला पकडले, पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले. तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात. आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. या भस्माचे केवढे हे माहात्म्य !" त्यावर वामदेव म्हणाले, "माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे. भगवान शिवशंकर या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात, एवढा या भस्माचा मान आहे. याचे माहात्म्य विशेष ते काय सांगणार ? पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची तुला कल्पना येईल." वामदेव कथा सांगू लागले, पूर्वी द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगांनी व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते. तो एका हीन जातीतील स्त्रीच्या नादी लागला. त्याने तिच्याशी विवाह केला. तो इतर स्त्रियांशीसुद्धा व्यभिचार करीत असे. तो चोऱ्या करून पोट भरीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले ? एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजाअर्चा करीत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मात लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राह्मणाच्या प्रेताला लागले. त्याचक्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पहिले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, "त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले होते. त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की, जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे. यमलोकांत नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की, "ज्यांनी जाणते-अजाणतेपणे भस्म लावले आहे, ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते. रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते." वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, "माझी पूर्वपुण्याई थोर म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राह्मणांच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती.माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्ताने यमाकडे केली होती व 'पंचविसाव्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल' असे भविष्य वर्तविले होते. ते पुण्य आज फळाला आले. आता या भस्माचा विधी कसा करायचा, हे भस्म कसे लावावयाचे हे सर्व मला सांगा." राक्षसाने अशी विनंती केली असता वामदेव म्हणाले, "ऐक. पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देव, ऋषी, यक्ष, किन्नर, विद्याधर यांच्यासमवेत बसले होते. त्यावेळी सनतकुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, "पवित्र अशा गोमयाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्यांची राख करावी. तेच भस्म, नंतर ते शिवगायत्रीने (ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।।) अभिमंत्रित करावे. त्यावेळी अग्निरीति भस्म. इत्यादी मंत्र म्हणावेंत. संद्योजात० या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे. मग ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबक० या मंत्राने भस्म भाळी लावावे. त्र्यायुषे० या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे. भस्म लावताना तर्जनी व करंगळी वापरू नये. कपाळावर दोन बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जाळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्ष्यभक्षण इयादी महापातकेसुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात. भस्मधारक पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थांत स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सर्व सुखे यांचा लाभ होतो. त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व त्याला मान देतात. शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो. तेथून ब्रह्मलोक व वैकुंठलोक येथें अनंतकाळ वास्तव्य करून तो कैलासलोकी जातो. त्याला सायुज्यमुक्ती प्राप्त होते." भगवान शंकरांनी केलेले हे भस्मनिरुपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. हे भस्ममाहात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला. त्याने वामदेवांना विनंती केली, "स्वामी, माझा उद्धार करा." मग दयाघन वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले. त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले. त्याचक्षणी त्याला दिव्यदेह प्राप्त झाला. मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लोकास गेला. हे भस्ममाहात्म्य सांगून श्रीगुरूनृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीला म्हणाले, "वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते. जगाच्या उद्धारासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते. त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी सार्धम्य असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे." हे ऐकून अतिशय आनंदित झालेल्या त्रिविक्रमभारतींनी श्रीगुरूनृसिंहसरस्वतींना सद्गदित होऊन नमस्कार केला. श्री गुरूंचा जयजयकार करीत तें स्वस्थळी निघून गेले. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'भस्म माहात्म्य - ब्रह्मराक्षसाचा उद्धार' नावाचा अध्याय एकोणतिसावा समाप्त. ============================== अध्याय ३० वा विधवेचा शोक - ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, "स्वामी, सिद्धमुनी, तुमचा जयजयकार असो. तुम्हीच संसारसागर तारक आहात. तुम्हीच अज्ञानरुपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात. तुमच्या कृपारुपी नौकेने मला तारून नेले आहे. तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात, त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली. तुम्ही मला श्रीगुरूचरित्ररुपी विपुल अमृतरस पाजलात. तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही. तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकणार नाही. अहो सिद्धमुनी, तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वतींनी एका पतिताकडून चारही वेद वदविलेत. त्रिविक्रमभारतीला ज्ञानोपदेश केला हे सर्व तुम्ही मला पूर्वीच सांगितले आहे. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस.तुझ्यावर श्रीगुरुची पूर्ण कृपा आहे. तू हा भवसागर पार केला आहेस. श्रीगुरुंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खरोखर श्रीगुरुमहिमा अत्यंत गहन आहे. मी एकेक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल. तरीसुद्धा तुला मी काही कथा सारांशरूपाने सांगतो." श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती. अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्रीगुरुंना भेटावयास येत असत. श्रीगुरुंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत. दरिद्री लोक श्रीमंत होत. वंध्य स्त्रीला पुत्रलाभ होत असे. श्रीगुरुंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे. अंधाला दृष्टी लाभत असे. बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे. असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे. अनेक आर्त दुःखी-कष्टी, पीडित लोकांच्या कामना श्रीगुरुंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत. त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही श्रीदत्तात्रेयांची उपासना करीत असत. त्या दोघांचे दुर्दैव असे की, त्यांना झालेला मुलगा जगत नसे. काही दिवसांनी त्यांना श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव 'दत्त' असे ठेवले. एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे. पाचव्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली. बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला. त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती. ती आपल्या सासूसासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे. ती मोठी पतिव्रता होती. सुस्वभावी होती. दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत असत. विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला. अनेक औषोधोपचार केले, नवससायास केले; पण कशाचा काही उपयोग होत नव्हता. रोग बळावत चालला होता. त्याच्या पत्नीने व आई-वडिलांनी श्रीदत्तात्रेयांचा धावा केला. श्रीदत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता. असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते. शेवटी वैद्य म्हणाले, "आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल. आपल्या हातात काही नाही." वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई-वडील शोक करीत श्रीदत्तगुरूंचा धावा करू लागले, "हे जगन्नाथा. दत्तात्रेया, आम्ही तुझी आराधना केली, त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास. आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र ! हा जगला-वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू." आई-वडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, "खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी; पण आज दुर्दैवाने तुम्हांलाच माझी सेवा करावी लागत आहे. पण आपण काय करणार ? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना हेच खरे!" तो आपल्या पत्नीला म्हणाला,"आता माझे काही खरे नाही ! तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस, गतजन्मी तू माझी ऋणी असावीस.तें ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस. तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको. तू तुझ्या आई-वडिलांकडे जा. तेथे तरी तुला सुख मिळेल. माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्याही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा." हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली. ती म्हणाली, "तुम्ही असे का म्हणता? तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन." मग ती शोक करीत असलेल्या सासू-सासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली, "तुम्ही कसलीही काळजी करू नका. धीर सोडू नका. माझे पती नक्की वाचतील. गाणगापुरास स्वामी श्रीनृसिंहसरस्वती आहेत. ते त्रैमूर्तींचा अवतार आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील,अशी माझी श्रद्धा आहे. मी यांना घेऊन तिकडे जाते." सासू-सासऱ्यांनी होय-नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली. मग त्या पतिव्रतेने सासू-सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसवून मोठ्या प्रयासाने ती गाणगापुरास आली. ती एका धर्मशाळेत उतरली. तिने श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले आहेत असे लोकांनी तिला सांगितले. तिने श्रीगुरुंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरविले. आपल्या पतीसही सोबत घेऊन जावे असा विचार करून तिने डोलीत पहिले तो काय? तिचा पती गतीप्राण झालेला होता. ते पाहताच तिला ब्रह्माण्ड आठवले. तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. जीव देण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले. लोक तिचे सांत्वन करू लागले, पण तिचा शोक काही थांबेना, "अरे देवा, हे काय झाले ? मी मोठ्या आशेने येथे आले, पण माझी पूर्ण निराशा झाली.एखाद्या वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा. वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी, पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मी खरोखर मोठी पापी आहे, अपराधी आहे. मीच माझ्या पतीचा घात केला. माझे सासू-सासरे नको नको म्हणत असतानासुद्धा मी मोठ्या विश्वासानें माझ्या पतीला येथे घेऊन आले ! आता त्यांना मी काय सांगू बरें ? " असे बोलून ती शोक करीत असता, काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या, " तू विनाकारण का बरे शोक करतेस ? जे होणार ते कधीही चुकत नाही. ब्रह्मदेवाने ललाटी जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही." तरीही तिचा शोक थांबेना. "मी लहानपणी हरितालिकेची पूजा केली होती. विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगळागौरीचीही पूजा केली. सौभाग्याच्या आशेने देवीभवानीला मी साकडे घातले. अनेक व्रते, उपवास केले. पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले. मग माझे सगळे पुण्य कोठे गेले ? मी शिवगौरीचीही पूजा केली ती व्यर्थच गेली ! आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार ?" पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली, "तुम्ही माझे प्राणेश्वर होता. आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू ? तुमच्या विरहाने तुमचे आई-वडील प्राणत्याग करतील. या तीन हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील." असा ती शोक करीत होती. तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले. त्याचवेळी तेथे एक तेजस्वी, तपस्वी ब्रह्मचारी आला. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. तो जटाधारी होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या. हातात त्रिशूल होते. तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस ? कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडते. जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते. तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाहीत. या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे ? तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता ? तुझा जन्म कोठे झाला ? पूर्वी तुझे आई-वडील कोण होते ? समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात, पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात. ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत. तशीच सर्व नातीगोती असतात. एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येउन बसतात व पुन्हा चारही दिशांना उडून जातात. हा संसार असाच आहे. येथे कोणीही कायमचा टिकत नाही. हा संसार क्षणभंगूर आहे. मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही. नातीगोती, आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहे. मृत्यू कोणालाही टळत नाही. कुणाला तो बालपणी वा तरुणपणी येतो तर कुणाला तो वृद्धापकाळी येतो; पण तो येतोच येतो. दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे. या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते. केवळ रक्तमांस, अस्थी इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा ?" त्या ब्रह्मचाऱ्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले. तिला सत्यज्ञान झाले. ती त्या ब्रह्मचाऱ्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली, "स्वामी, माझा उद्धार करा. तुम्हीच माझे मायबाप आहात. आता मी काय करावे ? मी काय केले असता हा संसारसागर तरून जाईन ? तुम्ही सांगाल ते मी करीन." त्या स्त्रीने अशी विनंती केल असता त्या ब्रह्मचाऱ्यास आनंद झाला, मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे, काय करू नये ? परमार्थचिंतन व्रतस्थ कसे राहावे? हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'विधवेचा शोक - ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश' नावाचा अध्याय तिसावा समाप्त. ============================= अध्याय ३१ वा पतिव्रतेचा आचारधर्म ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, " पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशी खंडात एक कथा आहे ती मी तुला सांगतो." "एकदा नारदमुनी फिरत फिरत विंध्यपर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला. विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले. तो म्हणाला, "मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्वपुण्यच आज फळाला आले." विंध्याचे हे बोलणे ऐकून नारदमुनी जरा संचित झाले. त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, "देवर्षीं, आपण कसली चिंता करता आहात ?" नारदांनी विचार केला. 'आता याला जरा डिवचलेच पाहिजे.' नारदमुनी म्हणाले, "अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे; पण सर्व पर्वतात मेरुपर्वत आधी उंच आहे. तू त्याच्याइतका उंच नाहीस, त्यामुळे मेरुपर्वत तुझा अपमान करतो आहे. त्यामुळे मी सचिंत झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज इथे आलो होतो." असे सांगून नारदमुनी आकाश-मार्गाने निघून गेले. नारदमुनी निघून गेले आणि विंध्यपर्वत अत्यंत उद्विग्न झाला. क्रुद्ध झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरुपर्वताचा तो द्वेष करू लागला. 'सूर्य मेरूपर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय ? पाहतोच आता.' असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला,की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करावयास निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार. लोकांना सूर्य दिसेना, त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले. पंचयज्ञकर्मांचा लोप झाला, त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. सर्व देव भयभीत झाले. आता काय करावे ? हे संकट कोण दूर करणार ? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात ? हे मला माहित आहे. विंध्यपर्वत मेरुपर्वताशी स्पर्धा करीत आहे, त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हांला एक उपाय सांगतो. अगस्ती हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशीक्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा. ते तुमचे संकट निवारण करतील." ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशीक्षेत्री अगस्ती ऋषींच्याकडे गेले. अगस्ती ऋषींचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्ती ऋषींनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्तींची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, "मुनिवर्य, आपण सर्व ऋषीमुनींमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्यज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे. आपण साक्षात 'प्रणव' आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे." बृहस्पती म्हणाले, "पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या; पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही. अरुंधती, सावित्री, अनसूया, शांडिल्यपत्नी, लक्ष्मी, पार्वती, स्वयंभू मनूची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुवमाता सुनीता, सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या; पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे." असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, "पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी. मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल, अशा ठिकाणी ठेवू नयेत. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्यापूर्वी आपण उठावे. सडासंमार्जन करावे. आपल्या पतीची नित्य पूजा करावी.पती घरी असताना साजशृंगार करावा; पण पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे, काय नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे.पती घरी नसेल तर अतिथी-धेनुप्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रते, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादींविषयी हट्ट नये. पती संतुष्ट असतांना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे. बोलू नये. वेदमंत्र ऐकू नये. असे चार दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशावेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळदकुंकू लावावे. केसात सिंदूर घालावा. डोळ्यांत काजळ घालावे. वेणी घालवी. सौभाग्यलंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासूसासरे, दिर, नणंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वानयोनीत जन्म घ्यावा लागेल. नग्नपणे स्नान करू नये. उखळ-मुसळावर बसू नये. उंबरठ्यावर बसू नये. घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही, असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्या गृहांतील श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नातसुद्धा वासना धरू नये. आपल्या पतींची सर्वतोपरी सेवा करावी. कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते. अशा पतीव्रतेमुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्मे घडत नाहीत. यज्ञयागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्वप्रकारची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव-पितृ-कर्मे करण्यास पात्र ठरत नाही.पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान. ते ज्याला लाभते, त्याची सप्तजन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो." बृहस्पतींनी सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तमगती प्राप्त होते असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'पतिव्रतेचा आचारधर्म' नावाचा अध्याय एकतिसावा समाप्त. ========================== अध्याय ३२ वा पतिव्रतेचा आचारधर्म ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। अगस्ती ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा ? हे सविस्तर सांगितले. पतिनिधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे ? काय करावे, काय करू नये ? म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला. बृहस्पती म्हणाले, " पतिनिधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे; परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर, बाहेरगावी निधन पावला असेल, तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते." " वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे. नित्य स्नान करावे. एकभुक्त असावे. एक धान्याचे अन्न खावे. तिने तीन दिवसांनी, पाच दिवसांनी, पंधरा दिवसांनी किंवा महिन्यात एक तरी उपोषण करावे, किंवा चांद्रायण व्रत करावे. वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार, शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी दूध प्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये. मंगलस्नान करू नये. अंगाला तेल लावू नये. सुगंधीद्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूंची नित्यपूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीने वा आज्ञेने तीर्थयात्रा, उपवास, व्रते करावीत. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे.श्रीहरी विष्णूंचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखात जलकुंभदान करावे. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे. वैशाखात पाणपोई घालावी. शिवशंकरांची पूजा करावी. त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राह्मणांच्या घरी पाणीपुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे.अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र, पादत्राणे द्यावीत. कार्तिकात सातूचे अन्न खावे. कास्यपात्रात भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदलधान्ये वर्ज्य करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे. कास्यपात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमीशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे. माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्रे, घोंगडे यांचे दान करावे. भगवान श्री शंकरांची व श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी. श्री शंकरांस रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत रहावे. 'आत्मा वै पुत्र नाम' म्हणजे पतीच पुत्ररूपाने जन्मास येतो हे श्रुतिवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकृत्ये दिवंगत पतीला नरकापासून वाचवितात." बृहस्पतींनी अगस्ती ऋषींच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मणस्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, " मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत. सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्याठिकाणी धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हींचे पुण्य सारखेच आहे. त्या ब्रह्मचारी तपस्व्यानें असे सांगितले असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, "यतिमहाराज, मी खूप लांबून येथे आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्यागोत्यातील कोणीही नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत. मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखर माझे बंधू, वडील आहात. तुम्हीं मला दोन मार्ग दाखविलेत; पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही. मी तरुण आहे. कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील. मला नको ती दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसे होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जाण्यास तयार आहे." त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, "तुझी इच्छा असेल तसे कर. तू मोठ्या आशेने श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही, याचे वाईट वाटते; पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे ? जे विधिलिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे. ते ठीक आहे. पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते, म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्रीगुरुंचे दर्शन घे." त्या स्त्रीने तें मान्य केले. त्या ब्रह्मचारी तपस्व्यानें तिच्या कपाळी भस्म लावले, तिला चार रुद्राक्ष दिले व सांगितले, " दोन रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध. एक रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी दोन्ही कानांना बांध. श्रीगुरुंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात. ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवाण दे. ब्राह्मणांना दक्षिणा दे. मग श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर." असे सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्यलंकार व वस्त्रे परिधान केली. कपाळी हळदकुंकू लावले. त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावर नेले. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ सोळा वर्षांची होती. तिचं दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढनिश्चय पाहून इतर सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. या पतिव्रतेने आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सदबुद्धी होवो." असे त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यवायने दिली. सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली, " मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू-सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका. त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमातीरावर श्रीगुरुंच्याजवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्रीगुरुंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे, असे माझ्या सासू-सासऱ्यांना व आई-वडिलांना सांगा." मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येकी एक व गळ्यात दोन रुद्राक्ष बांधले. श्रीगुरुंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली.त्यावेळीं श्रीगुरू अश्वत्थवृक्षाखाली बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरुंनी तिला आशीर्वाद दिला, 'अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव'. श्रीगुरुंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, "स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात ? अहो ! ह्या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे, म्हणून ही आपल्या चरणांपाशी आली आहे." त्या लोकांनी असे सांगितले असता श्रीगुरू म्हणाले, "हे कसे शक्य आहे ? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा." आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्रीगुरुंच्या समोर ठेवले. श्रीगुरू म्हणाले, " ते प्रेत सोडा. त्याचे कपडेही काढून टाका." लोकांनी तसे केले असता श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्रीगुरुंनी त्या प्रेताकडे अमृतदृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे-तिकडे पहिले. आपण नग्न आहोत, आपल्याभोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहोत? हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, "हा सगळा प्रकार काय आहे ? मी कोठे आहे ? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत ?" तो ब्राह्मण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व हकीगत त्याला सांगितली. मग ती दोघे श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. "अहो, श्रीगुरू तुमचा जयजयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा-विष्णू-महेशस्वरूप आहात. कृपासागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यवेषात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरांत तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आता आम्हाला जन्म-मरण नको. तुमची ज्याच्यावर कृपा होते, त्याचे चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात." त्या ब्राह्मण पतिपत्नींनी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता कसलीही चिंता करू नका. तुमच्या सर्व दोषांचा, रोगांचा परिहार झाला आहे. तुम्ही पूर्णायुषी व्हाल.तुम्हांस अष्टपुत्र होतील. तसेच चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." याच वेळी तेथे असंख्य स्त्री-पुरुष जमले. ते आनंदाने श्रीगुरूंचा जयजयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तेथे असलेला, हीनबुद्धीचा ब्राह्मण श्रीगुरुंना म्हणाला, "सर्व वेदशास्त्रे, पुराणें सांगतात की, विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला ?" त्यावर श्रीगुरू म्हणाले, "मी सांगतो, ते नीट ऐक. या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे, त्यातील काही वर्षे आयुष्य या जन्मी त्याला मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी तीस वर्षे मागून घेतली." श्रीगुरुंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः आश्चर्यचकित झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरुंच्या ठायी आहे, हे पाहून सर्व लोक श्रीगुरूंना वारंवार वंदन करू लागले. त्यांचा जयजयकार करू लागले. मग सर्वजण श्रीगुरुंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती दहाही दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पतिपत्नींनी संगमात स्नान करून श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. मोठा दानधर्म केला. श्रीगुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, यानंतर एक मोठी अद्बूत कथा घडली, ती मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील ' पतिव्रतेचा आचारधर्म ' नावाचा अध्याय बत्तिसावा समाप्त. ============================= अध्याय ३३ वा रुद्राक्ष माहात्म्य - सुधर्म- तारक आख्यान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्रीगुरुंच्याबरोबर गाणगापुरातील मठात आली, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका,ऐक ! श्रीगुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्रीगुरुंच्या दर्शनाला आली. श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, "माझ्या पतीचा मृत्यू झाला, त्यावेळी एका ब्रह्मचाऱ्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला. मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले. त्याचप्रमाणे रूद्रसूक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले. अंतकाळी श्रीनृसिंहसरस्वतींचे दर्शन घ्यावे,असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला." त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्रीगुरू हसून म्हणाले, "तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. रुद्राक्षाचे माहात्म्य फार मोठे आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो, तो साक्षात रुद्र होतो. अशा मनुष्यांस सर्व देव वंदन करतात. एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर एकशेआठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत." " रुद्राक्ष हे सर्वपापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे, अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. या रुद्राक्षांचे माहात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे. ती सांगतो, ऐक." पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे. त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते, तारक. हे दोघेही मुलगे जन्मतःच मोठे शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते. पांच वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत. सर्वांगाला भस्म लावीत. ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत. त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण मिळाले होते. तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती. एके दिवशी पराशरऋषी भद्रसेन राजाकडे आले. राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तमप्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या. राजा हात जोडून म्हणाला, "मुनिवर्य, आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाहीत. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे, हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते." पराशरांनी त्या दोन मुलांच्याकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्राप्रमाणें तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व तें राजाला म्हणाले, " राजा, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्यदृष्टीने दिसत आहे. हे दोघे असे विरक्त का झाले आहेत ?, हे शिवभक्त का झाले ? व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ? ते मी सांगतो. लक्षपूर्वक ऐक." पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती. तिचे रूपलावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजा-महाराजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट व मर्कट (कोंबडा व माकड) पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यांत रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवीत असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट व मर्कटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावीत असे. एकदा काय झाले, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत, मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वीमोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, "तीन दिवस-तीन रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे." त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकरच होते. त्या गणिकेची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वायू वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. ' ऊठ, ऊठ लौकर. नाट्यशाळेला आग लागली आहे !' असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट-मर्कटांना सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्यावेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, "माझे दिव्य लिंग कुठे आहे ?" त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, "माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी माझ्या व्रतनियमामुळे त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो." असे म्हणून त्याने अग्नी पेटविला. ' ॐ नमः शिवाय' असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता, म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रासाद या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतःकरणापूर्वक शिवध्यान केले व 'ॐ नमः शिवाय' असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याचक्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूरगौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, "तुझी माझ्यावरील दृढ भक्ती पाहून मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग." त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, "प्रभो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सन्निध वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा." भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याचक्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून पराशरमुनी भद्रसेनाला म्हणाले, " राजा, आता तुमच्या दोन मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत ? हे सतत शिवभजनात दंग का असतात ? हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात ? असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐक. हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट - मर्कट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्वपुण्याईने ते कुक्कुट-मर्कट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तमप्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट-मर्कट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते, ती विरक्ती अंशात्मकरूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे, म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे." पराशर ऋषींच्या या उत्तराने भद्रसेन राजाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशर ऋषींच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला, त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'रुद्राक्ष माहात्म्य - सुधर्म- तारक आख्यान' नावाचा अध्याय तेहतिसावा समाप्त. ================================ अध्याय ३४ वा रुद्राध्याय माहात्म्य ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। श्रीगुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राह्मण पति-पत्नीला म्हणाले, "पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षमहिमा सांगून राजपुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशर ऋषींच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, " मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्मवृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे कुक्कुट-मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी." राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले, थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, "राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल, याची कल्पना आहे; परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे. नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना ?" राजा म्हणाला, "भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारीत आहे. जे असेल ते सांगा." पराशर म्हणाले, "मग ऐक तर ! तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली आहेत. आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल." पराशर ऋषींचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले. ते अनिष्ट वृत्त ऐकून तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशर ऋषींचे चरण धरून विनवण्या करू लागला, " मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा." राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, "राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल, तर त्या शूलपाणि शिवशंकराला शरण जा.त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे, यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला चारी वेदांचा उपदेश केला. या चारही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय, हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे, असे स्वतःच श्रीशंकरांनीच सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने, परमश्रद्धेने श्रवण-पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्वप्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्याससुद्धा यमदूत घाबरतात." " मात्र हा रुद्राचा जप, गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्यांना पापे शिवत नाहीत.रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्रावर्तनांनी अभिषेक कर, शंभर घटांची स्थापना कर. त्यात दिव्यवृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्षे जगेल." पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरु केले. श्रीशंकरांवर सतत अभिषेक सुरु केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड सात दिवस चालू होते. सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुध्द पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्मरूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर ऋषींना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, "राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. " मग त्यांनी सुधर्माला विचारले, " बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का ? " त्यावर सुधर्म म्हणाला, "एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी चार दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरांसारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली." हे ऐकताच राजा भद्रसेनासहित सर्वजण भगवान श्रीशंकरांचा जयजयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशर ऋषींना उच्चासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले. "मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का ?" नारदमुनी म्हणाले, "मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम तिथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. "माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले ?" असे यमाने विचारले असता, वीरभद्र उत्तरला, " तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास ? त्याला दहा हजार वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहित नाही का ? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास ? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. " मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, " येथे या राजपुत्रास बारा वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे हे खरे. मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच ' मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्षे राज्य करील ', असे लिहिले आहे." हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशर ऋषींच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे." असे सांगून नारदमुनी ' नारायण नारायण ' म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पतिपत्नीला ही भद्रसेनपुत्राची कथा सांगून श्रीगुरू नृसिंहसरस्वती म्हणाले, " रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे माहात्म्य असे मोठे अद्भुत आहे." इतके कथावृत्त सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्रीगुरू साक्षात रुद्रस्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'रुद्राध्याय माहात्म्य' नावाचा अध्याय चौतिसावा समाप्त. ।। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

Search

Search here.