श्री महालक्ष्मी अष्टक

स्तोत्र - मंत्र  > देवी स्तोत्र Posted at 2016-01-30 06:21:00
श्री महालक्ष्मी अष्टकाची कथा पूर्वीच्या काळी भल्या पहाटे म्हणजे पंचपंचउषःकाली सर्व योगी, तपस्वी व ऋषीमुनी पृथ्वीवरून देवलोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी जात असत. असेच एकदा, साक्षात शिवअवतार असलेले व अत्रि अनुसयेचे पुत्र श्री दुर्वास महर्षी देवलोकात निघाले होते. महर्षी दुर्वास म्हणजे साक्षात महादेव असून अत्यंत कोपिष्ट होते. ते देवलोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी पोहोचले. आपला भक्त आल्याचे पाहून श्रीविष्णूंना अत्यानंद झाला व आनंदाने त्यांनी स्वतःच्या गळ्यातील वैजयंती माला महर्षी दुर्वासांच्या गळ्यात घातली. महालक्ष्मींना आश्चर्य वाटले. माझे पती, मला कधी ती वैजयंती माला दिली नाही आणि आज महर्षी दुर्वासांना दिली. असो. दर्शन घेऊन महर्षी दुर्वास परतीच्या प्रवासाला लागले. महर्षी दुर्वास हे महातपस्वी व साक्षात भगवान शिवशंकरच असल्याने ते पूर्णपणे विरक्त वृत्तीचे होते. त्यांनी ती माळ कोणाला तरी देण्याचे ठरवले. त्या हेतूने ते पहात चालले असता वाटेत त्यांना देवराज इंद्र देवलोकी महाविष्णूंच्या दर्शनाला जात असलेले आढळले. त्यांनी स्वतःच्या गळ्यातील ती वैजयंती माला इंद्रदेवांना दिली व ते निघून गेले. इंद्रदेवांनी विचार केला की, 'अगोदरच आपल्या खजिन्यात इतक्या किमती माळा धूळ खात पडल्या आहेत; त्यात हीची भर कशाला?' असा विचार करून त्यांनी ती माळ आपल्या ऐरावताच्या गळ्यात घातली. हे सर्व महालक्ष्मी पहात होत्या. आपल्या पतिच्या गळ्यातील वैजयंती माला इंद्रदेवांनी ऐरावताच्या गळ्यात घातली हे पाहून महालक्ष्मी इंद्रदेवांवर प्रचंड संतापल्या व त्यांनी रागाने तोंड फिरवले. कारण पतीचा अपमान पत्नीला कधी सहन होत नाही. साक्षात महालक्ष्मीच रागावल्यामुळे इंद्राचे सारे वैभव एका क्षणात नाहीसे झाले. इंद्र घाबरला. तो श्री विष्णूंकडे क्षमायाचना करू लागला. विष्णू म्हणाले की तू महालक्ष्मीची क्षमा माग. तेव्हा इंद्र म्हणाला की मला देवींची भिती वाटते. देवींच्या हातात तलवार आहे, शंख, चक्र, गदा आहे. मला फार भिती वाटते. तेव्हा भगवान महाविष्णू म्हणाले, सिंहीणीच्या पिल्लाना सिंहीणीची भिती कधीच वाटत नाही. मुलाने खोडसाळ पण केला तर आई रागावणे सहाजिक आहे. पण माफी मागणे हा त्यावरील उपाय आहे. माफी मागतेवेळी जर मुलाने आईच्या गळ्याला लाडीकपणे जरी मिठी मारली तरी आई त्याचे हात झटकून टाकेल, आईच्या कमरेला मिठी घातली तरी आईचा राग फारसा शांत होणार नाही. पण जर कोणत्या मुलाने जाऊन आईचे पाय धरले तर जगात अशी एकही आई नाही जी त्याला लाथाडेल. महालक्ष्मी तर जगत्जननी आहेत, अखिल विश्वाची ती आई आहे. म्हणून तू जाऊन तिच्या पायाला मिठी मार. त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आई महालक्ष्मींच्या पायाला मिठी मारली आणि नतमस्तक झाले. तत्क्षणी जगत्जननी जगदंबा महालक्ष्मींच्या डोळ्यातून खळ्ळकन् अश्रू ओघळले. कारण कितीही झालं तरी शेवटी ती आईच आहे. त्यातील दोन अश्रू देवराज इंद्रांच्या मस्तकी पडले. महालक्ष्मींनी इंद्रदेवांना क्षमा केली. तेव्हा इंद्रदेवांना स्फुरलेलं 'श्री महालक्ष्मी अष्टक' जे आज घराघरात म्हटलं जातं. महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता आई जगदंबा प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही. ॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥ श्री गणेशाय नमः नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते । शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥ नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी । सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥ सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥ सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥ आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी । योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥ स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे । महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥ पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी । परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥ श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥ महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः । सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥ एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥ त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥ ॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥ श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.