श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय १ ते ६

ग्रंथ - पोथी  > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 06:02:31
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय १ ते ६ अध्याय १. नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या ...... ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमाहात्म्य वाढवू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रितीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रितीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले. एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिराल. त्या माराच्या तिरिमिरीसमसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ *********************************************************** अध्याय २. मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान.... शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पहात पहात ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली. त्याची स्थिति पाहून या कलीमधे दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले. मग दत्तात्रेय मच्छिंद्राजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहा, वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज ! आज मला येथे बारा वर्षे झाली. पण आजपावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारीत आहा, त्याअर्थी आपण कोण आहा हे प्रथम मला कळवावे व ज्याअर्थी आपले दर्शन झाले आहे त्याअर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला. मी अत्रि ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रेय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे, ती मला सांग. हे ऐकून, आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले. त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले; तेणेकरून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला, महाराज ! आपण साक्षात भगवान आहा. शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहा, असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगिकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला. मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की, तू चिंता करू नको; तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर व विष्णु कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, ईश्वरावाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ति आहे. हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कविनारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरिले आणि त्याजकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथसंप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले. मग मच्छिंद्रनाथहि तीर्थयात्रा करावयास निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुति केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊन गेले. ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती; परंतु दैवत अनुकूल झाल्यावाचून कार्यसिद्धि व्हावयाची नाही अशीहि त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबेसन्निध सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतु मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग, म्हणून म्हणाली. त्याने सांगितले की, मातोश्री ! साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतु पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून, 'तुझे मनोरथ पूर्ण होतील.' असा देवीने त्यास आशीर्वाद दिला. मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदीप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले. असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहात होती. पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहे, तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील, त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे शंभर आहेत; पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मूर्च्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करवा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल. असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्लवेल टाकिला. पुन्हा परत येऊन पाहू लागला, तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करिताच त्यास मूर्च्छना आली. म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याजजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील, म्हणून वर दिला. सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरुन घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतु आहे, म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, कविता करावी असे माझ्या मनात आहे; तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतु पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये-जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला. सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेाने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गोठ्याजवळ केरकचरा, शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती, त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले. बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ''मुलगा कुठ आहे?'' नाथांनी विचारले. ''मला मुलगा झालाच नाही.'' तिने सांगितले. ''खोट बोलू नकोस ! त्या भस्माचे काय झाले?'' नाथांनी प्रश्न केला. ''मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले. योगीराज, मला क्षमा करा !''. मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली. ''हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!''. ''गुरुराया, मी इथ आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.''मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. असे हि म्हणतात कि मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला. योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. शके सतराशे दहापर्यंत सर्व नवनाथ प्रगटरूपाने फिरत होते. नंतर ते गुप्त झाले. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते. महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************** अध्याय ३. मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन .... मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादि तीर्थयात्रा करून सेतुबंध-रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे, तो आपणास राहावयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला म्हटले की, मर्कटा ! तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे ! पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे; आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे, तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर, तू असा चतुर दिसतोस तो कोण आहेस, म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारिले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रास विचारिले. तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्या वेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो, असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात ! पण आता ते कसेहि असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो, यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे, तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर जती हे नाव तू टाकून दे. याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की, तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव, तिचे निवारण श्रीगुरुनाथ करील. हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले. ते आकाश मार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन 'स्थिर स्थिर' असे त्याने वातप्रेरकमंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून टाकिले. हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे. तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन, वायुआकर्षणमंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जसाच्या तसा खिळवून टाकिला. त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला, ते पाहून वायूने आपल्या पुत्रास (मारुतीस) पोटाशी धरिले. नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंति केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेणेकरून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीहि पूर्वस्थितीवर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन 'धन्य धन्य' म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती ! तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकिले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की, तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता; तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकिली आहेत. नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की, तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे साह्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ. असे प्रफुल्लित मनाने बोलून, आता 'आपण जती आहो' असे तू खुशाल सांगत जा, असे मारुतीने वरदान दिले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे ! पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिची आपण निवृती करावी. कोणती शंका आली आहे, असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळज्ञानी आहेस, असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती, त्या वेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करवून तू मला वरदान दिले आहेस, असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की, जेव्हा तू समुद्रस्नान करीत होतास त्या वेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कविनारायणाचा अवतार आहेस व मत्स्यीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते; परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की, नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले, त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावयाचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील ह्याचाहि अजमास मला अशा रितीने पाहाता आला. असो. नंतर मारुती म्हणाला, तू आता येथून स्त्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल ऐष आराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुजवर पडले आहे, म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर, मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा ! लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता, तिच्या मनात आले की, मारुती निःसंशय रामाचा पक्का दास आहे, यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन, संपत्तिसंतति सर्व अनुकूल करून देऊन, सर्व सुखसंपन्न करावे. स्त्रीवाचून संसारात सुख नाही, तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजव्ळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला. नंतर सीतामाता मला म्हणाली. बा मारुती ! तू तिन्ही लोकामध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस. अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारिले. परंतु मी आपले वचन दिल्यावाचून ती आपला हेतु मला कळवीना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की, तू अगदी दिलगीर होऊ नको. स्त्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत; परंतु यातील मख्खी अशी आहे की, तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावयाचा असतो. मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला. तूहि नव्याण्णवावा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशहि नव्याण्णवावा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला. यास्तव समयास अनुसरून वाग. याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदिकरून सर्व स्त्रीपुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होतात असे तिच्या ऐकिवात आले होते. ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुति दिल्या. असे अनुष्ठान तिने बारा वर्षेपर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले. तरीहि तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंति करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतु आहे, म्हणून मी तिला विचारिले. तेव्हा ती मला म्हणाली की, मारुती ! तुझ्या भुभुःकारा पासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात, यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस. तेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिति आहे. तर तू ते सुख आम्हांस प्रत्यक्ष दे. असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की, ब्रह्मचर्यव्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे; यास्तव ही गोष्ट माझेकडून घडावयाची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल, तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल, तो मच्छिंद्रनाथ साक्षात कविनारायणाचा अवतार होय. त्याजपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ति होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले. तो योग आज घडुन आला; तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे असे भाषण ऐकुन मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मीहि ऊर्ध्वरेताच आहे; म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे? माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल; म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय; म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की, ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे. म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल. त्याची सूर्यासारखी कीर्ति प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************* अध्याय ४. देवीच्या भैरवांची व दासींची फजिति; देवीचे दर्शन ... मच्छिंद्रनाथाने सेतुबंधरामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळादेवीच्या दर्शनास जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ति होय ! जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोचला, तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते; त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहाताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत, तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे, ह्याची प्रचीति पाहाण्याचे त्याच्या मनात आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर, तुम्ही कोठे जात अवगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा त्याने सांगितले की, देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे. असे सांगून मच्छिंद्राने त्यांस विचारले की, तुम्ही संन्यासी आहा, तुमची मर्जी आत जावयाची आहे की काय? त्यावर ते म्हणाले, आम्ही येथले द्वारपाळ आहो. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो. यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हांस झाडा देऊन मग तू आत जावे कोणी विषयविलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेविले, तर आत प्रवेश करतेवेळेस तो मध्येच दारात अडकतो. कारण, त्या वेळेस दार अतिशय अरुंद होते. मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहाताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करितो. याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मै झाली असतील, ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे. अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापपुण्य काही एक जाणत नाही, मजकडून आजपर्यंत जी जी कर्मै घडली, ती ती सारी ईश्वराप्रीत्यर्थ केली आहेत, तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहो. हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागावयाचा नाही, मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आत जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, की, प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे, मजपुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भूत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे? हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, बरची, गदा, भाले, कुर्‍हाडी, अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने 'जयजय श्रीदत्तगुरुराज' म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की, मित्रा वरुणीदेवा ! माझ्या कार्यासाठी तयार रहा. अग्निनी, वरुणी, अग्नि, वायु, इंद्रादि देव, गण, गंधर्व आदिकरून सर्वांनी कार्यामध्ये साह्य करण्यासाठी तयार रहावे, तुम्हा सर्वांना मी नमस्कार करितो. अशा रितीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांस फेकले. नंतर वज्रपंजरप्रयोग म्हणून विभूति अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले. नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की, तुम्ही आता आळस करून विलंब करू नका. युद्ध करण्यास तयार व्हा, न कराल तर तुम्हास मातापित्यांची शपथ आहे. ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही. ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला. त्यावेळी वासवशक्ति सोडण्यात आली, तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखाणी दासी पाठविल्या. त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला. परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांच त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्यासमान सर्वात भ्रमविले. या प्रकारचा चमत्कार चालला असता, विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर मायाअस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणिले त्या वेळी, समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता, भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या, सुकृत सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली ! कोणीएक जोगी आला आहे, त्याने ह्या रितीने आमची दुर्दशा करून टाकिली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हांस दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या, त्या भिऊन गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने 'आला आला !' असा शब्द त्या करीत होत्या. हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली, तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वास वस्त्रे दिली आणि त्यांसह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास ह्रदयी धरिले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंत मजकूर अंबेला कळविला. तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे, म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो, असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुनः जागच्या जागी आणून ठेवावयास सांगितले. हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. ते पाहून अंबेस संतोष वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिरात्र राहिले. जातेसमयी अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादादाखल दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथा अंबेस नमस्कार करून निघाला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************* अध्याय ५. मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी... मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोनप्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे, असा त्याने विचार केला. मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भुते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती; परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भुते तिकडे पाठविली. मग पाच-सात भुते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली, तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणीएक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे, ह्याचा तपास करीत फिरत असता, मच्छिंद्रनाथास वेताळाकडुन आलेल्या भुतांनी पाहिले. तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी, असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भुतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की, स्वामी ही भुते पतित आहेत, ह्यांची मुक्तता करावी; म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भुते खिळली असता, तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारिले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ही भुते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरिता वेताळाने आम्हांस इकडे पाठविले आहे. तर महाराज ! यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही, हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल. मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भुते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की, तिकडे एक योगी आला आहे, त्याने शरभतीरावरची भुते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकिली आहेत व तुम्हांलाहि तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखशिखात आग झाली. त्याने सर्व देशातील भुतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने साराकच्चा मजकूर कळविला. मग सर्व जण आपापल्या फौजेनिशी शरभतीरि येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेविले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला. पुढे त्याने वज्रस्त्रमंत्र जपून सभोवती एक रेघ ओढिली व वज्रशक्ति मस्तकावर धरिली, तेणेकरून भुतांना जवळ जाता येईनासे झाले. भुतांच्या राजांनी झाडे, डोंगर नाथावर टाकिले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकिले. त्या वेळी पिशाच्चांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळता, बावरा, म्हंगदा, मुंजा, म्हैशासुर व धुळोवान हे सातजण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहात होते. पण तितक्यात नाथाने चपळाइने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदु, कुंमक, मरु, मलीमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी हे सात दानव निर्माण केले. मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करिताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ति सोडून वेताळास मूर्च्छित केले. त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली, तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावयाचा आहे? आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ति गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णुजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्चफौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकुम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भुतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे, याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल, त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरहुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला साह्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणारासहि मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच, त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेविले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जयजयकार करून त्याची स्तुति केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ *************************************** अध्याय ६. मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति... बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे, त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांति घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की, मातोश्री ! मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुझे साह्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्वविद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. अगोदर त्या अस्त्रास (देवीस) श्रम झाले होतेच, तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की, अरे नष्टा, पतिता, मला फार श्रम झाले आहेत, असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस? तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस; पण तेणेकरून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले; असे असता, दुरात्म्या! मला त्रास देण्यास आला आहेस, तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो. नाही तर तुला शिक्षा करीन. अरे ! शंकराच्या हातातील अस्त्र, ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे, मला बोलाविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून निमूटपणे चालता हो; नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की, मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगे ! सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करिते, त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा. तेथे अंबा म्हणाली, भष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळास शेंदुर लावून येथे येऊन मला भिववीत आहेस, पण मी या तुझ्या धमकावणीला भिणार नाही. अरे ! तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावयाचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की, मी थोर प्रताप दाखवून भुतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन. पण मी तशापैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी विषअस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन, तर सारे ब्रह्मांड पालथे घालुन लोळवून टाकीन. तेथे तू आपला कसचा दिमाख दाखवितोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशकासमान समजत होता; परंतु त्यालाच परिणामी पाताळलोक पाहावा लागला ! हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला. ती त्यास म्हणाली, तुजमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखीव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की, तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाख मला दाखवीत आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखीव. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की, जोगड्या, आता आपला प्राण वाचीव. तू आपल्या गुरूचे स्मरण कर. कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो, तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे, ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल? अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हावयाचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासवशक्तिमंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदीप्यमान वासवशक्ति तत्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकाअस्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती. झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली. हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले. ते भयंकर व अनिवार प्रळय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुति केली; तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र, धूम्रास्त्र ही सोडिली; परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना. कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकिले व वज्रास्त्र शैलाद्रि पर्वतावर आपटले. तेणेकरून तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुनः वाताकर्षणास्त्राची योजना केली. त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिकादेवीवर प्रवेश केला; तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले. इतक्यात देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली, ते पाहून देव दानवांनासुद्धा मोठा विस्मय वाटला. कालिकेचे प्राण जाऊ लागले, तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे, तसे त्याच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले. शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायांवर मस्तक ठेविले. मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटानी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की, बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र-अस्त्रविद्यादि सर्व शिकविले, तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय. त्यावर शंकराने म्हटले, तूर्त ते असो, तू प्रथम कालिकादेवीस सावध कर. तेव्हा नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारिल्यावर त्याने मागणे मागितले की, जशी शुक्राचार्याने संजीवनीविद्या कचास दिली, त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्ये केली, तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेहि मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधानवृत्तीने राहीन. तेव्हा शंकराने सांगितले की, तू कालिकेस जीवदान देऊन उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करितो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. मग वातास्त्रमंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्याची स्तुति केली. मग शंकराने तिला सांगितले की, माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतु आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की, माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे, हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली. मी तुमच्या पायाची दासी आहे; असे असता आर्जव केल्यासारखे करून मजजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा प्रणाम आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले. तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर ह्यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले. चौथे दिवसी देवीस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरास गेला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥

Search

Search here.