श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय १३ ते १८

ग्रंथ - पोथी  > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 05:57:29
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय १३ ते १८ अध्याय १३ जालिंदरनाथ व मैनावतीची भेट, मैनावतीस उपदेश.... पुढे शंकर व विष्णु हे जालंदरनाथ व कानिफा यांसह बदरिकाश्रमास गेले. ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता, दैवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले. व आजपर्यंत त्यांना हात दाखविणारांमध्ये असा वस्ताद कोणीहि मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले. नंतर शंकराने जालंदरास सांगितले की, तू नागपत्रअश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे. वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत. अस्त्रविद्या महान प्रतापी खरा, परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही. मंत्रविद्येचा लोकांस काडीचासुद्धा लाभ व्हावयाचा नाही. ह्यास्तव कविता सिद्ध करून ठेव. आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव. ह्या कानिफाचे उदारपण दांभिकपणाचे आहे, परंतु कारणपरत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची ही वृत्ति ठीक आहे, हजारो शिष्य करील, ह्याला सर्व विद्या अवगत असतील, येणेकरून ह्याचे वर्चस्व सर्व जगात राहील. पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढिला, परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिजपासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही. शंभर कोटि कविता पाहिजे ती नऊ नाथांनी करावी. सर्व खटपट परोपकारासाथी करावयाची आहे. तुम्ही सर्वज्ञ आहा ! तुम्हास सांगावयास पाहिजे असे नाही. जारण, मारण, उच्चाटणादिकांवरहि कविता करावी. असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की, ह्यास तपास बसवून समर्थ कर. हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले. मग जालंदर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटि वीस लक्ष कविता तयार केल्या. ते पाहून शंकर प्रसन्न झाला. मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांस बोध केला. त्यावरून उभयता तेथे गेले. तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली. ते पुनः बदरिकाश्रमास परत आले, तेथे जालंदराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणहि तपश्चर्येस गेला. तेथे गोरक्षनाथहि तपश्चर्या करीत होता, पण त्याना परस्परांविषयी माहिती नव्हती. इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता. तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गायीस चारीत असे. त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायु तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी. याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौडबंगाल देशांतील हेलापट्टनास गेला, तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारावाचून कसा राहिला ह्याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले. त्यांना हा कोणी तरी सिद्ध आहे, असे वाटून ते त्याच्या दर्शनासहि जाऊ लागले. तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे. त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी तेथचा राजा होता. गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्‌गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पहात असता, तिने जालंदरास पाहिले. आधारावाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे, असे तिच्या मनात आले. मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे, असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले. ती दासी तर चतुरच होती. ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले, म्हणून विचारू लागली. तेव्हा मैनावती तिला म्हणाली, माझे एक फार नाजुक काम आहे, ते मी तुला करावयास सांगत आहे, यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये. का की, प्रसंगवशात जिवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे. असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे, त्याचा पक्का शोध, गुप्त रितीने करून येण्यास सांगितले. जालंदरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाउन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे, असा तिने मैनावतीस चांगला बोध केला. नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली. अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंदर वस्तीस राहिला. ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले. मग मैनावतीने एका ताटात फळफलावळ व पक्वान्ने घेतली आणि अर्धरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंदरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता. त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या. त्या वेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुति केली. मैनावतीने केलेली स्तुति जालंदराने ऐकिली, पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तीचा पुष्कळ छळ केला. तो तिजवर रागाने दगड फेकी, शिव्या देई. मैनावतीने धैर्य खचू दिले नाही. ती त्याची विनवणी करीतच होती. ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचितसुद्धा दुखावले नाही. मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, योगिराज ! महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे, परंतु त्यास कृतांतकाळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत वैधव्यदुःखसागरात बुडून गेले आहे. ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिऊन गेले आहे व ह्या योगाने मला पश्चात्ताप झाला आहे. काळाने पतीची जी अवस्था केली, तोच परिणाम माझा व्हावयाचा ! असे ऐकून तो म्हणाला, जर तुझा पति निर्वतला आहे, तर तू हल्ली कोणाजवळ असतेस ? तो प्रश्न ऐकून ती म्हणाली, माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्या जवळ मी असते, पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही. कृपा करून मला तुम्ही कृतांतकाळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंति आहे. तेव्हा त्याने सांगितले की, कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे, ते मजसारख्या पिशाच्च्याकडुन तुटावयाचे नाही, यास्तव तु येथून लवकर निघून आपल्या घरी जा. जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल. इतका प्रकार होईपर्यंत उजाडले, तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली. तिला सारा दिवस चैन पडले नाही. मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेउन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली. पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली. नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली. अशा रितीने सहा महिनेपर्यंत तिने जालंदरनाथाची सेवा केली. एके दिवशी फार काळोख पडला आहे, अशी संधि पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक मायीक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला. तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकिली; तरी तिने आपले अवसान खचविले नाही. असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंदरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला. तेणेकरून तिची कांति दिव्य झाली. तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली. नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली, तेणेकरून मैनावती अमर झाली, जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला, तद्वत जालंदराने मैनावती अमर केली. पुढे तिची भक्ति दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************ अध्याय १४ गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले.... जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पति त्रिलोचन ह्याच्या शरिराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हावयाची, म्हणून तिला परम खेदही झाला. म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधि पाहात होती. माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्‍नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेले, अर्गजे लावून घेत होता. सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाहि होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे, तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार, म्हणून वाईट वाटले. तिला त्या वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले, ते काही केल्या आवरेना. तिचे ते अश्रु राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे, असे त्यास दिसले. त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला, आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तिला म्हणाला, मातोश्री ! रडण्याचे कारण काय, ते मला कृपा करून लवकर सांगावे. तुला कोणी गांजिले, ते सांग. ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो ! जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. ती करताना प्रत्यक्ष प्राणावरहि बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्यावाचून राहणार नाही. गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की, महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता, मला गांजील असा कोण आहे? परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की, तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता; परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली. तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटते. शरिराची व्यर्थ माती न होऊ देता, कृतांतकाळापासून सोडविण्याची युक्ति योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून घ्यावे. गोपीचंदा, क्षणभंगुर ऐश्वर्यास न भुलता देहांचे सार्थक करून घे; पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व ह्या करिताच रडे आले. एर्‍हवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही. मग राजाने सांगितले की, मातोश्री ! तुझे म्हणणे खरे आहे. पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे? प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करील. तर असा आजकाल आहे तरी कोण? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा ! जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कायेने, वाचेने व मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायकामुले, सुखसंपत्ति, राज्यवैभव आदिकरून सर्वांस अंतरेन ! ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेववणार नाही, तर मला आणखी बारा वर्षे सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे. मग मी गुरूस शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ति करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुला, ह्या देहाचा एका पळाचासुद्धा खात्रीने भरवसा देता येत नाही. असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस ! पण बाळा ! बारा वर्षे कुणी पाहिली आहेत? कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येइल ह्याचा नेम नाही. मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी लुमावती दडून ऐकत होती. तो ऐकून तिला त्या वेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागली की, ही आई नव्हे. वैरीण होय. हे राजाचे ऐश्वर्य भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते. आता ह्यास उपाय तरी कोणता करावा? अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली. गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की, मातोश्री ! ज्याअर्थी तुझी अशी मर्जी आहे, त्याअर्थी मीहि तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की, मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा; असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला. इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती, हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्‍न चालविला. तिने आपल्या दुसऱ्या पाच सात सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदरसत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करित आहे. जालंदर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकिले. तिच्या उपदेशाने राजाचेहि मन वळले आहे. त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणावयाचे ! मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे? परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ति काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल. लुमावतीने सवतींच्या मनात अशा तर्‍हेने विकल्प भरवून त्यांची मने दूषित केली; परंतु कोणासहि चांगली युक्ति सुचेना. त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की, मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की, जालंदर म्हणून जो वैरागी गावात आला आहे, त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे. तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंदरास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणाने त्या जालंदरसमागमे विषयविलासाचा उपभोग घ्यावा, असा त्या दोघांचा मतलब आहे, असे आपण राजास सांगून मनात विकल्प येउ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करील. तो बेत लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्याना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या. त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती इच्या महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणिला. तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की, माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीति वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेविली तर मोठा अनर्थ घडून येईल; अशी मी दोहींकडून चिंतेत पडले आहे, तेव्हा राजा म्हणाला, तू मनात काही किंतु आणिल्याशिवाय निर्भयचित्ताने मला सांग. मग अभय वचन देत असाल तर बोलते, असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्यसुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दुरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा. तो मजकूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास आणविले व एक मोठी खाच खणून तीत त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जिवे मारून टाकिन, अशी त्या वेळेस हजर असणारांना सक्त ताकीद दिली. राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणिली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाहि समजली नाही. दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली, तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला, हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले. जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली, ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले.. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ *************************************************** अध्याय १५ कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध, कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन. गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षै बदरिकाश्रमास तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरिता निघाले. पण कोठेहि शोध न लागल्यामुळे ते दोघेहि माशाप्रमाणे तडफडत होते व गुरूच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटपा पाणी पडत होते. अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते. गोरक्षनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात गेल्यावर हेलापट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला. तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता, पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता. तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहात असे. तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली. तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता, पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणास नाह. ह्या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली. ते भाषण ऐकल्यानंतर, मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरूने नाव पालटले असावे, अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्या समयी ईश्वरकृपेने गुरूची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस, अशी ते त्याची समजूत करीत होते. पुढे तो अंमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला. तो घरोघर भिक्षा मागावयास फिरत असता, तेथे जालंदरास पुरले होते तेथे गेला व त्याने 'अलख' शब्द करताच आतून जालंदरनाथाने 'आदेश' केला तेव्हा गोरक्षनाथाने 'आदेश' करून आपले नाव काय, म्हणून विचारिले. त्यावरून त्याने मला जालंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासहि तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारिले. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की, माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात. मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली, वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला. तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला. पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली. तो म्हणाला, तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. तुझा व माझा शिष्य कानिफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग; म्हणजे तो येथे येऊन हरयुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खांचेतून बाहेर काढील. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस जा. मग गोरक्षनाथ 'आदेश' करून तेथून निघाला. तो फिरत फिरत जगन्नाथास गेला. इकडे कानिफा गावगन्ना उपदेश करीत चालला होता. पुष्कळ लोकहि त्याचे हौशीने शिष्य होत. त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत. ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही, हे सर्वांना ऐकून ठाऊक होते; म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना. पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली. तरी त्यातून कितीएक असेही म्हणू लागले की, गुरुचे पाय मनापासून धरिल्यानंतर जिवाचे भय कसले आहे ! तशातून तन, मन, धन इत्यादि सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे; तर आता जिवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय. हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकिले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकिल्या. त्याला असे करण्यास दोन कारणे होती. शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भुभुःकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा. ह्याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की, मला आता स्त्रीराज्यात जावयाचे आहे; परंतु तो देश मोठा कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती भुभःकार करीत असतो, त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही. असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर जालंदरनाथ गुरूच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्याधोक्याशिवाय मनात धरिलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईन. कदाचित जिवावर प्रसंग येऊन प्राणहानि झाली तरी पुरविली. परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित ! तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा. ज्यांची गुरूच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल, त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जिवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे. कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले. आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते, पण तेणेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते, त्यापेक्षा गुरुजीनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली, ही गोष्ट फार चांगली झाली, हाच हर्श मानून ते आनंदाने परत जाऊ लागले. ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले. परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले. जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना. मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडावयास पहात होते; पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व ओणवे होऊन राहिले. इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्रविभूति लावून सांगितले की, तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत, त्यांच्या पाठीवरून एकएक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले. ह्या सातांना पाहाताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरूने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले. ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा ते सात शिष्य म्हणले, जिवाची आशा धरून येथे खुशाल असा, गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हास सोडवून नेऊ. संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणारास तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरूचा प्रताप समजला, असेही त्यांनी बोलून दाखविले. मग ते सातहिजण परत गुरूकडे येऊन जोडीदारांची स्थिति सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरूला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले. तेव्हा गुरू कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले; ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले. मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरूच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जावयास निघाला. तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला. नंतर असा चमत्कार झाला की, भुभुःकार करण्यासाठी मारुती सेतुबंधरामेश्वराहून रात्रीस स्त्रीराज्यांत तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला; पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही. तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला, त्या वेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणी तरी प्रतापी असला पाहिजे, असेही त्याच्या मनात बिंबले. इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले. त्या वेळी मारुतीस असे वाटले की, आपण महाप्रयत्‍नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील. मग तोहि ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतु जागच्या जागी राहून जातील. ह्यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि भुभुःकार केला. तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरूस विनंति करू लागले. त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यांस पुष्कळ धीर देऊन सांगितले की, पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पाहा; ह्यांच्यापासून तुम्हांस मुळीच धक्का बसणार नाही. नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई, म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने, कालिकास्त्र, अग्न्यस्त्र, वासवास्त्र, वाय्वास्त्र अशी वरच्यावर सोडिली. तेव्हा अग्न्यास्त्रास वाय्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला. त्या वेळी मारुतीने सर्व इलाज केले, पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग, मी तुझा मुलगा असता, माझा तू प्राण घेऊ पाहात आहेस, तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायु त्याची बरीच स्तुति केली. तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले; तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले. मग तो (समुद्र) मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहात होता, परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही; उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्च्छना येऊन जमिनीवर पडला. मग मूर्तिमंत वायु पुत्रमोहास्तव मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुनः युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की, हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडिली होती ह्याची आठवण कर ! वाताकर्षणविद्या ह्यांच्या जवळ पक्क्या वसत आहेत. यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे. सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ति मलासुद्धा दिसत नाही, असा समुद्राचाहि अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परम प्रीतीने भेटले. कानिफानेहि वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारिले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही, त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले. हे त्याचे जातवाले असल्यामुळे, युक्ति प्रयुक्तिने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली, दुसरा काही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही, असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणने कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले. मग अग्नि, वायु व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले. मग प्रातःकाळी कानिफा आपल्या शिष्यांसहवर्तमान निघून स्त्रीराज्यात गेला. तेथे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे श्रृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला. तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले. ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा, असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार ! हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला; तेणेकरून तो दिलगीर झाला. मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला. उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. भरजरी गालिचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली. मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली. त्या वेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणिले आणि एक महिना राहवून घेतले ... ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय १६ कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन... स्त्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदरसत्काराने राहवून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेविली. असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतु असा होता की, कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल. मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल. असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन; इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेहि मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुम्दर रूपवान देवांना देखील भ्लविणाऱ्या अशा स्त्रिया, विषयात गोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागला. पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. कानिफापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही. त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येतात, असे वर्तमान मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले; पण शिष्यांजवळहि स्त्रियांचे काही चालले नाही. त्या इलाज करून थकल्या, पण त्यांचा हेतु सफळ झाला नाही. महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावयास आज्ञा मागितली; ती त्याने बिनतक्रार दिली. तेव्हा हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू राहुट्यादि पुष्कळ देऊन हिरे, माणके, सुवर्ण व पैसा विपुल दिला. अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली. कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदरसत्कार होई. पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले. जो तो त्याची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपआपल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात. त्याजविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धि उत्पन्न होऊ लागली. अशी त्याची कीर्ति पसरत हेलापट्टणातहि त्याच्या नावाचा डंका बराच गाजला. तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुति केली. इकडे गोरक्षनाथ जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली. उभयतांनी आदेश केला. मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसविले. त्या वेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढिली की, त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहेत, त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, कशाला इतका खटाटोप ! आपल्याला काही गरज नाही. तेव्हा कानिफा म्हणाला, खटपट कशाची आली आहे त्यात? आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, इतका यत्न करण्याचे काय कारण आहे? आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल; पण कोणे वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे? आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा. तेव्हा कानिफाने सांगितले की, जर अशी तुमची मर्जी आहे, तर मी गुरूच्या कृपेने आता फळे आणितो. असे म्हणून त्याने विभक्तास्त्रमंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले; त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की, कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले. तेव्हा आपणहि ह्यास थोडासा चमत्कार दाखवावा. असा विचार करून कानिफास तो म्हणाला की, तुम्ही माझा पाहूणचार केलात ! आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे. कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले. मग गोरक्षनाथाने आकर्षणशक्ति व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तर्‍हेतर्‍हेची फळे येऊन जवळ पडली. ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले. मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढिली की, ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी. तेव्हा कानिफा म्हणाला, ही गोष्ट अशक्य होय. त्यावर गोरक्ष म्हणाला, निःसीम गुरुभक्तास काही अवघड नाही. तो दुसरा ब्रह्मदेवहि उत्पन्न करील. अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन. हे ऐकून कानिफास राग आला. तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरूला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे ! स्वतःला योगी असे म्हणवून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो. अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू भ्रमिष्टासारखा भाषण करतोस ! तुझा गुरू जालंदरनाथ दीनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लीदीत पडला आहे. सुटुन जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे. गौडबंगाल देशात हेलापट्टणच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीद टाकून अगदी बेमालूम करून टाकिले. शाबास त्या राजाची ! माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे. हे ब्रह्मांड हालवून टाकील असा त्याचा प्रताप आहे. त्याच्या कृपेने तुला आताच चमत्कार दाखवितो पहा. असे म्हणून संजीवनी म्म्त्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. ते पाहून कानिफा चकितच झाला. त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याचि वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की, आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला. तो हा क, माझ्या जालंदर गुरूचा शोध लागला. मग गोरक्षनाथ म्हणाला, गोष्ट खरी आहे. माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरूचा शोध लागला, तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिद्रनाथ गुरूचाहि मला शोध लागला. आजचा योग फारच उत्तम आला; असे बोलून त्यानी एकमेकास नमस्कार केला. मग गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणास चालला. आपला गुरु जालंदरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याचि बातमी कळताक्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नि उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यास झाले होते. तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला. कानिफा आल्याचि बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच, त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसहवर्तमान कानिफानाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की, प्रारब्धयोगेकरून या नगरास आज महान सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत, त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे. हा गुरू मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेहि वैभव आहे. नाही तर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल, घाणेरडा असा होता. मी राजा आहे; माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत. तो जालंदर पिशाच्च्यासमान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला, परंतु कोणतीहि गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे. मजसारख्या राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे. हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे. असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणावयास गेला. कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र, तोच त्याचा क्रोधरूपी अग्नि भडकून गेला. परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरिला. त्याने त्या वेळेस असा विचार केला की, जर आपण ह्यास आताच शाप देऊन भस्म करावे, तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे, तो तसाच राहून जाईल. तशात गुरूची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीहि आपणास पुरी माहीत नाही. यास्तव ह्याच्याकडून गुरूची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला. इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की, महाराज ! दैवयोगाने मला अनाथास सनाथ करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. राजा याप्रमाने बहुत प्रकारे बोलत असता, तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते. राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता. तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की, राजा ! तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे. परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले; नाही तर ह्या वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन. मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला. त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले षोडशोपचारांनी त्याचि यथाविधी पूजा केली. वस्त्रेभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला. राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच. तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला. तेव्हा कानिफाने राजास म्हटले की, तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस. पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे, ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे, त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लीदीत पुरून टाकिले आहेस; परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला. नाही तर जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकिला असता. तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंति करू लागला की, महाराज ! मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला. हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासहि ती बातमी समजली. हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकिला, म्हणुन मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही मैनावतीस कळविले की, कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे. तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू. गोपीचंद राजाने जालंदरास लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले. पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये. असे तिला वाटले. राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला. कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला; न्यूनता बिलकूल पडू दिली नाही. त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला साद्यंत वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी, म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तिने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला. तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहाण्याचे कबूल केले. नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवीत आहे, असे तिने त्यास सांगितले. ते ऐकून, आपणहि तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरूची अशी कशी अवस्था होऊ दिलीस, असे तिला विचारिले. तेव्हा तिने सांगितले की गुरूची पुत्राने अशा रितीने वाट लाविल्याची बातमी मला आताच कळली. मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीगत त्यास कळविली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता, आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरूस कूपातून काढून या ब्रह्मांडभुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले. तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले, मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीति समूळ उडविली. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************************* अध्याय १७ जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट ...... मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीति नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारिले की, तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की, आता कोणत्या युक्तीने जालंदरमहाराजांस कूपाबाहेर काढितोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की, महाराज ! या बाबतीत मला काहीच समजत नाही; मी सर्वस्वी तुम्हांस शरण आहे, माता, पिता, गुरु, त्राता, सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे. असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ति सांगतो. प्रथम तू असे कर की, सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणिले. नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ, गुरूस पुरून टाकिले होते तेथे गेला. तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला. त्या वेळी राजास सांगून ठेविले की, तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंदर गुरूने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नीघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीवप्रयोग सिद्ध करून विभूति राजाच्या कपाळास लाविली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता, आतून ध्वनि निघाला की, खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर, 'गोपीचंद राजा आहे, महाराज !' असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नि भडकून गेला. तो म्हणाला, 'गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो.' असे मुखातून शापवचन निघताच, सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले. शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की, माझा क्रोधवडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ! ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षीत आहे ह्यात संशय नाही. ह्यास्तव आता राजास अमर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की, अद्यापपावेतो तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी ! मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनि उमटला की, गोपीचंद राजा अद्यापपावेतो जिवंत राहिला आहे; तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो !' असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली. बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा ! मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले; तो माती दोहो बाजूस झाली. नंतर गुरु-शिष्यांची नजरानजर झाली. त्या वेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली ! मग जालंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की, या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की. 'प्रळयाग्नीतून तू आता चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा !' मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्यठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले. नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की, तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल; योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग. मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे; पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही. कारण, हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले. त्या वेळी गोपीचंद राजाने मनात आणिले की, राज्यवैभव शाश्वत नाही. जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे, आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता, जसाच्या तसाच कायम ! ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ! ह्याच्यापुढे राजाचीहि काय प्रौढी ! तर आता आपणहि ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पुर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की, गुरुमहाराज ! पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले. त्या वेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला. कौपीन (लंगोटी) परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली. शिंगी वाजविली, कुबडी, फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरूच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला. गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चर्यैस जावयास सांगितले. त्या वेळी त्याने राजास उपदेश केला की, आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी. माई भिक्षा घाल, असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रितीने भिक्षेच्या मिषाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे. मग गुरूची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली. त्या वेळी त्यांना इतके रडे लोटले की, त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुण स्वरूप आदिकरून आठवून त्या दुःसह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका, करिती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वरसत्तेने जे व्हावयाचे होते ते झाले; पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा; कोठे तरी दूर जाऊ नका. आम्ही विषयसुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू, हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ; तेथे खुशाल रहावे. आम्ही सेवाचाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला. पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही; उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले. परंतु, मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी, कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुनः असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल, कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ-बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोभ करतील. कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कांसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण, निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम, निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी, फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी, भूचरी या दोन आदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीहि तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष, मुक्ति ह्या शैलीचे मी भूषण मिरवीन. असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता, मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी, फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली; तिनेहि तसेच सांगितले. मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरूने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा, जालंदर व प्रधानादि लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले. राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसहवर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ****************************************************** अध्याय १८ गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन; तिचा मृत्यु व गुरुकृपेने पुनः सजीवता..... गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बदरिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला. तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी. राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके, तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही, असे म्हणून हळहळ करी. तो जेथे जेथे जाई, तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत. परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणिता पुढे मार्गस्थ होई. हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौडबंगाल टाकून कौलबंगाल्यात गेला. तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती रहात होती. तेथील तिलकचंद राजाची ती सून होय. तो राजाहि गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता. त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती. अशा राजघराण्यात चंपावती ही सासुरवाशीण होती. नणंद, जावा, दीर ह्यांना ती देवाप्रमाणे मानी. काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता; सासूदेखील मोठी वस्ताद बायको होती. तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला. तेव्हा ती सर्व टीका करू लागली की, गोपीचंद राजा षंढ खरा; याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे ! मरण आले तरी बेहेत्तर; पण क्षत्रियधर्म काय भीक मागण्याकरिता आहे? या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले ! कुळाला बट्टा मात्र लाविला. याने आमच्या तोंडाला काळे लाविले. लोकांमध्ये फटफजिती झाली. आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे, त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते. अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली. परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे. तेव्हा नणंदा, जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या. इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला. तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले. त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली. तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला. घरच्या मनुष्यांनीहि यथेच्छ तोंडसुख घेतले. मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की, आता गडबड करून फायदा नाही; तो घरोघरी भीक मागेल व हा आमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील; तेणेकरून आपलाच दुर्लौकिक होईल. तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा. तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या. राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की, चंपावतीला भेटण्यासाथी तुम्हास राजाने बोलाविले आहे. तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता. मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेविले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले. मग राणीने अन्नपात्र वाढून दिले. ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे, म्हणून सांगितले. हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणिले की, मानपान पैक्याला असतो. आपण तर बैरागी झालो. आपणास शत्रुमित्र समान आहेत. आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये. विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला, म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली. ती चंपावतीस सहन झाली नाही. ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जिवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा ह्या वेळेस येथे यावयाची नाही; आम्ही तिला तजविजीने रात्रीस घेऊन येऊ व तुम्हास भेटवू. आता तुम्ही जाऊ नका; मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले. मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला, अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे, असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले. तेव्हा ते म्हणाले की, गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधु होय; तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे, हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजिर खुपसुन जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासहि चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला, असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदहि प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की, जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ति होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाहि थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानिले; यास्तव नाथपंथाचा प्रताप ह्यांना प्रत्यक्ष दाखवावा. ह्यांनी आमच्यात बिलकूल पाणी नाही, असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानि केली; यास्तव नाथपंथाचा तडाका दाखविल्यावाचून ठेविता कामा नये, असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला. मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका; मी जालंदरगुरूस आणून प्रेत उठवितो. ह्या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय? ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही. असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी; पण माझ्या गुरूचा प्रताप असा आहे की, त्याची कीर्ति वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणिले. मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकिले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढिले, पण जसाच्या तसा कायम ! तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरूस आणून बहिणीस उठवितो पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचिली व ते अग्निसंस्कार करणार, इतक्यात गोपीचंद चितेवर बसून 'मलाहि भस्म करून टाका, माझे भस्म झाल्यानंतर जालंदरगुरूच्या कोपानळ शांत व्हावयाचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील. असे सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरूच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस; तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवितो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरूस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरूस आणण्यासाठी गौडबंगाल्यात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंदरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्या वेळी त्याने प्राणास्त्राची विभूति कपाळास लाविली. पृथ्वीवर नैषधराजपुत्रावाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंदरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंदराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरूने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला. ह्या उभयतास पहाताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंदरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदरसत्कार केवळ कुभावाचा होता. ही त्याची मानभावी करणी जालंदरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले. ह्या घरात ती शोभत नाही. असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनीमंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिली; त्यासरशी चंपावती उठली व जालंदरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले, तद्वत जालंदरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडुन प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे ! असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला. मग जालंदराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंदराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तिस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देउन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यैस जात आहे. ह्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे. म्हणून कोणी शत्रु उठणार नाही. मीहि येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन. परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही. म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेहि मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंदरच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंदरनाथ हेळापट्टणास गेला. त्या वेळी राजा उभयतांस पोचवावयास गेला होता. गोपीचंद राजा बदरिकाश्रमास जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंदरनाथ हेळापट्टणास सहा महिने राहून, मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासहवर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बदरिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणिले होते; तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुनः दैवते आणून वर देवविले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************

Search

Search here.