रुक्मिणी स्वयंवर 10 to 18

ग्रंथ - पोथी  > इतर ग्रंथ पोथी Posted at 2018-03-31 04:04:52
रुक्मिणी स्वयंवर http://www.shyamjoshi.org/rukmini-svayamvar1 रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दहावा श्रीगणेशाय नम: ॥ राय चलिले मुगुटांचे ॥ थोर बळ गवेषणाचें । सैन्य पातलें मागधाचें । युद्ध त्याचे दारुण ॥ १ ॥ वेगीं धनुष्या वाहिला गुण । शितीं लावूनियां बाण । शस्त्रें झळकती दारुण । रणकंदन करूं आले ॥ २ ॥ राजे चालिले प्रबळ । यादव उठवले सकळ । दुमदुमलीं दोन्ही दळे । एकमेळें मिसळले ॥ ३ ॥ गगन कोंदलें तिही बाणीं । तळीं खिळिली धरणी । मागें पाय न ठेविती कोणी । वीर रणीं खवळले ॥ ४ ॥ वीर वीरातें हणित ॥ लोहधुळोरा उसळत । वरिया वाट न चले तेथे । वीर अद्‍भुत मातले ॥ ५ ॥ शस्त्रेंसहित तोडिती कर । मुगुऎंसहित पाडिती शिर । गजांसहित मारिती वीर । सपिच्छ शर भेदिले ॥ ६ ॥ चरण तोडिले गजंचे । रजे पाडिले ब्रीदांचे । खुर छेदिले अश्वांचे । आंख रथांचे भेदिले ॥ ७ ॥ राजे विनटले अनेक । यांवरी उठावला श्वफल्क । बाणीं त्रासूनिया देख । एकें एक खिळियेले ॥ ८ ॥ वीर भिडिन्नले पडिपाडें । यादवांचे बळ गाढें । गवेषण चालिला पुढें । गुणीं कुर्‍हाडे लाविले ॥ ९ ॥ श्वफल्क विंधिला पांच बाणी । रथ छेदूनि पाडिला धरणीं । कंक सात्यकी हे दोन्ही । विसां बाणीं विंधिलें ॥ १० ॥ बण अनिवार निर्व्यंग । भेदिलें वीरांचे अष्टांग । गवेषण योद्धा चांग । न करी पांग दुजयाचा ॥ ११ ॥। चक्रदेव चालिला रागें । एकें बाणें विंधिला वेगें । रथासहित घातला मागें । रणभूमि सांडविली ॥ १२ ॥ देखोनि चालिला अतिदंत । कोपें खवळला अद्‌भुत । दहा वीस पांच सात । बा सह्त वरुषला ॥ १३ ॥ बाणीं निवारिले बाण । हांसिन्नला गवेषण । येरु कोपला दारुण । आठ बाण सोडिले ॥ १४ ॥ दारुण बाण आले आठ । अनिवार अति उद्भट । रथसारथी केला पीठ । शिरींचा मुगुट पाडिला ॥ १५ ॥ एक खडतरला बाण । गगना गेला गवेषण । क्रमूनियं ग्रहगण । ध्रुवमंडळ उडविला ॥ १६ ॥ घयासरसी आली भवंडी । पडत पडत आवरली मुरकुंडी । रणांगणीं घातली उडी । मूर्च्छा गाढी सांवरिली ॥ १७ ॥ गवेषण आणिके रथा । चढोनि पातला अवचिता । पाचारूनि अतिदंता । होय विंधिता सा बाणीं ॥ १८ ॥ बाण सुटले कडाडी । पडली डोळियां झांपडी । काढों विसरला वोढी । थोर हडबडी अतिदंता ॥ १९ ॥ दोन भेदले भुंजावरी । एक उरीं एक शिरीं । दोनी रुतले दोहीं करीं । धरणीवरी पाडिला ॥ २० ॥ घायें लोळविला महाबळीं । अधोमुख महीतळीं । झोटीं सुटली मोकळीं । भाते तळीं रिचवले ॥ २१ ॥ हांक देऊनि गवेषण । रणांगणी उभा आपण । त्यावरी चालिला सारण । बाण दारुण घेउनी ॥ २२ ॥ बाण विंधित चपल । धनुष्य तोडिलें तत्काळ । दुजें धनुष्य घे भूपाळ ॥ तेंही सबळ तोडिलें ॥ २३ ॥ तिजे धनुष्य वाइला गुण । तेंही तोडिलें विंधोनी बाण । जें जें धनुष्य घे गवेषण । तें तें सारण तोडित ॥ २४ ॥ सारणें थोर केली ख्याती । धनुष्य घेऊं नेदी हातीं । देखोन कोपला भूपती । मेढा निगुती वाइला ॥ २५ ॥ सारणें विंधिला सारथी । ध्वजस्तंभ पाडिला क्षितीं । येरें विंधिला बाणें सातीं । दोहीं हातीं खोचला ॥ २६ ॥ सारण विकळ पाडिला रथीं । वीर मूर्च्छित पाडिले क्षितीं । गवेषणे लाविली ख्याती । भद्रजती खवळला ॥ २७ ॥ मग मिसळला जळभारीं । करीत असे महामारी । वीर खिळिले जिव्हारीं । शरधारीं वर्षत ॥ २८ ॥ येरीकडे केशिक वीर । वर्षत बाणांचा महापूर । बाणीं त्रासिला बळिभद्र । दळभार वेढिला ॥ २९ ॥ खड्‌ग तोमर गदा परिघ । वीर हाणिताती सैघ । राम साधक अति सांग । घाय आंगा लागों नेदी ॥ ३० ॥ हल भवंडी चहूंकडे । वीर पाडिले दडदडां । नांगरें केला जी उवेढा । केशिक गाढा हांकिला ॥ ३१ ॥ बाणीं विंधिला प्रबळें । तिखट सोडी शरजाळें । बाण तोडोनियां हळें । निजबळें लोटला ॥ ३२ ॥ नांगर उचलूनिया निवाडें । नेहटून पाय ठेविला पुढें । घायीं चूर केली हाडें । अशुद्ध उडे आकाशीं ॥ ३३ ॥ सैन्यावरी लोटला देख । ठायीं पाडिले सेनानायक । धरितां न धरवेचि तबक । वीर अनेक मारिले ॥ ३४ ॥ रथ भूमीसी आफळीं । गज शुंडादंडी पिळीं । शिरें खेळती चेंडूफळी । रणखंदोळीं मांडिली ॥ ३५ ॥ धाक घेतला झुंजारीं । केशिकसैन्य पळे दूरी । बळीभद्र पेटला महामारी । युद्ध वीरीं सांडिलें ॥ ३६ ॥ जरासंध देखिला दूरी । राम चढे रथावरी । रथ पेलिला झडकरी । उपराउपरी मारिला ॥ ३७ ॥ वेगीं धनुष्या चढविला गुण । रामें काढिला निर्वाणबाण । गदें घातली आपुली आण । रणविंदाण पाहें माझें ॥ ३८ ॥ धीर धरीं अर्ध घडी । पाहे युद्धाची निरवडी । जरासंधा बाणीं फोडी । गर्वझाडी करीन ॥ ३९ ॥ गदू निजगडा महावीर । योद्धा रणरंगचतुर । बळीभद्रासी केला स्थिर । रहंवर धांवविला ॥ ४० ॥ येरीकडे यादवभारा । गवेषण पेटला महामारा । बाणीं खिळिले महावीरां मुख्य धुरा खोंचल्या ॥ ४१ ॥ विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार । आट भविन्नला थोर । हाहाकार ऊठिला ॥ ४२ ॥ निजसैन्यासी महामार । दुरोनि देखे बळीभद्र । कोपें खवळल दुर्धर । रहंवर पेलिला ॥ ४३ ॥ परसैन्य देखोनि दृष्टीं । वेगें चालिला जगजेठी । धडधडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला ॥ ४४ ॥ देखोनि शत्रूचा खटाटोप । बळीभद्रासी न धरवे कोप । बाहुस्फुरणें आला कंप । वेगें साटोप ऊठिला ॥ ४५ ॥ रथाखालीं घातली उडी । शेष दडपला फडेबुडीं । वराहाची दाढ तडतडी । कूर्में गाढी पाठि केली ॥ ४६ ॥ वीर खिळूनियां बाणीं । गवेषण गर्जे रणीं । आल बळिभद्र धांवोनी । निर्वाणबाणीं विंधिला ॥ ४७ ॥ बाण विंधिला सबळ । येरें परजिलें मुसळ । साधक बळिभद्र प्रबळ । बाणजाळ तोडिलें ॥ ४८ ॥ नांगर उचलूनियां बळें । न धरत पातला तये वेळे । रथ सांडिला तत्काळें । वेगें पळे गवेषण ॥ ४९ ॥ सवेंचि परतावया पाहत ॥ पायीं घातला नांगरदांत । गवेषण पडिल तेथ । भूमी दांत आदळले ॥ ५० ॥ लाजा उठिला त्वरित । तंव बळिभद्रें दिधली लाथ । येरु अशुद्धातें विमित । पडिआ मूर्च्छित अचेतन ॥ ५१ ॥ सांडूनियां धनुष्यबाण । सैनिक धांविन्नला आपण । रथीं घालोनियां गवेषण । घेऊनि प्राण पळाला ॥ ५२ ॥ देखोनि बळिभद्राचें बळ । राजे चालिले प्रबळ । पुढें करूनियां गजदळ । एक वेळ लोटले ॥ ५३ ॥ आलें देखोनि परदळ । करीत हरुपाचा गोंधळ । झेलित नांगर मुसळ । वेगें सबळ उठिला ॥ ५४ ॥ गज हाणीत मुसळें । विदारीत कुंभस्थळें । घायीं किळकिळती एक वेळे । गजकलेवरें पाडिलीं ॥ ५५ ॥ नांगर घालूनि रथावरी । शतसहस्रांचूर करी । पळत गज पायीं धरी । तेणें किरकिरी करिताती ॥ ५६ ॥ चपळ चौताळती घोडीं । नांगर घालोनि त्यांतें वोढी । घायें मुसळाचेनि पाडी । वीरझोडी मांडिली ॥ ५७ ॥ वीर वरुषताती शस्त्रास्त्रां । जैसा मेरूसी पर्जन्यधारा । रणीं चालतां बळीभद्रा । वीर थरथरां कांपती ॥ ५८ ॥ पायींचे रगडिले पायीं । कारुप राजा पाडिला ठायीं । रथ रथ मोडिला पाहीं । सन्मुख घायीं कोण राहे ॥ ५९ ॥ पृथ्वी तेचि उखळ जाण । नांगरें वीर घाली वैरण । मुसळघायें करा चूर्ण । रणकंदन मांडिलें ॥ ६० ॥ सात्त्विका दंतवक्रा युद्ध । गदें गोंविला जरासंध । मोकळा पडला हलायुध । वर्‍हाडी सुबुद्ध कांडिले ॥ ६१ ॥ वीरीं घेतला रणकावो । देखोनि धांविन्नला शाल्वो । मिळोनि वीराचा समुदावो । महाबाही पडखळिला ॥ ६२ ॥ धांवतां देखोनि शाल्व वीर । आडवा आला अक्रूर । राहें साहें म्हणें स्थिर । धरीं धीर संग्रामीं ॥ ६३ ॥ तंव बळिभद्र पावला रागें । अक्रूरातें म्हणे उगे । मज पाचारिता अंगें । तू कां वेगें आलसी ॥ ६४ ॥ रणीं झुंजार विकळ जाय । तरी दुजयानें व्हावें साह्य । शाल्व बापुडें तें काय । कौतुक पाहें पैं माझें ॥ ६५ ॥ मग चालिला शाल्वावरी । बळीभद्र वेढिला वीरीं । बहुत उठिले महामारी । शरधरीं वर्षती ॥ ६६ ॥ बाप बळीराम जगजेठी । नांगरें बाण तरी पिटी । अंग लागों नेदी चिरटी । शाल्व दृष्टी सूदला ॥ ६७ ॥ बाणीं विंधिला अमित । राम बाणांतें न गणित । वेगें उसळला अद्‍भूत । आला न धरत आंगेंसीं ॥ ६८ ॥ रथ धरिला मकरतोंडी । शाल्वे वेगीं घातली उडी । सांपडला तो रथाबुडीं । वोढाकाढीं निष्टला ॥ ६९ ॥ रथ आपटिला भूमंडळीं । वीर सापडलें तयातळीं । घायें केली रांगोळी । निधा पाताळीं ऊठिला ॥ ७० ॥ ते वेळीं शाल्वें चुकविलें आंग । घायासरिसा उडाला सवेग । मागुता आवेश धरुनियां चांग । रणीं अव्यंग उभा असे ॥ ७१ ॥ शाल्व घेऊनियां गदा । ह्रदयीं हाणतां हलायुधा । गगना उसळला तो योद्धा । धावो नुसधा तळीं गेला ॥ ७२ ॥ शाल्व रथीं जंव चढे । तंव मुसळ वोपिलें रोकडें । करीत अशुद्धाचे सडे । मूर्च्छित पडे अवनीये ॥ ७३ ॥ मग मिसळला मागधांत । घायें शतसहस्र मारीत । अशुद्ध भडभडां वाहात । नांगरें अंत पुरविला ॥ ७४ ॥ बळीबद्रे केली महामारी । वीर झोडिले नंगरीं । तेथं वीर वीरंतें परस्परीं । एशियापरी वोलती ॥ ७५ ॥ हाती येरां दुकळ पडला । मग यासी नांगर साम्पडला । सैन्य नांगरावया आला । वीरकाशिया काढित ॥ ७६ ॥ नांगर घालूनियां बुडीं ।थोर उपडिलिया पेडी । रथगजकाटिया मोडी । पालव्या तोडी वीरांच्या ॥ ७७ ॥ अतिरथी जे उद्भट । समूळ फोडियेले खुंट । बळीभद्र हा कुणबट । केली चोखट रणभूनि ॥ ७८ ॥ महावीरां घालितां घावो । अशुद्धें डवरिला बलदेवो । तेणें शोभत महाबाहो । रणभैरवो डुल्लत ॥ ७९ ॥ रणमदें जाला मस्त । नांगर घेउनि नाचत । वीर देखोनि धांवत । पुरला अंत सैन्याचा ॥ ८० ॥ घायें मारीत महावीर । भडभडां वाहे रुधिर । लोटला अशुद्धाचा पूर । नदी दुस्तर उलथली ॥ ८१ ॥ नदी वाहतां दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । वोडणें कमठें पुष्टी गाढी । गज करवडी महाग्राह ॥ ८२ ॥ बाबरझोटिया केशजाळ । तेचि नदीमाजी शेवाळ । मगर सुसरी महाविशाळ । शिरें विक्राळ वीरांचीं ॥ ८३ ॥ बाण तरती सपिच्छेंसी । तेचि मस्त्य रणनदीसी । धनुष्यें वाहती शितेंसीं । वक्रगतीसीं तेचि सर्प ॥ ८४ ॥ पडिले गजांचे अलंकार । घंटा घागरिया नूपुर । तेचि नदीमाजी दर्दुर । लहान थोर किरकिरती ॥ ८५ ॥ रथ ध्वजेंसीं वाहात । तेंचि तारुं शिडेंसहित । वीरां मोक्ष भरिलें भरित । तारू तेथ श्रीकृष्ण ॥ ८६ ॥ एकेचि घायें शिर पडे । स्वर्गपर्यंत तें उडे । स्वर्गभोग त्या नावडे । कृष्णाकडे तें परतलें ॥ ८७ ॥ कृष्णदृष्टी देहत्याग । तुच्छ करूनि सांडिती स्वर्ग । जिंतिला जन्ममरणाचा पांग । सुख अव्यंग पावले ॥ ८८ ॥ घायें उडालें शिरकमळ । टाकूनि गेलें ध्रुवमंडळ । पदनमनेंचि अढळ । उतावेळ परतलें ॥ ८९ ॥ देह अर्पितां श्रीकृष्णासी । चारी मुक्ती होतीं दासी । म्हणोनि आलें कृष्णचरणासी । निजसुखासी पावलें ॥ ९० ॥ घायीं उडालें शिर एक । टाकून गेलें सत्यलोक । ब्रह्मसदन नावडे देख । कृष्णासन्मुख परतलें ॥ ९१ ॥ देखोनि कृष्णाचें श्रीमुख । धिक्कारिला सत्यलोक । ब्रह्मसदन वांच्छिती मूर्ख । परमसुख हरिचरणीं ॥ ९२ ॥ घायासरिसें शिर उडे । वैकुंठपर्यंत तें चढे । एकदेशी गति नावडे । हरीकडे मुरडलें ॥ ९३ ॥ सांडूनिया कृष्णनाथा । आम्ही नेघों सलोकता । हरिचरणीं ठेविला माथा । नेघो सर्वथा वैकुंठ ॥ ९४ ॥ शिर उडालें अंतराळीं । अहंकारमुगुट पडला तळीं । शिर न उतरेचि भूतळीं । हरीजवळी पावलें ॥ ९५ ॥ जेथें अभिमान तुटला । तेथेंचि त्यास हरि भेटला । युद्धमिसें लाभ झाला । वीरां फावळा निजमोक्ष ॥ ९६ ॥ अत्यंत प्रळयींचा चिद्‌घन । वर्षताहे संकर्षण । वीरांचा अभिमान मर्दून । लिंगदेह छेदिल ॥ ९७ ॥ अधिकारियां मोक्षभावो । द्यावयालागीं कृष्णदेवो । मिष भीमकीचा विवाहो । रणनिर्वाहो मोक्षाचा ॥ ९८ ॥ निधड्या वीरां जाली मुक्ती । देह लोभियां कवण गती । रण सांडोनियां जे पळती । ते विन्मुख होती कृष्णासी ॥ ९९ ॥ अश्व गज जे रणा आले । तेही श्रीकृष्णें उद्धरिलें । युद्ध सांडून जे पळाले । ते पावले अवगती ॥ १०० ॥ यापरी तो बळिभद्र । कृपेनें कोपला दुर्धर । ब्रह्मसायुज्येंकरून मार । वीरें वीर आटिलें ॥ १०१ ॥ एका जनार्दनी कौतुक । कथारहस्य सुखदायक । पुढील कथा अलोकिक । समाधिसुख संग्रामीं ॥ १०२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे चैद्यमागधपराजयो नाम दशम: प्रसंग: ॥१०॥ ॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग अकरावा श्रीगणेशाय नम: । येरीकडे वक्रदंत । सात्त्विकांतें पाचारित । कोपें खवळला अद्‌भुत । टाकोनि बोलत येरयेरां ॥ १ ॥ केवळ सात्त्विक तूं पैं गा । तापसियांमाजी होसी दाटुगा । न साहवे युद्धवेगा । पळोनि मागां जासील ॥ २ ॥ सात्त्विकांसी युद्ध घडे । हें तंव बोलणेंचि कुडे । केवळ सात्त्विक बापुडें । युद्धापुढें केविं राहे ॥ ३ ॥ अरे मी सात्त्विक न भेटतां । वक्रदंताची श्र्लाघ्यता । तुझी तोडीन रे वक्रता । सात्त्विकता पाहें माझी ॥ ४ ॥ सात्त्विका शरण न रिघतां साचें । तोंवरी तुम्हां सत्त्व कैंचे । लेइलेति अभिमानाचीं कवचें । लक्ष्य साचें भेदीन ॥ ५ ॥ लागतां सात्त्विकाचा घावो । परतोनि जावया नाहीं ठावो । आली वाट भुलवीन पाहा वो । महाबाहो खवळला ॥ ६ ॥ घायेंवीण घेईन प्राण । तुझी माया करील रुदन । तिचें देखो न शकसी वदन । देहबंधन छेदीन ॥ ७ ॥ वक्रदंत कोपला गाढा । वाइला रजतमाचा मेढा । ममताभालीं जी दडदडां । कोपें वेगाढा विंधित ॥ ८ ॥ बाप सात्त्विक निजगडा । बोधकवचें जाला गाढा । निजबळें चालिला पुढां । भाली तडतडां तोडित ॥ ९ ॥ लक्ष्य आतुल्या परवडी । गुणधनुष्याचें शीत तोडी । खुंटला विषमबाणाची वोढी । धनुष्य लडलडी नुसधेंचि ॥ १० ॥ धनुष्य तुटलियापाठीं । कामकोतेसीं सवेग उठी । सत्त्वें सात्त्विक जगजेठी । लक्ष्य दृष्टी साधिलें ॥ ११ ॥ काढिला कामांतक बाण । धगधगित अति दारुण । कामकोतें केले चूर्ण । बळ संपूर्ण सात्त्विकाचें ॥ १२ ॥ घेऊनि क्रोधाचा परिघ । अविचारीत टाकिला अव्यंग । शांतिबाणें विंधिला चांग । घायें परिघ उडविला ॥ १३ ॥ घेऊनि लोभाची पैं गदा । भुलवूनि करिता ह्रदयभेदा । वैराग्यबाणें विंधिला सांधा । तोडोनि गदा सांडिली ॥१४ ॥ गदा तुटलियावरी । मोहवोडण आदळे उरीं । गुप्तशस्त्र घेऊनि करीं । ह्रदयावरी हाणों आला ॥ १५ ॥ दृढ सात्त्विक- अनुसंधान । विवेकतेजें तिखट बाण । विंधोनि उडविलें वोडण । वक्रदंत मागें सारिला ॥ १६ ॥ घेऊनि वासनेचे वज्र । वेगें धाविन्नला थोर । भेदावया जिव्हार । साहंकार चालिला ॥ १७ ॥ सात्त्विकें थोर धरिला धीर । अत्यंत तेजें तिखट वीर । विंधोनि वज्र केलें चूर । घायें अंबर गर्जिन्नले ॥ १८ ॥ वज्र छेदिलें वीरनायकें । वक्रदंत चालिला रोखें । चहूं मुक्तीचीं वाघनखें । ह्रदयीं तिखें हाणों आला ॥ १९ ॥ सात्त्विक उठावला आंगें । शस्त्रसंधान सांडिलें वेगें । लाता हाणोनि घातला मागे । मोडिली रगें वाघनखे ॥ २० ॥ मग सात्विकें दिधली हांक । वक्रदंतें घेतला धाक । देहलोभाभेणें देख । अधोमुख पळाला ॥ २१ ॥ पळतां भुलला तो वाट । पडिला अभिमानाचा मुगुट । सात्त्विक झुंजार चोखट । पळत्यापाठीं न लागेचि ॥ २२ ॥ जरासंध आणि गद । दोघां चढला रणमद । क्रोधें झाले अति सक्रोध । वीर उन्नद्ध लोटले ॥ २३ ॥ मेरु मांदार झगटले । तैसे रथीं रथ तगटले । दोघे महामारीं पेटले । विरुद्धबोलें बोलती ॥ २४ ॥ सन्मुख देखोनियां गद । हांसिडला जरासंध । मजसीं भिडो न शके गोविंद । बुद्धिमंद तू कैंचा ॥ २५ ॥ विपायें कांहीं ऎसें घडे । जैं अंधारीं सूर्य बुडे । उंडणीं स्वयें भिंती चढे । तरी युद्ध न घडे तुज मजसीं ॥ २६ ॥ मशकाचेनि चरणप्रहारें । महामेरू उभाचि विरे । इंद्रासीं भिडिजें उंदिरें । तैं तुज मज सामोरेम संग्राम ॥ २७ ॥ घटामाजी सिंधु सांपडे । जांभईमाजी आकाश बुडे । वागुरेमाजी वारा अडे । तैं तुज घडे संग्राम ॥ २८ ॥ मुरकुट सगळा समुद्र शोखी । गज गिळिजे मुंगिया मुखीं । आकाश चडळें काढिजे टाकीं । तैं तुज मज घडे संग्राम ॥ २९ ॥ चित्रींचा देखोनिया सर्प । गरुडाअंगीं उठे महाकंप । तैसाच तुझा हा साटोप । कटाटोप घडे युद्धी ॥ ३० ॥ सूर्यासीं खद्योत रणांगणीं । भिडें शके झॊटधरणी । तरी तुज मजलागोनी । पडिपाड रणीं असेना ॥ ३१ ॥ नवग्रहांचें बळ घटांसी । परी न भिडवे पाषाणासीं । तेवीं तूं यादव योद्धा होसी । परी मजसीं न झुंजवे ॥ ३२ ॥ ससा चढोन सिंहाचे माथां । जरी नाचवील निजसत्ता । तरी तुज मज समता । युद्धीं सर्वथा न घडेचि ॥ ३३ ॥ वांझेचा पुत्र महारोगी । संध्याराग करूनि भुगी । कासवघृतेंसीं आरोगी । निरुजा रोगी व्हावया ॥ ३४ ॥ तैसा प्रकार आजि घडला । जे यादववीरीं दुष्काळ पडला । यालागीं गद येथें धाडिला । नावाजिला पुरुषार्थी ॥ ३५ ॥ गदू नांवाचा रे शब्दीं । तुझा संग्रह कीजे वैदीं । पोतडीं घालोनि कांखेसांदीं । दारोदारीं हिंडविती ॥ ३६ ॥ रोगियांमाजी तूं सबळ । तुज युद्धीं कैचें बळ । धर्मवाट दिधली पळ । सांडीं सळ युद्धाचें ॥ ३७ ॥ हांसूनि बोलिला वीर गदू । तुझा जरेनें सांधिला सांधू । सांधा न वैसेचि निबंधू । फाडूनि शुद्ध करूं आलों ॥ ३८ ॥ शस्त्र घालीन मी गदू । काढीन अभिमानाचा रेंदू । तोडीन जरामरणकंदू । ह्रदय शुद्ध करीन ॥ ३९ ॥ ऎकोनि खवळला मागध । झाला कवचेंसीं सन्नद्ध । किती करिशी रे अनुवाद । होई सावध चावटा ॥ ४० ॥ वोढी काढोनि सत्राणें । गद विंधिला आठ बाणें । येरू धनुर्विद्या जाणें । बाण तत्क्षणीं तोडिले ॥ ४१ ॥ गदें ओढोनियां कानाडी । धगधगित बाण सोडी । पाडिले जरासंधा झांपडी । निवारण परवडी न करवे ॥ ४२ ॥ जरेनें सांधिला जो सांधू । तो संधि पाहूनि विंधी गदू । वर्मी खोंचला जरासंधू । रणमदू उतरला ॥ ४३ ॥ बाण खोंचला अतिनिगुती । विकळ गेला दोहीं हातीं । गळोनि धनुष्य पडिलें क्षितीं । गदें ख्याती लाविली ॥ ४४ ॥ मागधासी पडिले टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक । पोटीं रिघाला जी धाक । तुटलें तुक युद्धाचे ॥ ४५ ॥ जरासंध मागें पाहे । रणीं कोणी न देखे साहे । बळिभद्रं झोडिले रायें । हुबत घायें पडियेले ॥ ४६ ॥ मुळींच झाला अपशकुन । पडिले हातीचे धनुष्यबाण । सिद्ध नपवे आंगवण । रणांग्ण सांडिलें ॥ ४७ ॥ काल साह्य श्रीकृष्णास । यश आलें यादवासी । पाठी देऊनि गदासी । निघे वेगेंसी जरासंध ॥ ४८ ॥ जरासंध मोडल्यापाठीं । पळतां राजे देखती दृष्टी । तिंही सांडिल्य युद्धगोष्टी । उठाउठी पळाले ॥ ४९ ॥ यादवां यश आलें गाढें । पळतां न पाहती मागें पुढें । रथ गज सांडूनि घोडे । वीर वेगाढे पळाले ॥ ५० ॥ पळतां पडताती वेंगडी । योद्धे नव्हों आम्ही वर्‍हाडी । बळीभद्रें निजपरवडी । रणलुगडीं वोपिलीं ॥ ५१ ॥ नवरीचा वडील भावो । तेणें दिधला गौरवो । पाठी तांबड्या करूनि पाहा वो । रायें रावो बोळविले ॥ ५२ ॥ निजप्राप्तीसी विन्मुख । युद्धीं जाले पराङ्‌मुख । राजे नरवीर अनेक । पळतां दु:ख पावले ॥ ५३ ॥ अत्यंत प्रळय करितां देख । संकर्षणें दिधली हांक । पोटीं घेऊनियां धाक । एकेएक पळाले ॥ ५४ ॥ देहलोभियें बापुडीं । पायीं ममतेची वेंगडी । विस्मरणाची खरस तोंडी । जरें मुरकुंडी घालिती ॥ ५५ ॥ सांडिली पुरुषार्थलुगडीं । केवळ नागवीं उघडीं । विन्मुख पडती उबडी । मेलीं मढी होउनी ठेली ॥ ५६ ॥ चहू पुरुषार्थी नव्हे वाट । केवळ नरस्तुतीचे भाट । करिती युक्तीची वटवट । भिकें पोट भरूं आले ॥ ५७ ॥ एकें लटिकेंचि करूनि खत । धरणें करूं ऎसें बोलत । आम्हांसी विन्मुख जगन्नाथ । जीवघात करूं नका ॥ ५८ ॥ नवविध लुगडीं सांडुनि वेगीं । प्रंपचराख लाविती आंगीं । अलक्ष्य चुकोन झाले जोगी । भिकेलागीं हिंडावया ॥ ५९ ॥ एक मरणाचेनि धाकें । काखे लोभाचे चौंडके । प्रपंच गोंधळाचेनि हरिखे । उदो म्हणूनी नाचती ॥ ६० ॥ एकी धाक घेतला भारी । धनलोभें कापती टिरी । अधर्मटोले वाजती शिरीं । मुखी उचारू नकारू ॥ ६१ ॥ कामखंडेरायापुढे । एक कुतरें झालें गाढें । कोणी आलिया दारपुढें । वसवूनि ऊठती ॥ ६२ ॥ एक जाले जी कापडी । सलोभलोभें रंगलीं लुगडीं । धरूनि जीवित्वाची गोडी । तीर्थपरवडी सांगती ॥ ६३ ॥ पळतां न पळवे निश्चित । म्हणोनि बैसले ध्यानस्थ । पूजा लोकांची वांच्छित । भोगीं चित्त ठेवोनिया ॥ ६४ ॥ दांती तण तोडिती पाहीं । एक म्हणति आम्ही गाई । पशु जाहलों मनुष्यदेही । अभक्ष्य पाहीं भक्षिती ॥ ६५ ॥ केवळ देहलोभासाठी । मोक्षश्रियेसी पडिली तुटी । युद्धी पळालियापाठीं । आपदा मोठी वीरांसी ॥ ६६ ॥ यादववीर जगजेठी । न लागती पळतियापाठी । भेडें न पाहतीच दृष्टीं । उठाउठी पळालीं ॥ ६७ ॥ रणीं जिंकिले महाशूर । तुरें वाजती अपार । विजयी जाले यादववीर । जयजयकर प्रवर्तला ॥ ६८ ॥ वीर सांगती युद्धगोष्टी । सोडिल्या कवचांच्या गांठी । उल्हास भीमकीच्या पोटीं । हरिख सृष्टी न समाये ॥ ६९ ॥ आपुले न पडतीच रणीं । बंधू आले नाहींत कोणी । राजे गेले जी पळोनी । भीमकी मनीं हरिखलीं ॥ ७० ॥ आतां कृष्णरुक्मिया सन्नद्ध । दोघां होईल द्वंद्वयुद्ध । मेहुणेपणाचा विनोद । अतिविनोद निकराचा ॥ ७१ ॥ पुढील कथा अतिगहन । रसाळ आहे अनुसंधान । एक आविनवी जनार्दन । सावधान परिसावें ॥ ७२ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे यादवविजयो नाम एकादश: प्रसंग: ॥११॥ ॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग बारावा श्रीगणेशाय नम: ॥ निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऎकोन विकळ पडियेला ॥ १ ॥ पांडुरवर्ण झाले डोळे । मुखींहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें । गात्रें विकळें पडियेली ॥ २ ॥ भीमकी अप्राप्तीचे बण । ह्रदयीं लागले दारुण । घायेंवीण घेतला प्राण । अकालमरण वोढवलें ॥ ३ ॥ वोखेटवाणें दिसे मुख । नाडी तुटल्या नि:शेष । कृष्णधाकाची धुकधुक । ह्रदयामाजी उरली असे ॥ ४ ॥ महाशब्द मंडपद्वारीं । मिळालिया नगर-नारी । माता येऊनि रुदन करी । कपाळ करीं पिटीत ॥ ५॥ सिद्धीं नपवेचि गे शोभन । वायां गेले वरमायपण । अंबिका क्षोभली गे जाण । वराचे प्राण वांचोत कां ॥ ६ ॥ थोर वोडवलें दु:ख । न देखेंचि सुनमुख । बुडालें सोहळ्याचें सुख । हरिखीं विख कालविलें ॥ ७ ॥ अगे हा रुक्मिया दुर्बुद्धी । न पाहेचि लग्नशुद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धि मांडिली ॥ ८ ॥ कृष्ण ज्योतिषी गे निका । वश नोहे पांचां पंचकां । काळ साधिला नेटका । सम्यो देखा तो जाणे ॥ ९ ॥ तेणेंचि साधिली गे वेळ । साधोनि नेली भीमकबाळ । आमुचें करंटें कपाळ । आतां शिशुपाळ वांचवा ॥ १० ॥ विलाप करूनि अनेक । शिंपिलें शिशुपाळचें मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥ ११ ॥ उठूनि बैसला एकसरें । श्वास घालता पैं थोरें । दु:ख ह्रदयींचें नावरे । नेत्रद्वारें जळ चाले ॥ १२ ॥ शिशुपाळा आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन । धीरें आवरूनियां जाण । शहाणपणा मांडिले ॥ १३ ॥ नोवरी नेली रे सुंदर । पडिले समर्थासीं वैर । कृष्ण नेटका झूंजार । आणी बळिभद्र महाबळी ॥ १४ ॥ हेच दोघे नावरती । येर यादव ते किती । ऎसें विचारूनि चित्तीं । काय वीराप्रती बोलिला ॥ १५ ॥ सौन्य पालाणा पालाणा । घाव घाला रे निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणांगणां जाऊं वेगीं ॥ १६ ॥ सन्नद्ध अक्रूनियां दळ । रथीं चढला शिशुपाळ । नगरद्वारा आले सकळ । पुढें घायाळ भेटले ॥ १७ ॥ घायीं तुटले सबळ । अशुद्धें झाले बंबाळ । बणीं भेदलें कपाळ । वीर विकळ पडताती ॥ १८ ॥ वीरी घेतलें घायवारें । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल रे बळीभद्रें । साह्य दुसरें कोणी न ये ॥ १९ ॥ एकीं घेतला भेदरा । एक कांपती थरथरां । करूं नको गा बलिभद्रा । दास डिंगर आम्ही तुझे ॥ २० ॥ एकचे तुटले पैं हात । एकीं विचकले दांत । एक कण्हत कुंथत । तवा देत पैं आले ॥ २१ ॥ एक घायीं जर्जर बहुत । एक हंबत हुंबत । एकांची लोंबती आतें । घायीं कोते अडकलीं ॥ २२ ॥ एक रडत रडत । एक अत्यंत चरफडित । एक पाणी जी मागत । खुणा हात दाउनी ॥ २३ ॥ मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचें अर्ध तुटले शिर । ऎसाचे घायीं बुडाले तीर । तेणें वीर तळमळतीं ॥ २४ ॥ भले गौरविले वर्‍हाडी । थितीं गेलीं लेणीं लुगडीं । एक नागवी उघडीं । मेलीं मढीं वोढिती ॥ २५ ॥ घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं चौघीं जणीं । वीरश्रेणी आणिल्या ॥ २६ ॥ एक मार्गी झालें पुरें । एकाचें आणिले खटारें । वीर आपटिले जी वीरें । बळिभद्रे मारिले ॥ २७ ॥ राये खोचले मुगुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । डोळे मोरकुंचे वारिती ॥ २८ ॥ देखोनि दचकला शिशुपाळ । धांकिन्नलें त्याचें दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवांचे ॥ २९ ॥ युद्धीं झाले पराङ्‌मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेउनी ॥ ३० ॥ भेटला शिशुपाळ सन्मुख । अत्यंत कोमाइलें त्याचे मुख । बुडलें सोहळ्याचें सुख । ह्रदयीं दु:ख भीमकीचें ॥ ३१ ॥ दु:खे मुख काळवंडलें । दोन्ही ओंठ वाळले । लाजा न बोलवे बोलें । तें देखिलें जरासंधें ॥ ३२ ॥ मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद कां करिसी मना । प्राप्ताप्राप्ताची गणना । आधीन कोणा पैं नाहीं ॥ ३३ ॥ संसार म्हणजे खांबसूत्र । चौर्‍यायंशीं लक्ष पुतळ्या विचित्र। त्यांचा सूत्रधारी ईश्‍वर । त्याचिया इच्छें वर्तिजे ॥ ३४ ॥ आपण राहोनियां दूरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूतें तदनुसार सारी । निजव्यापारी वर्तती ॥ ३५ ॥ तेथें सुखदु:ख निजतंत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥ ३६ ॥ येथें यश आलियाचे सुख । अथवा अपेशचें दु:ख । अहंपणें मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥ ३७ ॥ येथें कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदु:खांचे नागवणे । जन्ममरणांसी अवतणें । दिधलें तेणें सर्वथा ॥ ३८ ॥ अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदु:खांसी ठावो । जन्ममरणाच निर्वाहो । तेणेंचि पाहाहो होतसे ॥ ३९ ॥ यालागीं अहंकर्तव्यता । मनीं न धरावी सर्वथा । भीमकीप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवों नेदी ॥ ४० ॥ म्यांचि पाहें पां केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युद्ध केलें सत्रा वेळ । एक वेळ जयो आला ॥ ४१ ॥ भंग झालियाचे दु:ख । अथवा यश आलियाचे सुख । हें न मानूनियां देख । यथासुखें वर्तावे ॥ ४२ ॥ एवं सुखदु:ख जेम आहे । तें तवं काळाधीन पाहें । तो काळ ज्यासी साह्य होये । तोची लाहे यशातें ॥ ४३ ॥ आजि तुज युद्धासी जातां । यश न ये गा सर्वथा । काळ साह्य श्रीकृष्णनाथा । झाला तत्त्वतां निजबळें ॥ ४४ ॥ काळ साह्य झालेपणीं । प्राप्त झाली बा रुक्मिणी । मजसकट राजे राणी । तृणप्राय जिंकिले ॥ ४५ ॥ तो जंव काळ साह्य नाहीं । तंववरी युद्ध करिशील कायी । वीर झोडिजेतील घायीं । योद्धे ठायी पडतील ॥ ४६ ॥ जंव अनुकूळ नाहीं काळ । तोंवरी काय करिशील बळ । सिद्धी न पवे गा सकळ । श्रम केवळ पावशील ॥ ४७॥ यालागीं धीर धरीं शहाणपणीं । जंव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंकोन अर्धक्षणीं । केवीं रणीं राहातील ॥ ४८ ॥ यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासी बोध । मग सोडोनि युद्धक्रोध । निजनगरासी निघाला ॥ ४९ ॥ शिशुपाळासी युद्धाआंत । जीवेंचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला जी अनर्थ । हित मानित मदघोष ॥ ५० ॥ तो म्हणे जरासंधासी । उत्तीर्ण नव्हे उपकारासी । तुवां वाचविले शिशुपाळासी । पुत्रदानासी तूं दाता ॥ ५१ ॥ ऎसें मानुमियां सुख । परतला जी दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥ ५२ ॥ युद्धीं यादवीं मारितां । राजे उरले जे झुंजतां । तिहीं मानूनियां हिता । मग सर्वथा निघाले ॥ ५३ ॥ घयीं जर्जर नेंओं किती । नागविली सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रती । वेगें भूपती निघाले ॥ ५४ ॥ मग परतला शिशुपाळ । राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणें केले ॥ ५५ ॥ धुर रणीं होय विन्मुख । तेव्हांचि त्याचें काळें मुख । कवण वांचल्याचें सुख । घेऊनि विख मरावें ॥ ५६ ॥ जरासम्ध शिशुपाळ देखतां । सकल राजेही ऎकतां । उभा करोनि भीमकपिता । थोर गर्जता तो झाला ॥ ५७ ॥ तुम्ही सांडिले पुरुषार्था । मी तंव नेऊ नेदी राजदुहिता । रणी जिणोनि कृष्णनाथा । भीमकी आता आणीन ॥ ५८ ॥ कृष्ण विभांडोनि बाणी । हिरोनि नाणींच रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणीं । मजलागोनी तो दोष ॥ ५९ ॥ जे करिती सांधुनिंदा । त्या पापाची मज आपदा । र्णीं न जिंकितां गोविंदा । जरी मी नुसधा परतेन ॥ ६० ॥ विद्या होऊन गर्वा येती । विकल्पूनि गुरुसी निंदिती । तीं तीं पापें मज होती । जरी मी श्रीपती न जिंके ॥ ६१ ॥ केवळ पूज्य मातापिता । त्यांतें पुत्र हाणे लाता । तीं तीं पापें मजचि आतां । जरी श्रीकृष्णनाथा न जिंके ॥ ६२ ॥ देखोनि सधुजन्नंसी । दोष आरोपिती त्यासी । तीं तीं पापें सजसी । जरी मी कृष्णासी न जिंकें ॥ ६३ ॥ कृष्ण न जिंकितां रणीं । घेऊनि न येतां रुक्मिणि । पुरीं न प्रवेशें कौंडणीं । मुख परतोनी न दाखवी ॥ ६४ ॥ ऎसी वाहूनियां आण । कवचेम लेइला । वेगें घेऊनि धनुष्यबाण । म्हणे आंगवण पहा माझी ॥ ६५ ॥ क्रुष्ण अज्ञानाची आदी । त्यासी ह्रदयीं नाहीं बुद्धी । पर्ण पाहे राक्षसविधीं । तें मी सिद्धी जाऊं नेदीं ॥ ६६ ॥ कृष्ण गर्वित एकलेपणीं । दुजियातें दृष्टीं नाणीं । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बणीं दंडीन ॥ ६७ ॥ रागें कांपत थरथरां । दांत खातसे करकरां । धूम्र निघत नेत्रद्वारा । रहंवरा चढिन्नला ॥ ६८ ॥ रथीं बैसला मदगर्वित । वेगे सारथ्याते म्हणत । चपळ चौताळो दें रथ । कृष्णनाथ जेथें असे ॥ ६९ ॥ आजि कृष्णासी सन्नद्ध । करणें असे द्वंद्वयुद्ध । अगर्वी धरितो गर्वम्द । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥ ७० ॥ अजि माझ्या तिखट बाणीं । कृष्ण खिळीन रणांगणीं ।चोरूनि नेतो माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥ ७१ ॥ सैन्य अवलोकिले दृष्टीं । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थातीं । शस्त्रें मुष्टीं झळकती ॥ ७२ ॥ चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनियां सबळ । संख्या केवळ परियेसा ॥ ७३ ॥ दोन लक्ष अठरा सहस्र । सातशें अधिक वीर । संख्या अक्षौहिणीप्रकार । केला निर्धार श्रीव्यासें ॥ ७४ ॥ किती गज किती रथ । अश्व पदाती समस्त । विभाग संख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥ ७५ ॥ एकवीस सहस्र आठ शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्नत । सैन्य आंत चालती ॥ ७६ ॥ एक लक्ष सहस्र नव । तीन शतें पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥ ७७ ॥ पासष्ट सहस्र सा शतें । एक दशक अधिक तेथें । वीर पायांचे भिडते । युद्धीं पुरते निजगडे ॥ ७८ ॥ इतुकी सैन्याची मिळणी । तया नांव एक अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणीं । महामुनी श्रीव्यासें ॥ ७९ ॥ ऎसें निजसैन्य अद्‌भुत । त्यामाजी रुक्मिया विराजीत । साह्य आले राजे दक्षिणाद्वत । वीर गर्जत महाबळी ॥ ८० ॥ रणीं जिणोनि जरासंध । मीनले गद हलायुध । अवघे करिती विनोद । थोर आल्हाद जेत्यांचा ॥ ८१ ॥ यादव मिळोनि थोर थोर । करिती परतावयाचा विचार । येतां देखोनि पारखे भार । मग सामोरे लोटले ॥ ८२ ॥ दोन्ही सैन्यां झाला मेळू । घायीं उठला हलकल्लोळू । वाजंत्र्यांचा ध्वनी प्रबळू । रणवेताळू खवळला ॥ ८३ ॥ कोपें चालिला रुक्मिया वीरू । ठाकोनि आला यादवभारू । तेथें न देखे शारंगधरू । रथ सत्वरू पेलिला ॥ ८४ ॥ एकाएकीं एकला चक्रपाणी । दुरोनि देखिला नयनी । एके रथीं कृष्णरुक्मिणी । देखोनि मनीं प्रज्वळला ॥ ८५ ॥ सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेवी वैरागी निघे योगासी । तेवीं सैन्य सांडोनि यादवांपाशीं । एके रथेंसीं धांविन्नला ॥ ८६ ॥ धनुष्य मांडूनि मांडणीं । गुण वाइला तत्क्षणीं । बाण लावूनियां गुणी । वोढी काढोनि चालिला ॥ ८७ ॥ श्रीकृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता नेणे प्रभावो । कुमती धरोनिया मदगर्वो । काय पाहा वो बोलत ॥ ८८ ॥ कृष्णासी म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें । चोरी करुन पळसी काये । कोण माय राखेल ॥ ८९ ॥ जगामाजी तूं चोर होसी । चोरूनि दिसों नेदिसी मागासी । आजि मी पावलों लागासी । केउता जासी निजचोरा ॥ ९० ॥ उद्देशें देवा इंद्रादिकीं । होम कीजे अग्निमुखीं । ते अवघे तूं खाशी शेखीं । अग्निमुखीं कांहीं नुरे ॥ ९१ ॥ देव म्हणती आम्हांसी पावले । त्यांसी ठकवूनि हव्य त्वां नेलें । तें काउळें मत येथें च चाले । सांडीं वहिलें भीमकीसी ॥ ९२ ॥ जन्मोनियां यादववंशी । कुळगोत्रा नाश करिसी । बुडविलें नांवरूपासी । जाती तुजपाशीं तवं नाहीं ॥ ९३ ॥ भोग अवघेचि भोगांसी । आणि योगिया म्हणविसी । मूळमाया ते तुजपाशीं । वेष धरिसी कपटाचा ॥ ९४ ॥ तुझिया कपटाची झाडणी । करावया आलों मी गुणी । झाडणी करीन रणांगणीं । झणीं पळोन जाशील ॥ ९५ ॥ सांडीं सांडीं माझी बहिणी । नाहीं तरी खोंचीन तिखट बाणीं । तीन बाण लावूनि गुणीं । चक्रपाणीं विंधिला ॥ ९६ ॥ शार्ङ्ग टणत्कारूनि हरी । सा बाण घेतले करीं । तीन सोडूनि माझारीं । धनुष्य करीं छेदिलें ॥ ९७ ॥ सवेंचि सोडिलें आठ बाणांसी । चारी चहूं वारूंसी । सारथी पाडूनि धरणीसी । ध्वजस्तंभ छेदिला ॥ ९८ ॥ रुक्मिया कोपा चढिन्नला भारी । पंच बाण घेतले करीं । रागें सोडिले कृष्णावरी । बळें निर्धारीं विंधित ॥ ९९ ॥ कृष्ण धनुर्वाडा निजगडी । अचुक संधानपरवडी । पांचही बाण वाणें तोडी । धनुष्य पाडी छेदुनी ॥ १०० ॥ आणीक धनुष्य घेतलें वेगें । सन्मुख विंधों आला रागें । तेंही तोडिलें श्रीरंगे । आणीक वेगें घेतलें ॥१ ॥ बाण लावोनियां वोढी । तेंही कृष्ण सवेंचि तोडी । जें जें धनुष्य रुक्मिया काढी । तें तें तोडी श्रीकृष्ण ॥ २ ॥ धनुष्य घेतलें घाव टाळुनी । अग्निअस्त्र लाविलें गुणीं । धूम्र कोंदला दिशा व्यापुनी । ज्वाळा गगनीं न समाती ॥ ३ ॥ पर्जन्यास्त्र सोडिलें हरी । मेघ वर्षती मुसळधारी । अग्नि शांत क्षणामाझारीं । वेगे श्रीहरी पैं केला व ४ ॥ येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झझामारुत सुटला रणीं । वार्‍यानें जाऊं पाहे अवनी । टाळीं कानी बैसलीं ॥ ५ ॥ पर्वतास्त्र सोडी श्रीकृष्ण । वारा सांडिला बुझोन । येरें वज्रस्त्र सोडून । गिरी ताडून सांडिले ॥ ६ ॥ रुक्मिया कोपला महाथोर । कृष्णासी म्हणे स्थिर स्थिर । गुणीं लाविलें उद्रास्त्र । महारुद्र प्रगटला ॥ ७ ॥ दाढा विक्राळा तिखटा । माथां मोकळीया जटा । काळिमा चालिलीसे कंठा । मिशा पिंगटा आरक्त ॥ ८ ॥ कृष्ण अस्त्रविद्याचतुर । बाणीं योजिया भस्मासुर । बाण देखोनि पळे रुद्र । धाके थोर कांपत ॥ ९ ॥ रुक्मिया आणिक शस्त्र विचारी । तंव कृष्णें धनुष्य छेदिलें करीं । सरली कोदंडसमग्री । रथावरी कांही नाहीं ॥ ११० ॥ सरली धनुष्याची वोढी । परिघ घेऊन घातली उडी । कृष्ण विंधोनि परिघ तोडी । अपरवदी घायांची ॥ ११ ॥ परिघ तुटलियापाठीं । रागें पट्टिश घेऊनि उठी । न धरत पातला उठाउठी । कृष्णदृष्टी सूदली ॥ १२ ॥ कृष्णें विंधिलें कठीण बाणां । पट्टिश उडविला गगना । सवेचि शूळ घेऊनि ताणी । हाणी कृष्णा पै आला ॥ १३ ॥ दांत खातसे कराकरा । शूळ भोवंडी गरगरां । साहें म्हणे शार्ङ्गधरा । घायें पुरा करीन ॥ १४ ॥ कृष्णें बाण सोडिला पाहीं । शूळ तोडिला तीं ठायीं । सवेचि पाडिला भोई । तीं ठायीं त्रिखंड ॥ १५ ॥ शूळ वाया गेलां थोरा । रुक्मिया चुरी दोनी कर । सवेचि घेवोनि तोमर । कृष्णासमोर धांविन्नला ॥ १६ ॥ साहें म्हणे कृष्णनाथा । तोमर हाणों आलों माथां । माझारीं विंधिला येतायेता । घायें मागुता सारिला ॥ १७ ॥ बाण आदळला थोर । छेदून पाडिला तोमर । रुक्मिया म्हणे मर मर । शक्ति थोर काढिली ॥ १८ ॥ शक्ति घेऊनियां हातीं । म्हणे कृष्ण तुझा पाड किती । रणीं लावीन रे ख्याती । भद्रजाती लोटला ॥ १९ ॥ कृष्ण जे जे बाण सोडी । शक्तिहस्तें रुक्मिया तोड । रथ धरी मकरतोंडीं । शक्ति भोवंडां हाणावया ॥ १२० ॥ कृष्णें बाण सोडिला तिधारा । रुक्मियासी लागला पिसारा । मागें सारिला अउड बाण । शक्ति अंबरा उडविली ॥ २१ ॥ रुक्मियाची क्षीण शक्ति । साह्य आले दक्षिणापती । तिहीं हांकिला श्रीपती । सैन्यसंपत्ति अनिवार ॥ २२ ॥ कृष्ण नेटका झुंजार । बाणीं त्रासिले महावीर । आठ बाणीं खोंचली धुर । हाहाकार ऊठीला ॥ २३ ॥ बाण सोडिले निर्व्यंग । घायीं निवटिलें चातुरंग । त्याच्या सैन्या झाला भंग । रणीं श्रीरंग खवळला ॥ २४ ॥ बाण वरुषे शार्ङ्गधर । सैन्या झाला थोर मार । कोपें खवळला रुक्मिया वीर । साटोप दुर्धर मांडिला ॥ २५ ॥ कृष्ण मारीन हें निर्धारीं । वोडण खांडें घेतलें करीं । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धाविन्नला ॥ २६ ॥ रुक्मिया महावीर नेटक । वोडण स्वर्गाचा साधक । थरक सरक दावी चवक । अति नि:शंक निजगडा ॥ २७ ॥ वोडण धडकोनि आदळीत । खर्ग तोलोनि तळपत । उल्लाळ देऊनि उसळत । हात मिरवत खर्गाचा ॥ २८ ॥ कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारीं तितुके तोडी । चारी मारावया घोडीं । रथाबुडी रिघो आला ॥ २९ ॥ दारुक सारथी निजगडा । रथें करूं पाहा रगडा । कृष्णें विंधिला कुर्‍हाडा । रथाबुडीं येऊ नेदी ॥ १३० ॥ बाण आदळला सत्राणें । आडवें वोडण धरिलें तेणें । वाडण भेदूनियां बाणें । शिरींच मुगुट पाडिला ॥ ३१ ॥ कोण आला रुक्मियासी । वेगें धाविन्नला मोकळे कैशीं । हात घांसूनि भूमीसी । हातवशी खर्गातें ॥ ३२ ॥ कृष्णासी म्हणे देख देख । घायी छेदीन रे मस्तक । विकट देऊनियां हांक । वेगीं सन्मुख लोटला ॥ ३३ ॥ कृष्णें विंधिला तिखट बाण । तिळप्राय केलें वोडण । खर्ग छेदूनियां जाण । अणुप्रमाण तें केलें ॥ ३४ ॥ बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आली वाट । रथ लोटूनिया घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥ ३५ ॥ धनुष्य घालूनियां गळां । वोढोनि आणिला घायातळा । कांपिन्नला भीमकबाळा । घनसांवळा देखतसे ॥ ३६ ॥ दाटोनि आणिलें जी क्रोधआ । झळफळित काढिली गदा । म्हणे याच्या करीन शिरच्छेदा । येरी गदागदां कांपतसे ॥ ३७ ॥ काहीं न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । कृपाळुवा जगन्नाथा । यासी सर्वथा न मारावें ॥ ३८ ॥ कृष्ण म्हणे परतीं सर । येणें निंदा केली थोर । याचेम छेदीन मी शिर । म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥ ३९ ॥ तिखट देखोनि शस्त्रधारा । चरण न सोडीच सुंदरा । बोलोनि मृदु मंजुळ उत्तरा । गदाधरा विनविलें ॥ १४० ॥ सुरां असुरां तूं दुर्धर । योगिमाजी योगेश्वर । विश्वनियंता इश्वर । वेदां पार न कळेचि ॥ ४१ ॥ ऎशियासी तुज युद्धीं । आवळूं पाहे हा अहंबुद्धी । पिता अवगणूनि तूंतें निंदी । होय अपराधी सर्वथा ॥ ४२ ॥ हा अभिमानिया मारिशी रणीं । माय प्राण सोडील तत्क्षणीं । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल पूर्ण ॥ ४३ ॥ जेथूनि उठे निंदा क्रोधू । त्या लिंगादेहाचा करीं छेदू । मारूं नको ज्येष्ठ बंधू । लोकाविरुद्ध न करावें पूर्ण । ४४ ॥ धरिलिया कृष्णाकांस । द्यावा दों पक्षीं उल्हास । नादवावें सावकाश । येथें तेथें समत्वें ॥ ४५ ॥ न धरत चाललें स्फुंदन । नेत्रीं लोटले जीवन । झालें कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥ ४६ ॥ देखोनि बोलाची चातुरी । मग उचलली दोहीं करीं । आलिंगिली प्रीतीं थोरी । बंधू न मारीं सर्वथा स्तकवपना आणा पाणी । नाही आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटावणी । विनोद मेहुणीं मांडिला ॥ ४८ ॥ अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसीं । विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेसीं बांधिला ॥ ४९ ॥ रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन । वेगें करीं लिंबलोण । सकळ जन हांसती ॥ १५० ॥ रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बळिराम येऊनि आपण । बंधमोचन करील त्यासी ॥ ५१ ॥ परिहारमिषें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एका जनार्दनीं विनोद । परमानंद प्रगटेल ॥ १५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे रुक्मिपराभवो नाम द्वादश: प्रसंग ॥१२ ॥ ॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग तेरावा श्रीगणेशाय नम: ॥ येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर । लोटले येरयेरांसमोर । घायें निष्ठुर हाणिती ॥ १ ॥ दक्षिणराजे निजभारीं । युद्ध पाहती राहोनि दूरी । रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी उठावले ॥ २ ॥ उरलें रुक्मियाचें दळ । यादवीं त्रासिले प्रबळ । वर्षोनियां बाणजळ । वीर सकळ भेदिले ॥ ३ ॥ यादवांच्या तिखट बाणीं । निधडे वीर पदिले रणीं । धडमुंडांकित धरणी । अर्धाक्षणीं तिहीं केली ॥ ४ ॥ कृष्णें रुक्मिया बांधिल । उरलिया सैन्या पळ सुटला । जयो यादवांसी आला । मग परतला बळीभद्र ॥ ५ ॥ सरोवरामाजी कमलीं । गज करी रवंदळी । तैशी मर्दूनी शत्रुफळीं । कृष्णाजवळी तो आला ॥ ६ ॥ रुक्मियाचे विरूपकरण । देखता झाला संकर्षण । कृपा द्रवलें अंत:करण । दीन वदन देखोनी ॥ ७॥ सोडोनियां गळबंधन । कृष्णासी म्हणे हे बुद्धि कोण । सोयरियांसी विरूपकरण । तें निंद्य जाण आम्हांसी ॥ ८ ॥ शरीरसंबंधासी विरूपबाधू । हा तंव वधाहूनि अधिक वधू । तुवां थोर केला अपराधू । सुह्र्दसंबंधू लाजविला ॥ ९ ॥ याचा वध तूं करितासी । तरी हा पावत निजसुखासी । मान देऊनि सोडितासी । सोयरिकेसी श्र्लाघ्यता ॥ १० ॥ क्षत्रिय सांपडे रणसांकडी । त्यासी द्यावीं लेणीं लुगडीं । युद्धीं खांडमिशी बोडी । हे अपरवडी त्वां केली ॥ ११ ॥ सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । दोष न ठेवावा आम्हासी । जो कर्में करी जैसीं । फळें तैसी तो भोगी ॥ १२ ॥ कृष्ण निजतत्त्व तत्त्वतां । कर्मे करूनि अकर्ता । बंधुवैरुप्याचा दाता । नव्हे सर्वथा श्रीकृष्ण ॥ १३ ॥ तुया बंधूचें जें वैरुप्य । तें त्याचें त्यास फळलें पाप । हेंचि जाणोनि भोगाचें निजरूप । सांडी कोष सर्वथा ॥ १४ ॥ येथें कर्ता तोचि भोक्ता । ऎसी कर्ममर्यादा तत्त्वतां । बोल न ठेवीं कृष्णनाथा । ह्रदयी व्यथा न धरावी ॥ १५ ॥ सवेंची म्हणे श्रीकृष्णासी । रणीं विटंबू नये सुह्रदासी । बोल लागला क्षत्रियधर्मासी । ह्रषीकेशी हें अनुचित ॥ १६ ॥ दंडा योग्य जरी अपराधू । तरी दंडुं नये सोयरा बंधू । दंडापरीस अधिक बाधू । न मारूनि वधू तुवां केला ॥ १७ ॥ इतरांपासोनि अन्याय झाला । तो आपण पाहिजे क्षमा केला । शेखीं तवां सोयरा दंडिला । बोल लागला निजधर्मा ॥ १८ ॥ जो आवडीनें विष प्याला । तो आपआपणा मारक जाला । त्या अन्याया दंड नाहीं वहिला । घात केला निजकर्मे ॥ १९ ॥ यालागीं प्रवर्ते जो अधर्मासी । तेणेंचि कर्मे दंडिजे त्यासी । मेलेंचि तुं कां मारूं पाहसी । रुक्मियासी जाऊं दे ॥ २० ॥ मेलियासीच मारणे । हेंचि आम्हां लाजिरवाणें । विनोद न करावा मेहुणेपणें । सोडूनि देणें सर्वथा ॥ २१ ॥ सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । कठिण कर्म क्षत्रियांसी । उल्लंघु न करवे आम्हांसी । निजधर्मासी सर्वथा ॥ २२ ॥ विधात्याने नेमिला नेम । क्षत्रियांचे अघोर कर्म । दारुण मांडिलीया संग्राम । आपपर न म्हणावा ॥ २३ ॥ समरंगणीं सन्नद्धू । सन्मुख आलिया पिता बंधू । रणांगणी करिता वधू । नाहीं बाधू क्षत्रियां ॥ २४ ॥ ऎसें जाणूनि रुक्मिणी । खेद न करीं वो मनीं । सवेंचि म्हणे शार्ङ्गपाणी । विरुद्ध करणी तुवां केली ॥ २५ ॥ राज्यलोभें श्रीमदाध । त्यासी उपजे कामक्रोध । तेणें लोभें होऊनि मंद । थोर विरुद्ध आचरती ॥ २६ ॥ आपुलें राज्य जाता । कीं पुढिलांचे राज्य घेतां । तेणें स्वार्थे क्रोध चित्ता । उठे सर्वथा अनिवार ॥ २७ ॥ नातरी वृत्तिभूमिउच्छेदू । होता सज्ञान होय मंदु । तोहीं करू लागे विरोधु । निंदानुवादू द्वेषाचा ॥ २८ ॥ अथवा धनागमनागमनीं । प्रबळ लोभ उपजे मनीं । वेदविक्रय कीजे ब्राह्मणीं । धनालागीं कलियुगीं ॥ २९ ॥ धनालागीं वेदाध्ययन । धनालागीं पुराणपठण । धनालागीं व्याकरण । शास्त्रश्रवण वेदांत ॥ ३० ॥ धनालगीं घेती दान । धनालागीं होती सज्ञान । धनालागीं नीचसेवन । उपसर्पण हीनाचें ॥ ३१ ॥ धनालागीं देह विकिती । धनालागीं दांभिक भक्ती । धनकामना कर्मे करितीं । नानावृत्ती धनेच्छा ॥ ३२ ॥ त्या धनास होय अवरोधू । तेव्हां सज्ञानियासी उपजे क्रोधू । विवेकीही होय मंदू । प्रबळ विरोधू धनवंता ॥ ३३ ॥ आणीक एक थोर कारण । जेव्हां होय दाराहरण । न विचारितां आत्ममरण । वेंचिती प्राण स्त्रीलोभें ॥ ३४ ॥ अथवा होतां मानहानी । विवेकी होय अभिमानी । निंदा द्वेष उपजे मनीं । मानालागोनीं सर्वथा ॥ ३५ ॥ कां आंगींचेनि शौर्यतेजें । येरयेरां निंदिती राजे । वीर्यशौर्याचेनि मांजे । अतिउन्मत्त होउनि ॥ ३६ ॥ अणुमात्र स्वार्थाचा अवरोधू । होतां समस्तां उपजे क्रोधू । स्वार्थालागोनि विरोधू । पडे संबंधू द्वेषाचा ॥ ३७ ॥ इतुकीं कारणें सर्वथा । तुज तव नाहीं गा कृष्णनाथा । रुक्मियाची विरूपता । कवण्या अर्था तुवां केली ॥ ३८ ॥ तूं परिपूर्ण आत्माराम । तुज सर्वथा नाहीं काम । तरी कां केलें निंद्य कर्म । क्षत्रियधर्म हा नव्हे ॥ ३९ ॥ सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । पावोनियां कृष्णचरणासी । विषमबुद्धी तुजपाशीं । निजमानसीं न धरावी ॥ ४० ॥ सुह्रद दुर्ह्रद उदासीन । ऎसें त्रिविध न करी मन । सर्वांभूती सदां संपूर्ण । पाहें श्रीकृष्ण सर्वदा ॥ ४१ ॥ अभद्र व्हावे शिशुपाळासी । कल्याण रुक्मिया वांछिसी । हें विषमता तुजपाशीं । कृष्णसुखासी प्रतिबद्धक ॥ ४२ ॥ म्हणसी शिशुपाळा कृष्णद्वेषी । सर्वदा अभद्र पाहिजे त्यासी । मातेचि दशा रुक्मियासी । तोही कृष्णासी द्वेषित ॥ ४३ ॥ हा सर्व भूतात्मा ह्रषीकेशी । ऎशिया द्वेषिती जे कृष्णासी । तैशिया दुष्टां सोयरियांसी । भद्र वांछिसी तें अभद्र ॥ ४४ ॥ ऎशिया सर्वभूतद्वेषियासी । दंडमुंडन ते कल्याण त्यासी । ते तूं कल्याण मानिसी । चतुर नव्हेसी निजबोधें ॥ ४५ ॥ कृष्ण ज्ञानिया चतुर । विनोदरूपें केला उपकार । रुक्मियाचा नरक घोर । यमप्रहार चुकविला ॥ ४६ ॥ कृष्ण युद्धी रुक्मियासी । दंड न करितां खांडमिशांसी । तरी हा होता रौरवासी । अध:पातासी पैं जाता ॥ ४७ ॥ कृष्ण सोयरा स्नेहाळू । वपनरूपें अतिकृपाळू । केला निजकरें निर्मळू । फेडिला विटाळू द्वेषाचा ॥ ४८ ॥ यालागीं कृष्णें केलें तें भद्र । तूं कां मानितेसी अभद्र । कृष्ण ज्ञानियांचा नरेंद्र । वेदां पार न कळेचिं ॥ ४९ ॥ दुर्घट मोहो पैं प्राणिया । केली असे कृष्णमाया । ब्रह्मादिकां न येचि आया । देवमाया देहबुद्धी ॥ ५० ॥ तये देहबुद्धीचें लक्षण । सुह्रद दुर्ह्रद उदासीन । त्रिविध त्रिगुण न करीं मन । देहाभिमान नुपजवीं ॥ ५१ ॥ नश्वर देह तंव जाणती । देह निमालिया मृत्यु मानिती । देहसंबंधियां अतिप्रीती । येरां द्वेषिती उपेक्षा ॥ ५२ ॥ नाना अलंकारी कनक । तैसा सर्वांभूती आत्मा एक । हेचि नेणोनियां मूर्ख । एकासी अनेक म्हणताती ॥ ५३ ॥ अनेकां घटीं जेवीं अनेक । प्रतिबिंबोनि भासे अर्क । तैसा विश्वात्मा विश्वव्यापक । दिसे अनेक देहयोगें ॥ ५४ ॥ आकाश एकलें एक निर्मळ । मठीं चौकोनें घटीं वर्तुळ । विकारयोगे भासे प्रबळ । नव्हे केवळ निजवाच्य ॥ ५५ ॥ तैसा परमात्मा श्रीहरी । नाना आकारविकारीं । एकानेकत्वाते धरी । देहसंचारी देहयोगे ॥ ५६ ॥ येथें देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश । घटभंगें घटाकाश । सहजस्थिती जेवीं विरे ॥ ५७ ॥ देहाचें जन्मकरण । महाभूतें गुणप्रमाण । अविद्येनें केलें जाण । जन्ममरण यालागीं ॥ ५८ ॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्यत्वें दाविलें । तेंचि अभिमानें घेतलें । प्रेमें बांधिलें देहबुद्धि ॥ ५९ ॥ जयासी देहाभिमान थोर । तयासी कल्पना अनिवार । तेणेंचि दृढमूळ संसार । येरझार न खुंटे ॥ ६० ॥ आतां ऎकें वो सुंदरी । परमात्मा अलिप्त चराचरीं । संयोगवियोगाचि परी । न धरीं संसारीं सर्वथा ॥ ६१ ॥ आत्मासंयोगेंविण सहसा । स्वयें संसार चाले कैसा । विकल्प न धरीं वो ऎसा । तेही दशा सांगेन ॥ ६२ ॥ जैसा रवि अलिप्त आकाशीं । दृष्टिरूपातें प्रकाशी । तैसा परमात्मा ह्रषीकेशी । संसारासी द्योतक ॥ ६३ ॥ नातरी तैसा खांबसूत्री । अचेतन पुतळ्या नाचवी यंत्रीं । एका जैत्य एका हारी । दोहीं परी अलिप्त ॥ ६४ ॥ पुतळ्याचेनि जालेपणे । नाहीं सूत्रधारिया जन्मणें । तयांचेनि निमालेपणें । नाहीं मरणे सर्वथा ॥ ६५ ॥ ऎसा अलिप्त कृष्ण प्रसिद्ध । तयासी दंड मुंडण अपराधू । लावितेसी तूं नववधू । नव्हे शुद्ध भाव तुझा ॥ ६६ ॥ कृष्णा चालक वेगळेपणीं । तरी व्यापकता आली हानी । ऎसा न म्हणावे वो रुक्मिणी । तेही कहाणी ऎक पां ॥ ६७ ॥ जैसें गगन आपणावरी । शीत उष्ण-पर्जन्यधारी । परि अलिप्त तिही विकारीं । तैसा श्रीहरी कर्मासी ॥ ६८ ॥ गगन सर्वत्र तत्त्वतां । तयासी चिखल लावूं जातां । चिखलें माखे जो लाविता । गगन सर्वथा अलिप्त ॥ ६९ ॥ तैसेंचि जाण कृष्णनाथा । भोग भोगोनि अभोक्ता । कर्म करोनि अकर्ता । अलिप्तता निजबोधें ॥ ७० ॥ कृष्णाअंगीं जे लाविती कर्म । तोचि त्यांसी होय अधर्म । हेंचि कोणा न कळे वर्म । कृष्ण निष्कर्म सर्वथा ॥ ७१ ॥ यालागीं तूं वो ऎसें जाण । देहासीच जन्ममरण । आत्मा अविनाश परिपूर्ण । जीवि हें खूण राखावी ॥ ७२ ॥ लोकप्रवाद प्रबळा । नाश मानिती केवळा । चंद्री तुटलिया कळा । म्हणती नासला अंवसेसी ॥ ७३ ॥ चंद्रीं चंद्र यथास्थिती । कळाचि तुटती वाढती । तैसा आत्मा सहजस्थिती । नाशउत्पत्ती देहासी ॥ ७४ ॥ जैसी वांझेची संतती । तैसी संसारउत्पत्ती । भ्रांत सत्यत्वें मानिती । मिथ्या प्रतीति प्रबुद्धं ॥ ७५ ॥ स्वप्नीं देखें आत्ममरण । चितेसी घालूनि देह दहन । जागृती उदयीं मिथा स्वप्न । जन्ममरण मज नाहीं ॥ ७६ ॥ ऎसाचि जाण संसारक्रम । यालागीं भीमकी सोडीं भ्रम । कृष्ण पावलीसी पुरुषोत्तम । मिथ्या भ्रम करूं नको ॥ ७७ ॥ स्वप्नीं सोयरिया जालें दु:ख । सत्य मानिती ते तंव मूर्ख । बंधुवैरुप्याचें असुख । सोडीं नि:शेष वेल्हाळे ॥ ७८ ॥ कृष्ण न पावतांचि आधीं । शोक ओहो जीवासी बाधी । कृष्ण पावलीया आधी । व्याधी जाती त्रिशुद्धी सर्वथा ॥ ७९ ॥ कृष्ण पावलियापाठी । मोहो ममता तुझे पोटीं । कृष्ण नोळखीसी वो गोरटी । आत्मदृष्टी तुज नाहीं ॥ ८० ॥ आत्मदृष्टीचें लक्षण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । तिन्ही होऊनि अकारण । परिपूर्ण श्रीकृष्ण ॥ ८१ ॥ तेथे कैचे धरिसी ध्यान । ध्याता ध्येय जालें शून्य । तुटला बोल खुंटले मौन । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ ८२ ॥ उरलें चिन्मात्र स्फुरण । तेंही मायिक तूं जाण । हेतु मातु नाही लक्षण । ऎसा श्रीकृष्ण जाणावा ॥ ८३ ॥ होती कृष्णरूपीं संलग्न । ऎकोनि बळिरामवचन । कृष्णमय झालें मन । तेणें स्फुंदन चालिले ॥ ८४ ॥ कृष्णभाव झाला चित्ता । गेली देहबुद्धी सर्वथा । चरणांवरी ठेविला माथा । तिन्ही अवस्था सांडुनी ॥ ८५ ॥ वाचा झाली सद्रद । नि:शेषे खुंटला अनुवाद । सुखें कोंदला परमानंद । पूर्ण बोध भीमकीसी ॥ ८६ ॥ नाठवती भावे दीर । वृत्ति झाली कृष्णाकार । ब्रह्मरूपें चराचर । देखे सुंदर निजबोधें ॥ ८७ ॥ देखोनि भीमकीची निजवृत्ती । हरिख न माये रेवतीपती । उचलोनियां दोहीं हातीं । अतिप्रीती मानिली ॥ ८८ ॥ कृष्ण बळिभद्र रुक्मिणी । तिघें मीनली पूर्णपणीं । परमानंद रणांगणीं । भावें रुक्मिणी भोगीत ॥ ८९ ॥ कृष्णरुक्मिणी हलायुध । तिघां झाली एकचि बोध । एका जनार्दनीं आनंद । परमानंद प्रगटला ॥ ९० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितसंमते रुक्मिणीबोधे रुक्मिबंधनमुक्तिर्नाम त्रयोदश: प्रसंग ॥ १३ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग चौदावा श्रीगणेशाय नम: ॥ यापरी कृष्णपत्‍नी । रामें प्रबोधिली वचनीं । रुक्मिया दिधला सोडोनी । विरूपपणीं सलज्ज ॥ १ ॥ दीन हीन गेली कळा । वीर्यशौर्य मुकला बळा । केवीं मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ॥ २ ॥ पित्यानें म्हणीतलें नपुंसक । त्या वचनाचें थोर दु:ख । दाविता त्रूपतेचें मुख। सकळ लोक हांसती ॥ ३ ॥ प्रतिज्ञा करूनि वाहिली आण । रणीं विभांडोनि श्रीकृष्ण । भीमकी आणीन मी जाण । तोही पण सिद्धी नपवेचि ॥ ४ ॥ यालागीं न वचें कौंडिण्यपुरा । लाजां राहिला बाहिरा । उभवोनि भोजकटनगरा । वस्तीसी थारा तेणें केला ॥ ५ ॥ रुक्मिया सोडिल्यापरी । यादवांच्या दळभारी । लागलिया निशाणभेरी । जयजयकारीं गर्जती ॥ ६ ॥ यापरी रणांगणीं । जिणोनि महावीरश्रेणीं । कृष्णें आणिली रुक्मिणी । अतिविंदानी लाघवी ॥ ७ ॥ कृष्ण निघाला वेगेंसी । आला प्रभासक्षेत्रासी । तेथें पूजोनि सोमनाथासी । दुसें चोपाशीं दिधलीं ॥ ८ ॥ पाहोनि सावकाश वाडी । कटक उतरलें निरवडी । हट चोहट परवडी । घडामोडी वस्तूंची ॥ ९ ॥ राजे प्रजा देशदेशिक । नगर नागरिक लोक । उपायनें जी अनेक । येती सम्नुख घेउनी ॥ १० ॥ जिणोनि सकळिकां रायांसी । विरूप करूनि रुक्मियासी। कृष्णें नेले नोवरीसी । भीमकासी श्रुत जालें ॥ ११ ॥ ऎकोनि जालें अत्यंत सुख । जीवीं न समाये हरिख । मज तुष्टला आदिपुरुख । भाग्य चोख भीमकीचें ॥ १२ ॥ मजपासूनि दोघां जन्म । परी दोहींचें भिन्न कर्म । भीमकी पावली पुरुषोत्तम । विरूपकर्म रुक्मिया ॥ १३ ॥ रुक्मिया निंदी कृष्णासी । तेणेंचि कर्मे वैरूप्य त्यासी । भीमकीभावार्था कृष्णचरणासी । अर्धांगासी पावली ॥ १४ ॥ आपला भावर्थाचि जाण । कृष्णप्राप्तीसी कारण । यावेगळें शहाणपण । केवळ जाण दंभार्थ ॥ १५ ॥ याचिलागी निजभावेंसी । शरण जावें श्रीकृष्णासी । भीमकी अर्पूनियां त्यासी । ह्रषीकेशी भजावें ॥ १६ ॥ पाचारून शुद्धमतीसी । वृत्तांत सांगितला तियेसी । येरी म्हणे रहावा श्रीकृष्णासी । कन्यदानासी विधि करूं ॥ १७ ॥ कन्यादानाचेनि मिसें । कृष्ण पूजूं सावकाशें । पांचां पंचकाचें फिटेल पिसें । अनायासें मन निवे ॥ १८ ॥ भीमक निघाला वेगेंसी । ठाकोनि आला प्रभासासी । लोटांगण श्रीकृष्णासी । निजभावेंसीं घालित ॥ १९ ॥ त्राहि त्राहि जी दातारा । नेत्रीं अश्रुंचिया धारा । कृपा उपजली कृष्णवीरा । वेगें सामोरा धाविन्नला ॥ २० ॥ उचलोनियां वेगेसीं । ह्रदयीं घरी ह्रषीकेशी । येरें मिठी घातली कंठेसीं । भावार्थेसी मिसळला ॥ २१ ॥ जीवींच्या जीवा झाली भेटी । कांही केलिया न सुटे मिठी । बाप कृपाळू जगजेठी । पूर्णदृष्टीं पाहिला ॥ २२ ॥ सच्चिदानंदें झाला तृप्त । सबाह्य देखे कृष्णनाथ । फिटला आर्तीचा मनोरथ । कृतकृत्यार्थ पैं झाला ॥ २३ ॥ मग म्हणे जयजय चक्रपाणी । माझे भाग्य तें रुक्मिणी । विनटली तुझ्या चरणीं । कुलतारिणी चिद्गंगा ॥ २४ ॥ शुद्ध करीत दोहीं कुळां । जेवीं प्रवाह गंगाजळा । तेवीं जन्मली हे बाळा । सकळ कुळा उद्धार ॥ २५ ॥ श्रद्धा शांति निवृत्ति भक्ती । ते हे भीमकी निजमूर्ती । तुज वोपिलो श्रीपती । एक विनंती परिसावी ॥ २६ ॥ वीर्यशौर्य भीमकीहरण । करितां नलगे अर्धक्षण । आतां विधियुक्त कन्यादान । पाणिग्रहण करावें ॥ २७ ॥ हेचि विनंती गरुडध्वजा । चारी दिवस माझी पूजा । अंगिकारावी अधोक्षजा । दास मी तुझा निजभावें ॥ २८ ॥ ऎका श्रीकृष्णविंदान । भक्ताधीन होय आपण । भीमकीचे पाणीग्रहण । भावे जाण करीतसे ॥ २९ ॥ होते श्रीकृष्णाचे मनीं । जे संभ्रमें पर्णावी रुक्मिणी । देवकी सुभद्रादि आणोनी । महोत्सव करावा ॥ ३० ॥ हेंचि भीमकीच्याही चित्तीं । सोहळेनि वरावा श्रीपती । हळदी लावीन आपुलें हातीं । बोहल्याप्रती बैसोनि ॥ ३१ ॥ दोघांसीही प्रीतिकर । भीमक बोलिला नृपवर । कृष्णासी मानलें उत्तर । हर्षे निर्भर भीमकी ॥ ३२ ॥ कृष्ण म्हणे ज्येष्ठ माझा । दादोजीस विनंती करा जा । राम नमस्कारी राजा । चरण वोजा धरियेले ॥ ३३ ॥ कृष्णासी म्हणजे बळिभद्र । होसी कार्यार्थी अतिचतुर । रामे उठवूनि नृपवर । थोर सन्मान त्या केला ॥ ३४ ॥ राजा म्हणे गा श्रीहरी । माझा आश्रम पवित्र करीं । आपुल्या दासातें उद्धरीं । कौंडिण्यपुरीं त्वां यावें ॥ ३५ ॥ भीमकी म्हणे ऎक ताता । भाग्ये पावलासी कृष्णनाथा । मागें सरों नको सर्वथा । गृहममता सांडावी ॥ ३६ ॥ सर्व सामग्री जीवेंभावेंसी । आवडीं आणावीं कृष्णापाशीं । भावें पूजिल्या ह्रषीकेशी । सकळ कुळासी उद्धार ॥ ३७ ॥ वचना मानवला बळिदेवो । ऎकोनि हांसिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळींचा ठावो लग्नासी ॥ ३८ ॥ भीमक म्हणे कळलें बीज । कृष्णपूजनें आमुचें काज । धन्य धन्य माझी आत्मज । श्रीकृष्ण निजबीज पावली ॥ ३९ ॥ इच्या वचनाचें महिमान । पाहतां बुडोनि ठेलें मन । वचनें पळविला अभिमान । मीतूंपण उडविलें ॥ ४० ॥ बाप माझें भाग्य थोर । कृष्ण परब्रह्म साचार । भीमकीयोगें चराचर । ब्रह्माकार पै जाले ॥ ४१ ॥ अवचटें श्रीकृष्णचरणी । वंशींचें विनटलिया कोणी । तोचि सकळ कुळातें तारुनी । परब्रह्मभुवनी नांदवी ॥ ४२ ॥ ऎशा सुखाचेनि हरिखे । राजा बोलिला निजमुखें । वचन भीमकीचें कौतुक । अवश्यक मानिलें ॥ ४३ ॥ सेवक पाठविले नगरासी । वैभवसामग्री वेगेसीं । नगर नागरिकवासी । मूळमाधवासी आणावें ॥ ४४ ॥ सवेंचि विनवी श्रीकृष्णासी । मूळ पाठवा जी द्वारकेसी । देवकी आणी वसुदेवासी । सोहळ्यासी आणावें ॥ ४५ ॥ भाव जाणोनि मानसीं । संतोषला ह्रषीकेशी । मूळ पाठविलें द्वारकेसी । सकळिकांसी सोहळिया ॥ ४६ ॥ पाचारूनी विश्वकर्म्यासी । आज्ञा दिधली मंडपासी । मूळमाधवीं अतिविशेषीं । शोभा चौपाशीं आणावी ॥ ४७ ॥ मूळमाधवी अद्यापवरी । वृक्षमात्र मंडपाकरीं । कृष्णआज्ञा पै तरुवरीं । अजूनिवरी पाळिजे ॥ ४८ ॥ मूळमाधवा आला परी । शोभा देखोनि साजिरी । संतोषला श्रीहरी । निजपरिवारीं उतरला ॥ ४९ ॥ तीर्थस्नान केलें सहजीं । मूळमाधवा माधव पूजी । पूजाविधी सांगिजे द्विजीं । पुण्यपूजीं ऋषीश्वरीं ॥ ५० ॥ भीमकी दिधली भीमकापाशीं । थोर उल्हास झाला त्यासी । कन्या नेली निजमंडपासी । ह्रषीकेशी केळवला ॥ ५१ ॥ कौंडिण्यपुरींची आइती । सकळ सामग्री संपत्ती । घेऊन आली शुद्धमती । भावें श्रीपती पूजावया ॥ ५२ ॥ कृष्णरुक्मिणींचे देख । पाहावया विवाहसुख । नगरनागरिक लोक । आले सकळिक उल्हासें ॥ ५३ ॥ थोर उल्हास श्रीकृष्णासी । मूळें पाठविलीं रायासीं । कुरु- सृंजय - कैकयासी । सोयरियांसी निजलग्ना ॥ ५४ ॥ कृष्णविवाह मनोहर । पाहों आले जी सुरवर । शिव शांभव यक्ष किन्नर । नारदादि वैष्णव ॥ ५५ ॥ वर्‍हाड निघालें द्वारकेबाहेरी । गणेश चढिन्नला उंदरावरी । अग्रपूजेचा अधिकारी । निर्विघ्न करी लग्नासी ॥ ५६ ॥ सिंहें पसरिलें जाभाडें । दुर्गा येऊनि त्यावरी चढे । मुक्तकेश खांडे उघडें । तेही पुढें निघाली ॥ ५७ ॥ वेगें आल्या अष्टमातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । बाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ॥ ५८ ॥ नेणति वर्‍हाडिणी चरबटा । स्थूल उदर दांत थोटा । उंदिरी चढोनि लुटलुटा । ढेरपोटां का आला ॥ ५९ ॥ विक्राळ सिंहाचे जाभाडें । बाइले हातीं खांडें उघडें । कोण बोलाविलीं वर्‍हाडॆं । अवघ्यापुढे निघाली ॥ ६० ॥ रोडके आंग चढे वृश्चिका । कोणें बोलाविली हे चंडिका । फजितीचे वर्‍हाड देखा । सूकरमुखा कां आली ॥ ६१ ॥ ऎसियासी नेतां वर्‍हाडें । व्याही हांसती रोकडे । यांसी राहवा मागिलेकडे । वर्‍हाड पुढें चालो द्या ॥ ६२ ॥ मिळोनी पांचां पंचकांचा मेळा । निंदूं लागल्या त्या बरळा । कोपल गणेश मातृकांचा मेळा । तात्काळ देखा रुसलिया ॥ ६३ ॥ गणेशें केलें गाढे । ठायीं ठायीं मोडती गाढें । रथीचे पांगुळले घोडे । वर्‍हाड पुढें चालेना ॥ ६४ ॥ कोपलिया महामातृका । शीतज्वर सोडिला देखा । दुर्गा सोडी विषूचिका । हगी ओकी देखा सुटली ॥ ६५ ॥ ओकाओकी वर्‍हाडणी । एकी म्हणती पाणी । उठली माशांची गोंगाणी । साउली पोहाणी घालिती ॥ ६६ ॥ कृष्णासी लग्नाची अति गोडी । म्हणे कां न येती द्वारकेचे वर्‍हाडी । मार्गी कांही पडली आडी । दूत तांतडी पाठविले ॥ ६७ ॥ दूत सांगती श्रीहरी । वर्‍हाडणींसी लागली शारी । खटखटां वाजती दांतोरी । रथीं कुंजरीं न बैसवे ॥ ६८ ॥ बहुतां जाली विषूचिका । गाडे नि:शेष सोडले देखा । तुटी जाली रथांचे आंखां । घोडे देखा पांगुळले ॥ ६९ ॥ कृष्ण कृष्ण म्हणे अबला मूर्ख । उपहासिले विनायका । क्षोभल्या महामातृका । दुर्गा देखा कोपली ॥ ७० ॥ कृष्णें स्तविला विनायक । दिधले साखरेचे मोदक । सुखिया जाला गणनायक । विघ्नें देख निवारिली ॥ ७१ ॥ सुखसेवया कुंकुमरेखा । कृष्णें पूजिली अंबिका । सन्मानूनि महामातृका । मंडपीं देखा स्थापिल्या ॥ ७२ ॥ वर्‍हाड पातलें गजरें । वाजती नाना परीचीं तुरें । नरनारी अलंकारें । केले साजिरे रथ गज ॥ ७३ ॥ श्रीकृष्णाची जे निजजननी । देवकी बैसली सुखासनीं । करवली सुभद्रा बहिणी । गजारोहिणीं मिरवती ॥ ७४ ॥ ज्येष्ठ बंधूची जे राणी । रेवती कृष्णाची वोहिणी । यादवांच्या वर्‍हाडिणी । अनर्घ्य लेणी लेइल्या ॥ ७५ ॥ उग्रसेन वसुदेवासमान । दोघां एकसारखाचि मान । वर्‍हाड दाटलें संपूर्ण । भेरी निशाणें गर्जती ॥ ७६ ॥ दोहीं मंडपीं झाली प्रतिष्ठा । होम दिधला हव्यवाटा । द्विज पूजिले बरविया निष्ठा । वस्त्रें ज्येष्ठा अर्पिलीं ॥ ७७ ॥ आइती केली शुद्धमती । भीमकें आणिली सेवती । नोवरा अभ्यंतरीं श्रीपती । यादवपंक्ती बैसल्या ॥ ७८ ॥ समाधिसुख तेंचि आसन । मुक्तमंडित चौक जाण । बैसावया श्रीकृष्ण । भीमकें विंदान मांडिलें ॥ ७९ ॥ चार्‍ही पुरुषार्थांची चवाई । तेंचि आसन त्यावरी पाहीं । पूजावया निजजावई । भीमक ठायीं तिष्ठत ॥ ८० ॥ म्हणती आचार्य सावधान । शब्द सांडून धरा मौन । वर वरिष्ठ श्रीकृष्ण । फल संपूर्ण त्या हातीं ॥ ८१ ॥ पाहातां श्रीकृष्णाचें रूपडें । अरूपरूपें कृष्ण चहूंकडे । विस्मयें भीमक झाले वेडे । मागे पुढें कृष्ण देखें ॥ ८२ ॥ अनंत रूपें यादवपती । कैसेनि मी पूजूं श्रीपती । पूज्यपूजकतावृत्ती । हेही स्थिती नाठवें ॥ ८३ ॥ केवळ प्रपंच तें वर्‍हाड । परी भीमकाचें भाग्य वाड । परत परमार्थाचें कोड । वर्‍हाड गोड त्या झालें ॥ ८४ ॥ उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती । तीर्थें चरणतीर्थ मावती । कृष्णपदप्राप्ति दुर्लक्ष ॥ ८५ ॥ कृष्णकपाळा पावे कोण । तेथेंही सप्रेम चंदन । भीमकें अर्पिलें शुद्ध सुमन । कृष्णभजन निजभावें ॥ ८६ ॥ शुद्धसत्त्वाचें विरजांबर । चिद्ररत्‍नांचे अलंकार । भीमकें अर्पूनियां अपार । कृष्ण वरावर पूजियेला ॥ ८७ ॥ भीमक गौरवी व्याहीयांसी । व्याहींरूपें देखे कृष्णासी । भूतमात्रीं ह्रषीकेशी । निजवृत्तीसी ठसावला ॥ ८८ ॥ वृद्धपरंपरा ऎसी आहे । वरचरण उटी वोहमाये । शुद्धमती येऊनि लवलाहें । वदन पाहे कृष्णाचें ॥ ८९ ॥ मुगुट कुंडलें कौस्तुभमाळा । झळकत पितांबर मेखळा । देखोनिया घनसावळा । दोहीं डोळा निवाली ॥ ९० ॥ झणीं लागेल बाह्यदृष्टी । म्हणोनि घेतली इटिमिठी । निंबलोण उठाउठी । करि गोरटी निजभावे ॥ ९१ ॥ कृष्णचरणीं लावितां हळदी । अहंभावेसीं ठकली बुद्धी । लाज विसरली त्रिशुद्धी । मीतूंउपाधी नाठवे ॥ ९२ ॥ ज्याचे चरणींचे रज:कण । शिव विरिंची आपण । वंदिताती सांडूनि गुण । ते कृष्णचरण पावली ॥ ९३ ॥ अक्षवाणें करी आरती । कृष्णप्रभा दीपदीप्ती । कृष्णीं लागलिया परमप्रीति । चित्तवृत्ती तद्रूप ॥ ९४ ॥ चिच्छक्ती न सोडी चिन्मात्रा । तेवीं कृष्णाधाकुटी सुभद्रा । मणिमौक्तिकें रत्‍नहारां । दिव्यांबरें दीधलीं ॥ ९५ ॥ शुद्धमती म्हणे देवकीसी । धन्य धन्य म्हणे तुमची कुशी । जेथें जन्मला ह्रषीकेशी । म्हणोनिया पायांसी लागली ॥ ९६ ॥ मग पूजिली यथाविधीसीं । वस्त्रें भूषणें दिधलीं तिसी । जगन्निवास जन्मला कुशी । मान्य सकळांशी यालागी ॥ ९७ ॥ एवं भीमक आणि शुद्धमती । विनीत होऊनि सर्वाप्रती । वस्त्रें भूषणें अर्पिती । सोयरा श्रीपती जोडिला ॥ ९८ ॥ सावधान आचार्य म्हणती । झाली रुखवताची आइती । संतोषली शुद्धमती । भावें श्रीपती प्रार्थिला ॥ ९९ ॥ कृष्ण परमात्मा भव्यमूर्ती । आवरणपूजा यादवपंक्ती । लाविल्या स्वप्रकाशवाती । शुद्धमती सावध ॥ १०० ॥ तळीं त्रिगुणाची आडणी । त्यावरी ताटाची मांडणी । वाढिताती नवजणी । खुतखावणी जाणोनि ॥ १ ॥ ऎका रुकवताची स्थिती । वाढीतसे शुद्धमती । जे जे धाले कृष्णपंक्ती । क्षुधा पुढती त्यां नलगे ॥ २ ॥ झळकती खावार्थाचीं ताटें । जडित चतुर्विध चोखटें । स्वानंदरसें भरिली वाटे । वोतू काठें नेणती ॥ ३ ॥ झाणिवा खुडिवा तोडिवा । त्रिगुण गुणांच्या सोलिवा । शाका वढिती स्वानुभवा । हावभावा फोडणिया ॥ ४ ॥ एकें पचली गोडपणें । एकें सप्रेम सलवणें । एकें नुसतीं अलवणें । बरवेपणें मिरविती ॥ ५ ॥ एके सबाह्य आंबटें । एकें अर्धकाची तुरटें । एके बहुबीजें कडवटें । एकं तिखटें तोंडाळें ॥ ६ ॥ एकें हिरवीं करकरितें । एकें परिपक्वें निश्चितें । एके जारसे कचकचित्तें । एकं स्नेहदेठिंहूनी सुटलीं ॥ ७ ॥ वाळल्या आनुतापकाचरिया । वैराग्यतळणें अरुवारिया ॥ राजसा वाढिला कोशिंबिरिया । नाना कुसरी राइतीं ॥ ८ ॥ मुखीं घालिता अतितिखटीं । नाकीं तोंडी धूर उठी । कुसुमुसुनी कपाळ पिती । दुसरेनि गोष्टी न करवे ॥ ९ ॥ एकें वाळोनि कोरडीं । तोंडीं घालिता कुडकुडी । त्यांची अनारिसी गोडी । बहु परवडी स्वादाची ॥ ११० ॥ वळवटाची नवलपरी । एकें पोपळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पैं एक ॥ ११ ॥ परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडों नेदि सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ॥ १२ ॥ शेवया वळिल्या अतिकुसरी । असार केवळ सांडिलें दूरी । घोळिल्या क्षीरसाखरीं । चवी जेवणारीं जाणिजे ॥ १३ ॥ अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु । सुरस रसें रसाळ गोडू । चवीनिवाडु हरि जाणे ॥ १४ ॥ पापड भाजिले वैराग्यआगीं । तेणें ते फुगले सर्वांगी । म्हणोनिया ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती ॥ १५ ॥ उकलतां नुकलती । आंतल्या आंत गुंडाळती । तापल्या तेलें तळिजेती । कुडी आइती कुरवडिया ॥ १६ ॥ भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती । जाणे वृद्धाचाररीती । परम प्रीति बोहरांची ॥ १७ ॥ त्रिगुण त्रिकुटीं पचलीं पाहीं । भोकरें खारलीं ठायींच्या ठायीं । कृष्णरंगे रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ॥ १८ ॥ पुर्ण परिपूर्ण पुरिया ॥ सबाह्य गोड गुळवरिया । क्षीरसागरींच्या क्षीरधारिया । इडुरिया सुकुमारा ॥ १९ ॥ सफेद फेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्कारा भरली भरी । अमृतफळें ठेविली वरी । अभेद घारी वाढिल्या ॥ १२० ॥ नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली । गगनगर्भीची काढिली । घडी मांडिली मांडियाची ॥ १२१ ॥ स्नेहदेठींहुनि सुटलीं । अत्यंत परिपाकें उतटलीं । वनिताहातींहून निष्टलीं । फळें घातिलीं शिखरिणी ॥ २२ ॥ अत्यंत सूक्षं आणियाळें । तांदुळा वेळिलें सोज्वळें । सोहंभावाचें ओगराळें । भावबळें भरियेलें ॥ २३ ॥ खालीं न पडतां शीत । न माखतां वृत्तीचा हात । ओगराळां भरिला भात । न फुटत वाढिला ॥ २४ ॥ अन्नावरिष्ठ वरान्न । विवेकें कोंडा काढिला कांडोन । अवघ्यावरी वाढिले जण । वरी वरान्न स्वादिष्ट ॥ २५ ॥ लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्यभोज्य जी प्रसिद्ध । षड्रसांचे हे स्वाद । केले विविध उपचार ॥ २६ ॥ जिव्हा चाटून जें घेइजे । लेह्य त्या नांव म्हणिजे । घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे तयासी ॥ २७ ॥ रस चोखून घेइजे । बाकस थुंकोनि सांडिजे । चोष्य त्या नाव बोलिजे । खूण जाणिजे रसाची॥ २८ ॥ अग्नि उदक लवणेंविण । जें खावया योग्य जाण। खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ॥ २९ ॥ क्षीरभात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण । रोटी पोळी आणी पक्वान्न । भक्ष्य जाण यां नांव ॥ १३० ॥ ऎसी षड्रसांची गोडी । ताटें वाढिलीं परवडी । चाखों जाणती ते गोडी । निज आवडीचेनि मुखें ॥ ३१ ॥ कृष्णस्वदासी जाणतां जाण । अवघियां आणिलें गोडपण । यालागीं वाढिलें वरी लवण । अपूर्ण तें पूर्ण करावया ॥ ३२ ॥ नाहीं श्रद्धेची जया भूक । आंगीं अश्रद्धेचें असुख । गोड तेंचि म्हणति विख । थुंकोनि देख सांडिती ॥ ३३ ॥ कृष्णपंक्तीची आवडी । श्रद्धाक्षुधा जया गाढी । ग्रासोग्रासी अधिक गोडी । हे परवडी त्यालागी ॥ ३४ ॥ कृष्णपंक्ती नाहीं उणें । जेवितां जेविते जाणती खुणे । रुचलेपणें वाढिती जाणें । सावध म्हणे शुद्धमती ॥ ३५ ॥ कृष्ण देखोनियां डोळा । जीवा जीवन देती चपळा । चतुर्विध सुपरिमळा । येळा वाळा उदादि ॥ ३६ ॥ चतुर्विधा चारी मुक्ती । शुद्धमती पुढें राबती । जें जें पाहिजे जिये पंक्ती । तें तें देती ठायी ॥ ३७ ॥ पहिलें वाढिलें तवजणीं । पूर्ण करिती चौघीजणीं । एकाजनार्दन भोजनीं । अतृप्त कोणी राहो नेदी ॥ १३८॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितसंमते रुक्मिणीस्वयंवरे रुखवतवर्णननामचतुर्दश: प्रसंग: ॥ १४ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पंधरावा श्रीगणेशाय नम: । शुद्धमतीने सगळे । न फोडितां रांधिले कोहळे । चवी आले सोहंमेळें । स्वाद गोपाळें जाणिजे ॥ १ ॥ धालेपणाचे ढेंकर । स्वानंदे देती जेवणार । गोडी नीत नवी अपार । कृष्णदातार जे पंक्ती ॥ २ ॥ स्वाद घेतला जेवणारें । जेवितां कोणी न म्हणे पुरे । गोडी घेतली शार्ङ्गधरें । भाग्यें उदार शुद्धमती ॥ ३ ॥ सावध शुद्धमती वाढी । यादवां तृप्ति झाली गाढी । ब्राह्मणांची शेंडी तडतडी । धोत्रें बुडीं ढिलविती ॥ ४ ॥ भीमक करताहे विनंती । अवघ्यां झाली परम तृप्ती । उष्टावणलागी श्रीपती । ठायीं ठेविती निजमुद्रा ॥ ५ ॥ देखोनि आनंदली शुद्धमती । भीमकीभाग्य वानूं किती । कृष्णमुद्रा चढली हातीं । शेषप्राप्ती निजभावें ॥ ६ ॥ कृष्णपंक्ती जे जेविले । ते सवेंचि संसारा आंचवले । कृष्णरंगें सुरंग जाले । विडे घेतले सकळिकी ॥ ७ ॥ कृष्ण देखोनिया डोळां । भीमकीच्या सख्या सकळा । विस्मित राहिल्या वेल्हाळा । आणिक डोळां नावडे ॥ ८ ॥ कृष्णउच्छिट घेऊनि हातीं । वेगें निघे शुद्धमती । संतोषोनिया श्रीपती । प्रसाद देती निजमाळा ॥ ९ ॥ कृष्णप्रसाद सुमनमाळा । शुद्धमती घाली गळां । लाज विसरोनि वेल्हाळा । चरणकमळा लागली ॥ १० ॥ कृष्णास रुखवत शेवती । देतां न कळे दिवसराती । ज्योतिषी रायातें म्हणती । उदयप्राप्ति हो आली ॥ ११ ॥ वेगी मंडपासी चला । घडवटें आधीं घाला । उशिर न लावा जी फळा । यादवां सकळां सांगिजे ॥ १२ ॥ नमस्कारूनियां श्रीपती । मंडपा आली शुद्धमती । उष्टावण भीमकी हातीं । परम प्रीती दीधलें ॥ १३ ॥ कृष्णप्रसाद धरिला माथां । भीमकी झाली रोमांचिता । चित्त विसरलें सावधानता । कृष्णशेषें ॥ १४ ॥ जंव जंव कृष्णशेष सेवी । तंव तंव समाधिसुखा वांकुल्या दावी । बाप भाग्याची पदवी । स्वर्गी देवीं वानिजे ॥ १५ ॥ कृष्णमुद्रा ह्रदयीं धरी । अभिवंदूनियां शिरीं । मग घातली कराग्रीं । लोण उतरी शुद्धमती ॥ १६ ॥ चढोनि परिचियें उपरी । सद्‌गुरु सावधान करी । घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी सखेच्या ॥ १७ ॥ घडी जेंगटातें हाणत । जेंगट तेणें नादे गर्जत । काळ गेला रे गेला म्हणत । वेळ व्यर्थ जाऊं नेदी ॥ १८ ॥ अक्षर निमिष पळेंपळ । घटिका भरतां न लगे वेळ । लोक व्यापारें बरळ । गेला काळ नेणती ॥ १९ ॥ सद्‍गुरु सांगे भरली घडी । उगेंचि पाहाती वर्‍हाडी । ज्यासी निजकार्याची तातडी । ते घडिया घडी साधिती ॥ २० ॥ आळसी लोक निद्रापार । निजमंडपी कृष्ण सादर । विस्तारवी फलसंभार । नानाप्रकार मेचूचे ॥ २१ ॥ शून्य सांडूनि विरजांबर । चिद्रत्‍नाचे अलंकार । पदकी नीळ मनोहर । जो शृंगार ह्रदयीचा ॥ २२ ॥ अहंकाराचें बीज भरडी । मोहममतेचा कोंडा काढी । सोलींव डाळींचीं परवडी । भरली दुरडी श्रद्धेची ॥ २३ ॥ विवेकचाळणियां चाळिली । कणीक आणिली तेजाळी । निवडूनि स्वानंदाची नव्हाळी । ठेविली गुळी निजगोडी ॥ २४ ॥ देठीहूनि सुटलीं फळें । अत्यंत परिपाकें निर्मळें । मधमधीत सुपरिमळें । सूफळ फळें रुक्मिणी ॥ २५ ॥ अत्यंत पढिये भीमकबाळा । गुणेंवीण सुमनमाळा । अंगें गुंफी घनसांवळा । हार गळा आणि जाळी ॥ २६ ॥ सौभाग्यद्रव्यें ठेविली आधीं । धनींपणें धणे हळदी । जिरें मेळविलें त्यामधीं । जेवीं सद्‌बुद्धि विवेक ॥ २७ ॥ गांठी सांडिल्या सोडोनि । घेतला सूक्ष्म तंतू काढोनी । श्रीकृष्ण वोवी कृष्णमणी । ते रुक्मिणी गळसरी ॥ २८ ॥ सांडोनि कठिणत्वाचें बंड । केवळ रसाचे प्रचंड । कृष्णें कृष्णवर्ण इक्षुदंड । अति उदंड आणिले ॥ २९ ॥ बीजेंवीण वाढलीं फळें । एक त्वचेवीण रसाळें । चमत्काराचीं निर्मळें । कृष्ण फळें विस्तारी ॥ ३० ॥ फळ विस्तारले प्रबळ । यादव शृंगारले सकळ । भेरी त्राहाटिल्या मांदळ । निशाणें ढोल लागले ॥ ३१ ॥ अनर्घ्य लुगडीं आणि लेणीं । लेऊनि निघाल्या वर्‍हाडिणी । चारी बारा सोळाजणी । चौघीजणी तयांपुढें ॥ ३२ ॥ जीवशिवां वडिल मान । तैसे वसुदेव उग्रसेन । संतोषोनि संकर्षण । करी परिपूर्ण याचकां ॥ ३३ ॥ एका दिधलें कांहीं एक । एका दिधलें अनंत सुख । चिद्रत्‍नें अलोलिक । देऊनि याचक सुखी केले ॥ ३४ ॥ फळ चालिलें गजरें । ढळती रत्‍नदंड चवरें । झळकती पालवछत्रें । दशविध तुरें वाजती ॥ ३५ ॥ जैसी श्रद्धा आणि शांती । तैसी सुभद्रा आणि रेवती । मुख्यपणें माजी मिरविती । घेतल्या बुंथी पाचूच्या ॥ ३६ ॥ नानापरींच्या घेतल्या बुंथी । तरी अंतरशोभा बाह्य फांकती । अलंकारल्या निजवृत्ती । त्या न झांकती झाकिल्या ॥ ३७ ॥ फळ समीप आलें देखा । ऎसें जाणवलें भिमका । तो सावधान अतीनेटका । भावें बैसका घातली ॥ ३८ ॥ साउमा येऊनि आपण । वसुदेवादि उग्रसेन । नमस्कारूनि संकर्षण । भीतरीं जाण आणिलें ॥ ३९ ॥ विचित्र घातलीं आसनें । सुकुमार मृदुपणें । गाद्या पडगाद्या टेंकणें । वोठंगणें मृदोळिया ॥ ४० ॥ भीतरें आलिया वर्‍हाडिणी । शोभती जैशा दिव्य योगिनी । फळ मांडिलें विस्तारोनी । भावे रुक्मिणी हरिखेली ॥ ४१ ॥ पीठ स्थापिलें कुसरीं । शृंगारोनियां नोवरी । वेगें आणिली बाहेरी । मंत्रोच्चारीं द्विजवरीं ॥ ४२ ॥ पाहतां भीमकीचें रुपडें । अरूपरूपें तेज गाढें । मंडपामाजी उजियेड पडे । आणिकेकडे पाहों नेदी ॥ ४३ ॥ नानारूपाचेनि प्रकाशें । अवघी भीमकीच भासे । देखोनि जीव भुलले कैसे । डोळियां पिसें लाविलें ॥ ४४ ॥ उभवूनि स्वरुपठसा । भुलविलें आदिपुरुषा । एकाएकीं धांविन्नला कैसा । कृष्ण पिसा इणें केला ॥ ४५ ॥ कृष्ण शहाणपणें अतिगाढा । तोही भीमकिया केला वेडा । वोढूनि नेला आपुलेकडा । दुजें पडिपाडा इसी नाहीं ॥ ४६ ॥ भीमकी लावण्याची राशी । कृष्णरूपा भाळली कैसी । सांडूनि जातिकुळासी । कृष्णरूपासी निवटली ॥ ४७ ॥ भीमकी कृष्णायोग्य सहजें । कृष्णवर इसींच साजे । यासारिखें न देखों दुजें । बोलों लाजिजें बोलतां ॥ ४८ ॥ पाहतां भीमकीची रूपरेखा । टक पडिलें सकळिकां । कृष्ण पारखी गे निका । जोडा नेटका मेळविला ॥ ४९ ॥ गोरेपणें अतिसुंदर । विशाळ नयन भाळ थोर । अंगें सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा ॥ ५० ॥ कृष्ण साधावया निधान । नेत्रीं सूदलें अंजन । पाहतां भीमकीचें वदन । विकल्प मन करूं नेणे ॥ ५१ ॥ भुंवया सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक । नाकींचें मोति जडितमाणिक । तेणें श्रीमुख शोभतसे ॥ ५२ ॥ सरळ बाहू सुपोष । कोंपर मनगटें कळास । पांचां आंगोळियां विन्यास । कळन्यास मुद्रिका ॥ ५३ ॥ सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त । बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ती ॥ ५४ ॥ कटिप्रदेशें शोभत जघन । माज अतिशयेंसीं सान । घोंटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥ ५५ ॥ माथां मोतिलग जाळी । इळके फरातळीं हांसळी । मिरवे भांग टिळा कपाळीं । तेज झळाळी तानवडां ॥ ५६ ॥ नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी रत्‍नांची मेखळा । सुनीळ कांचोळी वेल्हाळा । लेइली माळा मोतिलग ॥ ५७ ॥ गंगातीरीं चक्रवाकें । तेवीं कुचद्वय सुरेखें । ह्रदयीं घननीळ झळके । शोभां पदकें दाविजे ॥ ५८ ॥ नाकींचें झळकत सुपाणी । तेणें शोभली रुक्मिणी । शोभा आली बाहुभूषणीं । रत्‍नकंकणी कळाविया ॥ ५९ ॥ चरणीं गर्जती नुपुरा । भुलोनि मदन आला उदरा । तेही भुलली शार्ङ्गधरा । कृष्णवर वरावया ॥ ६० ॥ नाहीं लग्नास व्यवधान । वेगीं करा फळार्पण । उठोनि वसुदेव आपण । करी पूजन भिमकीचें ॥ ६१ ॥ पहिलें करावें गणेशपूजन । तंव गणेश वंदी कृष्णचरण । कृष्णचरणीं समाधान । गजवदन तुष्टला ॥ ६२ ॥ कृष्णपुरोहित निष्काम । न करिती कलशपूजेचें काम । नवरीचे उपाध्ये सकाम । पुरुषार्थ परम त्यां दिधला ॥ ६३ ॥ वस्त्रें अर्पूनि सुंदरी । वेगीं नेली अभ्यंतरीं । मायावसन त्याग करी । अंगीकारीं श्रीकृष्णनिवास ॥ ६४ ॥ फेडूनि मायेचीं परिधानें । लेइली कृष्णमय लेणें। भीमकी अत्यंत शोभली तेणें । निंबलोण जिवेंभावें ॥ ६५ ॥ सवेंचि आणिली बाहेरी । डोळां न पाहवे सुंदरी । दृष्टी जातसे चाचरी । आधार धरी धैर्याचा ॥ ६६ ॥ कृष्णीं विनटली वाडेंकोडें । ती कवणाचे दृष्टी न पडे । भाग्य वसुदेवाचें गाढें । तयापुढें बैसविली ॥ ६७ ॥ कृष्णें पाठविलें फळ । नि:शेष अर्पिले सकळ । मस्तकीं घरी भीमकबाळ । जन्म सफळ येणें फळें ॥ ६८ ॥ फळें वाढिले प्रबळ । झाले वर्‍हाडी सफळ । हातां आलें कृष्णफळ । खूण प्रेमळ जाणती ॥ ६९ ॥ भीमकीसी म्हणे पुरोहित । वरासी मूळ निघा त्वरित । यादव परतले समस्त । गुण वर्णीत भीमकीचे ॥ ७० ॥ वर्‍हाडिणी सांगती गोष्टी । सगुणगुणाची गोमटी । भीमकी ऎसी नाहीं सृष्टीं । कृष्ण जगजेठी पारखी ॥ ७१ ॥ यासी माया म्हणे वेडा । परी हा देखणा चोखडा । कैसा मिळविला जोडा । निजपडिपाडा समत्वें ॥ ७२ ॥ आदिकुमारी घेऊनि जाण । कृष्णासी तेल लावी आपण । बांधोनि दृश्याचें कंकण । जीवें जीव म्हणतसे ॥ ७३ ॥ तिची करावया बोळवण । कृष्णाआंगी आंगवण । येरा न कळे महिमान । जुनाट जाण वृत्ती तिची ॥ ७४ ॥ लग्न साधावया चक्रपाणी । भीमक हांकी वर्‍हाडिणी । शुद्धमतीसहित सुवासिनी । चालती निशाणी गर्जत ॥ ७५ ॥ नाना वाजंत्रीचिया ध्वनी ध्वनी । नाद न समाये गगनी । मधुर शब्दांचिया किंकिणी । गोडपणें गर्जती ॥ ७६ ॥ घेऊनि पूजेचे संभर । ठाकिले विवाहमंडपद्वार । भीमकें केला अति आदर । वेगें वर आणावा ॥ ७७ ॥ सहजेंचि नेटुगा दातुगा । फेडावेडी नाहीं श्रीरंगा । सभे बैसविला समचौरंगा । नयनभृंगा आल्हादू ॥ ७८ ॥ दृष्टी जडली कृष्णरूपासी । परतोन न ये दृश्यापाशीं । पारणें होतसे डोळ्यासी । कृष्णसुखासीं भोगिती ॥ ७९ ॥ कृष्ण देखोनि धाले नेत्र । देताति तृप्तीचे ढेंकर । तरी भुकेले अपार । वारंवार हरि पाहती ॥ ८० ॥ शुद्धमतीने आपण । कृष्णासी आणिलें तेलवण । सुखसेवयांचे लाडू जाण । तें गोडपण हरि जाणे ॥ ८१ ॥ सोलींव विवेकांचे तिळवें । स्थूळ ना सूक्ष्म अति बरवें । बांधा बांधिले अतिस्वभावें । निजभावें विस्तारी ॥ ८२ ॥ फोडोनि चार्वाकचारें । निजबीज काढिलें बाहिरें । चारोळियांचे लाडू साजिरे । श्रद्धासाखरे आळिले ॥ ८३ ॥ आणोनि सडियेली खसखस । धुवोनि सांडिली घसघस । लाडू वळिले सावकाश । अतिसुरस श्रीरंगा ॥ ८४ ॥ अष्टदळ कमळाचें बीज । फोडूनि सोलोनि काढिलें निज । लाडू वळिले सहज । दाखवी वोज शुद्धमती ॥ ८५ ॥ वरिवरि वैराग्याचे कांटे । भीतरी अमृताचे साटे । फणस फॊडूनि चोखटे । काढी गोमटें निजबीज ॥ ८६ ॥ त्याची अवीटतेची गोडी । लाडू वळिले आवडी । शुद्धमती दावी परवडी । प्रीती गाढी हरिचरणीं ॥ ८७ ॥ वरिवरीं दिसती साजिरे । आंत पाहतां आंबट बोरें । त्यांच्या आठोळिया फोडूनि निर्धारे । काढिलें साजिरें निजबीज ॥ ८८ ॥ घालूनि समतेचा गूळ गोडू । त्या बीजाचे वळले लाडू । कृष्ण करूं जाणे निवाडू । पडिपाडू स्वादाचा ॥ ८९ ॥ कृष्णालागीं तेलवणें । आणिलीं कडकडीत कडकणें । फुटलें तुटलें द्वंद्वपणें । रजोगुजें तळियेलें ॥ ९० ॥ वांकुढे कानवले तेलवणें । कृष्णासी आणिलें कवणें गुणें । मुरडी मुरडिले अनुसंधानें । गोडपणें अंतरीं ॥ ९१ ॥ शुद्धमतीनें आपण । कृष्णासी वाहिलें तेलवण । वस्त्रें अलंकार संपूर्ण । परिपूर्ण स्वानंदे ॥ ९२ ॥ तेलवणाचा विस्तार । किती वाढवावा उपचार । होईल लग्नासी उशीर । वर सत्वर चालों द्या ॥ ९३ ॥ शुद्धसत्त्वाचा श्वेत वारू । त्यावरी चढिन्नला कृष्णवरू । झाला वाद्यांचा गजरू । मंत्रोच्चारू द्विजांचा ॥ ९४ ॥ आठही भाव होऊनि गाढे । वारू धरिला दोहींकडे । छंदे चालती कृष्णापुढें । आणिकेकडे न चालती ॥ ९५ ॥ निजबोधाचें आतपत्र । शिरीं तन्मयचें छत्र । पहावया कृष्णवक्त्र । येति सत्वर नरनारी ॥ ९६ ॥ मदें गर्जती अतिगंभिर । अनुभव स्वानंदाचे थोर । दोहीं बाहीं जी कुंजर । सालंकार पतकी ॥ ९७ ॥ चंद्रकिरण अतिसाजिरे । तैशीं अतिशुभ्र चामरें । रत्‍नदंडी सहजाकरें । मनोहरे ढळताती ॥ ९८ ॥ कृष्णे सोडिल्या त्याग देउनी । अष्टमहासिद्धी नाचणी । नाचताती चपळपणीं । देखोनि जनीं भुलीजे ॥ ९९ ॥ सिद्धी नाचतां देखती जेथे । जन मीनले त्याभोंवते । पाहोनि विसरले कृष्णातें । नाचणीतें भुलले ॥ १०० ॥ चैतन्यबुका घाली वनमाळी । ज्यासी लागे तोचि परिमळी । देत खुणेच्या अंजली । पसेदान याचकां ॥१॥ कृष्णरंगें सुरंग विडे । वांटिताती वाडेंकोडें । जो राहिला मागिलकडें । त्यासी न चढे तो रंग ॥ २ ॥ ऋग्वेदादि सामगायन । गर्जती वेद बंदीजन । त्या शब्दाची निजखूण । सत्य श्रीकृष्ण जाणता ॥ ३ ॥ सत्त्वें सात्त्वीक जगजेठी । घेऊनि विवेकाचि वेताटी । दृश्य गलबला मागें लोटी । कृष्ण दृष्टी पहावया ॥ ४ ॥ कृष्णासी आवडती अतिप्रीती । ते वैष्णव रंगीं नाचती । सांडूनि अहंसोहवृत्ती । नृत्य करिती निजबोधें ॥ ५ ॥ कृष्णासवें सुवासिनी । शांति क्षमा दया उन्मनी । आल्या सुखासनीं बैसोनि । वरासनीं सुभद्रा ॥ ६ ॥ निर्धारूनियां तत्त्वतां । निजबोधाच्या अक्षता । घालिती कृष्णाचिया माथां । लक्ष सर्वथा न चुकती ॥ ७ ॥ उग्रसेन वसुदेव । वहनीं चढले यादव । अवघ्यांपुढें बळीदेव । महोत्साव करीतसे ॥ ८ ॥ सोयरे कृष्णाचे निजभावी । भक्त योगी ज्ञानी अनुभवी । तयांसी वाहनें बरवी । कृष्णदेवें दिधलीं ॥ ९ ॥ एका सलोकतेचा वारू । एकासी समीपतारहंवरू । एकासी स्वरूपताकुंजरू । महा थोर भद्रजती ॥ ११० ॥। एका दिधलें अमोल । सायुज्यता चवरडोल । त्याचा अनुभव सखोल । निजात्मबोल हरी जाणे ॥ ११ ॥ तयासी सर्वथा श्रीहरी । आपणावेगळें क्षणभरी । कोठें जाऊं नेदी दूरी । सरोभरि निजभावें ॥ १२ ॥ वर्‍हाड राखावया निगुती । गुणावतार गुणमूर्ती । करणें मारणें धरणें स्थिती । तिघां हाती भरभारू ॥ १३ ॥ तयां तिघांमागिलेकडां । कृष्ण पुरुष अतिगाढा । दोहीं पक्षी देखणा फुडा । भार वर्‍हाडा त्या माथां ॥ १४ ॥ वर्‍हाडाची घडामोडी । कृष्णाआंगीं नलगे वोढी । अवघे पर बाहिरे दवडी । ऎसी परवडी रचियेली ॥ १५ ॥ विचारितां निजनिवाडीं । कृष्णावीण अर्धवडी । इकडील तिकडे नव्हे काडी । वृथा वेडीं बलगती ॥ १६ ॥ भरूनि रजतमाचें औषध । करूनि अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ॥ १७ ॥ अग्नि लावूनि ठायीं ठायीं । ममता जाळिती हवायी । गगना उसळली पाही । धुपोनि ठायीं निमाली ॥ १८ ॥ मोहयंत्रीं सुमनमाळा । अग्निपुष्पे भासती डोळां । फुलें म्हणती अबला । पाहतां डोळां ते राख ॥ १९ ॥ अतिलोभाच्या चिचुंदरी । अग्नि लावूनि टाकिती दूरी । पेटल्या पडती जनांवरी । उरीं शिरीं जाळिती ॥ १२० ॥ देऊनि उपशम-अनळा । जाळिती क्रोधाचा भुईनळा । भडभडां निघती ज्वाळा । तोही निमाला तात्काळ ॥ २१ ॥ हातीं धरूनि कृष्णलीला । जाळिती कामाचा हातनळा । धरूं नेणती त्या अबळा । जीवीं जिव्हाळा पोळत ॥ २२ ॥ पाहतां अत्यंत कठीण । चिन्मात्र अग्नि देऊनि जाण । सांडिती अहंकाराचे बाण । पळे जीवपण दचकोनी ॥ २३ ॥ मदमत्सरधूम्रमेळें । एकाचें झांकले जी डोळे । देहबुद्धीचीं भेडें सकळें । विषयबळें पळालीं ॥ २४ ॥ स्वानुभवाचे महाथोर । उठावले जी कुंजर । रगडूनि अहंकाराचा दूर । निरंतर डुल्लती ॥ २५ ॥ सवेंचि निजतेजचंद्रज्योति । उजळली जी अवचित्तीं । प्रकटली परम दीप्ती । तेही स्थिती परियेसा ॥ २६ ॥ नि:शेष अंधार नाहीं जेथ । उष्णचांदणीयाहूनि अतीत । तेज प्रकटलें अद्‌भुत । संतोषत श्रीकृष्ण ॥ २७ ॥ पदोपदीं नाना त्याग । करीत चाले श्रीरंग । वोंवळण्या जी अनेग । दोहीं भागीं पडताती ॥ २८ ॥ कौतुक दावावया श्रीपती । कपटमहामोहाचा हस्ती । आणूनि पुढा उभा करिती । भद्राजाती मातला ॥ २९ ॥ नेणती त्याची लटकी कळा । देखोनि भय उपजे सकळां । कोण पुरे त्याच्या बळा । चळचळां कापती ॥ १३० ॥ महामदे झाला मस्त । अहंकारें अतिगर्जत । अव्हासव्हा जी धांवत । लोकांआंत निजबळे ॥ ३१ ॥ भेडांपाठीं अधिक लागे । तंव ते सरती मागें । अंधकूपीं पडतीं वेगें । मागते निघों नेदी तों ॥ ३२ ॥ भेडें लटकींच रगडी । तेणें चरफडती बापुडीं । एकीं त्या भेणें झोंपडी । जीवेंभावें धरियेली ॥ ३३ ॥ ऎसा जनांसी लाविला धाक । तंव कृष्णे खुणाविला सेवक । लाता हाणोनिया देख । कपटवेष मोडिला ॥ ३४ ॥ धारणाधायें कपट झोडी । भवगज हे गोष्टी कुडी । ऎसी देखणी दृष्टी ज्या चोखडी । भवभयवोढी त्या नाहीं ॥ ३५ ॥ चतुर्विधा प्रसिद्ध दासी । शकुनालागीं ह्र्षीकेशी । उभ्या परिपूर्णकलशेंसीं । महाद्वारासी तिष्ठत ॥ ३६ ॥ कृष्णभांडार तें अनंत । अखंड श्रीकृष्णासवें चालत । पाहोनियां शुद्ध भावार्थ । उचित पदार्थ हरि देत ॥ ३७ ॥ श्रद्ध कीर्ती धृति विरक्ती । त्याही दासी अति तिष्ठती । श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ॥ ३८ ॥ जें जें काहीं त्या मागत । तें तें कृष्णनाथ देत । त्याहूनि अधिक दे समर्थ । महाद्वारांत प्रवेशला ॥ ३९ ॥ अंतरीं प्रवेशला कृष्णवरू । सकळां स्वानंद झाला थोरू । अवघे करिती जयजयकारू । बैसकारू झाले तदा ॥ १४० ॥ सिद्धसामग्री मधुपर्कासी । विष्टर दिधला ह्रषिकेशी । साम्यतेचिया चौरंगासी । श्रीकृष्णासी बैसविलें ॥ ४१ ॥ सांडूनि फळाशा समस्त । अर्घ्य अर्पिलें सफळित । सुर नर कौतुक पाहात । सिद्ध समस्त तेथें आले ॥ ४२ ॥ पाद्यालागीं आणिलें तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी अतीत । चैतन्यप्रवाहें शोभत । यथोचित मनकर्णिका ॥ ४३ ॥ उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती । जेथोनि तीर्थाचि उत्पत्ती । ते पूजिती श्रीचरण ॥ ४४ ॥ चरणप्रक्षाळणा ठेविलें अंबू । तंव पातला तीर्थकदंबू । आम्हांसी लाभों द्या एक थेंबू । चरणांबू श्रीहरीचा ॥ ४५ ॥ मूळमाधवीं जाऊनि पाहें । कदंबतीर्थ अद्यापि आहे । भाग्यवंत तो तेथें नोहे । कृष्णपाये तें तीर्थ ॥ ४६ ॥ शुद्धमतीनें आपण । कृष्णासी दिधलें आचमन । तीन वेळां न करी जाण । सर्वापोशन एक वेळां ॥ ४७ ॥ ब्रह्मपदींचा अधिष्ठाता । त्यासि देती ब्रह्मसूत्रा । मान दे तो वेदविचारा । श्रुतिव्यवहार संरक्षी ॥ ४८ ॥ चंदन पुष्पें टिळे माळा । भावें पूजिला घनसांवळा । आनंद भीमकभूपाळा । परब्रह्म डोळां देखत ॥ ४९ ॥ हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासी वोपिल्या विचित्रा । बाहुभूषणें जडित मुद्रा । पीतांबर अर्पिलें ॥ १५० ॥ दधि मधु एकत्रता । करीं घातलें अच्युता । मेहुणे म्हणती कृष्णनाथा । लाज सर्वथा न धरावी ॥ ५१ ॥ गोकुळीं चोरूनि दधि खातां । तुम्हांसी लाज नाहीं सर्वथा । आम्हीं निजभावें अर्पितां । कां लाजता निजचोरा ॥ ५२ ॥ सलज्ज हांसे शुद्धमती । वर्‍हाडी वर्‍हाडिणी हांसती । निष्कर्मासी कर्मप्राप्ती । जन वदती विपरीत ॥ ५३ ॥ भीमक म्हणे 'प्रतिगृह्यत' । प्रतिगृण्हामि म्हणा अच्युता । टक पडिलें कृष्णनाथा । मग तत्त्वतां विचारी ॥ ५४ ॥ खूण बोलिला कृष्णस्वामी । 'दान देतों एक आम्हीं' । हाही भाव सांडूनि तुम्ही । मग प्रतिगृण्हामि सर्वचि ॥ ५५ ॥ संकल्प सोडितां तात्काळ । दधि मधु सेवी गोपाळ । भीमकाचें जन्म सकळ । सफळ कुळ उद्धरिलें ॥ ५६ ॥ देऊनि कृष्णासी आचमन । सवेंचि केलें करक्षालन । गुरु म्हणती सावधान । नाहीं व्यवधान लग्नासीं ॥ ५७ ॥ कृष्णचरण शून्य न पडे । घातले परिपूर्ण पायघडे । श्रीकृष्ण चालविला पुढें । वाडेकोडें लग्नासी ॥ ५८ ॥ भीमकी भावार्थे आइती । पर्णावया निजपती । गौरीहर सहज स्थिती । उपचारप्रीतीं पूजितसे ॥ ५९ ॥ कृष्णासी अंत्रपाट पुढें । बोलतां बोलणें हें कुडे । श्रोते म्हणती न सुचीं झाडे । लग्न निवाडें लागों द्या ॥ १६० ॥ आधींच कृष्णकथा सखोल । त्याहीवरी तुझे रसाळ बोल । जाणसी प्रेमाची बोल । येताती डोल सुखाचे ॥ ६१ ॥ ऎकोनि श्रोतियांचे वचन । आनंदला एक जनार्दन । मनें करूनि लोटांगण । वंदिले चरण निजभावें ॥ ६२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणी स्वयंवरे लग्नअतिकालसमयोनाम पंचदश: प्रसंग ॥ १५ ॥ ॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सोळावा श्रीगणेशाय नम: । अंत्रपाट आहे ज्यासी । वेगें सावध करा त्यासी । पळ अक्षर निमिषोन्मिषीं । हरिचरणासी चिंतावें॥ १ ॥ सद्‌गुरु म्हणती सावधान । घटिका हो आली पुर्ण । वचनीं नेदावें प्रतिवचन । सावधान परिसावें ॥ २ ॥ सांडा चौघींची कळकळ । महामौन्येंसी रहा निश्चळ । लग्नघटिका भरे चपळ । अतिसबळ वेगेसीं ॥ ३ ॥ अंगीं धरुनि जाणपण । वचना देती प्रतिवचन । तेणेंचि वचनें त्यांसी दूषण । सावधानपण त्यां नाहीं ॥ ४ ॥ अतिसमयो वर्ते लग्न । दोन्हीं पक्षीं सावधान । अच्युतचिंतनीं राखा मन । सावधान निजबोधें ॥ ५ ॥ ओंपुण्या पडली मिठी । द्वैतभावना सुटली गांठी । सुटला अंत्रपाट दृष्टी । उठाउठी हरीवरी ॥ ६ ॥ भीमकीमाथा एकाएक । कृष्ण अक्षता घाली देख । तोचि मस्तकीं हस्तक । परम सुख पावली ॥ ७ ॥ भीमकी कृष्णाचिया माथां । घालूं जाय जंव अक्षता । कृष्णचि देखे सभोवता । सबाह्यता हरि देखे ॥ ८ ॥ कृष्ण देखे जिकडे तिकडे । अक्षता घाली चहूंकडे । पुरोहित म्हणती लागलें वेडें । कृष्ण निवाडे नोळखसी ॥ ९ ॥ कृष्णालागीं परम पिसी । माळ घालूनि रथीं होतीसी । शेखीं कृष्णासी नोळखसी । केवीं नांदसी संसारीं ॥ १० ॥ ऎसें हें झालें पाणिग्रहण । कृष्णे प्रकृति पाहिली जाण । मग बांधावया कंकण । शुद्ध सुतें सुतविती ॥ ११ ॥ पहिलें सूक्ष्म अति अत्यंत । तेंचि अष्टधा वाढत । स्थूलमानें दृश्य होत । भग तोडित तडातडां ॥ १२ ॥ पहिलें दुखंड केलें जाण । त्रिगुणगुणें घाली वळण । अर्ध स्त्रीनाम कंकण । अर्ध जाण कृष्णपुरुषा ॥ १३ ॥ एकचि तंतू द्वैत झाला । स्त्री अंगीं बाणला । अर्ध पुरुषत्व पावला । करीं बांधला कृष्णाचे ॥ १४ ॥ फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ॥ १५ ॥ मलिन वाम सांडी प्रकृती । सांडिलें दोहीं पक्ष न घेती । सलोभ उपाध्यें तें नेती । मग भांडती परस्परें ॥ १६ ॥ भीमकिया वरिला नारायण । झळकत दृश्याचें करीं कंकण । सौभाग्यद्रव्यें देतसे वाण । आहेवपणा श्रीकृष्णें ॥ १७ ॥ दिव्य शोभा शोभे कृष्ण । तेथीची शोभा वर्णी कोण । जाणती अनुभवीं सुजाण । सुख संपूर्ण तेथीचे ॥ १८ ॥ जीवी जीवां पडली मिठी । बाह्य पालवां दिधल्या गांठी । भीमकी कृष्ण पाहें दृष्टीं । हरिख पोटीं न समाये ॥ १९ ॥ विवाह होमलागी श्रीहरी । वेगें चला बोहल्यावरीं । कडे घ्यावी जी नोवरी । लहानथोरी वेढिला ॥ २० ॥ नोवरी धरितांचि हाती । नारी मिनल्या नेण किती । प्रकृती वेढिली श्रीपती । अडकले गोविंदा ॥ २१ ॥ बाइल हाती धरिल्यासाठीं । कृष्ण गोविला जगजेठी । येरां जीवांची कायसी गोष्टी । बैसता पाठीं गोड लागे ॥ २२ ॥ कृष्ण विचारी निजव्रती । मजचि वरी माजी प्रकृती । माझेनि गमन इसी निश्चितीं । लाजों किती लटिकाचीं ॥ २३ ॥ हे बैसली माझिये कडिये । जीवेंभावें मज हे पढिये । प्रपंचाचे आंतुलेकडिये । नामरूप इचेनी ॥ २४ ॥ मजवीण हे नोवरी । पुढें न चलें पाऊलभरी । लटकी लाज सांडुनि दूरी । वचन करी वडिलांचे ॥ २५ ॥ आंगां नातळत श्रीहरी । हात न लाविता नोवरी । उचलोनी आणली बोहल्यावरी । नरनारी हांसती ॥ २६ ॥ विवाहहोम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणिग्रहण । भीमकें दिधली वरदक्षिणा जाण । भूरिदान वांटिलें ॥ २७ ॥ कान पिळू मेहुणे भिती । होईल रुक्मियाची गती । परु विटंबील श्रीपती । याची ख्याती तिहीं लोकीं ॥ २८ ॥ त्यांचा जाणोनियां भावो । कृष्णें फेडिला संदेहो । मेहुणे गौरविले पहा हो । दिव्यांबरी भूषणीं ॥ २९ ॥ भीमक कृष्णासी विनंती करी । चतुर्थहोम आमुचे घरीं । करावा जी कृपेंकरीं । सहपरिवारीं सुदृदेशीं ॥ ३० ॥ पाहावया सुनमुखासी । मूळ पाठवा वरमायेसी । भंवरिया कळस आहे तिजपाशीं । निघें वेगेंसी शुद्धमती ॥ ३१ ॥ कृष्ण वदे ह्रदयासी । धन्य धन्य तिची कुशी । शुद्धमति लागे पायांसी । देवकीसी प्रार्थिलें॥ ३२ ॥ देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणी पदोपदी ॥ ३३ ॥ शुद्धमती देतसे विडिया । पीक धरावया सुवर्णघडिया । श्रीगिरीवरी बोलती गुडिया । पायघडिया पदोपदीं ॥ ३४ ॥ चांदवें मोतिलग विस्तारें । दोहीं बाहीं ढळतीं चवरे । देवकी समारंभें थोरें । आणिली गजरें मांडवा ॥ ३५ ॥ कृष्णरुक्मिणी अतिगोमेटीं । साजिरीं वोहरें देखिलीं दृष्टीं । ऎसा जोडा नाहीं सृष्टीं । माझी दृष्टीं झणी लागे ॥ ३६ ॥ देवकी घेऊनि अपण । दोघां उतरी निंबलोण । कृष्णनिंबलोणा हुताशन । मुख पसरोन धांविन्नला ॥ ३७ ॥ कृष्णनिंबलोण पडतां मुखीं । तेणें मुख सरतें तिहीं लोकीं । हे जाणोनियां याज्ञिकीं । अतिसाक्षेपीं सादर ॥ ३८ ॥ कृष्णनिंबलोण अतिसाक्षेप । करितां हरलें त्रिविधताप । जाऊनि देहसंताप । सुखरूप तो जाला ॥ ३९ ॥ सून बैसवूनि मांडिवरी । कृष्णश्रवण जडित भोवरीं । कानीं घातली निर्धारी । कळस त्यावरी धैर्याचा ॥ ४० ॥ मुक्तमोतिलग गंभीर । श्रवणी बाणल्या साचार । तेणें शोभलीं सुंदर । मनोहर सकळिंकां ॥ ४१ ॥ लग्न लागलिया येरे दिवशी । सोहळा मांडिला वोहरांसी । मूळ पाठविले हळदीसी । यादवांसी भीमकें ॥ ४२ ॥ मूळ पाठविलें सकळां । दोहीं बाहीं बारा सोंळा । करवली सुभद्रा वेल्हाळा । चाले सुढाळा उन्मनी ॥ ४३ ॥ अत्यंत शाहाण्या सुवासिनी । आणीक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ॥ ४४ ॥ वडिलपणें अतिश्रेष्ठ । सकळांमाजी वरिष्ठ । शांति चालिली चोखट । अतिलोभिष्ट श्रीकृष्णा ॥ ४५ ॥ सभा बैसली निजबोधें । ढवलळे गाती स्वानंदें । हळदी आरंभिली विनोदे । झालीं सावधे अधिकारें ॥ ४६ ॥ पाहों जाणती कृष्णकौतुक । तेही सावध झाले लोक । अनाधिकारिया लगबग देख । पाहाती मुख वनितांचें ॥ ४७ ॥ वोहरें पाहातां निवे मन । दोन्हीं पक्षी सावधान । कोणा न बोलवे वचन । पडिलें मौन सकळिकां ॥ ४८ ॥ चौघीजणी अतिचपळा । कुजबुजती वेळोवेळां । कैशा झाल्याती तोंडाळा । शब्द्चाळा न सोडा ॥ ४९ ॥ शांति म्हणे परत्या सरा । सांगेन तें तुम्ही करा । कुरवंडी श्रीकृष्णवरा। लोण उतरा सर्वस्वें ॥ ५० ॥ स्नेहें उजळूनियां वाती । भीमकी सन्मुख दाविती । येरी नातळे जी हातीं । स्नेहवृत्ती नावडे ॥ ५१ ॥ कुरवंडी न धरितां हातीं । माय धाय शंकल्या चित्तीं । मग बोलली निजशांती । नव्हे श्रीपती हें योग्य ॥ ५२ ॥ जया दीपाचिये मेळीं । न निघे स्नेहधूम काजळी । तैसा दीप उजळी । मग वोवाळी श्रीकृष्णा ॥ ५३ ॥ ऎकोनि भीमकी झाली सुखी । खूण बाणली नेटकी । जीवीं जीवाची वोळखी । परम पारखी तो जाणे ॥ ५४ ॥ निर्धूम अग्नीच्या निजमेळीं । कृष्णदीपें दीप उजळी । आकाश लोपलें प्रभेतळीं । भावें वोवाळी श्रीकृष्ण ॥ ५५ ॥ न कळे भीमकीचें लाघव । सकळही म्हणती धन्य भाव । आतां घेऊनिया नांव । पाय मागें कृष्णाचे ॥ ५६ ॥ ऎकोनि जनांचियां गोष्टी । भीमकी दचकली पोटीं । काय आतां बोलों वोठीं । न दिसे दृष्टि नामरूप ॥ ५७ ॥ याच्या नामरूपभेदा । व्यक्ति नाणवेचि वेदा । पुढारी वाटले नच शब्दा । नेति अनुवादा परतल्या ॥ ५८ ॥ पाहातां रूपाचा दुकाळ । घालितां साकारतेचा आळ । लाविती नामाचा विटाळ । तेणें गोपाळ शोभेल ॥ ५९ ॥ सवेचि म्हणे कळें चित्ता । गोइंद्रियांचा हा नियंता । यासी गोपाळा म्हणतां । दोष सर्वथा मज नाहीं ॥ ६० ॥ ऎसें विचारूनि वेल्हाळा । लक्ष लाविजे चरणकमळा । वेगीं पाय द्या गोपाळा । भीमकबाळा बोलिली ॥ ६१ ॥ तंव पिटिली टाळिया टाळी । ऎकोनि हांसिजे सकळीं । भीमकीये भली केली रांगोळी । खुण वनमाळी जाणत ॥ ६२ ॥ ऎकोनि भीमकीच्या बोला । कृष्णदेवो मानवला । वर्तत खुणा आपुल्या । देत पाउला स्वानंदें ॥ ६३ ॥ अबला सांगती वडिलां । येणें अभिमान सांडिला । कृष्ण बाइलेआधीन झाला । तिच्या बोलामाजी वर्ते ॥ ६४ ॥ कृष्ण देखोनि बहु काळा । हळदी लाव वेळोवेळां । उठूनिया घनसांवळा । अति सोज्वळा करूं पाहे ॥ ६५ ॥ जें जें कृष्णाअंगीं लावे । तें तें कांहीं केलिया न निघे । भीमकी उटी लागवेगें । मळी न निघे सर्वथा ॥ ६६ ॥ अत्यंत निर्मळ वनमाळी । निज निर्मळ न निघे मळी । चाकाटली भीमकबाळी । न देखे तळीं मळवटू ॥ ६७ ॥ पाहातां कृष्णचरणरेखा । चरणीं देखे तिहीं लोकां । भीमकी कृष्णमय देखा । उटणें हरिखा होतसे ॥ ६८ ॥ कृष्णचरणीं निजस्वरूप । देखतां आला स्वेदकंप । कंठीं दाटला जी बाष्प । विकळरूप मूर्च्छित ॥ ६९ ॥ सद्‌गुरु म्हणती सावधान । कृष्णचरणीं दृढ मन । धैर्य बळें राखोनि जाण । विकळपण येवों नेदीं ॥ ७० ॥ मोहें धांविन्नलो धाये । म्हणे तुज झालें काये । झणीं दिठी लागेल माये । उचलोनि कडिये घेतली ॥ ७१ ॥ कृष्णचरणीं जें अनुभविलें । तें तंव न बोलवे बोलें । भीमकीया शहाणपण केलें । खुणें वारिलें धायेतें ॥ ७२ ॥ पाळी आली कृष्णाकडे । एकेचिं हातें फेडा बिरडें । न फिटे तरी रोकडें । दंडवत घडे भीमकीसी ॥ ७३ ॥ महुणेपणाचे परिपाटीं । विषयतृष्णेचिये दृष्टीं । बिरडा पडिल्या सुबद्ध गांठी । केवीं जगजेठी सोडील ॥ ७४ ॥ मेहुणे म्हणती हा जगजेठी । जाणे बिरडियाची हातवटी । अभ्यास केला यमुनेतटीं । दाटोदाटी गौळणीसीं ॥ ७५ ॥ वर्मेंकर्में बोलती खुणा । यादव म्हणती श्रीकृष्णा । बिरडिया पाडु तो केसणा । तूं देखणा निजदृष्टीं ॥ ७६ ॥ महावीरांचें बिरडें पडलें । तें तुवां एकलेनि फेडिलें । मेहुणे न लाजती बोलतां बोलें । रुक्मिया दिधलें तें यासी दीजे ॥ ७७ ॥ सासुसासरियांची आवडी । देवकीवसुदेवांचिये गोडी । म्हणती कृष्ण बिरडें फेडीं । वचन न मोडीं वडिलांचें ॥ ७८ ॥ कृष्ण अवलोकी कृपादृष्टीं । बिरड्या सुटल्या जी गांठी । द्वैतकांचोळी समदृष्टी । फेडी जगजेठी तत्काळ ॥ ७९ ॥ पहा गे येणें नवल केलें । कृष्णदृष्टीच उगवले । न सोडितां पैं फेडिलें । बिरडें काढिलें निजदृष्टीं ॥ ८० ॥ पाहतां कृष्णदृष्टीकडे । फिटे संसारबिरडें । त्यासी हें दुर्घट केवढें । फेडितां बिरडें नोवरीचें ॥ ८१ ॥ नाना व्रतें तपें दानें । योगयागादि सधनें । करितां शिनले होगिजन । तरी कृष्णचरण न ठाकती ॥ ८२ ॥ भीमकी दैवाची पैं चांग । परम भाग्यें अतिसभाग्य । पावली कृष्णाचें अर्धांग । भावें श्रीरंग भोगित ॥ ८३ ॥ श्रीकृष्णासन्मुख भीमकी । बैसविली जी कौतुकीं । लाज जाली अधोमुखी । कृष्णाकडे पाहे ॥ ८४ ॥ तंव तळवटीं एकाएक । देखती जाली कृष्णमुख । पाठमोरी पाहता देख । देखे सन्मुख श्रीकृष्ण ॥ ८५ ॥ वाम सव्य दोहींकडे । देखे कृष्णाचें रूपडें । आतां मी रिघों कोणीकडे । चहूंकडे हरि दिसे ॥ ८६ ॥ ऎशापरी अतिसंकटीं । लाजतां कृष्ण देखे दृष्टीं । लाज सांडूनि गोरटी । उघटी दृष्टीं हरिरूपीं ॥ ८७ ॥ भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इसीं हळूचि उटीं । कठिणहस्त तूं जगजेठी । मल्ल मुष्टीं मर्दिले ॥ ८८ ॥ तुझा लागतांचि हात । देह बुद्धीचा करिती घात । याचलागीं जीव भीत । तुझी मात न करवे ॥ ८९ ॥ रेवती म्हणे जी यादवा । आधीं घ्यावें इच्या नांवा । मग इसी हळदी लावा । देवाधिदेवा श्रीकृष्ण ॥ ९० ॥ कृष्ण म्हणे हळदीमिसे । मजसी लावूं आल्या पिसें । नांवरूप मज न दिसे । काय म्यां कैसें म्हणावें ॥ ९१ ॥ नामरूपाची व्यवस्था । रुक्मिणीच जाणे तत्त्वतां । माझ्या आंगीं नाहीं सर्वथा । नाम घेता मी नव्हें ॥ ९२ ॥ आग्रह न करावा गोपाळा । नामरूपा तूंचि जिव्हाळा । व्यर्थ चाळविशी अबळा । सुखसोहळा तुझेनी ॥ ९३ ॥ कृष्ण खूण सांगें जीवींची । नामरूपें अतिरूपाची । सगुणगुणें हे गुणाची । प्रिया आमुची निजदृष्टीं ॥ ९४ ॥ कृष्ण म्हणे रुक्मिणी देवी । नामरूप तूंचि अवघी । मजपरीस तूंचि बरवी । हांसिजे सर्वी ऎकोनी ॥ ९५ ॥ हळदी घेऊनि श्रीरंगें । उतित भिमकीची अष्टांगें । येरी निवतसे सर्वांगें । जाणती आगें अनुभवी ॥ ९६ ॥ चरणीं उद्धरली शिळा । ते कर भोगी भीमकबाळा । मृदुपणाचा जिव्हाळा । जाणती कळा निजभक्त ॥ ९७ ॥ हा तंव ब्रह्मादिकांचा ईश । हळदीमिसें ह्रषीकेश । झाला भीमकीचा दास । जगन्निवास जगाचा ॥ ९८ ॥ दासांचेंही दास्य करणें । हें तव श्रीकृष्णचि जाणे । उच्छिष्ट भक्तांचें काढणें । स्वामिपणें फुगों नेणे ॥ ९९ ॥ कृष्ण साचार देवाधिदेवो । फेडी भक्तांचा संदेहो । जैसा जयाचा भक्तिभावो । तैसा देवो तयासी ॥ १०० ॥ भक्तभावाच्या आवडी । धूत रणांगणीं घोडीं । भक्तभावाची निजगोडी । जाणे धडफुडी श्रीकृष्ण ॥ १ ॥ कृष्णचरणीं सत्य समता । सुरंग भावार्थ अक्षता । भीमकीये ठेवीं माथा । लाज सर्वथा न धरावी ॥ २ ॥ ऎकोनि हरिखेली वेल्हाळा । धन्य दशा झाली कपाळा । चरण वंदीन गोपाळा । भीमकबाळा उल्हासली ॥ ३ ॥ हरिखें नमूं पाहे गोरटी । तव पूर्वील सख्या वक्रदृष्टी । देखतां लाज आली पोटीं । भेद उठी शंकेचा ॥ ४ ॥ तेणें चुकविले समचरण । वृथा गेलें जी नमन । मायेसकट हांसती जन । येरी अभिमान धरियेला ॥ ५ ॥ थोर अभिमानली बाळी । धरी अंगुष्ठ करतळीं । नमन चुकों नेदी ये वेळीं । देखोनि वनमाळी हांसत ॥ ६ ॥ येरी मस्तक जंव लोटी । तंव समचर्णा पडली तुटी । अभिमानें केली फुटी । पाय ललाटीं न लागती ॥ ७ ॥ नमस्कारालागीं भलें । येरी मागुती अंगविलें । तंव समसाम्य पाउलें । कांहीं केल्या नातुडती ॥ ८ ॥ जितुकें अभिमानाचें बळ । तितुकें निजदृष्टिपडळ । तेणें चुकविलें चरणकमळ । वेगें वेल्हाळ गजबजली ॥ ९ ॥ वियोग न साहवे पोटीं । ऊर्ध्वश्वासें स्फुंदे गोरटी । चरण न लागती लल्लाटीं । कपाळ पिटीं निजकरीं ॥ ११० ॥ दु:खे म्हणतसे कटकटा । मर मर दुष्टा अदृष्टा । कृष्ण पावलिया गोष्टी फुकटा । चरण लल्लाटा न लागती ॥ ११ ॥ लोक म्हणती सकळ । धन्य भीमकीचें कपाळ । तें हें आजि झालें निर्फळ । श्रीकृष्णचरण नातळती ॥ १२ ॥ मनीं होती ऎसी आस । करूनि उटणियांचे मिस । कृष्ण नमीन सावकाश । तेंही उदास भाग्य जालें ॥ १३ ॥ चरण न पावेचि कपाळ । जीवीं लागली तळमळ । गात्रें जाताती विकळ । परम विव्हळ होतसे ॥ १४ ॥ चंडवाते जैसी कर्दळी । उलथों पाहे जी समूळीं । त्याहून अधिक भीमकबाळीं । गात्रें सकळीं कांपती ॥ १५ ॥ नेत्रीं अश्रूचिया धारा । अंग कांपतसे थरथरा । चरणवियोगें सुंदरा । शरीरभारा उबगला ॥ १६ ॥ गळती अलंकार भूषणें । करमुद्रिका आणि कंकणें । पडली अवशेषित प्राणें । सत्त्वगुणें मूर्च्छित ॥ १७ ॥ जीवनावेगळी मासोळी । तेवी तळमळी भीमकबाळी । उद्धव कळवळिला तये वेळीं । आनंदजळीं वर्षत ॥ १८ ॥ उद्धव म्हणे कृष्णनाथा । तुझी अवस्था शोधित चित्ता । विनोद करिसी भक्तहिता । चरणीं माथा ठेवूं दे ॥ १९ ॥ मग धांवोनियां लवलाहें । धरूनि भीमकीची बाहे । म्हणे उठीं उठीं वो माये । वंदीं पाय कृष्णाचे ॥ १२०॥ सांडीं सांडीं लज्जाभिमान । निर्विकल्प राखीं मन । वृत्ति करूनि सावधान । हरिचरण वंदावें ॥ २१ ॥ मग उद्धवाचे वचनीं । देत विश्वास रुक्मिणी । लाज सांडिली उपडोनी । हरिचरणीं निर्लज्ज ॥ २२ ॥ समचरणाचिये भेटी । सुटल्या अहंसोहं गांठी । उटूं विसरली गोरटी । घातली मिठी हरिचरणीं ॥ २३ ॥ वृत्तीसी जालें समाधान । खुंटला शब्द तुटलें मौन । भोगिताहे चैतन्यघन । समचरण वंदितां ॥ २४ ॥ उपरमली विषयदृष्टी । निजानंदें कोंदली सृष्टी । तेथें हरपली त्रिपुटी । उठाउठी निजलाभ ॥ २५ ॥ कृष्णचरणीं जडली कैसी । देह विदेह नाथवे तिसी । विसरली विवाहसोहळ्यासी । कृष्णसाम्येंसी समरस ॥ २६ ॥ नोवरा नोवरी नाठवे हेतू । आणवाहूनि गेला दृष्टांतू । अर्थ स्वार्थ आणि परमार्थू । झाला अनंतू अनंतीं ॥ २७ ॥ हरि म्हणे वेल्हाळ । दिसे देहभावीं विकळ । माय धाय करिती कोल्हाळ । सोयरे सकळ मिळोनी ॥ २८ ॥ ऎशा करतील पां गोष्टी । पायां लागलियासाठीं । जीवभावा पडली तुटी । वर जगजेठी वरूं नये ॥ २९ ॥ लौकिक परमार्थासी सळ । दोहीं पक्षीं पडेल विकळ । मजवरी रचिती किडाळ । नानाशब्द जाळ तर्काचे ॥ १३० ॥ ऎसी उफराटी विकडी । पडली देवांसी सांकडी । सावधान हे धडफुडी । केवीं तांतडी होईल ॥ ३१ ॥ भीमकी निजसुखा अंतरीं । वेगें प्रवेशला श्रीहरी । तोही विसरला सुंदरी । सावधान करावया ॥ ३२ ॥ देवो देवी झालीं एक । भेद फिटला नि:शंक लागली निजसुखटकमक । चेतवि देख कोण कोणा ॥ ३३ ॥ सहजीं सहजमेळीं । निजबोधें वनमाळी । स्वभावें भीमकबाळी । सावध करी सवेगें ॥ ३४ ॥ निजीं निजसुखावेगीं । न निवडे कवणें काळीं । करूनि अहंकाराची होळी । होय वेल्हाळी सावध ॥ ३५ ॥ तिसी देहावर जरी येणें । तरी मी देह ऎसें न म्हणे । अवघें आंगेंचि आंगवणें । पूर्णपणें रचिलीसे ॥ ३६ ॥ चराचर जें जें दिसे । तें तें अवघें मीच असें । जीव शिव झाले मदंशें । रितें न दिसे मजविण ॥ ३७ ॥ यापरी कृष्णरुक्मिणी । सावध झालीं ऎक्यपणीं । माया गेली निंबलोण करूनी । वोंवाळूनि सर्वस्वें ॥ ३८ ॥ ऎक्याचिया बहुल्यावरी । दोघें वोहरे साजिरीं । बैसलीं अभिनव प्रीतिकरीं । निजनिर्धारीं स्वलीला ॥ ३९ ॥ सरली नमस्काराची वारी । तंव श्रीकृष्णें केली चोरी । लिंगदेहाचे गांठीभीतरीं । डाव श्रीहरीं चोरिला ॥ १४० ॥ पालवा पालव बांधल्या साठी । चहूं देहांच्या सोडिल्या गांठी । पायां लागतां गोरटी । नेदी महाहटी हटवादी ॥ ४१ ॥ चैतन्य चोर हा निजदृष्टीं । सोडीत अभ्यंतरींच्या गांठीं । घेतले देऊं नेणे जगजेठी । व्यर्थ चावटी कां करावी ॥ ४२ ॥ आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आइती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण ॥ ४३ ॥ ओंकार आळां दृढमूळ । सहज वृक्ष तो सुनीळ । वाढिन्नला सकोमळ । अर्धमात्रापरियंत ॥ ४४ ॥ आगमनिगम तेचि पानें । वैराग्यमोहराचीं सुमनें । मोहरला कवणें मानें । श्रद्धाजीवें सपोष ॥ ४५ ॥ परिमळा लोधले साचार । रुंजी करिती मुमुक्षुभ्रमर । आमोदरस भाव सादर । झणत्कार सांडूनी ॥ ४६ ॥ स्वानंदवसंताचें रिघवणें । वृक्ष नित्य नवा तेणें गुणें । संतकोकिळचीं सुटलीं मौनें । टाहो करिती निजबोधे ॥ ४७ ॥ सकळ फळें फळल्यापाठी । आम्रवृक्ष फळे शेवटीं । रसास्वादाचिय खोटी । पोटींची आंठी सांडिलिया ॥ ४८ ॥ निजसेजे जो मुराला । तोचि सज्जनीं सेविला । बहु काय बोलों बोला । आंबा शिंपों आला श्रीकृष्ण ॥ ४९ ॥ तेथें केली नवलकुसरी । सन्मुख पाहतां नोवरा श्रीहरी । विन्मुख पाहतांचि नोवरी । मांडियेवरी बैसविली ॥ १५० ॥ शेंड्याहूनि समूळीं । अखंड एक धार लागली । आंबा शिंपी भीमकबाळी । चौघी वेल्हाळ तेथें गाती ॥ ५१ ॥ प्रकृती पुरुष दोघेंजणें । आंबा शिंपिती एकपणें । चूत विस्तारला अच्युतपणे । आंबा म्हणवणें जगाचा ॥ ५२ ॥ आंबा शिंपोनी गोरटी । कृष्णसहित वेगें उठी । हातींची रिती नव्हे वाटी । कृष्ण पूर्णदृष्टीं पाहातसे ॥ ५३ ॥ त्रिगुण गुणातीत जाण । तिसरे दिवशीं तेलवण । करूनि नोवरीसी अर्पण । वाणपालटण चतुर्थी ॥ ५४ ॥ श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचें वास संपूर्ण । स्थितिकाळासी देऊनि मान । लीला श्रीकृष्ण नेसला ॥ ५५ ॥ वाणपालटण नोवरीस । अक्षयाचे सपूर वास । नेसोनियां सावकाश । निजसुखेसी वर्तती ॥ ५६ ॥ वोहरें बैसवोनि वाडेंकोडें । समसाम्य वाहूनि साडे । ऎरणी विस्तारावया पुढें । शुद्धमती सावध ॥ ५७ ॥ व्याही गौरवितां कौतुक । कृष्णासमान मानी भीमक । सकळिकां देऊनि सुख । एकेंएक गौरविलें ॥ ५८ ॥ भीमकें मांडिलें विंदान । भवऎरणी संपादून । कृष्णासी वंशपात्रदान । विधीविधान वेदोक्त ॥ ५९ ॥ वंश विस्तारितां सुख । सोळा कळांचे सोळा कर्क । प्रकृतिस्वभाव सुपल्या देख । ज्ञानदीपें सोज्वळ ॥ १६० ॥ शुद्धमतीनें तत्त्वता । एका जनार्दन पाहतां । वंश ठेविला कृष्णसमर्था । जुनाट कथा परिसिजे ॥ ६१ ॥ पूर्वी पितामहाचा पिता । तयासी प्रसन्न सुभानु होता । तेणें भानुदासें वंश सरतां । केला तत्त्वता हरिचरणीं ॥ ६२ ॥ प्रल्हादाचे कृपेसाठीं । बळींचें द्वार राखी जगजेठी । तैसीच हेही आहे गोष्टी । कृपादृष्टी कृष्णाची ॥ ६३ ॥ सांगतां वंशपात्रदान । लागलें निजयशाचें अनुसंधान । आमुचे वंशी वरदान । परम भक्त कृष्णाचे ॥ ६४ ॥ मी जन्मलों धन्य वंशीं । म्हणोनि हरिभक्ति आम्हांसी । संत सोयरे निजमुखासी । वश कृष्णासी निरविला ॥ ६५ ॥ जें जें जयासी निरविलें । तेणें तें पाहिजे सांभाळिलें । आमुचें चाळकपण कृष्णासी आलें । कांसे लाविलें जनार्दन ॥ ६६ ॥ कथेसी झाली आडकथा । म्हणोनि न कोपावें श्रोतां । धेंडा नाचवील कृष्णनाथा । रसाळ कथा पुढें आहे ॥ ६७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे विवाहसंभ्रमो नाम षोडश: प्रसंग ॥ १६८ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सतरावा श्रीगणेशाय नम: । श्रोते म्हणती नवल । ऎकता याचे रसाळ बोल । अति अनुभव आणि सखोल । येताती डोल प्रेमाचे ॥ १॥ मग म्हणती कविपोषका । थोर मिळविलें सुखा । पार नाहीं आजिचिया हरिखा । कथा सांग कां नि:शंक ॥ २ ॥ महाप्रसाद जी आतां । म्हणॊनि चरणीं ठेविला माथा । कोणें नाचविलें कृष्णनाथा । नोवरी नाचविता कोण झाला ॥ ३ ॥ दोहीं पक्षींच्या दोघां जणां । कांस घालोनि आले रंगणा । सभा देखोनि दाविती खुणा । कळा नाचणीं दाविती ॥ ४॥ बोधें कृष्ण घेऊनि खांदी । नाचत ऎक्यतालें तिहीं छंदीं । चुकों नेदी समान बुद्धी । नाना छंदी नाचत ॥ ५ ॥ देहाभिमानें घेतली नोवरी । दावित नाना छंद कुसरी । द्वंद्वतालातें सांवरी । देतसे भोंवरी भवस्वर्गी ॥ ६ ॥ बोध नाचत घेऊनि कृष्ण । नोवरी घेऊनि देहाभिमान । आपुलाले पक्षीं जाण । दोघेजण नाचती ॥ ७ ॥ ओंवाळूनी श्रीकृष्णासी । अनंत मुद्रा याचकासी । देऊनि आभर केलें त्यांसी । मागों आणिकांसी विसरले ॥ ८ ॥ ओंवाळणी हातीं चढे । तों न पाहे आणिकांकडे । वानिती श्रीकृष्णाचे पवाडे । मागणें त्यापुढें खुंटलें ॥ ९ ॥ श्वेतपीत त्रिगुणवास । वोवाळूनि सावकाश । त्याग करिती कृष्णदास । अतिउल्हास सोहळियाचा ॥ १० ॥ ओंवाळणी नोवरीकडॆ । अमित विषयसुख पडे । घेतां अधिक तृष्णा वाढे । चहूंकडे ते मागती ॥ ११ ॥ न सुटती अभिलाषाच्या गाठी । सोडूनि देतां कांपती मुष्टी । मागुती लोलंगता दृष्टी । कवडीसाठीं झोंबती ॥ १२ ॥ त्यागितां जीर्ण देहाचें वास । दाते होती कासाविस । न सरे मागत्याची आस । त्यातें बहुवस वानिती ॥ १३ ॥ पाहतां अत्यंत जर्जर झालें । दिसे नवांठायीं तरकेलें । पाहिजे अविमुक्ती त्यागिलें । वायां गेलें दो दिसां ॥ १४ ॥ ऎकोनि त्यागाची भात । अधोमुख होय गृहस्थ । लोभ न संडी पोटाआंत । क्रोधें निंदित शिकविल्या ॥ १५ ॥ तुम्हीं कैसेनि त्याग केला । शिकवूं आलेती पुढिलांला । आम्ही नायकों तुमच्या बोला । म्हणोनि रुसला त्यागासी ॥ १६ ॥ त्याग नोहे नोवरीपक्षीं । देखोनि हांसिजे मुमुक्षीं । कृष्णवर्‍हाडी अतिदक्षी । त्याग विषयीं उद्भट ॥ १७ ॥ कृष्ण घेऊनि नाचतां । बोध शिणला तत्त्वतां । हळूच उतरूनि कृष्णनाथा । होय निघता लाजोनी ॥ १८ ॥ अभिमान पैं नोवरी । कांहीं केल्या न उतरी । पळे उठी पळे दूरी । लाज न धरी सभेची ॥ १९ ॥ त्यासी धरूं धांविन्नले एक । नोवरि घेऊनि पळे देख । कोंडूं जातां अधिकाधिक । ठकूनि लोक तो पळे ॥ २० ॥ त्यासी संतीं केली विधी । हळूचि आणिला सोहंबुद्धी । तेही सांडुनि त्रिशुद्धी । नोवरी संधी उतरली ॥ २१ ॥ तेथे झाली जी नवलपरी । भक्तिं प्रार्थिला मुरारी । नोवरी घेऊनि खांद्यावरी । रंगी श्रीहरी नाचावे ॥ २२ ॥ भक्तिभाव भुलला देवो । वचन नुल्लंघीच पाहा हो । नोवरी घेऊनि देवाधिदेवो । दावीं निर्वाहो नृत्याचा ॥ २३ ॥ निजीं निजरूपावरी । समसाम्य निजनोवरी । घेऊनियां खांद्यावरी । नृत्य करी स्वानंदें ॥ २४ ॥ पहिलेनि तालें जी तत्त्वतां । अकार हाणोनियां लातां । उकरमकारंचिया माथां । पाय पिटीता होय कृष्ण ॥ २५ ॥ उल्लाळ देत कवणे परी । वैकुंठ-कैलासांहूनि वरी । शून्य सोडूनियां दुरी । चिदंबरीं नाचत ॥ २६ ॥ नोवरी वाढवीं आपणावरी । आपण वाढें नोवरी । क्षणा तळीं क्षणा वरी । नानापरी नाचत ॥ २७ ॥ पहातां पहातां पडलें टक । नोवरी नोवरी झाली एक । जीव शिव हे सरली भाक । निजसुख स्वानंदें ॥ २८ ॥ कृष्णासी आठवलें देख । आम्ही दोघें होऊनि एक । नाचतां जीवसकळिक । जीवपणासी मुकतील ॥ २९ ॥ यालागीं काळाचिये स्थिती । नोवरी उतरी श्रीपती । जयजयकार कीजे भक्तिं । वोंवाळिती सर्वस्वें ॥ ३० ॥ धेंडा नाचविलियावरी । तळी आणिली बाहेरी । फळीं पुष्पीं अति साजिरी । ज्ञानदीपें सोज्वळ ॥ ३१ ॥ दिधली अनुभवाच्या हाता । वंदूनि झाला तो बोलता । वेगीं सांगा कुळदेवता । नाचविता मी होईन ॥ ३२ ॥ आधीं सांगा नोवरीकडे । नांवे एकों द्या निवाडे । ते नाचवीन वाडेंकोडें । वराकडे मग पुसों ॥ ३३ ॥ नोवरीकडील कुळदेवता । मायाराणी आणि ममता । कल्पनाकामाक्षी सर्वथा । माजघरी खेळतसे ॥ ३४ ॥ वासनादेवी सकळी । बाळा बगळा मुकी मैराळी । मारको मेसको कराळी । उच्छिष्ट चांडाळी भाणाची ॥ ३५ ॥ आशा तृष्णा दोघीजणी । आमुच्या कुळी मुळींहूनी । निंदादेवी महादारुणी । तिसी सज्जनी कांपिजे ॥ ३६ ॥ मोहमातंग आमुचे कुळी । लोभवेताळ त्याजवळी । क्रोध झोटिंग महाबळी । आधीं सळी शुभकार्या ॥ ३७ ॥ जें जें दैवत सांगे पैं गा । तें तें नातळत आणि रंगा । न ये त्या वाटा लावी वेगा । नाचवूनि उगा तो राहे ॥ ३८ ॥ कृष्णपक्षी अलौकिक । अवघें कुळदैवत एक । नाचतां अनुभव कौतुक । पडलें टक सकळिकां ॥ ३९ ॥ कृष्ण कुलदैवत एक । दुजें नाहीं नाहीं देख । एका जनार्दनीं सुख । अति संतोष नाचतां ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमतें रुक्मिणी स्वयंवरें धेंडानृत्यं नाम सप्तदश: प्रसंग: ॥ १७ ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग अठरावा श्रीगणेशाय नम: । हातीं दुधातुपाची वाटी । देवकी बैसवूनि पाटी । पुढें दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपी शुद्धमती ॥ १ ॥ धन्य धन्य तुमची कुशी । जेथें जन्मले ह्रषीकेशी । म्हणोनि लागली चरणांसी । रुक्मिणीसी निरवित ॥ २ ॥ चौघां पुत्रांहूनि आगळी । वाढविली हे वेल्हाळी । आतां दिधली तुम्हांजवळीं । कृष्णस्नेहें पाळावी ॥ ३ ॥ दोघीजणीं मातापितरीं । हातीं धरूनियां नोवरी । यादवांचे मांडीवरी । यथानुक्रमें बैसविली ॥ ४ ॥ गहिंवर न धरवे भीमकासी । प्रेम लोटलें तयासी । मिठी घालोनि कृष्णचरणांसी । उकसाबुकसी स्फुंदत ॥ ५ ॥ लाज सांडोनि शुद्धमती । पाया लागली श्रीपती । भीमकी देऊनियां हातीं । वैकुंठपती जोडिला ॥ ६ ॥ पाहाती नरनारी सकळा । आसवें आलीं त्यांचियां डोळां । खंतीं न भीमकबाळा । मायेकडे न पाहेचि ॥ ७ ॥ कृष्णीं लागलिया प्रीती । मायमाहेराची खंती । सर्वथा न करी चितीं । निजवृत्ती हरिचरणीं ॥ ८ ॥ वोहमायेसी कळवळ । पायां लागे वेळोवेळा । आसुवें पूर्ण आलीं डोळा । म्हणे प्रतिपाळा भीमकीसी ॥ ९ ॥ शुद्धमती म्हणेज रायासी । मज आंदण द्या भीमकीसी । होईन कृष्णाची निजदासी । चरण सेवेसी निरंतर ॥ १० ॥ राजा म्हणे शुद्धमती । जीवप्राण आणि संपत्ती । सर्वस्व अर्पिले श्रीपती । विकल्प चित्तीं न धरावा ॥ ११ ॥ भाव विश्वास दोघेजण । दिधले भीमकीसी आंद्ण । कृष्णसेवेलागीं जाण । अहर्निशी सादर ॥ १२ ॥ द्विपदा आणि चतुष्पदा । नाना रत्‍ने धातु अष्टधा । भीमकें आंदण गोविंदा । बहुत संपदा दीधली ॥ १३ ॥ वसुदेवादि उग्रसेन । भीमकासी करिती आमंत्रण । भोजनाचा आग्रह जाण । केला सन्मान सर्वांचा ॥ १४ ॥ भीमकें विनविलें कृष्णासी । विनंति आहे पायांपाशी । पुत्र झालिया भीमकीसी । निजपंक्तीसी शेष दीजे ॥ १५ ॥ चतुर्विधा सूत्रधारी । तुझी आज्ञा आमुचे शिरीं । भोजनाचा आग्रह न करीं । वचन श्रीहरी मानलें ॥ १६ ॥ वरात निघाली वेगेंसी । गृहप्रवेश द्वारकेसीं । आज्ञा दिधली भीमकासी । निजनगरासी तो निघे ॥ १७ ॥ दोघें वधूवरें गजस्कंधीं । भोंवतीं यादवांची मांदी । गीत नृत्य अतिविनोदीं । द्वारकेंमध्यें उत्सवो ॥ १८ ॥ मदगजगंधाचे पैं सडे । कुंकुम कस्तूरी चहूंकडे । मखरें श्रृंगारली पुढें । वाडेंकोडें झळकती ॥ १९ ॥ नगर श्रृंगारिलें कुसरी । गुढिया तोरणें घरोघरीं । कर्दळीस्तंभ रोविले द्वारीं । फळें त्यामाझारीं शोभती ॥ २० ॥ पूर्णकुंभ द्वारोद्वारीं । प्रदीप्त दीप ठेविले वरी । दधि-अक्षता-दुर्वांकुरीं । सुमनहारीं सुगंध ॥ २१ ॥ वोहरें पहावया कौतुक । नगरनागरिक लोक । मुडपघसणी होतसे देख । एकेंएक धांविन्नले ॥ २२ ॥ एक चढलीं माडिया गोपुरीं । पुष्पांजुळी देती नरनारी । देव वर्षती अंबरीं । जयजयकार प्रर्वतला ॥ २३ ॥ पाहता कृष्णस्वरूपासी । अराणुक नाहीं डोळीयांसी । यालागीं न येति दृश्यापाशीं । कृष्णसुखासी पकडले ॥ २४ ॥ पदोपदीं दीपावळीं । वोंवाळीती वनमाळी । बाप दैवाची नव्हाळी । भीमकबाळी अर्धांगी ॥ २५ ॥ वेश्या आणि संन्यासी । मुडपघसणी होतसे कैसी । कोप आला श्रीपादासी । दंडें वैश्येसी ठोकिलें ॥ २६ ॥ येरी विसरली देहासी । वृत्ति लोभली कृष्णस्वरूपासीं । रागें लाता हाणोनि तिसी । म्हणे विटाळ आम्हासी कां केला ॥ २७ ॥ येरि हांसोनि कपाळ पिटी । अजुनी क्रोध न सोडी पाठी । विटंबिली दंड कांसोटी । आत्मदृष्टी तुम्हां नाहीं ॥ २८ ॥ मी उत्तम पैल हीन । विषमभेदाचें अज्ञान । सर्वांभूतीं समसमान । निजात्मज्ञान तुम्हा नाहीं ॥ २९ ॥ नाहीं निजशांती रोकडी । तंव कां केली तडातोडी । भगवीं नाशिलीं लुगडीं । उपाधि गाढी श्रीपादा ॥ ३० ॥ शेंडी सांडिली उपडोनी । वासना वाढविली चौगुणीं । श्रीकृष्ण देखिलिया नयनीं । विटाळ मानी तो निजांध ॥ ३१ ॥ ऎसा करितां वाग्वाद । तंव दुरी अंतरला गोविंद । आड ठाकला जनसंबंध । न दिसे मुकुंद सर्वथा ॥ ३२ ॥ वोहरे आली महाद्वारा । लोण उतरिती सुंदरा । मूद वोवाळी सुभद्रा । कृष्ण पुढारां चालिला ॥ ३३ ॥ पूर्ण कलशेंसीं आल्या दासी । अनंत वाणें परिवस्त्रेंसी । ते ते मेचू देऊनि त्यांसी । नानाविधेंसीं अलंकार ॥ ३४ ॥ शोभा आली भाणववासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । साच मानलें जनांसी । तिणें सकळांसी भुलविलें ॥ ३५ ॥ येतां देखोनि कृष्णनाथा । लक्ष्मी लाजली तत्त्वता । सांडूनियां कृत्रिमता । निजस्वरूपता प्रगटली ॥ ३६ ॥ भीमकीया देखिलें लक्ष्मीसी । विस्मय वाटला तियेसी । विचारितां निजमानसीं । दोहीं रूपेंसीं आपणचि ॥ ३७ ॥ विधि गृहप्रवेशासी । वोहरें बैसविली भाणवसासी । करविती लक्ष्मीपूजनासी ॥ विधिवेदेंसी द्विजवर ॥ ३८ ॥ परमामृतें भरूनि वाटी । देवकी लावी सुनेच्या वोठीं । पुसे वृद्धाचारगोष्टी । सुनें घालीसी पोटीं निजमाये ॥ ३९ ॥ येरीं म्हणे परमानंदें धाल्यें । कृष्णसुखे नित्य निवाल्यें । तुमचे सेवेसी पावल्यें । प्राप्त झाल्यें हरिचरणा ॥ ४० ॥ रेवती येऊनि भीमकीपाशीं । वेगीं निरवी भाणवसासी । हातीं धरूनि नोवरीसी । काय तियेसी सांगत ॥ ४१ ॥ वरूनि आलीसी कृष्णानाथा । तरी हे सर्व तुझे माथां । देणेंघेणें कार्यचिता । कर्तव्यता तुज आली ॥ ४२ ॥ येथींची ऎसी आहे रिती । सुचित्त राखावी चित्तवृत्ती । सकल मानावी कृष्णस्थिती । जेणें श्रीपती संतोषे ॥ ४३ ॥ जे कां खरकटलें पाळें । अत्यंत गोंगाणी गोंगाइलें । तें भाणवसाबाहेर पाहिजे केलें । नेऊन घातलें वोंवळ्यांत ॥ ४४ ॥ जेंकां उठंडळ डळमळी । अत्यंत झणत्कारें गडबडीं । आश्रमआळां ठेविं रोकडी । वेळणी तोंडीं विधीची ॥ ४५ ॥ जें कां कांठफरा उललें । देखसी ज्याचें बुड भंगलें । ते न पाहिजे हालविलें । असो संचरले निजआळां ॥ ४६ ॥ तपें तापली तुपाची । स्वर्गसिंका बैसका त्याची । सामुग्री वेंचिल्या तेथींची । मग उलंडूनि सांडिती ॥ ४७ ॥ कामक्रोधाचे उंदीर । कोरूनि टोलर करिती अपार । त्यांच्या मुखीं घालूनि पाथर । येतें द्वार बुजवावें ॥ ४८ ॥ लाविल्या लोण नलगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी । ते तंव नाणावे पंक्तीसी । चवी त्यांसी पैं नाहीं ॥ ४९ ॥ सगळे शिजविता अवघड । काकड करिती कडकड । समजावें भरडीं दृढ । होतील गोड परिपाकें ॥ ५० ॥ कणिक चाळावी असकट । पाखडूनि सांडावें कसपट । होईल परिपाक चोखट । पूर्णपुरिया सिद्धलाडू ॥ ५१ ॥ कृष्णभाणवसा त्रिशुद्धी । अष्टमहासिद्धी नवनिधी । तेथें तुवां वागावें सोहंबुद्धी । जीवउपाधी सांडूनी ॥ ५२ ॥ सासु सासरे भावे दीर । आदिकरून लहान थोर । होऊनि अवघ्यासी सादर । अति तत्पर सेवेसी ॥ ५३ ॥ वडील जाऊ आपण । भीमकीकरीं निजकांकण । घालूनि करी निरवण । पाणिग्रहण भाणवसा ॥ ५४ ॥ धाकटे जावेसी प्रीतिकर । नवविध नवरत्‍नांचा हार । कंठीं घातला मनोहर । येरीं नमस्कार तिसी केला ॥ ५५ ॥ बाई जें जें तुम्ही शिकविलें । तें तें मज हितासी आलें । रेवति हरिखेली येणें बोलें । आलिंगिलें भीमकीसी ॥ ५६ ॥ एवं द्वारकेमाझारीं । परमानंद घरोघरीं । देव वर्षती कुसुमें अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥ ५७ ॥ यापरी गृहप्रवेश । करूनियां हृषीकेश । रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ॥ ५८ ॥ शुक म्हणे परीक्षिती । गृहस्थ जाला श्रीपती । भीमकीहरणाची ख्याती । तुजप्रती सांगितली ॥ ५९ ॥ एवं हरण पाणिग्रहण । तुज केलें गा श्रवण । ज्याचेनि श्रवणें जाण । दोष दारुण नासती ॥ ६० ॥ ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण । कळसा आलें निरूपण । प्रेम सज्जन जाणती ॥ ६१ ॥ रुक्मिणीहरणवार्ता । जुनाट होय सर्वथा । परी पाणिग्रहण व्यवस्था । नवी कथा कवित्वाची ॥ ६२ ॥ ऎसा विकल्प मानाल झणीं । जें बोलिले श्रीव्यासमुनी । तोचि अर्थ विस्तारूनी । प्रगट केला प्राकृतें ॥ ६३ ॥ यथाविधि पाणिग्रहण । मुळीं आहे व्यासवचन । तें सूत्रपाय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलों ॥ ६४ ॥ साच न मानी ज्याचें चित्त । तेणें पाहावें श्रीभागवत । तेथील श्लोकीच श्लोकार्थ । ऎसाचि असे सर्वथा ॥ ६५ ॥ राजे जिणोनि दारुण । भीमकी आणोनी आपण । कृष्णें केलें पाणिग्रहण । हें निरूपण मुळींचें ॥ ६६ ॥ येणेंचि पदें पदविस्तारीं । कथा चालिली पुढारी । खोडी ना ठवावी चतुरीं । ग्रंथ निर्धारीं न पाहतां ॥ ६७ ॥ जैसें वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय । तैसीच हे कथा होय । थोडेनि बहू विस्तार ॥ ६८ ॥ मूळ सांडूनि सर्वथा । नाहीं वाढविलें ग्रंथा । पाहातां मूळींच्या पदार्था । अर्थकथा चालिली ॥ ६९ ॥ नाहीं ग्रंथारंभसंकल्प । नव्हता श्रोतयांचा आक्षेप । ग्रंथीं उजळला कृष्णदीप । सुखरूप हरिकथा ॥ ७० ॥ जेणे हा ग्रंथ करविला । तो आरंभींच उपरमला । पुढें ग्रंथ कैसा चालिला । बोलतां बोला न बोलवें ॥ ७१ ॥ नेणों काय कृष्णनाथा । हे आवडली ग्रंथकथा । तोचि होऊनि श्रोता वक्ता । अर्थ परमार्था आणिला ॥ ७२ ॥ ये ग्रंथींचें निरूपण । जीवशीवां होतसे लग्न । अर्थ पाहतां सावधान । समाधान सात्त्विकां ॥ ७३ ॥ येथें विवेकी व्हावा वक्ता । समाधान पाहिजे श्रोता । त्याचेनि संवादे हरिकथा । सुख समस्तां होईल ॥ ७४ ॥ होऊनि अनुभवकसवटी । कथा चालिली मर्‍हाठी । वोवी न चले फुकासाठीं । श्रद्धा पोटीं धरिलिया ॥ ७५ ॥ हे कृष्णकथा अलोलिक । महादोषांसी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ॥ ७६ ॥ हे मुमुक्षीची कुलदेवता । मुक्तांची करी नित्य मुक्तता । येरां संसारियां सर्वथा । नवरसें निववीत ॥ ७७ ॥ जरी कोणी स्वभावें पुढें । उघडती कानींचीं कवाडें । अर्थ ऎकतां निवाडें । पुढें पुढें अतिगोड ॥ ७८ ॥ गोडपणें पडल्या मिठी । सुटती जीवशिवांच्या गांठी । कृष्णकथा हे गोमटी । उठाउठी विजलाभू ॥ ७९ ॥ येथें भीमकीचे पुरले आर्त । तो हा आदरें वाचितां ग्रंथ । श्रोतयांचे मनोरथ । कृष्ण समर्थ पुरवील ॥ ८० ॥ माझे पुरवाया मनोरथ । तों मनचि झाले कृष्णनाथ । एका जनार्दनीं नित्य तृप्त । परंगत हरिचरणीं ॥ ८१ ॥ एका जनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण । सहज खुंटलें निरुपण । महामौन कथेचें ॥ ८२ ॥ मुखीं जनार्दनचि वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता । जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ॥ ८३ ॥ एका एकजनार्दनीं । जनार्दनचि एकपणीं । निर्मळ जान्हवीचें पाणी । मनकर्णिका अतितीर्थ ॥ ८४॥ वाराणसी महापुरीं । मनकर्णिकेच्या तीरीं । रामजयंतीमाझारीं । ग्रंथ निर्धारीं संपविला ॥ ८५ ॥ शके चवदाशे त्र्याणव । प्रजापति संवत्सराचे नांव । चैत्रमासाचें वैभव । पर्व अभिनव रामनवमी ॥ ८६ ॥ ते दिवशीं सार्थक अर्थी । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ती । एका जनार्दन कृपास्थिती । ग्रंथ वाराणसीप्रति संपविला ॥ ८७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणि स्वयंवरे एकाकारटीकायां अष्टादश: प्रसंग: ॥१८॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ संपूर्ण ग्रंथसंख्या १७०८. ॥ समाप्तोऽयं ग्रन्थ: ॥

Search

Search here.