संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 1

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-06-30 13:53:08
संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेख प्रथम 30 जून 2016 लेखक अभ्यासक - श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित - वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा - सुभाषितांचा अर्थासह उहापोह करणार आहोत .. आपल्या लेखमालेतील प्रथम सुप्रसिद्ध वाक्य आहे -- " कालाय तस्मै नमः " अनेकवेळा सर्रास वापरले जाणारे हे वचन पूर्ण नसून एका सुभाषित वाक्याचा एक छोटा भाग आहे .. व्यवहारात अनेक ठिकाणी अनेक वेळा फक्त एवढेच वाक्य बोलले जाते , परंतु याचा पूर्ण भाग खालील प्रमाणे -- सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामंत चक्रं च तत् | पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताश्चन्द्रबिम्बाननाः  || उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस् ते बन्दिनस्ता कथाः  | सर्वं यस्य वशादगात् स्मृतिपथं *कालाय तस्मै नमः*  || अर्थ  ---->  अत्यंत रम्य अशा नगरीचा महान असा राजा , त्याचे विद्वान मंत्रीमंडळ , त्याच्या सुंदर - शालीन राजयुवत्या ( राणी राजकन्या इत्यादी ) , तेथील वीर उत्साही राजपुत्र , हे सर्व वैभवासह ज्या काळामुळे नष्ट झाले त्या सर्वश्रेष्ठ काळाला माझा नमस्कार असो .. भर्तृहरीच्या नितिशतकातील हे वाक्य .. याच वाक्याचा एक भाग असणारे  " कालाय तस्मै नमः "  हे मात्र काळाच्या ओघात प्रसिद्ध झाले व नेहमी अनेक ठिकाणी अनेक वेळा वापरले जाते पण मूळ पूर्ण वाक्य मात्र त्याच काळाच्या ओघात विस्मृतीत गेले .. अशा या सर्व शक्तिमान काळाला व श्रेष्ठ भर्तृहरीला सुद्धा नमस्कार करून मी सुद्धा काही काला करीता रजा घेतो .. शुभम् भवन्तु ... लेखक - © श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा ज्योतिष आचार्य अभ्यासक व संशोधक -- प्राचीन वैदिक ज्ञान व इतिहास

Search

Search here.