सत्याम्बा व्रत व कथा

व्रत - पूजा - कथा Posted at 2019-02-17 15:46:41

श्रीसत्याम्बादेवी व्रत

आपल्या हिंदू धर्मात विविध कारणांसाठी वेगवेगळी व्रतवैकल्ये सांगितलेली आहेत. ही व्रतवैकल्ये शुद्ध मनाने, पूर्ण श्रद्धेने व विधिपूर्वक केल्यास त्यांचे अपेक्षित फल मिळाल्याशिवाय रहात नाही. श्रीसत्याम्बादेवीचे व्रतही या प्रकारे केल्यास व्रतकर्त्याचे सर्व मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊन त्याची प्राप्‍त संकटापासून मुक्‍तता होते व त्यास सुख, समाधान व आनंद यांची निश्चित प्राप्‍ती होते असा अनेक व्रतकर्त्यांचा रोकडा अनुभव आहे. श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या 'देवी भागवत' पुराणात हिच्या पराक्रमाचे वर्णन वाचावयास मिळते. ईशशक्‍ती ही निर्गुण निराकार असली तरी भक्‍तांवरील प्रेमाखातर तिला सगुण रुपात साकार व्हावे लागते व आपल्या भक्‍तांना दर्शन देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे लागतात. ही शक्‍ती सगुण रुपात साकार झाल्यानंतर तिच्या प्रसन्नतेसाठी तिचे भक्‍त तिला सहस्त्रावधि नावे देऊन आपले तिच्याविषयीचे प्रेम प्रकट करीत असतात. श्रीदुर्गादेवी म्हणजेच श्रीसत्याम्बा, हिलाही अनंत नामे आहेत, तिची अनंत रुपे आहेत. तिचे गुणही अनंत आहेत. ही देवी दुर्गा, चामुण्डा, वाराही, लक्ष्मी, विमला, बहुला, नित्या, वनदुर्गा, मातंगी, कालरात्री, कुमारी, शिवदूती, मधुकैटभन्त्री, सावित्री, परमेश्वरी, कात्यायनी, ब्रह्मवादिनी अशा विविध नावांनी ओळखली व आळवली जाते. 'श्रीसत्याम्बा' मधील 'सत्य' शब्द हा ब्रह्मवाचक आहे. 'जे सतत असते तेच सत्य !' ईशशक्‍ती शिवाय दुसरे काहीच सत्य नाही. तर अम्बा याचा अर्थ आई किंवा माता. देवी जगन्माता आहे. कारण तिच्या पासूनच अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ति आहे. अशाप्रकारे 'सत्याम्बा' हा शब्द निर्माण झाला. हीच श्रीसत्याम्बा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वति असून वेगवेगळ्या कार्यासाठी तिने ही विविध रुपे धारण केलेली आहेत. हिचे स्मरण आणि पूजन अत्यंत पुण्यप्रद असून साधकांचे सर्व मनोरथ त्वरित पूर्ण करणारे असल्याने हिचे व्रत नियमाने करणे मनुष्यमात्राच्या हिताचे आहे. * व्रत कसे करावे ? * श्रीसत्याम्बा व्रताचा विधि अतिशय सोपा आहे. हा व्रतविधी सूर्य संक्रांतीच्या दिवशी, म्हणजेच सूर्य ज्या दिवशी नव्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी किंवा अष्‍टमी पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी करावा. परंतु मन प्रसन्न असेल अशा अन्य दिवशीही करण्यास हरकत नाही. त्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे उरकावे व कायावाचा मनाने देवीचे स्मरण व पूजन करावे. व्रताचे फल त्वरित मिळण्यासाठी व्रतकर्त्याने शास्त्रात सांगितलेल्या यम-नियमांचे पालन करणे मात्र फार आवश्यक आहे. कारण त्यायोगेच मन शुद्ध होऊन त्या ईशशक्‍तीशी मनाने संबंध जोडणे लवकर साधते व त्या शक्‍तीची कृपाही त्वरित होते. * पूजेचे साहित्य * या व्रतासाठी प्रथम केळीचे खांब, आंब्याची पाने, कलश, देवीची सुवर्णाची (वा अन्य धातूची) प्रतिमा. चौरंग, गहू किंवा तांदूळ, विडयाची पाने, सुपार्‍या, खोबर्‍याची वाटी, बदाम, खारका, वस्त्र, उपवस्त्र, नारळ, हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, कापूर, उदबत्ती, फुले, बेल, दुर्वा, पंचामृत, सुगंधी तेल आणि दक्षिणा इ. सामुग्री जमवावी. * प्रसाद व महानैवेद्य * त्याचप्रमाणे प्रसाद व महानैवेद्यही तयार करावा. प्रसादासाठी खवा, तूप, साखर, रवा, केशर, बदाम, खिसमिस, वेलदोडे याची आवश्यकता असून प्रसादाचे साहित्य दिडीच्या प्रमाणात असावे. महानैवेद्यात भात, भाज्या, कोशिंबिरी तसेच मुख्य खीर असावी. दुसर्‍या नैवेद्यासाठी केशरमिश्रित रव्याचे लाडू करावेत. (हा नैवेद्य अर्थातच सोवळ्यात तयार करावा.) हा व्रतविधी संध्याकाळी करावयाचा असून त्यासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी थोडावेळ अगोदर पतिपत्‍नींनी स्नान करून शुचिर्भूत व्हावे व पवित्र महावस्त्र नेसून शुद्ध केलेल्या आसनावर प्रसन्न चित्ताने विराजमान व्हावे. नंतर मंडप तोरणांनी सुशोभित केलेल्या चौरंगावरील श्रीसत्याम्बेच्या सुवर्ण अथवा अन्य धातूच्या प्रतिमेची पूजा करावी. प्रथम आचमन, प्राणायाम करुन व देशकालाचे स्मरण करुन संकल्पाचा उच्चार करावा. हा संकल्प पुढीलप्रमाणे उच्चारावा- 'ममात्मनः श्रुतिस्मृति पुरोणोक्‍त फलप्राप्‍तर्थ्य मम सहकुटुम्बस्य क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभ्युदयार्थं मनोप्सितकामनासिद्धयर्थं (येथे कामनेचा उच्चार करावा.) श्रीसत्यांबाव्रतांगत्वेन यथासंपादितसामग्रया श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वतीस्वरुपि श्रीसत्यांम्बामहादेवीपूजनं करिष्ये' । त्यानंतर सर्व व्रतकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महागणपतीचे आवाहन करुन पूजन करावे. यांनतर पूजा विधी पुढे अतिशय सोप्या संस्कृत भाषेत दिला आहे. त्याप्रमाणे करावा व शेवटी कथा वाचन करुन आरती करावी. तसेच प्रसाद व महानैवेद्याचा प्रसाद देवीला दाखवावा. हे व्रत करणार्‍या यजमानाने व त्याच्या पत्‍नीने संपूर्ण दिवस उपवास करावा व रात्री आरती नंतर ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देऊन आप्तजन व ब्राह्मण यांचेसह आनंदाने भोजन करावे. रात्रौ झोपण्यापूर्वी श्रीसत्याम्बा देवीचे अत्यंत श्रद्धायुक्‍त व शुद्ध अंतःकरणाने स्मरण करावे. या व्रताचे माहात्म्य स्वयं भगवान् शंकरांनी आपला पुत्र कार्तिकेय उर्फ षडानन यास सांगितले असून ते म्हणतात की, हे सत्याम्बाव्रत मनुष्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करणारे असून कलियुगात खरोखरच महान् फल देणारे आहे. या व्रताच्याच योगे प्रत्यक्ष शंकरही प्राप्‍त संकटातून मुक्‍त झाले. तसेच त्यांचा पुत्र षडानन यालाही असुरांबरोबरच्या युद्धात मोठा विजय प्राप्‍त झाला ! तसेच फार वर्षापूर्वी कांचीपुरात कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण रहात होता. तो अत्यंत दरिद्री असल्याने त्याची पत्‍नी त्यास नेहमी टाकून बोलत असे. त्यायोगे जीवनास कंटाळून तो ब्राह्मण जीव देण्यासाठी विहिरीपाशी गेला. परंतु पूर्वपुण्याईच्या योगे त्याचवेळी देवी सत्याम्बा तेथे प्रकट झाली व तिने त्यास आत्महत्त्येपासून परावृत्त करुन सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे श्रीसत्याम्बा व्रत करण्याचा उपदेश केला. त्या ब्राह्मणानेही तिच्या शब्दावर विश्वास ठेवून हे प्रभावी व्रत केले व त्यायोगे त्यास विपुल धनाची प्राप्‍ती होऊन त्याचा संसार सुखाचा झाला. मागध देशाचा राजा सूर्यकेतू याच्यावर मालवराजा चाल करुन आला. त्यामुळे सूर्यकेतू अतिशय चिंताक्रांत झाला. परंतु त्याच्या गुरुने त्यास सत्याम्बाव्रत करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे राजाने हे व्रत केले व त्यायोगे मालवराजाचा पराभव होऊन तो सूर्यकेतूस शरण आला. या सूर्यकेतूच्याच राज्यात गुण्ड नावाचा एक शूद्र रहात होता, त्यास संतति नव्हती. तेव्हा त्यानेही सूर्यकेतूकडून या व्रताची माहिती मिळविली व ते व्रत सुरु केले. त्यायोगे त्यासही पुत्र झाला. परंतु पुढे व्रताचे विस्मरण झाल्यामुळे त्याच्यावर अनेक संकटे आली. तथापि योगायोगाने त्यास पुन्हा या व्रताचे स्मरण झाले व त्याची सर्व दुःखे नष्‍ट झाली व तो सुखासमाधानाने राहू लागला. या व्रताचे माहात्म्य वर्णन करताना श्रीसूत शौनकादी ऋषींना सांगतात की, 'हे सत्याम्बाव्रत या लोकी मोठमोठ्या संकटांचा नाश करणारे असून पुत्र आणि धन देणारे आहे. तसेच हे व्रत करणार्‍या मनुष्यास अंती मुक्‍ती मिळून तो सत्याम्बा लोकात जाऊन तेथे हजारो वर्षे आनंदाने कालक्रमणा करतो.' या व्रताचे माहात्म्य असे आहे की या व्रताची नुसती कथा श्रवण करण्यानेही व्रत केल्याचे फल मनुष्याला प्राप्‍त होते . **************************************************************** सत्याम्बा व्रतकथा अध्याय १ नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥ श्रीव्यास म्हणतात - एके काळी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषि कथा ऐकण्याविषयीं उत्सुक होऊन अतिशय पुरातन असा जो 'सूत' त्यास विचारु लागले ॥१॥ अहो, वक्‍त्यांमध्ये श्रेष्‍ठ,महाबुद्धिमान सूत महर्षे, तुमच्या वाणीरुपी प्रवाहाच्या योगे आमचे आयुष्य निश्चयेकरुन सफल झाले आहे. ॥२॥ म्हणून आम्ही आता तुमची प्रार्थना करितो की, कोणत्या व्रताने अथवा तपाने इच्छिलेले फळ प्राप्‍त होईल, तें आम्हास कथन करा ॥३॥ अहो सूत, कृपा करुन आता कलीमध्ये लवकर फल देणारे असे जे व्रत अथवा तप असेल, त्याचे सार काढून ते आम्हांस सांगा ॥४॥ सूत म्हणतात - हे ऋषींनो, उत्तम असे सत्याम्बाव्रत ऐका. नद्यांमध्ये ज्याप्रमाणे गंगा अथवा मनुष्यांमध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण, ॥५॥ त्याप्रमाणे व्रतसमुदायांत उत्तम असे सत्याम्बाव्रत आहे. पूर्वी संकटाचे वेळी कार्तिकेय स्वामीने शंकरास असाच प्रश्न केला होता. ॥६॥ देव व दैत्य ह्यांच्या युद्धामध्ये मोठे संकट प्राप्‍त झाले असता अत्यंत व्याकूळ होऊन (कार्तिकेय स्वामीने) आपल्या पित्यास-शंकरास विचारिलें.॥ ७॥ षडानन म्हणतात - हे भक्तावर दया करणार्‍या कृपासागरा महादेवा, अत्यंत कठीण अशा या संकटापासून माझे रक्षण करा. ॥८॥ ह्या बालकावर दया करुन (अतिशय) त्वरित फल देणारे असे एखादे व्रत (मला) सांगा.श्रीशिव म्हणतात - हे मुला, शीघ्र फल देणारे असे व्रत मी सांगतो, ते एकाग्र चित्ताने ऐक ॥९॥ पूर्वी त्रिपुरासुराच्या वधाचे वेळी मजवर असेच संकट आले होते. ज्यांचे पुण्य थोडे आहे असे दुर्दैवी लोक पाहून ॥१०॥ तसेच अति दुःखामुळे पीडलेले, अल्पायुषी, नीच कुळात उत्पन्न झालेले असे लोक पाहून मी अगदी व्याकुळ झालो होतो. तेव्हा आकाशवाणी झाली.॥११॥ आकाशवाणी म्हणाली - हे शंभो, माझे भाषण ऐक, म्हणजे तू संकटापासून मुक्‍त होशील. सत्यांबेच्या कृपेने तुझे कल्याण होईल. ॥१२॥ असे मी तेथे ऐकून ते उत्तम सत्यांबाव्रत मनाने-ध्यान करुन सर्व काही जाणले व त्याप्रमाणे ते व्रत केले.॥१३॥ तेच मी तुला सांगतो, तू एकाग्र चित्ताने ऐक. ती सत्यांबा देवी सूर्यसंक्रांतीचे दिवशी पुजावी. ॥१४॥ अथवा अष्‍टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार हया दिवशी, अथवा ज्या दिवशी मनात उल्हास येईल त्या दिवशी प्रदोष काळी तिचे पूजन करावे. ॥१५॥ स्वस्तिवाचन पूर्वक गणेश व वरुण ह्यांची पूजा करुन आणि पीठपूजा करुन यथासांग देवीची स्थापना करावी. ॥१६॥ मोठ्या भक्‍तीने ब्राह्मण, बंधु, इष्‍टमित्र वगैरे सह गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप आणि दुर्वा यांच्या सहाय्याने देवीची पूजा करावी. ॥१७॥ भक्‍तीने नैवेद्य अर्पण करावा. शुद्ध अग्नीवर आटविलेले दूध, खवा, तूप, साखर, ॥१८॥ चांगल्या गव्हाचे पीठ (रवा), ही सर्व प्रत्येकी दीड शेर घेऊन ती एकत्र करुन त्यात थोडे केशर घालून उत्तम प्रकारचे लाडू करावे. (हा एक नैवेद्य प्रसाद करावा.) ॥१९॥ (आणि दुसरा नैवेद्य) साखर घालून खीर करावी. याप्रमाणे दोन पदार्थांचा नैवेद्य देवीस अर्पण करावा आणि सत्यांबेविषयी भक्ति धरुन मित्र व आप्त ह्यासह ॥२०॥ कथा श्रवण करुन ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. आणि यंत्राची, सोन्याची अगर रुप्याची प्रतिमा करुन तिची पूजा करावी. ॥२१॥ सर्वांस प्रसाद देऊन स्वतःही घ्यावा. नंतर आप्तजन व ब्राह्मण हयास भोजन द्यावे व आपणही भोजन करावे ॥२२॥ गाणे, नाचणे, (गीत नृत्य) वगैरे करवून नेहमी सत्यांबादेवीचे स्मरण करावे; नंतर देवीचे मंदिरात पूजा केली असेल तर ते मंदिर सोडून घरी जावे.॥२३॥ शंकर म्हणतात, 'हे षडानना, हे सत्यांबाव्रत त्वरित इच्छा पुरविणारे आहे. मुला, कलियुगात महत् (मोठे) फळ देणारा हा लहानसा उपाय आहे.॥२४॥ ज्या दिवशी व्रत करण्याविषयी मनुष्य संकल्प करील, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपोषण करुन त्याने एकाग्रचित्त व्हावे, आणि कायावाचामनेकरुन श्रीसत्यांबादेवीच्या भक्‍तीविषयीं तत्पर असावे. ॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्याम्बाव्रतकथायां प्रथमोऽध्यायः ॥१॥ ************************************************************** सत्याम्बा व्रतकथा अध्याय २ सूत म्हणतात, 'हे ब्राह्मणांनो पूर्वी हे सत्यांबाव्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो, तुम्ही भक्‍तियुक्‍त अंतःकरणाने ते ऐका ॥१॥ पूर्वी कांचीपुरातील एक अगदी गरीब व भुकेने पीडलेला असा ब्राह्मण नित्य पृथ्वीवर (भिक्षेकरिता) फिरत असे. ॥२॥ एकदा तो घराबाहेर पडून भिक्षेकरिता पृथ्वीवर फिरु लागला. सकाळपासून मध्यान्हापर्यंत फिरला तरी त्यास काही मिळाले नाही. ॥३॥ त्यामुळे तो खिन्न होऊन परत आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या पत्‍नीने दुरुनच धिक्कारयुक्‍त मुद्रेने त्याजकडे पाहिले ॥४॥ आणि म्हणाली 'अरे मूर्खा, आज संक्रांतीचा दिवस आहे हे तुला माहित नाही काय ? मी काय करावे ? असले सौभाग्य नसले तरी चालेल ॥५॥ माझ्या बापाने जातक वगैरे चांगले विधिपूर्वक पाहिले नाही ! जा, जा ! पुन्हा पुन्हा निर्लज्जासारखा कशाला येतोस ? ॥६॥ जिकडे तुला अन्न (भिक्षा) मिळेल तिकडे तू खुशाल जा.' असे तिचे भाषण ऐकून तो ब्राह्मण घराबाहेर पडला ॥७॥ गावापासून चार कोस तो गेला. तिथे एक विहीर पाहून (तेथे) तो विचार करु लागला की, ॥८॥ ही विहीर फार मोठी आहे व हिच्यात पाणीही खूप आहे. तर आपण प्रयत्‍न करुन हिच्यांत खरोखर जीव द्यावा ॥९॥ मी जिवंत राहून काय उपयोग अथवा फायदा आहे ? स्वतःच्या स्त्रीने देखील धिक्कार केला, त्या अर्थी मी आता जीव देतो. ॥१०॥ असा निश्चय करुन त्या ब्राह्मणाने मोठया प्रयत्‍नाने एक मोठा दगड आणून तो वस्त्रात बांधून ते वस्त्र आपल्या कमरेस बांधिले ॥११॥ तो उडी टाकणार इतक्यात त्याच्या मागे श्रीसत्यांबा देवी येऊन म्हणाली, 'अरे मुला, तू हे काय करितोस ? तू का दुःखित झालास ? ॥१२॥ दुःखाचा नाश होण्यास उपाय आहे ( तेव्हा) विचार करुन धैर्य धर." असे आपल्या पाठीमागे झालेले भाषण ऐकून तो मागे पाहू लागला. ॥१३॥ पूर्ण विद्युल्लतेप्रमाणे दैदीप्यमान व श्यामवर्ण, वस्त्र व अलंकार ह्यांनी युक्‍त अशी देवी पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला. ॥१४॥ आणि म्हणाला- हे महामाये, योग्यांच्या अधिदेवते, देवी, तुला नमस्कार असो. तू सर्व काही जाणत आहेस तर मला निश्चित असा उपाय सांग. ॥१५॥ देवी म्हणाली, 'माझे भाषण ऐक व त्याप्रमाणे यथाविधि व्रत कर. सत्येचे आराधन केले असता पृथ्वीवर दुर्लभ असे फळ तुला मिळेल. ॥१६॥ आणि तुझे दुःख तत्काळ नाहीसे होईल. व पुत्र, नातु, धन इत्यादि प्राप्त होईल. कौंडिन्य म्हणाला, 'हे व्रत जर फलदायक आहे तर त्याचा निश्चित विधि सांगा.' ॥१७॥ त्याचे भाषण ऐकून मोठया आनंदाने देवीने त्यास विधि सांगितला व त्याच्याकडे कृपादृष्‍टीने पाहून नंतर ती गुप्त झाली ॥१८॥ त्यानें चोहोकडे नजर फेकली. त्यास (कोणी न दिसल्याने) वाटेल की, श्रीदेवीच हे इतके स्वतः बोलली. ॥१९॥ म्हणून मी आता हे व्रत करीन; म्हणजे खात्रीने माझे दुःख नाहीसे होईल. असा विचार करुन तो घराकडे परत जाण्यास निघाला ॥२०॥ नंतर तो ब्राह्मण गावातील धनिक लोकांच्या वस्तीच्या मार्गातून जाऊ लागला. तेव्हा दैवयोगाने त्यास पुष्कळ धन मिळाले. ॥२१॥ त्या पैशातून सर्व प्रकारचे सामान यत्‍नानें आणून मोठ्या हर्षाने तो आपल्या घराकडे आला. ॥२२॥ (तेव्हा) त्याच्या स्त्रीने मोठया आनंदाने ते ओझे तेव्हा घरांत नेलें. 'सर्व कांही पैशानें साध्य आहे; धनहीन हा मेलेलाच समजावा' ॥२३॥ असा विचार करुन तो स्त्रीस म्हणाला, 'अग ऐक. आज मी व तू मिळून एक व्रत करु' (असे म्हणून) ॥२४॥ त्याने धर्मवृद्धि करणारे हे सत्यांबाव्रत लगेचच आरंभिले आणि त्याने पत्‍नीस आज्ञा करुन ते चांगल्या रीतीने शेवटास नेले. ते असे :- त्या स्त्रीने सौभाग्यवायने देऊन उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला आणि मग त्याने ब्राह्मण व आप्तजन यासह व्रतास आरंभ केला. ॥२६॥ व आणलेल्या सामानाने तो पत्‍नीसह पूजा करिता झाला; नंतर कथा श्रवण करुन सर्वांनी उपाध्यायाची पूजा केली. ॥२७॥ तेव्हां आकाशवाणी झाली की, 'तुझे कल्याण होईल.' त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही तो ग्रहण केला. ॥२८॥ नंतर स्त्री व आप्तजन ह्यासह त्याने भोजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्यास पुत्रपौत्रादिक सर्व प्राप्त झाले. ॥२९॥ हे सर्व त्यास प्रयत्‍नावाचून, सत्याम्बादेवीचे कृपेने प्राप्त झाले, सूत म्हणतात - ह्याप्रमाणे शंकराने षडाननास मोठ्या भक्तीने हे व्रत सांगितले ॥३०॥ आणि तेव्हापासून मनुष्यास सुख देणारे असे हे व्रत प्रगट झाले, आणि तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरे काय सांगावे ? ॥३१॥ तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत केले व कथा श्रवण करुन प्रसाद घेतला त्यामुळे त्यास पुष्कळ फळ मिळाले ॥३२॥ व्रत करणार्‍यास फळ मिळते, ह्यात मुळीच संशय नाही; म्हणून भूलोकी फळ देणारे असे हे दुर्लभ व्रत लोकांनी नेहमी करावे ॥३३॥ ॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्याम्बाव्रतकथायां द्वितीयोध्यायः ॥२॥ ******************************************************************** सत्याम्बा व्रतकथा अध्याय ३ सूत म्हणतात, 'हे श्रोत्यांमध्ये श्रेष्‍ठ, भक्तितत्पर, महाभाग्यवान शौनका, अशाप्रकारे या मृत्युलोकी मुक्ति देणारे हे सत्यांबादेवीचे व्रत प्रगट झाले ॥१॥ ते सर्वच ऐकण्यासारखे असून भूलोकी फल देणारे आहे. आता त्याविषयी इतिहास सांगतो, श्रवण करा. 'पूर्वी मगध देशात सौराष्‍ट्र नांवाचे शहर होते ॥२॥ ते शहर मगध राजाची राजधानी म्हणून सर्व लोकात प्रसिद्ध होते. तेथे सूर्यकेतु नावाचा एक अत्यंत भक्तिमान राजा होऊन गेला. ॥३॥ त्याची आनंदलहरी नावाची स्त्री अत्यंत पतिव्रता होती. तो राजा नेहमी देवीच्या भजनपूजनात तत्पर असे. ॥४॥ देवीच्या कृपेने त्यास शंभर पुत्र झाले. त्यामुळे तो नेहमी आनंदात मग्न असून देवीच्या भक्तिविषयी तत्पर असे. ॥५॥ त्याने नगरांत एक देवालय बांधले. तेथे अनेक प्रकारचा दानधर्म करुन तो नेहमी गरिबांचे पालन करीत असे ॥६॥ त्याचा वडील मुलगा अर्ककेतु नावाचा असून तो फारच बहुश्रुत होता. तोही राज्यकारभार पहात असून बापाच्या भक्तीत तत्पर असे. ॥७॥ शत्रूस भय देणारा असा तो राजा, पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करुन नेहमी आनंदात असता त्यास एक दुःख प्राप्त झाले. ॥८॥ कोणे एके वेळी ह्याच्या राज्यात परचक्र आले; त्या शत्रूने आपला एक दूत त्याच्या सभेत पाठविला.॥९॥ त्या दूताने निर्भीडपणे येऊन राजास वंदन करुन म्हटले, 'हे राजा, मालंब देशाचा राजा गावाबाहेर बागेत येऊन उतरला आहे ॥१०॥ त्याने सांगितले आहे की, तू एक खंडणी तरी द्यावीस अगर क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध करण्यास तयार व्हावे ॥११॥ हे राजा, तो मालवराज सैन्यासह आला असून उद्या युद्ध करण्यास तयार आहे; तरी काय उत्तर देणे असेल ते लवकर दे.' ॥१२॥ असे दूताचे बोलणे ऐकून 'तू येथून जा' असे दूतास सांगून तो राजा रागाने मुलास म्हणाला, ॥१३॥ 'अरे मुला, तू काय करितोस ? परचक्र आले आहे हे तुला माहित नाही काय ? तर आता जा, आणि किती सैन्य आले आहे हे पाहून ये.' ॥१४॥ असे राजाचे भाषण ऐकून युवराज बाहेर गेला आणि शुत्रसैन्य पाहून येऊन बापास म्हणू लागला. ॥१५॥ 'अहो बाबा, माझे भाषण ऐका. मी शत्रुसैन्य पाहून आलो. मला तर ते अगदी तुच्छ वाटते. ॥१६॥ घोडे दहा लक्ष, हत्ती पाच लक्ष, रथ सात लक्ष व पायदळ वीस लक्ष आहे. ॥१७॥ हे राजा, शत्रूचे सैन्य ह्याप्रमाणे आहे; हे मी प्रत्यक्ष पाहिले. माझे सैन्या तर अगणित आहे; मी पाहून मोजून येतो.' असे म्हणून तो राजपुत्र सैन्य पहाण्यास गेला. इकडे तो राजा अंतर्गृहात जाऊन चिंताग्रस्त होऊन बसला. ॥१९॥ 'आता मी काय करावे ? मजजवळ सैन्य नाही. पैसाही पुष्कळसा नाही व जवळ योद्धेही नाहीत. ॥२०॥ आता मी काय करावे ? मुलगाही मूर्खच आहे.' नंतर तो दूतास म्हणाला, 'हे दूता, तू असाच जा आणि कुलगुरुस बोलावून आण' ॥२१॥ त्याप्रमाणे दूत त्वरेने गुरुकडे गेला आणि गुरुस नमस्कार करुन म्हणाला, 'हे गुरो, तुम्हास राजाने त्वरित बोलाविले आहे.' ॥२२॥ असे दूताचे बोलणे ऐकून गुरु त्वरित राजाकडे आला. त्यास पाहून राजा आदराने उठून उभा राहिला. ॥२३॥ नंतर बसण्यास आसन देऊन त्याने अर्घ्यपाद्यांनी गुरुची पूजा केली. तेव्हा भक्तिभावाने युक्त झाल्यामुळे राजाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. नंतर त्या राजाने गुरुस नमस्कार करुन दोन्ही हात जोडून सद्गदित अंतःकणाने त्याची प्रार्थना केली. ॥२५॥ राजा म्हणाला, 'हे संसाररुपी समुद्रातून तारणार्‍या कुलगुरो, तुम्हास नमस्कार असो, तुमच्यावाचून माझे संकट कोण हरण करील ? हे गुरो, माझे दुःख नाहिसे करा ॥२६॥ कुलाचे हित करणार्‍या हे गुरो, माझे संकटापासून रक्षण करा. सध्या माझा प्राण जाऊ पाहात आहेत. तर हे दयासागरा, मी काय करावे हे सांगा.' ॥२७॥ राजा असे गुरुशी बोलत आहे तोच दूत येऊन म्हणाला, 'हे राजा, शत्रूने गावास वेढा घातला व त्याने राजपुत्रास बांधून नेले ॥२८॥ त्याने द्रव्यभाण्डार (खजिना) लुटले व आपली अश्वशाळाही नेली.' शत्रूचे दूत राजवाड्यात सर्व ठिकाणी पसरले आहेत ॥२९॥ दूताचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, 'अरे तू आता येथून जा.' नंतर राजा गुरुस म्हणाला, 'हे गुरो, ही परचक्राची भीति लवकरच दूर करा' ॥३०॥ तेव्हा गुरु प्रसन्नचित्त (आनंदित) होऊन राजास म्हणाले. ॥३१॥ भारद्वाज गुरु म्हणतात, 'हे राजा, मी मोठ्या प्रयत्‍नाने आज तुझे संकट निवारण करितो. तूही प्रयत्‍न कर म्हणजे संकट आता जाईल. ॥३२॥ दुःख नाहीसे करुन सुख देणारे व उत्तम फळ देणारे असे (एक) व्रत आहे ते व्रत करुनच मी दुःख नाहीसे केले म्हणून समज ॥३३॥ तू धैर्य धर. मी तुला ते व्रत काही शंका न धरिता सांगतो. त्यापासून त्वरित फळे मिळतात. म्हणून तू ते लवकर कर' ॥३४॥ राजा म्हणाला, 'हे गुरो, जर ते (व्रत) फलदायक आहे, तर त्याचा विधि मला लवकर सांगा. हे गुरो, तुम्ही जे सांगाल ते सर्व मी शंका न धरिता करीन' ॥३५॥ त्यावर गुरु म्हणाले, 'हे राजा, उत्तम सिद्धि देणारे असे सत्यांबा व्रत तू लवकर कर. म्हणजे शत्रू गावाबाहेर पळून जाईल. ॥३६॥ नंतर वक्त्यांमध्ये श्रेष्‍ठ अशा भारद्वाज गुरुने व्रताचा विधि राजास सांगितला आणि ते म्हणाले, मी सांगितले ते तू लवकर कर व फळ मिळव.॥३७॥ नंतर भक्तितत्पर राजाने गुरुने सांगितल्याप्रमाणे व्रत केले व उपाध्यायाकडून एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण केली. ॥३८॥ नंतर ब्राह्मणास दक्षिणा दिली व गरिबास भोजन घातले आणि सर्वांस प्रसाद देऊन नंतर स्वतःही प्रसाद घेतला. ॥३९॥ कथा श्रवण करण्यास जे लोक आले होते, त्यांनी जगदंबेस नमस्कार करुन पौराणिक ब्राह्मणास यथाशक्ति दक्षिणा दिली. ॥४०॥ पालखी, मेणे, घोडे, हत्ती, गांवे, वस्त्रे, अलंकार, जहागीर, भूमि व असेच अनेक प्रकारचे धन राजाने उपाध्यायास दिले. ॥४१॥ नंतर आकाशवाणी झाली की, 'हे राजा, अगदी स्वस्थ राहा. तू भक्तीने व्रत केलें म्हणून आता तुझे शत्रु निघून जातील.' ॥४२॥ तेव्हा सर्व ब्राह्मणांनी राजास आशीर्वाद दिला. सूत म्हणतात - 'हे, शौनकादिक ऋषींनो, नुसत्या व्रताचरणानेच राजाचे दुःख नाहिंसे झाले. ॥४३॥ तेव्हा एकाएकी शत्रूच्या छावणीत गलबला झाला. 'हे दूतांनो, धरा, बांधा, मारा, लक्ष्य द्या.' (ह्याप्रमाणे शिपाई बोलू लागला.) ॥४४॥ असे ऐकून सर्व वीर हातात शस्त्रें घेऊन उठले आणि शत्रूच्या छावणीत आले; तेव्हा बंदिवान राजपुत्राची भीति कमी झाली. ॥४५॥ सत्याम्बाव्रत करण्यापूर्वी राजाच्या छावणीतून त्या शत्रूराजाने जे योद्धे शिपाई धरुन बांधून नेले होते. ते सर्व योद्धे बंधनापासून मुक्त झाले आणि हातात शस्त्रें घेऊन त्या शत्रूराजाच्या सैन्याबरोबर निकरानें युद्ध करावयास उठले. ॥४६॥ तेव्हा शत्रूसैन्याने असें, घोडे, रथ अलंकार वगैरे सर्व टाकून चोराप्रमाणे पळण्यास आरंभ केला.॥४७॥ तेव्हाच मालव राजा घोड्यावर बसून पळू लागला. तेव्हा ह्या राजाकडच्या योद्ध्यांनी त्याला मोठया प्रयत्‍नाने धरुन बांधिले ॥४८॥ व ज्याप्रमाणे माकडास दोरीने बांधून नेतात, त्याप्रमाणें त्यास बांधून नेऊ लागले. सूर्यकेतु राजाने ते पाहिल्यावर त्यास सोडण्यास सांगितले. ॥४९॥ मालव राजा खाली तोंंड घालून नमस्कार करुन उभा राहिला. तेव्हा सूर्यकेतूने त्यास असे विचारले 'तुझी मुले कुशल आहेत ना ? ॥५०॥ तुझ्या देशात सांप्रत स्वस्थता आहे ना ? सांग.' मालव राजा म्हणाला, 'हे राजा, मी तुझा फार अपराधी आहे. आता मजवर दया कर. ॥५१॥ मीं माझी सुलोचना कन्या तुझ्या पुत्रास दिली (असे समज) असे म्हणून त्याने आपली मुलगी आणून सूर्यकेतूचे स्वाधीन केली. ॥५२॥ आणि आपल्या वैभवाप्रमाणे कन्यादानाचा समारंभ करुन पुष्कळ धनही दिले. तेव्हा सूर्यकेतू राजा अतिशय संतुष्‍ट झाला. ॥५३॥ योद्ध्यांनी जे जे घेतले होते ते ते सर्व त्या सूर्यकेतु राजास त्या मालव राजाने दिले आणि मग तो मालव राजा मोठ्या आनंदाने सैन्यासह निघून गेला. ॥५४॥ त्या दिवसापासून तो सूर्यकेतू राजा, इष्‍ट फळ देणारे असे हे व्रत प्रतिमासीं (दर महिन्यास) करु लागला. ॥५५॥ म्हणून हे व्रत मोठे श्रम पडले तरी नेहमी करीत जावे. यामुळे दुःख नाहीसे होऊन सुख प्राप्‍त होते ॥५६॥ ॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे श्रीसत्यांबाव्रतकथायां तृतीयो‍ऽध्यायः ॥३॥ ******************************************************************** सत्याम्बा व्रतकथा अध्याय ४ सूत म्हणतात ऋषी हो, आणखी मी एक कथा सांगतो; ती तुम्ही श्रवण करा. जिच्या योगाने शेवटी मोक्ष मिळतो. ॥१॥ त्या सूर्यकेतु राजाने आपल्या देशात स्वस्थता नांदावी म्हणून सत्यांबा देवीची स्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या वंशाचे रक्षण झाले. ॥२॥ तो राजा एकदा मोठ्या आनंदाने व भक्‍तीने स्वतःच्या देवालयात गेला आणि त्याने पोर्णिमेला शुक्रवारी सत्यांबाव्रताचा आरंभ केला ॥३॥ त्याच वेळी तेथे एक सदाचरणी 'गुंड' नावाचा शुद्र आला आणि तो (देवीस) व राजास नमस्कार करुन मोठ्या नम्रतेने म्हणाला ॥४॥ (गुंड म्हणाला:-) हे राजा, आपण काय करीत आहात, हे मला स्वस्थ अंतःकरणाने सांगा. मला देखील भक्‍ति उत्पन्न झाली आहे. तर हे राजा, हे कोणत्या देवाचे पूजन आहे ते सांगा. ॥५॥ याचा विधि कोणता व ह्यापासून काय फळ मिळते हे सांगा, राजा म्हणाला, 'अरे तू हे का विचारतोस ? तुझी इच्छा काय आहे, हे निश्चये करुन सांग ॥६॥ हे केल्याने इच्छित फळ निश्चितपणे मिळते; म्हणून हे उत्तम व्रत भक्‍तीने करण्यासारखे आहे' ॥७॥ गुंड म्हणाला. 'हे राजा, मला संतति नाही. म्हणून तुला विनंती करितो की कृपा करुन हे मला सांगा. काही शंका न धरिता मी हे व्रत करीन' ॥८॥ त्यावर राजाने सर्व विधि सांगून त्यास प्रसादही दिला. त्याने भक्‍तीने सत्यांबादेवीस नमस्कार केला व तो आपल्या घरी आला ॥९॥ नंतर त्याने आपल्या स्त्रीस व भावास वगैरे ते व्रत सांगितले. नंतर धर्मात्मा अशा त्या गुंडाने आपल्या वैभवाप्रमाणे (ऐपतीप्रमाणे) ॥१०॥ सर्वांसह मोठया भक्‍तीने पुत्राची इच्छा धरुन ते व्रत केले आणि सर्वास प्रसाद देऊन नंतर स्वतः ग्रहण केला ॥११॥ नंतर सर्वासह भोजन करुन त्या व्रताचे विसर्जन केले आणि रात्री मोठ्या आनंदाने तो आपल्या स्त्रीशी रममाण झाला. ॥१२॥ तेव्हां सत्यांबेच्या कृपेने त्याच्या स्त्रीस गर्भ राहिला. पुढे दहाव्या महिन्यांत तिला मुलगा झाला. ॥१३॥ मुलगा झाल्यावर मी पुन्हा असेच व्रत करीन, असा त्याने संकल्प केला. परंतु दुर्दैवाने त्या उत्तम व्रताचे त्यास विस्मरण झाले. ॥१४॥ त्यामुळे त्यास फार दुखः झालें, तें काय सांगावे ? लग्नाच्या वेळीं त्याच्या पुत्रास अपस्माराचा रोग झाला. ॥१५॥ त्याला रोग झाल्यामुळे त्या मुलाची भावी स्त्री शत्रूने हिरावून नेली. तेव्हां तो गुंड व त्याचा शत्रू ह्यामध्ये परस्पर फार निकराचे भांडण झाले. ॥१६॥ नंतर उलट गुंडाचा कुभांड रचणारा शत्रूचे, त्याचे जातिबंधु निवारण करीत असताही अविचाराने स्वतः गुंडास शिक्षा व्हावी म्हणून राजदरबारात-खोटी, लबाडीची फिर्याद घेऊन गेला. ॥१७॥ तो शत्रू अति लीनतेने राजास म्हणाला, मणिधर म्हणतो 'हे राजा, तुझ्या नगरात गुंड शुद्र फारच उन्मत्त आहे. ॥१८॥ त्या दुष्‍टानें हल्ली माझे द्रव्य हरुन नेले. नंतर गुंड म्हणाला, 'हे राजा, ह्या मणिधराने माझी सून हिरावून नेली. ॥१९॥ तिच्या आईबापांनी ती मुलगी अगोदरच माझ्या मुलास दिली आहे. ह्याने माझे द्रव्यही नेले आहे; म्हणून मी तुला शरण आलो आहे. ॥२०॥ असे त्याने सांगितले तरी सत्यांबेच्या मायेने मोहित झालेल्या त्या राजाने कांही विचार केला नाही. गुंडाचे घरी असलेले सर्व द्रव्य राजाने हिरावून आणले ॥२१॥ आणि त्याला त्याच्या स्त्रीपुत्रांसह कैदेत टाकिले; तेव्हा ज्याच्या हातांपायांत शृंखला (बेड्या) आहेत असा तो गुंड प्रतिदिवशी ॥२२॥ राजाच्या आज्ञेमुळे खांद्यावर कुदळी घेऊन दुर्दैवामुळे नगरांत दगड व माती यांची कामे करु लागला. ॥२३॥ कोणे एके वेळीं तो तान्हेला होऊन एका ब्राह्मणाचे घरीं पाणी पिण्यास आला. तेथे फार भक्‍तीने चाललेले सत्यांबेचे व्रत त्यानें पाहिले. ॥२४॥ तेव्हा ब्राह्मणास नमस्कार करुन तो गुंड फार नम्रतेने म्हणाला, 'हे ब्राह्मणा, माझी विनंती ऐक. मी दुर्दैवाने - हें व्रत करण्याचे - विसरलो ॥२५॥ म्हणून मी प्रार्थना करितो की, तुम्हीं हे सत्यांबाव्रत करा. आज मला राजाने पोट भरण्याकरितां जे द्रव्य दिले आहे, ते मी तुम्हांस देतो ॥२६॥ ते घेऊन व किंचित् कष्‍ट सोसून मला प्रसाद द्या.' असे तो म्हणतो आहे तोच शिपाई मोठया आढ्यतेने त्याला 'चल' असें म्हणाले ॥२७॥ पण त्याने त्यांची विनंती करुन त्यांसही थोडेसे धन दिलें आणि बाकीचें धन ब्राह्मणास दिले; नंतर त्या ब्राह्मणानेंही मोठ्याभक्‍तीने ते उत्तम व्रत केले॥२८॥ नंतर सर्वांस प्रसाद देऊन त्या गुंड शूद्रास प्रसाद दिला आणि "तुझ दुःख नाहीसे होवो, तुला सुख मिळो'' असा आशीर्वाद त्यास दिला.॥२९॥ त्याने ब्राह्मणास नमस्कार केला व तो पुन्हा तुरुंगात गेला आणि 'मी आज व्रत केले' असे त्याने आपल्या स्त्रीस व मुलास सांगितले ॥३०॥ व त्या व्रताच्या प्रभावाने उद्या माझे कार्य होईल' असें म्हणाला. त्याच रात्रीं श्रीसत्यांबा राजाच्या स्वप्‍नात येऊन त्यास म्हणाली, ॥३१॥ 'हे राजा, मी सांगते हे कार्य तू' उद्या निःशंकपणें कर. माझे व्रत तो गुंड शूद्र विसरला होता, त्यामुळे मी त्यास शिक्षा केली होती ॥३२॥ आतां तो मला शरण आला आहे, तर त्याचे धन त्यास उद्या दे. त्यास कैदेतून मोकळे कर. असे न करशील तर मी तुझा नाश करीन' ॥३३॥ असे राजाला स्वप्‍नात सांगून ती सत्यांबादेवी गुप्त झाली. नंतर राजाने पहाटेस उठल्यावर प्रातःस्मरण करुन ब्रह्मचिंतन केले ॥३४॥ नंतर स्वशरीरांत चतुर्दश भुवनात्मक विराट पुरुषाचें चिंतन करुन स्वर्गादिक लोकांचे चिंतन केले. नंतर यथाविधि देहशुद्धि व स्नानसंध्यादि - विधि आचरुन राजा सभेमध्ये येऊन आपल्या सिंहासनावर बसला ॥३५॥ आणि त्या सूर्यकेतु राजाने लागलेच आपले दूतांस आज्ञा केली की, 'दूतांनो, कारागृहामध्ये 'गुंड' या नांवाचा शूद्र, त्याची स्त्री आणि पुत्र यासह कैद केलेला आहे. त्यास (सोडवून) लवकर इकडे आणा ॥३६॥ आणि त्यांच्या बेड्या सोडा' याप्रमाणे दूतांस आज्ञा होतांच त्यांनीं त्या गुंड शूद्रास स्‍त्रीपुत्रांसह कैदेंतून मुक्‍त केलें व त्यांस यथाविधि मंगलस्नान घातले. ॥३७॥ वस्त्र, अलंकार देऊन ताबडतोब संतुष्‍ट केले आणि स्वादिष्‍ट अन्नाने त्यांस भोजन घातलें. भोजन झाल्यावर राजाने त्या शूद्रास प्रश्न केला. ॥३८॥ 'हे गुंडा, तुझी ही अशी दशा का झाली ते सांग.' राजाचे हे भाषण श्रवण करुन तो शूद्र दुःखित होऊन म्हणाला ॥३९॥ हे राजा, संसाराच्या भरात मी मदोन्मत्त झालो; त्यामुळे पूर्वी नवस केलेल्या सत्यांबाव्रताचे मला विस्मरण झाले. त्या माझ्या कर्मामुळे मी या दशेप्रत पावलो आहे, ॥४०॥ हे राजा, आज मी आपणास शरण आलो आहे; तर आपणास वाटेल तसें करा.' असें त्या गुंडाचें भाषण ऐकून राजा संतुष्‍ट झाला; ॥४१॥ आणि त्यानें जें द्रव्य आणिलें होतें त्याच्या दुप्पट त्यास दिलें, आणि म्हणाला, 'आतां तुझें दुःख गेलें.' ॥४२॥ नंतर मणिधरापासून ती मुलगी आणिली, व त्यास त्यावेळी शिक्षा दिली. तिच्या बापानें पुन्हा गुंडाच्या निरोगी पुत्रास विधिपूर्वक ती मुलगी अर्पण केली. ॥४३॥ त्या दिवसापासून तो शूद्र हें सत्यांबाव्रत करुं लागला व ह्याच्या प्रभावानें शेवटीं तो सत्यांबालोकांस गेला. ॥४४॥ सूत म्हणाले - 'अहो ब्राह्मणांनो, तुम्हीं श्रवण केलेलें हें सत्यांबाव्रत ह्या लोकीं मोठें संकट हरण करणारें आणि पुत्र व धन देणारें आहे, ॥४५॥ तसेच हे शीघ्र फल देणारें व दारिद्र्य आणि दुःख ह्यांचा नाश करणारें आणि मुक्‍ती देणारें असून शेवटीं सत्यांबालोकास नेणारें आहे. ॥४६॥ म्हणून सर्व लोकांनी हें सत्यांबाव्रत, कोणत्याही कार्याचे आरंभी करावें; म्हणजे तें कार्य सिद्धीस जातें, लढाईत व वादविवादांत जय मिळण्याचे वेळीं किंवा संकट व भय उत्पन्न होईल, ॥४७॥ अगर जेव्हां दुःख प्राप्त होईल, त्या त्या वेळीं हें मोठ्या भक्‍तीनें करावें. सर्व व्रतांमध्यें हें फळ देणारें व मुक्‍ति देणारें असें उत्तम व्रत आहे. ॥४८॥ गरीबांवर दया करण्याकरितां शंकरानें हे व्रत प्रसिद्ध केलें आहे. ह्या व्रताची कथा नुसती श्रवण करण्यानें देखील व्रत करण्याचें फळ मिळतें. ॥४९॥ ॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्यांबाव्रतकथायां चतुर्थोऽध्यायः ॥४॥ श्रीसत्याम्बार्पणमस्तु ॥ श्रीजगदम्ब उदयोऽस्तु । उदयोस्तु । उदयोस्तु ।

Search

Search here.