शंकरगीता अध्याय १६ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:02:04
शंकर गीता अध्याय १६ देखून महाराज प्रत्यक्ष । ज्वलंत महतीची पटे साक्ष मोक्षार्थियास मिळावा मोक्ष । वंदिता झाला आनंद ।।१।। अनंताचार्य उंब्रजकर । वैदिक, भिक्षुक सोलापूर ।। मनात करती विचार । श्रीमंतांचे महाराज ।।२।। महाराज श्रीमंतांनाच विचारती । माझ्यासम गरिबाकडे न बघती ।। सोवळ्यात अभिषेकाहून ते परतती । रस्त्यात भेटले महाराज ।।३।। महाराज म्हणाले ‘चल रे आता’ । महाराज मी सोवळ्यात आता ।। असुदे, त्यांच्या धरून हाता । स्टेशनवरती आणले ।।४।। महाराजांनी मुंबईस । नेले अनंताचार्यास ।। केशवजी आशर घरास । महाराज म्हणाले आशरना ।।५।। यांना कपडे करावेत । दोन तिकिटे रिझव्र्ह केलीत ।। आशर महाराजांना सांगत । कालच तिकिटे काढली ।।६।। अनंताचार्य चकीत होत । सोवळ्यात महाराज मज आणत ।। आशर मजला कपडे करीत । दोन तिकिटेही काढत ।।७।। महाराज अनंताचार्यास घेऊन । निघाले विमान - बोटीतून ।। मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण । रोम, इटली, इंग्लड ।।८।। वगैरे सर्व देशातून । आणले तीन महिने हिंडवून ।। पुन्हा सोलापूरात सोडून । महाराज त्यांना म्हणाले ।।९।। मी श्रीमंतांनाच विचारतो । गरिबाकडे न बघतो ।। अनंताचार्यास पश्चात्ताप होतो । महाराजांचे चरण धरी ।।१०।। एकदा नगरला महाराज असत । संध्याकाळची जेवणे होत ।। भक्तासमवेत गप्पा रंगत । महाराज सतत सांगत ।।११।। गप्पात रात्र संपली । पहाटेची वेळ झाली ।। नानासाहेब मिरीकर त्यावेळी । महाराजांना म्हणाले ।।१२।। तुम्ही कुणास हसविले । तुम्ही कुणास रडविले ।। तुम्ही जर आहात असले । कसे असतील गुरू तुमचे ? ।।१३।। ताडकन महाराज उभे गुडघ्यावर । मागे नेला डावा कर ।। उजवा हात केला ताठ वर । दृष्टी आकाशाकडे ।।१४।। ‘माझे गुरू आहेत असले’ । जोरात महाराज उद्गारले ।। त्याच स्थितीत तसेच राहिले । दीड तास निश्चल ।।१५।। महाराजांच्या डोळ्यातून । अश्रूंची धार सतत लागून ।। कपडे त्यांचे गेले भिजून । भक्त सारे घाबरले ।।१६।। उगाच प्रश्न विचारला । महाराजांस आपण त्रास दिला ।। म्हणती ‘क्षमा करावी आम्हाला’ । तेव्हा महाराज म्हणाले ।।१७।। तुमचे काहीही न चुकले । तुमच्यामुळेच मज गुरू आठवले ।। तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले । धन्य तुम्ही आहात ।।१८।। गुरूंचे घेता नुसते नाव । कसा प्रगटावा मनी भाव ।। केवढी असावी मनाची धाव । प्रत्यक्ष गुरूच दाखवित ।।१९।। एकोणीसशे एकोणसाठ शनिवारी । जुलै दिनांक चार शिवरात्री ।। मिरजेचे पंडित यांच्या घरी । रात्री अकरा वाजता ।।२०।। महाराज प्रत्यक्ष प्रगटून । गादीवरती निजले असून ।। दोन्ही लोडावर दोन हात ठेवून । पाय तिरपे लांबविले ।।२१।। तसाच महाराजांचा फोटो काढला । आजही तो मिळतो पहावयाला समाधीनंतर बारा वर्षांनी भला । प्रसंग आहे घडला हा ।।२२।। एकोणीसशे बासष्ट साली । महिनाभर अभ्यंकराच्या स्वप्नामधी ।। महाराज येऊन सांगती । फोटो सर्व जमव मम ।।२३।। स्टुडिओ सर्वही धुंडाळले । फोटो काहीही न मिळाले ।। तोच स्वामीसमर्थ स्टुडिओ दिसले । सर्व वृत्तांत निवेदिला ।।२४।। फोटोग्राफर म्हणाले । फोटो मजपाशी आहेत सगळे ।। परी महाराजांनी मज सांगितले । फोटो न द्यावे कुणाला ।।२५।। तुम्ही याल उद्या जर । काय घडले ते पाहू तर ।। गेले दुस-या दिवशी अभ्यंकर । फोटो मिळाले सर्वही ।।२६।। अभ्यंकर किंमत विचारत । फोटोग्राफर त्यांना सांगत ।। महाराज, महाराजांचे फोटो नेत । किंमत कसली यात हो ।।२७।। पुढे पानशेतच्या धरणात । स्टुडिओ हा वाहून जात ।। सर्व फोटो ठेविले सुरक्षित । महाराजांनी यापरी ।।२८।। समाधीनंतर सोळा वर्षांनी । ही घटना आली घडूनी ।। महाराजांची ऐशी करणी । कल्पनातील असे ही ।।२९।। लहान मुलांच्या घोळक्यात । महाराज नेहमी रममाण होत ।। त्यांना प्रेमाने कुरवाळीत, बोलत । आनंदाने खेळत ।।३०।। लोक महाराजांना विचारीत । तुम्ही कसे खेळता मुलांत ?।। महाराज त्यांना सांगत । पवित्र, निष्पाप मुले ही ।।३१।। शुध्द अंत:करण यांचे फार । निरिच्छ यांचे विचार ।। मागत नाहीत काहीच तर । माझ्यापाशी मुले ही ।।३२।। तुम्ही सारे स्वार्थापोटी । नेहमी काही मागण्यासाठी ।। सतत लागता माझ्या पाठी । अप्पलपोटी तुम्ही सारे ।।३३।। महाराजांच्या या उद्गारात छान । झणझणीत भरले अंजन ।। कसे असावे अंत:करण । ज्याचे त्याने जाणावे ।।३४।। महाराज कुठेही बसत । कपड्यावर तंबाखू लाळ गळत ।। स्वच्छतेचा गंध नसत । कपडे घाणेरडेच ।।३५।। त्यांचे धोतर असता धूत । गुलाबपुष्पांचा सुगंध येत ।। जिकडे तिकडे सुगंध सुटत । सौगंधही अपूर्व ।।३६।। महाराजासं खिचडी आवडत । महाराज स्वत: खिचडी करीत ।। संपूर्ण कांदे लसून टाकत । ओंजळीत बसतील तेवढे ।।३७।। खडे मीठ, मिरच्या ओंजळीत घेत । तशाच खिचडीत टाकीत ।। दिसेल ते तसेच खिचडीत । टाकून होत मोकळे ।।३८।। सोलणे - निवडणे मुळीच नाही । शिजू लागे पहा खिचडी ।। खिचडीत हात घालुनी । खिचडी हलवीत जोराने ।।३९।। झारा - डाव - चमचा - उलथणे । यांची जरुरी कधीच नसणे ।। पदार्था मोजमापे प्रमाणे । कधीच वापरली नाहीत ।।४०।। अशी खिचडी मस्त बने । जणू कैलासचीच पक्वान्ने ।। महाराजांच्या हातचे मिळणे । भाग्य महाराज जाणोत ।।४१।। दोन्ही चरणे महाराजांची । एकसारखी मुळीच नव्हती ।। उजवा पाय लहान असूनी । डावा मोठा लांबच ।।४२।। उजवा पाय महाराजांचा । डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा ।। चमत्कार हा चरणांचा । स्वाध्याय हवा यावर ।।४३।। महाराज जेव्हा कुठे बसत । उजवा पाय पुढे असत ।। डावा पाय मागे असत । सहज बैठक त्यांची ही ।।४४।। गुरूचरणांचा स्पर्श शिष्यांना । व्हावा, कळतसे ही योजना ।। दीनोध्दारक कैलासराणा । किती कृपाळू मायाळू ।।४५।। पुरूषोत्तमबुवा सांगत । महाराज शुभराय मठात येत ।। माझे कपडे वापरत । मजवर प्रेम अपार ।।४६।। महाराजांचे सर्वांवर । प्रेम अमाप अपार ।। महाराजांच्या वास्तव्यात तर । आनंदाचा कल्लोळ ।।४७।। महाराज मारूतीसमोर बसती । म्हणती मी आहे मारूती याची सर्वा आली प्रचीती । समाधीच्या वेळेस ।।४८।। गोविंद जानू गिरमे असत । महाराजांचे एकनिष्ठ भक्त ।। ते सर्वांस आवर्जून सांगत । महाराज अग्नी केवळ ।।४९।। रावबहादूर नवले असत । मराठा समाजाचे पुढारी विख्यात ।। कोल्हापूरी त्यांचा सत्कार होत । भाषणात ते म्हणाले ।।५०।। केवळ महाराजांच्यामुळे । माझे संपूर्ण परिवर्तन झाले ।। पुण्यतिथीस भक्त जे जेवले । उच्छिष्ट यांचे सेवित ।।५१।। तात्या सहस्त्रबुध्दे अन गणेशन । एकमेकांचे पार्टनर असून ।। रहात दोन खोल्यांतून । दृष्टान्त झाला गणेशनना ।।५२।। अक्कलकोट स्वामींचा अवतार । सध्या मुंबईत असून तर ।। दर्शनही त्यांचे मनोहर । गणेशनना जाहले ।।५३।। दृष्टांत तात्यांना सांगून । निघाला तात्यांना घेऊन ।। स्वामींचा अवतार पहावा म्हणून । स्वामींचे मठ शोधिले ।।५४।। एक चित्र, गिरगाव मठात । चित्रकार होता पूर्ण करत ।। दृष्टांतातील हेच अवतार असत । गणेशन पाहता म्हणाले ।।५५।। मोटारीतून महाराज येत । चित्र घेऊन महाराज जात ।। त्याचा पाठलाग करत । माडीत गेले महाराज ।।५६।। महाराजांनी आपली खोली । कडी लावून बंद केली ।। हाक मारूनही खोली न उघडली । गणेशन निघून गेलाच ।।५७।। दार उघडून महाराज म्हणत । तात्या, तुझीच वाट मी पहात ।। महाराजकृपे तात्यांच्या हातात । पार्थिव पूजा प्रगटली ।।५८।। तात्यांवर महाराजांनी । अमाप कृपा ती करूनी ।। सर्वस्व त्यांना अर्पूनी । आपल्यासारखे बनविले ।।५९।। अगदी महाराजांसारखे । दिसत तात्या सहस्त्रबुध्दे ।। एकमेकांची सगळी कामे । एकमेक करीत ।।६०।। तात्यांच्या नोकरीवर महाराज जात । महाराजांची कामे तात्या करत ।। बरेच दिवस असेच जात । कळले कुणा काही ना ।।६१।। एकदा तात्यांची बायको खवळत । तेव्हा महाराज तात्यांस म्हणत ।। आता तुझे काम तू जा करीत । माझे काम मी करतो ।।६२।। महाराज शुभराय मठात । अष्टमीस देवीच्या नवरात्रात ।। भारी जरीचे पातळ नेसत । सर्व अलंकार घातले ।।६३।। मळवट कुंकवाचा भरून । मधुबूवास पालथे निजवून त्यांच्या पाठीवर उभे राहून । महाराज नाचू लागले ।।६४।। दशावतारी संगीत नृत्य । महाराजांचे सुरू होत ।। मधुबूवा भावावस्थेत जात । वादक गेले थकून ।।६५।। महिषासुरमर्दिंनीचे नृत्य । इतके रंगून गेले असत ।। वादकांची बोटे रक्ताळत । अपूर्व भयानक नृत्य हे ।।६६।। महिषासुरमर्दिनी नृत्याचे । फोटो फिल्म घेतले असते ।। आज उपयुक्त ठरले असते । घडले असते दर्शन ।।६७।। सुवासिनींची - कुमारिकांची । महाराज पूजा करीत असती ।। अशी पूजा करावी म्हणूनी । महाराज भक्तां सांगत ।।६८।। बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत । समाधी - मठावरून असता जात ।। मठासमोर मोटार बंद पडत । म्हणून गेले मठात ।।६९।। सिगारेट कोणी ओढत नसत । तरीही सिगारेटचा त्यांना वास येत ।। बेहरे यांना आश्चर्य वाटत । समाधी समोर गेले ते ।।७०।। समोर महाराजांचा पुतळा असत । एक भक्त सिगारेट घेऊन येत ।। महाराजांच्या मुखास लावत । महाराज सिगारेट ओढत ।।७१।। सिगारेट पेटे, धूर निघे । बेहरे टकमका पाहू लागे ।। दुस-या दिनी त्यांच्या घरामध्ये । प्रत्यक्ष महाराज प्रगटले ।।७२।। रामजोशींच्या तमाशात । चिमाबाई नृत्यांगना असत ।। ती महाराजांच्या दर्शना येत । गुलबी कुत्रीस घेऊन ।।७३।। महाराज चिमाबाईस सांगत । गुलबी महान व्यक्ती असत चिमाबाईस हे न पटत । महाराज म्हणाले पहाच ।।७४।। महाराज गुलबीस बोलवित । गुलबी महाराजांसमोर येत ।। त्यांना तीन प्रदक्षिणा घालत । मुक्त महाराजपदी हो ।।७५।। चिमा म्हणाली महाराजांना । तुम्ही गुलबीचा उध्दार केला ।। माझाही उध्दार करावा । अनुग्रह दिलाच ।।७६।। चिमाबाईस महाराजस म्हणाले । शुभराय मठ मारुती मंदिरामागे ।। एक तट बांधून देणे । मान्य केले चिमाने ।।७७।। तटाचे खोदकाम सुरू होत । त्यातून तीन मूर्ती निघत ।। नागनाथ - नरसिह - हनुमंत । चकीत झाले सर्वही ।।७८।। स्थापना हनुमानजयंती दिवशी । केली तिन्हींची महाराजांनी ।। हाच तटाचा मारुती असूनी । तीन मुर्ती मठात ।।७९।। महाराज एकदा दारू पीत । रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत ।। नागेश धनेश्वर समोर असत । दारू चढली नागेशा ।।८०।। नागेश भडाभड ओकले । महाराज रामचंद्रांना म्हणाले ।। तुझ्या मुलाने मद्य प्याले । दोष मज का देतोस ? ।।८१।। महाराजांनी काडी लावली । ओकारी सर्व जळून गेली ।। अघटित करणी पाहून सगळी । दोघेही थक्क जाहले ।।८२।। वकील होते रामचंद्र नागेश होते डॉक्टर ।। हेच डॉक्टर धनेश्वर । महाराजांचे लाडके ।।८३।। डॉक्टरांची अकरा मुले । मूरणार, महाराजांनी जाणले ।। महाराजांनी काय हवे विचारले । ते काहीही न बोलले ।।८४।। डॉक्टर धनेश्वरास । अष्टमहासिध्दी देत ।। डॉक्टर त्यांचा उपयोग न करत । केवढी तयारी पहा ही ।।८५।। काय इच्छा महाराज विचारीत । डॉक्टर महाराजांस सांगत ।। जिथे व्हाल तुम्ही समाधिस्त । तिथेच व्हावा अंत मम ।।८६।। महाराजांचे एकनिष्ठ । भक्तांत धनेश्वर वरिष्ठ त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ । महाराजांनी पुरविली ।।८७।। महाराज धनेश्वरास घेऊन । संगती हार एक आणून ।। पुणे स्टेशनवर जाऊन । महाराज बसले निवांत ।।८८।। तेवढ्यात तेथे गाडी आली । हार घेऊन गर्दी उसळली ।। डब्यातील व्यक्तीस हार घाली । महाराज म्हणाले धनेश्वरा ।।८९।। जे कृष्णमुर्ती होते डब्यात । सर्वजण त्यांना हार घालत ।। धनेश्वरही हार घालीत । जे कृष्णमुर्ती म्हणाले ।।९०।। कुणाचा आहे हा हार । धनेश्वर हात करत बाहेर ।। महाराजांस पाहता सत्वर । कृष्णमुर्ती उठलेच ।।९१।। त्यांनी महाराजासं हार घालुनी । परतून डब्यात बसता क्षणी ।। गाडी गेली निघूनी । तेव्हा महाराज म्हणाले ।।९२।। निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमुर्ती । जे माझा हार स्वीकारती ।। मलाही ते हार घालती । घडले कसे पहा हे ।।९३।। धनेश्वरांच्या मनात । यामुळे शंका उद्भवत ।। पुढे जेव्हा त्यांची भेट होत । शंका त्यांना विचारली ।।९४।। जे कृष्णमर्ती त्यांना सांगत । निर्गुणसंप्रदाय आमचा असत ।। आमच्या संप्रदायाचे गुरू साक्षात् । असती शंकरमहाराज ।।९५।। रात्री समाधीमठावर । एक सर्पराज करी संचार ।। लाल प्रकाश पडे प्रखर । मुख त्याच्या लाल असे ।।९६।। लाल रत्न विशेष असे । त्याच्या प्रकाशात तो फिरतसे ।। अनेकांनी हे पाहिले असे । शिपाई पाळत ठेवत ।।९७।। एकदा मध्यरात्र होत । सर्पराज होते हिंडत ।। बंदुकधारी शिपायांना ते दिसत । प्रकाशामागे धावत ।।९८।। लाल प्रकाश जिकडे दिसत । शिपाई तिकडे लगेच जात ।। सर्पराज समाधीवर चढत । अंतर्धान जाहले ।।९९।। शिपाई मठात शिरत । इथे नाग आला का ? विचारत कोणास काहीच ठाऊक नसत । शिपाई गेले निघुन ।।१००।। ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार । ते कोणाला सापडणार ? त्यांना कोण मारणार ? अगणीत लीला जयांची ।।१०१।। एकदा मध्यरात्री समाधीवरती । एक नागराज प्रगटती लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती । बाबुराव रुद्रांनी पाहिले ।।१०२।। समाधीनंतर दोन वर्षांनी पहा । भाऊसाहेब राऊत यांना महाराजांनी मंत्र दिला । श्रीस्वामी समर्थ ।।१०३।। पूर्वी जक्कलच्या मळ्यात । मंडप लहान, बांधलेला नसत सभोवती उघडे रान असत । संरक्षण नव्हते कसलेच ।।१०४।। महाराज मारुतीच्या रूपात । तेथे पहारा आहेत करत क्षणात मारुती, महाराज क्षणात । राम कोराड पहात ।।१०५।। एकोणीसशे एकोणपन्नासात । बाबुराव रुद्राला महाराज भेटत हिंदीत त्यांच्याशी बोलत । काव्यपंक्तीच होत्या त्या ।।१०६।। अगदी खणखणीत आवाजात । वीस चरणी हिंदी दोह्यात मै कैलासका रहनेवाला हूं । स्पष्ट महाराज म्हणाले ।।१०७।। शिर महाराज - चरणी टेकवून । साष्टांग नमस्कार घालून ।। सोळावा अध्याय पावन । पूर्ण येथे जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.