शंकरगीता अध्याय १८ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 16:52:21
शंकर गीता  अध्याय १८ वा महाराजांच्या पूजेचा थाट केला । गुलाबपुष्पांचा हार घातला उदबत्यांचा घमघमाट सुटला । आरती केली डौलात ।।१।। साष्टांग केला नमस्कार । मस्तक ठेवले चरणावर ।। महाराजांनी हात डोक्यावर । फिरवून कवटाळले मज ।।२।। घट्ट धरले महाराजांनी । मम मस्तक त्यांच्या ह्रदया भिडुनी ।। शरीर मम गेले मोहरूनी । आनंद लाटा उसळल्या ।।३।। महाराज इतके प्रसन्न दिसत । सतरा अध्याय जे लिहिले असत ।। ते महाराजांना अगदी पसंत । पावती याची त्यामध्ये ।।४।। आता फलश्रुतीचा अध्याय । लिहावा, फलश्रृती असे काय ? ।। सांगितली तुज तीच लिहिली जाय । लेखणी माझ्या हातात ।।५।। महाराजांचे धरून पाय । फलश्रृतीचा हा अध्याय ।। येथे पहा सुरू होय । दिव्य सुंगध दरवळला ।।६।। जेथे सुगंध दरवळत । तेथे महाराजांचे वास्तव्य असत ।। हे ठेवावे लक्षात । नमस्कार करावा ।।७।। गुरू करावा असतो लागत । म्हणून लोक गुरू करत ।। काय महिमा गुरूचा असत । ठाऊक नसतो लोकांना ।।८।। गुरूचा अगाध असे महिमा । गुरूच्या महत्वास नसे सीमा गुरूच्या थोरवीस कसलीच उपमा । देता येत नसेच ।।९।। शास्त्र आहे सांगत । गुरू प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत ।। गुरू विष्णूच साक्षात । गुरूच भगवान शंकर ।।१०।। हे तीनच देव मुख्य असत । हे तिन्ही देव गुरू होत ।। गुरू हे तीनही देव असत । एवढे महत्व गुरूला ।।११।। पूजा केली जर गुरूंची । पूजा होत या तिन्ही देवांची ।। जरूरी न वेगळी पूजा करण्याची । स्पष्ट अगदी होतसे ।।१२।। ब्रह्मा, विष्णू महेशाहून । अधिकार गुरूंचा थोर असून ।। यालाही असे शास्त्रवचन । शास्त्र सांगते पहा की ।।१३।। ब्रह्मा, विष्णू, महेशांनी । शाप जर दिला रागावूनी ।। सोडविण्यास त्या शापातूनी । समर्थ केवळ गुरूच ।।१४।। गुरूनीच जर शाप दिला । त्या शापातून सोडविण्याला ।। ब्रह्मा, विष्णू, महेशाला । सामथ्र्य नाही मुळीच ।।१५।। प्रारब्धामध्ये जे जे असत । तेच देव देऊ शकतात ।। देवांच्या मुळी न हातात । प्रारब्ध बदलून टाकणे ।।१६।। प्रारब्धात जे लिहिले असत । ते आपण होऊन होतसे प्राप्त ।। न मागताही ते असे मिळत । जरूरीच काय देवाची ।।१७।। गुरूंचे मात्र असे नसत । गुरू प्रारब्ध बदलतात ।। मनास येईल ते देतात । प्रारब्धात असो नसो ।।१८।। गुरूचा असा दिव्य महिमा । या महिम्याला नाही सीमा ।। गुरूला देणे कसली उपमा । कालत्रयी शक्य ना ।।१९।। गुरू म्हणजे गुरूच तर । त्रैलोक्याचा आधार ।। ज्यांची माया अपरंपार । गुरूमाऊली कृपाळू ।।२०।। किती गावेत गुरूंचे गुण । त्रैलोक्यावर ज्यांचे सदा ऋण ।। कशी सांगावी गुरूंची खूण । अनादि, अनंत, अगाध ।।२१।। गुरूंचा महिमा अपार । शिष्यही असावा लागतो तयार गाडी आली गेली पार । शिष्य झोपून राहिला ।।२२।। अशा शिष्यास गुरूंच्या गाडीत । बसण्याचा योग कधी तरी का येत ? ।। ही तर कैलास एक्सप्रेस असत । हयगय तेथे मुळी ना ।।२३।। गुरू माझा आहे प्राण । गुरू सर्वस्वाची असे खाण ।। गुरूच माझे कल्याण । अशी निष्ठा लागते ।।२४।। गुरूच माझे सर्व काही । गुरूशिवाय काही माहीत नाही ।। गुरूशिवाय मजला नको काही । धारणा अशी लागते ।।२५।। एकमेव आपले ठिकाण गुरू । गुरू आहेत कल्पतरू ।। जे जे आपण मनात धरू । इच्छा पूर्ण होणार ।।२६।। प्रत्येकास असे आई । प्रत्येकास प्यारी आपली आई ।। आईस प्यारी तिची आई । नैसर्गिक असेच ।।२७।। परी आपणास आईची आई । आई म्हणून चालणार नाही ।। हवी आपणास आपलीच आई । आगळेच महत्व आईचे ।।२८।। गुरूचे गुरू, गुरूस थोर । आपणास आपले गुरू थोर ।। आपले गुरूच आपणा तारणार । गुरूमहिमा प्रख्यात ।।२९।। आपले गुरूंचे जे चरित्र । त्यालाच म्हणतात गुरूचरित्र ।। इतर गुरूंचे चरित्र । गुरूचरित्र कसे होईल ? ।।३०।। आज ‘श्रीगुरूचरित्र’ म्हणून । जो ग्रंथ येतसे दिसून ।। नरसिंह सरस्वतीचे चरित्र असून । अलिकडचाच लिहिलेला ।।३१।। हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी । गुरूंची चरित्रे का नव्हती ? ।। परी श्रीगुरूचरित्राची विशेष ख्याती । सर्वत्र वाचले जातसे ।।३२।। ज्या ज्या गुरूंची चरित्रे असत । जी चरित्रे वाचली जात ।। ज्या गुरूचे चरित्र नसत । श्री गुरूचरित्र वाचत ।।३३।। गुरूंचे चरित्र नसल्यावर । ग्रंथ कोणता वाचणार ? ।। वाचला जाई सर्वत्र । श्रीगुरूचरित्र ग्रंथच ।।३४।। महाराजही भक्तास । श्रीगुरूचरित्र वाचण्यास सांगत होते त्यावेळेस । चरित्र त्यांचे नव्हतेच ।।३५।। आज महाराजांचे चरित्र । उपलब्ध आहे सर्वत्र ।। हेच वाचणे घरीच । शास्त्रोक्त योग्य होतसे ।।३६।। हा जो नवीन विचार मांडला । तो विरोधी वाटेल सर्वांना ।। तात्विक, खोल विचार केला । उपयुक्त, योग्य हा पटेल ।।३७।। म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी । महाराजांच्या सर्व शिष्यांनी ।। नित्य श्रीशंकर गीता वाचूनी । सार्थक करून घ्यावेच ।।३८।। हा ग्रंथ असे प्रासादिक । ग्रंथ हा अत्यंत मौलिक ।। महाराजांचे अघटिक कैक । लीला विलास ग्रंथात ।।३९।। प्रेरणा महाराजांनी देऊनी । आशीर्वाद दिले महाराजांनी ।। आदेश महाराजांचा होऊनी । कौशल्य त्यांचेच यात ते ।।४०।। वेळोवेळी कौल दिला । अडता, मुद्दा, सुचविला ।। शुभशकुन प्रत्येक वेळेला । झाले आहेत, अनुभवले ।।४१।। महाराज विचार सुचवीत । तेव्हाच ओवी तयार होत ।। यात माझे काहीच नसत । कर्ते - करविते महाराज ।।४२।। ‘माझ्या हातात लेखणी’ । महाराजांचे उद्गार असूनी ।। त्यांच्या हातात जर लेखणी । ग्रंथ कोण लिहिणार ? ।।४३।। अशा या अपूर्व ग्रंथात । महाराजलीलाविलासामृत ।। भरले आहे ओतप्रोत । हवे तेवढे लुटा हो ।।४४।। या लीलाविलासामृताने । जीवन उजळून टाकावे प्रत्येकाने ।। या मानवी देहाचे याप्रमाणे । सार्थक घ्यावे करून ।।४५।। आज धकाधकीचा मामला । जो तो उद्योगात गुंतला ।। निवांत वेळच नसे कोणाला । घाईगडबड नेहमी ।।४६।। प्रत्येक पहा, अध्यायात । एकशे आठ ओव्या असत ।। अध्याय अठराच असावेत । महाराजांचा आदेश ।।४७।। एकशे एकवीस ओव्या अठराव्या । सर्व ओव्यांची संख्या असत एकोणीसशे सत्तावन्न । ग्रंथराज हा एवढा ।।४८।। कितीही मोठा लिहिला ग्रंथ । संपणार नाही चरित्र ।। महाराज तर मारूतीराय । शेपूट संपेल का कधी ? ।।४९।। ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर । वेळ कोणास मिळणार ? ।। पारायण कोण करणार? । म्हणून स्वल्प ग्रंथ हा ।।५०।। मानवांच्या प्रमुख मागण्या अठरा । प्रत्येकीचे प्रकार अठरा ।। मागण्यांचा हा प्रचंड वारा । सुसाट वाहे अखंड ।।५१।। आपल्या असतील ज्या मागण्या । आपल्या असतील ज्या इच्छा ।। आपल्या असतील ज्या उणीवा । मनोकामना असतील ।।५२।। अचानक संकट उद्भवले । काही प्रश्न निर्माण झाले ।। परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले । काय करावे सुचेना ।।५३।। हा ग्रंथ असता वाचत । पारायणे करता सतत ।। वरील सर्वांची पूर्तता होत । प्रश्न सारे सुटतील ।।५४।। पूर्ण होतील सा-या मागण्या । पुरतील सर्वही आपल्या कामना ।। नष्ट होतील सगळ्या उणीवा । मनोकामना पुरतील ।।५५।। संकटात मार्ग दिसेल । प्रश्न मार्गी लागतील ।। अनुकूल बदल होतील । काय करावे सुचेल ।।५६।। महाराजांवर असावी प्रीती । असावी अव्यभिचारी भक्ती ।। असावी महाराजांचीच आसक्ती । अढळ श्रध्दा असावी ।।५७।। पारायण सुरू करतेवेळी । अग्निकुंडात अग्नी फुलवुनी ।। गोघृताची आहुती देऊनी । प्रज्वलित अग्नी करावा ।।५८।। मच्छिंद्रनाथांची शांत धुनी । महाराजांनी प्रज्वलित करूनी ।। धुनी म्हणजे अग्निहोत्र असूनी । असे महत्व अग्नीस ।।५९।। ज्याला अग्निहोत्राची माहिती असे । त्याने अग्निहोत्र करावे ।। अन्यथा धुनीस पेटवावे । नाथपंथी खूण ही ।।६०।। महाराज नाथसंप्रदायी असत । शांतिधुनी प्रज्वलित करत यात महाराजांचा हेतू असत । अखंड धुनी चालावी ।।६१।। पारायण जेथे सुरू होत । महाराज तेथे जातात ।। महाराजांसाठी लागत । एक पाट स्वतंत्र ।।६२।। या पाटाची पूजा करून । करावे महाराजांना आवाहन ।। महाराजांना नमस्कार करून । पारायण सुरू करावे ।।६३।। पध्दत सप्ताह पारायण । प्रथम दिनी ग्रंथ - महाराज पुजून ।। पहिले दोन अध्याय वाचून । नैवेद्य आरती करावी ।।६४।। पुढील पाच दिवसात । रोज तीन अध्याय वाचावेत ।। सातव्या दिवशी एकच अध्याय । अठरावा वाचावा ।।६५।। पारायण पूर्ण करूनी । महानैवेद्य आरती करूनी ।। पारायणाची सांगता उरकूनी । सप्ताह पध्दत अशी ही ।।६६।। रोज एक अध्याय वाचन । अठरा दिवसात पारायण ।। रोज वाचिता अध्याय दोन । पारायण नऊ दिवसात ।।६७।। वाचणे अध्याय रोज तीन । सहा दिवसांचे पारायण ।। रोज सहा अध्यायांचे वाचन । पारायण तीन दिवसांत ।।६८।। रोज वाचन नऊ अध्यायांचे । पारायण दोन दिवसांचे ।। बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे । पारायण एक दिवसात ।।६९।। पारायणाच्या या पध्दती । सात प्रकारच्या त्या असती ।। आपणास सोयीची वाटेल ती । अनुसरावी पध्दत ।।७०।। बसल्या बैठकीत पारायण । करणे सहज शक्य असून ।। बाकीच्या पध्दती याहून । असती सुलभ अत्यंत ।।७१।। नोंद ठेवावी पारायणांची । असे ती तुमच्याच कल्याणाची ।। किती पारायणात काय घडले याची । कल्पना तुम्हा येईल ।।७२।। या ग्रंथाचे पारायण पहिले । अगदी निष्काम पाहिजे केले ।। यातून आपणास सूचना मिळे । त्याप्रमाणे करावे ।।७३।। नंतर करून कामना । करावे पुढील पारायणा या पारायणातून आपणा । सूचना काही मिळतील ।।७४।। आपली कामना पूर्ण होणे । यास्तव किती करावीत पारायणे ।। सांगतील महाराज स्पष्टपणे । आज्ञेप्रमाणे करावे ।।७५।। पारायणे करील जो श्रध्दावंत । प्रगटेल पुढे भगवंत ।। दिसतील महाराज मूर्तिमंत । याहून काय हवे हो ? ।।७६।। हा शाश्वत लाभ महान । अपूर्व अत्यंत मौल्यवान ।। अशाश्वत लाभ यापुढे लहान । क:पदार्थ केवळ ।।७७।। मौल्यवान लाभ मिळे ज्यामुळे । त्यापासून क्षुल्लक लाभ का न मिळे ? ।। सागरी अथांग जल भरलेले । चूळभर जल का न मिळे ? ।।७८।। प्रत्येक अध्याय या ग्रंथातील । विशिष्ट कामना करील सफल ।। महाराज दृष्टान्तात सांगतील । कोणता अध्याय वाचावा ।।७९।। संपूर्ण ग्रंथाच्या । संपूर्ण कामनांची हमी असत ।। पारायणात ग्रंथाचे वैशिष्ट्य असत । सकल कामनापूर्ती हे ।।८०।। महाराज अनेकाना मंत्र देत । शिष्य, मंत्र ऐकतात ।। आणि तसेच स्वस्थ बसतात । माहीत त्यांना नसतेच ।।८१।। गुरू जेव्हा मंत्र देतात । तो, साधना करण्यासाठी असत ।। नित्य साधना असता करत । सार्थक होई जन्माचे ।।८२।। जन्माचे सुवर्ण होण्यास । गुरू देतात मंत्रपरीस ।। झोपला परीस घेऊन उशास । उपयोग काय मंत्राचा ? ।।८३।। गुरूंनी आपणास मंत्र दिला । त्याचा नित्य जप पाहिजे केला ।। किती अक्षरे मंत्राला ? । मोजावीत आपण ।।८४।। किती अक्षरे, तितके, हजार । जप केला पाहिजे दिनभर ।। नित्य एवढा जप करणे जर । शक्य नसेल आपणा ।।८५।। मंत्राच्या अक्षराएवढ्या । माळा पाहिजेतच ओढल्या ।। यात मात्र सवलत मुळी ना । एवढे तरी करावे ।।८६।। यातही काही कमी झाले । आपणास दोष लागतसे तो दोषही जातो गुरूकडे । विचार याचा करा हो ।।८७।। नित्य जास्तीत जास्त जप करुनी । नित्य नोंद ठेवावी लिहूनी ।। ऐसे सांगते निक्षूनी । मंत्रशास्त्र स्पष्टच ।।८८।। या ग्रंथाचा मुख्य आधार । आहेत भस्मे ओंकार ।। पारमार्थिक त्यांचा अधिकार । महाराजांप्रमाणे ।।८९।। एकोणीसशे ऐंशीत । हे चरित्र लिहिण्याचे मी विचारीत ।। त्यावेळी भस्मे काही न बोलत । आठ वर्षांनी म्हणाले ।।९०।। आमच्या महाराजांचे चरित्र । तुम्ही का नाही लिहित ? ।। ‘मी विचारले तुम्हा असत । आठ वर्षापूर्वी हे ।।९१।। तेव्हा महाराजांचा आदेश नसत । आज महाराजांचा आदेश असत’ ।। ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होत । पुण्यास गेलो दोघेही ।।९२।। दर्शन घेतले समाधीचे । निवेदन केले ग्रंथाचे ।। आशीर्वाद घेऊन महाराजांचे । अनेकांना भेटलो ।।९३।। ज्या गावात महाराजांचे भक्त । जाऊन त्या त्या गावात ।। माहिती, अनुभव मिळवीत । अगदी सर्वांस भेटलो ।।९४।। भस्मे लहानपणापासून । महाराजांच्या संगतीत असून ।। केली अपार सेवा मनापासून । भक्त एकनिष्ठ ते ।।९५।। वीस वर्षापासून । भस्मेंचा - माझा परिचय असून ।। महाराजांसंबंधी मधूनमधून । माहिती सांगत होते ते ।।९६।। नुसते महाराजांचे नाव काढता । भस्मे गहिवरून येतात, ऐकता ।। एवढी महाराजांशी एकरूपता । त्यांची आहे झालेली ।।९७।। विविध पुस्तके मजशी देणे । विविध माहिती सांगणे ।। अनेकांना भेटवून आणणे । तळमळ त्यांना अत्यंत ।।९८।। प्रत्येक अध्याय होता लिहून । त्यांना दाखवितो मी वाचून ।। भस्मे जातात आनंदून । संतुष्ट अत्यंत होतात ।।९९।। प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होत । त्यातून पावती मज मिळत या ग्रंथाचे सर्व श्रेय असत । भस्मे यांनाच यामुळे ।।१००।। शशिकांत महादेव देव । महाराज चरणी त्यांचा भाव ।। महाराजांच्या कार्यास सदैव । तत्पर अत्यंत असती ते ।।१०१।। त्यांनी आपल्या मोटारीतून । पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन ।। भेटीगाठी करवून । मुलाखती घडविल्या ।।१०२।। पुण्याहून अनेक गावातूनी । आम्हास ठिकठिकाणी नेऊनी ।। माहिती मिळावी म्हणूनी । देव सहकार्य असे हे ।।१०३।। जसे सुईवर बांधावे नगर । किंवा हाती घेऊन घागर ।। घागरी भरावा सागर । ऐसे महाराज - चरित्र ।।१०४।। घरात चालताही येईना । करी मोठ्याने वल्गना ।। ‘करीन पृथ्वी प्रदक्षिणा’ । ऐसे महाराज - चरित्र ।।१०५।। नित्य दोन प्रहरची भ्रांत । म्हणे जगास करीन तृप्त ।। देईन पक्वान्ने समस्त । ऐसे महाराज - चरित्र ।।१०६।। शक्य का रविकिरणे मोजणे ? । नभीची नक्षत्रे तारांगणे ? ।। सागर खोली सांगणे ? ऐसे महाराज चरित्र ।।१०७।। उंची किती आकाशाची ? लांबी किती पृथ्वीची ? ।। गती किती वायुची ? । ऐसे महाराज - चरित्र ।।१०८।। असंख्यांचे अनुभव असंख्य । अनुभवांच्याही छटा असंख्य ।। महाराजांच्या कृती असंख्य । सर्व गुंफणे अशक्य ।।१०९।। पंगुं लंघयते गिरीं । मूकं वाचालं करोती ।। ऐशी असे फलश्रुती । महाराजांच्या कृपेची ।।११०।। सोमवार सप्टेंबर अठ्ठावीस । एकोणीसशे सत्याऐंशी सन ।। शके एकोणीसशे नऊ असत ।अश्विन शुध्द पंचमी ।।१११।। या शुभदिनी सुवेळी । ग्रंथ लेखनास सुरूवात झाली ।। आणि पौष शुध्द अष्टमी भली । एकोणीसशे दहा शतक ।।११२।। सन एकोणीसशे एकोणनव्वदास । जानेवारी दिनांक तीस सोमवारी सुसमयास । ग्रंथ पूर्ण जाहला ।।११३।। ग्रंथास प्रारंभ सोमवार । ग्रंथ संपला सोमवार ।। प्रांरभ शेवट सोमवार । योग कसा पहा हा ? ।।११४।। महाराज प्रगटले सोमवार । महानिर्वाणही सोमवार ।। दोन्ही दोघांचे सोमवार । एकरूपता केवढी? ।।११५।। भगवंत वासुदेव अघोर । जामदग्न्यवत्स पंचप्रवर ।। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणतर । माहिती माझी असे ही ।।११६।। भगवान ‘श्री’ ची कृपा म्हणून । संपूर्ण झाले ग्रंथलेखन ।। योग आला सर्व जुळून । उपकार त्यांचे अनंत ।।११७।। महाराजांचा आदेश झाला । आशीर्वाद त्यांचा मिळाला ।। अठरा अध्यायांची ही माला । चरणी त्यांच्या अर्पितो ।।११८।। महाराजांच्या तीन पादुका असत । समाधी मठात एक स्थापित ।। दुस-या शुभराय महाराज मठात । तिस-या जक्कल मळ्यात ।।११९।। घरात ग्रंथ असावा पाटावर । गंध - फूल वाहावे ग्रंथावर ।। ग्रंथास नित्य करावा नमस्कार । समाधान - शांती मिळेल ।।१२०।। ‘अल्लख’ महाराज पुकार करत । लगेच साष्टांग नमस्कार मी घालत ।। अठरावा अध्याय, ग्रंथ समाप्त होत । स्वये ग्रंथ हाती घेतला।।१२१।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.