शंकर भजन स्तुती

भजन - स्तुती Posted at 2018-10-10 17:21:46

शंकराची आरती / भजन / स्तुती  1

जय जय आरती , पार्वती रमणा ॥ भवभय नाशना  दुष्टनिकंदना ॥ धृ. ॥ पंचवदन दश भुज विराजे ॥ जटाजुटी गंगा , सुंदर साजे ॥ १ ॥ कंठी रुंडमाळा , हस्तिकपाल । वाहन नंदी शोभे , भूषण व्याल ॥ २ ॥ गजचर्मांबर , तव परिधान ॥ त्रिशुलधारण , भस्मलेपन ॥ ३ ॥ दिगंबररूपा , शिव महारुद्रा ॥ वासुदेव प्रार्थी , ज्ञानसमुद्रा ॥ ४ 9॥ ----------------------------------------------   शंकराची आरती / भजन / स्तुती  2

कर्पूर गिरिसम कांतिदशकर शोभे शिरी गंगा । जवळी गणपति नृत्य करितो मांडुनिया रंगा ॥ अंकी अंबा सन्मुख नंदी सेविती ऋषी संगा । ब्रह्मादिक मूनि पूजा इच्छिती ध्याति अग्यंगा ॥ सुंदरपण किती वर्णूं रति - पति मदनाची मूर्ति । तेज पहातां संतृप्त होती कोटी गभस्ती ॥ वेदां नकळे पार जयाचा तो हा सुखमूर्ति । भक्तकाजकल्पद्रूम प्रगटे पाहूनियां भक्ति ॥ अंधक ध्वसुनी मख विध्वंसुनी बलहत करी दक्षा । त्रिपुरा सुरशल मर्दूनि सुखकर खला करी शिक्षा ॥ तो तू अगुणी सगुण होसी भक्तांच्या पक्षा । धर्म स्थापुनि साधु रक्षिसी सूरांकृति दक्षा ॥ नारद तुंबर व्यास सुखादिक गाती सद् ‌ भावे । सनक सनंदन वशिष्ट वाल्मिक याना यश द्यावें ॥ चिन्मय रंगा भवभयभंगा हरि प्रिया धांवें । तवपद किंकर रामदास हा यासी नुपेक्षावे ॥ जर आरती म्हणुन वापरल्यास हे धृवपद वापरावे. ( जय जय देवा आरती हरि हरेश्वरा । दयाळा ॥ काया वाचा मनोभावे नमू परात्परा ॥ धृ . ॥  ) ----------------------------------------------   शंकराची आरती / भजन / स्तुती  3 

नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥१॥ शिरीं जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥२॥ अंगां लावूनियां राख । मुखीं राम नाम जप ॥३॥ भक्तां प्रसन्न नाना परी । अभयंकर ठेऊनि शिरीं ॥४॥ दास ह्मणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ॥५॥ ------- ------ -------- -------- --------- --------- ----   शंकराची आरती / भजन / स्तुती  4 कराळें विक्राळें भुतें नानापरी । तेथें क्रीडा करी महादेव ॥१॥ अमंगळ सीळा तो नये कंटाळा । डोलतसे भोळा चक्रवर्ती ॥२॥ भुतें मांस खाती रक्त तोंडीं हातीं । वर्डाती झोंबती एकमेकां ॥३॥ कैंचे भारेभार चालिले अपार । फुंपाती विखार आंगावरी ॥४॥ लवथविती ओलीं हत्तीचीं कातडीं । गळती अंतडीं लवथवीत ॥५॥ साजुक सीसाळें टोंचुनी दोरीसी । रुंडमाळ ऐसी हेलावते ॥६॥ वन्हीनें पोळला विषें जाजावला । घामें थबथबीला सावकाश ॥७॥ घामावरी रक्त रक्तावरि राख । राखेवरी विख वाहतसे ॥८॥ भूतफौजा ऐशा भणभणती माशा । नंदीच्या गोमाशा भारेंभार ॥९॥ बेल राख आणि धोतर्‍याचीं फुलें । पुजेलागीं मुलें धांवताती ॥१०॥ सिद्धीची उपेक्षा भयानक दीक्षा । अभक्तांसि शिक्षा लावितसे ॥११॥ दास म्हणें हर तो भोळा शंकर । भक्तांसी अभर करीतसे ॥१२॥ -------- -------- ------- -------- --------- --------- -------   शंकराची आरती / भजन / स्तुती  5  माझा कुळस्वामी कैलासींचा राजा । भक्तांचिया काजा पावतसे ॥१॥ पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ॥२॥ कैवारी देव व्याघ्राच्या स्वरुपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥ जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतरांची ॥४॥ इतरांची शक्ति शंकराखालती । वांचविली क्षिती दास ह्मणे ॥५॥ ------ -------- --------- --------- --------- ----------- -----  शंकराची आरती / भजन / स्तुती  6 सोरटींचा देव माणदेशा आला । भक्तीसी पावला सावकाश ॥१॥ सावकाश जाती देवाचे यात्रेसी । होति पुण्यराशी भक्तिभावें ॥२॥ भक्तिभावें देव संतुष्ट करावा । संसारीं तरावा दास म्हणे ॥३॥ ६५ पृथ्वी अवघी लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ॥१॥ आतां कोठें ठेवूं पाव । जेथें तेथें महादेव ॥२॥ अवघा रुद्रचि व्यापिला । ऐसें देवचि बोलिला ॥३॥ दासें जाणोनियां भला । देह देवार्पण केला ॥४॥

Search

Search here.