शिवस्तुती

स्तोत्र - मंत्र  > शिव स्तोत्र Posted at 2018-10-27 14:55:15
श्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २ ॥ जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥ वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी । उमानिवासा त्रिपुरांतकार । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥ उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा । दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥ ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरी सोमकांत । गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ । कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हाळाहळें कंठ निळाचि साजे । दारिद्र्यदु:खे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥ स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चुडामणि कोण आहे । उदासमूर्तीजटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥ भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा । राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ९ ॥ नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश । सदाशिव व्यापक तापहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १० ॥ भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न। तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ११ ॥ इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ । उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १२ ॥ भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र । विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १३ ॥ प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या । मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १४ ॥ कीर्ति हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना । एकाग्रनाथ विष अंगिकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १५ ॥ सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता । अंकीं उमा ते गिरिरूपधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १६ ॥ सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू । गौरीपती जो सदा भस्मधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १७ ॥ कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरि जो भजकां सदैवा । अंती स्वहीत सुचना विचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १८ ॥ विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर । चिंतामणी चिंतनें चित्तहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १९ ॥ सुखावसानें सकळ सुखाचीं । दु:खावसानें टळती जगाचीं । देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २० ॥ अनुहातशब्द गगनी न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २१ ॥ शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे । भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २२ ॥ पीतांबरे मंडित नाभि ज्याची । शोभे जडित वरि किंकणीची । श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २३ ॥ जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी । शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २४ ॥ निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ॥ गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २५ ॥ मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी । काशीपुरीं भैरव विश्व तारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २६ ॥ जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं । प्रताप सूर्य शरचापधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २७ ॥ अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे । नेई सुपंथें भवपैलतीरीं ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २८ ॥ नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा । पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २९ ॥ एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्य नामीं । शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ३० ॥ शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थासि जाऊं नको ॥ योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें ती नको ॥ काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ॥ ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥

Search

Search here.