श्रीस्वामीचरित्र स्तोत्र 

स्तोत्र - मंत्र  > श्री स्वामी समर्थ स्तोत्र Posted at 2018-11-02 15:56:39
श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीस्वामीचरित्र स्तोत्र  श्रीगणेशाय नमः ।। श्रीस्वामीचरित्रस्तोत्र प्रारंभः ।। आधीं नमू श्रीसद्गुरूनाथा ।। भक्तवत्सल कृपावंता ।। तुजवांचूनि या जगीं त्राता ।। अन्य आतां नसेचि ।। १ ।। अवतार घेतला समर्थ ।। नाम शोभे कृपावंत ।। पाप जाळूनियां सत्य ।। भार उतरिला जगतींचा ।। २ ।। मूळ स्वरूप निर्गुण ।। निराकार नित्य ध्यान ।। अघटीत लीला करूनि जाण ।। तारिलें जना कौतुकें ।। ३ ।। म्हणुनि नमन तुझे पायीं ।। तुजविण अन्य दाता नाहीं ।। विश्वव्यापक तूंच पाहीं ।। ध्याती हृदयीं साधुजन ।। ४ ।। रूपारूपासी वेगळा ।। गुणगुणाच्या निराळा ।। परी अघटित जगीं कळा ।। सूत्र हातीं वागवित ।। ५ ।। स्वस्वरूपीं निपुण ।। सादर कराया जगतीं पालन ।। स्वामीनाम सगुण ।। उद्धराकारण धरियेलें ।। ६ ।। तो दिगंबरवेष द्वैतरहित ।। दत्तदिगंबर हाची सत्य ।। भार उतरावया यथार्थ ।। कलियुगीं समर्थ अवतरला ।। ७ ।। दीन जनांचिया पोटीं ।। पाप जाळूनि तारी संकटीं ।। नाम जयाचें धरितां कंठीं ।। मग सृष्टीं भय नाहीं ।। ८ ।। ॐ आदिस्वरूपरूपा ।। ओंकार निर्गुणरूपा ।। जगव्याप्यव्यापककौतुका ।। दाखविता सखा तूंचि खरा ।। ९ ।। कोण करील तुझी स्तुती ।। शेष शिणला निश्चितीं ।। तेथें मानव बापुडे किती ।। अल्पमती निर्धारें ।। १० ।। सुख करा स्वामीराया ।। भक्तवत्सला करुणालया ।। जगतारक तुझ्या पायां ।। नमन माझें सर्वदा ।। ११ ।। मी अन्यायी थोर ।। परी तूं कृपेचा सागर ।। जगतारावया निर्धार ।। सगुण अवतार धरियेला ।। १२ ।। जयजयाजी गुरुनाथा ।। भक्तवत्सला समर्था ।। तुजवांचूनि अन्य त्राता ।। मज आतां पाहतां नसेचि ।। १३ ।। सर्व सुख सगुण ।। अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण ।। जग तारावया कारण ।। अवतार जाण धरियेला ।। १४ ।। अनंत ब्रह्मांडाचा नायक ।। तूंचि सखा माझा देख ।। तुजवांचूनि अन्य कौतुक ।। नको नको मजलागीं ।। १५ ।। कैसी करावी तुझी स्तुती ।। हें मी नेणें बा निश्चितीं ।। चरणीं जडो तुझ्या प्रीती ।। ऐसें आतां करावें ।। १६ ।। दीन दयाळा गुरुराया ।। भावें वंदिलें तुझ्या पायां ।। सोडिली समूळ मोहाची माया ।। आतां मज वायां दवडू नको ।। १७ ।। हें स्तोत्र तुझें लघुस्थिती ।। तूंचि बोलविता निश्चितीं ।। भक्त तारावया गुरुमूर्ती ।। अवतारस्थिती दाविली ।। १८ ।। दीनवत्सला स्वामिराया ।। अगाधतेजा करुणालया ।। अघटित जगतीं तव माया ।। लीला कौतुक निर्धार ।। १९ ।। निरंजन स्वरूपरूपा ।। विश्वरूपा आदिरुपा ।। अक्कलकोटीं दावूनि कौतुका ।। जगसुखा राहिला ।। २० ।। अक्कलकोटीं जरी जन ।। अवचित कोणी जातां जाण ।। उद्धार तया कारण ।। स्वामिकृपें होय खरा ।। २१ ।। अवधूतवेष निर्धारी ।। निर्गुण निराकारी ।। तेज पाहतां थरारी ।। काळ पोटीं बापुडा ।। २२ ।। वेदीं रूप वर्णिलें निर्धार ।। तैसी लीला दाविली साहाकार ।। विश्वविश्वंभर गुरुवर ।। सद्गुरूनाथ स्वामी माझा ।। २३ ।। चरण पाहतां सुकुमार ।। कैसें पूजावें निर्धार ।। ठेऊनि प्रेम गादीवर ।। सत्य सादर पूजावें ।। २४ ।। प्रेम गंगा यमुना सरस्वती ।। सिंधु कावेरी भागीरथी ।। तयासी प्रार्थावें निश्चितीं ।। स्नानालागीं समर्थाच्या ।। २५ ।। मन कलश घेऊनि निर्धार ।। प्रेम गंगा जलसागर ।। स्नान घालूनि उत्तरोत्तर ।। पूजन प्रकार करावा ।। २६ ।। आवडी अक्षता निर्धारीं ।। सुमन संगती घेऊनि वरी ।। सद्गुरुनाथ पुजावा अंतरी ।। प्रेमभरी होऊनियां ।। २७ ।। भक्तिची ती जाण ।। वरी नामाचा चंदन ।। शांती केशर मिळवून ।। गंध अर्चन समर्थांचे ।। २८ ।। क्षमा धूप दीप निर्धारीं ।। प्रेम नैवेद्य वरी ।। भावें समर्पोनि निर्धारीं ।। सद्गदित अंतरीं होऊनियां ।। २९ ।। क्रोध कापूर जाळावा ।। प्रेमें स्वामी आळवावा ।। आवडीचा तो ध्यानीं पहावा ।। शुद्ध चित्त करूनियां ।। ३० ।। ऐसी पूजा झालियावरी ।। मग प्रार्थावा निजांतरी ।। हृदयीं उठती प्रेमलहरी ।। ऐशापरी आळवावा ।। ३१ ।। जयजयाजी गुरुराया ।। जयजयाजी करुणालया ।। भक्ता दाउनियां पायां ।। भवभया निवारिलें ।। ३२ ।। जयजयाजी अनंतरूपा ।। जयजयाजी आदिरुपा ।। चुकवा चुकवा जन्मखेपा ।। मार्ग सोपा दाऊनियां ।। ३३ ।। जयजयाजी त्रिगुणा ।। जयजयाजी अवतार सगुणा ।। पुरवावया मनकामना ।। जनीं वनीं फिरीयेला ।। ३४ ।। जयजयाजी दिगंबरा ।। जयजयाजी सर्वेश्वरा ।। मज सांभाळा लेंकरा ।। तुजविण आसरा नाहीं नाहीं ।। ३५ ।। जयजयाजी समर्था ।। स्वामिराया कृपावंता ।। ।। तुजविण आम्हां त्राता ।। नाहीं नाहीं जगत्रयीं ।। ३६ ।। शुद्धतेजा तेजरुपा ।। दिव्य स्वस्वरूपा ।। चुकवा चुकवा जन्म खेपा ।। आदिरुपा जगद्गुरू ।। ३७ ।। जयजयाजी यतिरुपा ।। जयजयाजी अघटित स्वरूपा ।। निर्गुण सगुणरूपा ।। सच्चिदानंद जगद्गुरू ।। ३८ ।। जयजयाजी त्रिगुणरहिता ।। जयजयाजी त्रिदोषहारका ।। जयजयाजी ब्रह्मांडनायका ।। निजभक्त सख्या स्वामिराया ।। ३९ ।। जयजयाजी दत्तात्रेया ।। जयजयाजी करुणालया ।। जयजयाजी विश्वमाया ।। संशयभयहारका स्वामिराया ।। ४० ।। जयजयाजी आनंदविलासा ।। जयजयाजी पापतमनाशा ।। जयजयाजी अवधूतवेषा ।। भवभयपाश निवारका ।। ४१ ।। जयजयाजी निजभक्तपालका ।। जयजयाजी विश्वव्यापका ।। निज दासासि सखा ।। कलियुगीं देखा तूं एक ।। ४२ ।। जयजयाजी विराटस्वरूपा ।। जयजयाजी आदिरूपरूपा ।। जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका ।। मायबापा गुरुराया ।। ४३ ।। त्रिलोकीं तूं समर्थ ।। अवतार तुझाचि यथार्थ ।। तारक भक्तांलागीं सत्य ।। दैवीरूप दाऊनि ।। ४४ ।। तूं पूर्णब्रह्म जाण ।। निर्विकार निर्गुण ।। निरंजनी सदा ध्यान ।। लीला कौतुक दाविलें ।। ४५ ।। तेज पाहतां थरारे ।। कली मनीं सदा झुरे ।। विश्वव्यापक व्यापूनि उरे ।। तारक खरे पतितासी ।। ४६ ।। तुजविण आणिक आधार नाहीं ।। कलियुगीं दुजा आम्हां पाहीं ।। सद्गुरुनाथ तूंचि खरा तोही ।। अवताररूपें नटलासी ।। ४७ ।। लीला दाविली अगाध ।। शेषा न करवे त्याचा शोध ।। जें तुम्ही केलें विविध ।। ज्ञानरूपें जाणविलें ।। ४८ ।। अक्कलकोटमहापुरीं ।। वास केला निर्धारीं ।। पवित्रक्षेत्र करूनि तारी ।। पाय ठेऊनि जगतासी ।। ४९ ।। तरी जनीं सत्य आतां ।। अक्कलकोटीं जावें तत्वतां ।। हित साधावया यथार्थ ।। पवित्र भूमी पैं केली ।। ५० ।। हें वचन निर्धार ।। समर्थांचें असे साचार ।। बोल बोलवितां उत्तर ।। स्वामी माझा निर्धारीं ।। ५१ ।। अक्कलकोटीं करितां अनुष्ठान ।। हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन ।। शुद्ध चित्त करून ।। ध्यान सदा समर्थांचें ।। ५२ ।। भिक्षान्न निर्धारीं ।। पवित्र राहे सदा अंतरी ।। षण्मास वाचितां तरी ।। महाव्याधी दूर होय ।। ५३ ।। एक संवत्सर अनुष्ठान ।। वटछायेसी करितां जाण ।। तयासी होईल पुत्र संतान ।। वचन सत्य समर्थांचें ।। ५४ ।। तेरा मासी जोडे धन ।। चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण ।। प्रेमभावें करितां अनुष्ठान ।। सत्य वचन निर्धार ।। ५५ ।। वटपूजा आवडी पूर्ण ।। तेथेंचि पादुका स्थापून ।। प्रेमभावें करितां अनुष्ठान ।। मनोरथ पूर्ण होतील ।। ५६ ।। कलियुगीं तारक निर्धारीं ।। स्वामी माझा सगुण अवतारी ।। जग तारावया निर्धारीं ।। सृष्टीवरीं पैं आला ।। ५७ ।। तरी सादर सादर मन ।। ठेऊनि वंदा आतां चरण ।। पुढें न मिळे ऐसें निधान ।। मायाबंधन तोडावया ।। ५८ ।। नाम घेतां निर्धारीं ।। स्वामी माझा कैवारी ।। भवामाजीं पार करी ।। वचन निर्धारीं सत्य हो ।। ५९ ।। आनंद म्हणे तरी आतां ।। स्वामीराया जी समर्था ।। भक्तवत्सला कृपावंता ।। वाचितां जगव्यथा चुकवावी ।। ६० ।। हाच देऊनि प्रथम वर ।। भक्तिपंथ वाढवावा निर्धार ।। आणिक काहीं मागणें साचार ।। तुजपाशीं दयाळा ।। ६१ ।। परोपकार हाचि एक ।। तुझ्या नामें तारावे लोक ।। आणिक मागणें तें कौतुक ।। नाहीं नाहीं सर्वथा ।। ६२ ।। विश्व विश्वाकारी ।। विश्वरूप तूंचि निर्धारीं ।। चालविता तुजविण तरी ।। कोण आहे दयाळा ।। ६३ ।। तूंचि सर्व सुखदायक ।। तूंचि कृपा नायक ।। तुजवांचूनि जगा तारक ।। नाहीं कोणी सर्वथा ।। ६४ ।। आतां न करीं निष्ठुर चित्ता ।। माय जाणे बालकाची व्यथा ।। तुजवांचूनि अन्य सर्वथा ।। माय दुजी न जाणो ।। ६५ ।। तूंचि मातापिता सर्वेश्वरू ।। जगतारक जगदगुरू ।। नको नको अव्हेरुं लेंकरुं ।। दीना उदारु तूं एक ।। ६६ ।। दीनदयाघन नाम ।। तुमचें असे हो उत्तम ।। जग तारावया कारण ।। स्वामी समर्थ धरियेलें ।। ६७ ।। महापूर बोरी पायीं उतरला ।। मैदार्गीहुनी येतां सोहळा देखिला ।। अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला ।। अघटित लीला समर्थांची ।। ६८ ।। प्रेम उंदीर सजीव केला ।। मुक्यासी वाचा देऊनि बोलविला ।। अंधासी रत्नें पारखविला ।। अघटित लीला जगीं तुझी ।। ६९ ।। अघटित केलें चमत्कार ।। किती लिहावे साचार ।। ग्रंथ वाढेल निर्धार ।। या भेणें सादर लेखणी आवरिली ।। ७० ।। स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार ।। पुढें स्वामिराज बोलवील सादर ।। भक्त तारावया निर्धार ।। कली जोर मोडोनियां ।। ७१ ।। म्हणुनियां आतां लघुचरित्र ।। स्वामी नाम नामाचें स्तोत्र ।। जग तारावया पवित्र ।। लघुस्तोत्र वर्णिलें ।। ७२ ।। अक्कलकोटीं बहु लीला ।। ज्याणें दाखविली अघटित कळा ।। कोटीमदनमदनाचा पुतळा ।। स्वरुपीं जयाच्या तुळेना ।। ७३ ।। बहु वर्षें एकभूमी वस्ती ।। एक विचार एक स्थिती ।। अघटित रूप तें निश्चितीं ।। जगतालागीं तारावया ।। ७४ ।। हे निर्जीव पाटावरी ।। पादुका उठल्या कलिमाझारी ।। अजूनि भुली कैशी जगांतरी ।। तरणोपाया चुकती हे ।। ७५ ।। नाम घेतां प्रेमभरीं ।। हृदय शुद्ध आधीं करीं ।। दया ठेऊनि अंतरीं ।। वाच निर्धारीं स्वामिलीले ।। ७६ ।। स्वामिपादुकापूजन ।। नामस्तोत्र भजन ।। तेणें वंश उद्धरे जाण ।। कलीमाझारी निर्धार ।। ७७ ।। म्हणुनियां आतां ।। स्वामिनाम आठवावें सर्वथा ।। तयावीण अन्य वार्ता ।। तारक नाहीं जगांत ।। ७८ ।। अहा सुंदरस्वरूपनिधान ।। अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान ।। सच्चिदानंद आनंदघन ।। स्वामी माझा दयाळू ।। ७९ ।। या प्रपंचमोहाचे काठीं ।। बुडोनियां जातां रे निकटी ।। तुम्हां तरावया सुलभ गोष्टी ।। स्वामिनाम पोटीं धरा ।। ८० ।। स्वामिनामाचा प्रताप ।। पाप जाळूनि करी राख ।। अपूर्व दाविलें कौतुक ।। कलीमाजी तरावया ।। ८१ ।। तरी आतां शुद्ध करूनि मन ।। हेंचि जाण संध्यास्नान ।। दया क्षमा शांती पूर्ण ।। गुणवर्णन समर्थांचें ।। ८२ ।। खोट्याचा जाणूनि पसारा ।। तोडीं तोडीं मायेच्या व्यवहारा ।। न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा ।। मोहपसारा दूर करोनी ।। ८३ ।। मूळबिंदु हा प्रमाण ।। तेथोनि वाढविता कोण ।। कोणी केलें हो रक्षण ।। पिंडालागीं जाण पां ।। ८४ ।। कैंची माया कैंसा मोह ।। कोठें आहे तुझा ठाव ।। तो आधीं शोधुनी पहा हो ।। भुलू नको मानवा ।। ८५ ।। मूळ बिंदुरूप प्रमाण ।। देह झाला बीजा कारण ।। वाढवोनि करचरण ।। दीनानाथें अर्पिले ।। ८६ ।। तेथें झाली जीवशिवाची वस्ती ।। तीन गुण गुणांची प्राप्ती ।। सहा विकारांची स्थिती ।। मायेसंगती खेळोनिया ।। ८७ ।। दया क्षमा शांती विचार ।। विवेक ज्ञान जागृतीसार ।। अविद्येची गती निर्धार ।। सोडोनि भवपार करीतसे ।। ८८ ।। धरितां स्वामी नावाची आवडी ।। घेतां भवामाजीं घाली उडी ।। नेवोनि भक्तां पैलथडी ।। पार करी दयाळू ।। ८९ ।। नाम जगीं तारक ।। काय सांगू नामाचें कौतुक ।। नामें तारिले कितीएक ।। महापापी कलियुगीं ।। ९० ।। नाम घेतां संकट हरे ।। वारी केल्या पाप सरे ।। सेवा करितां भवांत तरे ।। चुकती फेरे चौऱ्यांशीचें ।। ९१ ।। अक्कलकोटीं न जातां तरी ।। वटछायेसी अनुष्ठान करी ।। तयासीं तारक निर्धारीं ।। दृष्टांतरूपें स्वामी माझा ।। ९२ ।। स्वामींची मूर्ति मनोहर ।। प्रेमें घेऊनि अयन्यावर ।। भावें मांडोनि गादीवर ।। पूजन करावें प्रेमभावें ।। ९३ ।। भजनपूजनाच्या रीती ।। कलीमाजीं जग उद्धरती ।। प्रेम ठेउनियां चित्तीं ।। स्वामी कृपामूर्ति आठवावा ।। ९४ ।। काय न करी श्रीगुरुनाथ ।। सत्य होती शरणांगत ।। भक्ततारक अवतार समर्थ ।। कलियुगीं यथार्थ अवतरला ।। ९५ ।। विश्वव्यापक विश्वंभरू ।। त्यासी कैंची समाधी निर्धारु ।। जगीं जगप्रकार दाखवणें साचारु ।। लीला थोरु समर्थांची ।। ९६ ।। द्वैत नाहीं तिळभरी ।। आशा कैंची अंतरीं ।। योगमाया दवडिली दुरी ।। अवतार निर्धारीं स्वामी माझा ।। ९७ ।। भक्तांकारणे अक्कलकोटीं ।। वास केला हो निकटी ।। पाय दाऊनियां सृष्टीं ।। पतित उद्धार करविला ।। ९८ ।। अघटित कळा अघटित लीला ।। पूर्णतेज तेजाचा पुतळा ।। अगम्य ज्याची अवतार लीला ।। कलीचा सोहळा मोडावया ।। ९९ ।। तरी नामाची संगती ।। प्रेम ठेउनी सदा चित्तीं ।। स्वामी आठवा दिवसरात्रीं ।। भवामाजी तरावया ।। १०० ।। स्वामीनामाचा सोहळा ।। धाक पडे कलीकाळा ।। निजदासासी सांभाळी वेळोवेळां ।। अवतार सोहळा करूनियां ।। १०१ ।। कलीमाजी तारक ।। भक्तासी एकचि नाम देख ।। स्वामीरायाविण कौतुक ।। आणिक नको सर्वथा ।। १०२ ।। स्वामीनामाचें कीर्तन ।। सप्रेमें पादुकापूजन ।। करितां कलीमाजी जाण ।। जन उद्धरे निर्धारें ।। १०३ ।। स्वामीपंथ तारक ।। भव नाशील हा सत्य देख ।। कलीमाजीं जगतारक ।। परमसुखदायक उद्भवला ।। १०४ ।। म्हणुनि जनीं आपुल्या हिता ।। शरण जावें श्रीगुरूनाथा ।। मुखीं धरोनि स्वामीवार्ता ।। जन्मव्यथा चुकवावी ।। १०५ ।। ऐसी भुललिया सोय ।। पुढें नाहीं रें उपाय ।। भवाचा हा भय ।। दूर कराया निर्धारीं ।। १०६ ।। तरी सुंदर मानवाची काया ।। नेवोनि लावा स्वामिपाया ।। सुखें निवारा भवभया ।। मोहमाया तोडोनियां ।। १०७ ।। समर्थें दिधलें अभय वचन ।। जो हें स्तोत्र करील पठण ।। तयाचे मनोरथ पूर्ण ।। होतील जाण मज कृपें ।। १०८ ।। येथें धरितां संशय ।। तयासी भवामाजी भय ।। पुढें नाहीं ऐशी सोय ।। सत्य सत्य त्रिवाचा ।। १०९ ।। हें लघुस्तोत्र समर्थांचें ।। मनोभावें करितां पठण याचें ।। अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे ।। परमार्थकांसी मोक्षपद ।। ११० ।। आनंद  म्हणे तरीं आतां ।। स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा ।। प्रेमभावें स्तोत्र गातां ।। मोक्ष हातां येईल ।। १११ ।। इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र ।। हें जगतारक पवित्र ।। जपामाजीं महामंत्र ।। अर्थ सादर पुरवावया ।। ११२ ।। इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदापर्णमस्तु ।। राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय ।। श्रीरस्तु ।। शुभंभवतु ।।

Search

Search here.