Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

 

 

कार्तिकी द्वादशी , म्हणजे तुळशी विवाहारांभ :

विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीबरोबर  विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनावर “श्रीकृष्णाय नमः” असे लिहून स्वस्तिक काढावे. वृंदावनाभोवती चारही बाजुंनी ऊस उभे करतात. तुळशीच्या लग्नामध्ये ऊसाला “मामा”चे महत्व आहे. “उसमामा”. झेंडूच्या फुलांनी वृंदावन शोभिवंत करतात.

तुळशी वृंदावनात चिंच, आवळे ठेवावे. हा विवाहसोहळा संध्याकाळी करतात. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करावी. साडी-चोळी नेसवावी. तुळशीला (फांदीला) मणी मंगळसूत्र घालावे. खणा-नारळाने ओटी भरावी. तुळशी समोरच्या पाटावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी. तुळशीची आणि श्रीकृष्णाची विधिवत पूजा करावी. फळे, बत्तासे, खडीसाखर, दुधसाखर, ह्यांचा नैवेद्य दाखवावा.

तुळशी आणि श्रीकृष्ण ह्यांचे मध्ये अंतरपाट धरून, मंगलाष्टके म्हणावीत. तुळशीचे श्रीकृष्णाबरोबर लग्न होणे, याचा भावार्थ : तुळस ही पावित्र्य व
सात्विकता यांचे प्रतीक आहे. तुळशीबरोबर श्रीकृष्णाचा विवाह होणे, याचा अर्थ ईश्‍वराला जीवाचा `पावित्र्य’ हा गुण अतिशय प्रिय असणे. याचेच प्रतीक म्हणजे श्रीकृष्णाने गळयामध्ये `वैजयंती माळा’ परिधान केलेली असणे. तुळशी विवाहाचे महत्त्व :-

या दिवसापासून शुभ दिवसाला, मुहूर्ताच्या दिवसांना सुरुवात होते. हा विवाह भारतीय संस्कृतीतील आदर्शत्व दर्शविणारा विवाह आहे’, असे मानले जाते.

तुळशी विवाहाचेवेळी करावयाची प्रार्थना :- “हे श्रीकृष्णा व हे तुळशीदेवी, आज दिवसभरात तुमच्याकडून जी शक्‍ती मला मिळेल, ती राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी वापरली जाऊ दे. संकटात निराश न होता ईश्वरावर माझी अखंड श्रद्धा व भक्‍ती असू दे”.

तुळशी विवाहाचेवेळी करावयाचा नामजप :- या दिवशी पृथ्वीवर कृष्णतत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते. तुळशीच्या झाडातूनही जास्त प्रमाणात कृष्णतत्त्व कार्यरत असते. या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप करावा. पूजा झाल्यानंतर वातावरण खूप सात्त्विक होते. त्या वेळीही श्रीकृष्णाचाच नामजप करावा.

तुळशीचे फायदे :- तुळस ही जास्त सात्त्विक असल्याने तिच्यात ईश्‍वराची शक्‍ती मोठ्या प्रमाणात आकर्षित होते. तुळशीची पाने पिण्याच्या पाण्यात टाकल्यामुळे पाणी शुद्ध व सात्त्विक होते आणि त्यात शक्‍ती येते. त्या पाण्यामार्फत जिवाच्या प्रत्येक पेशीत ईश्‍वराची शक्‍ती कार्यरत होते.

।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।।

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगल ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
………………..
तुळशीची आरती :

जय देवी जय देवी जय माये तुळशी |
निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी || ध्रु. ||

ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी |
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारी ||
सेवा करिती भावे सकळहि नरनारी |
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी |
जय देवी जय देवी जय माये तुळशी |
निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी || १||

तुळशी विवाह व मंगलाष्टके

3 thoughts on “तुळशी विवाह व मंगलाष्टके

 • November 13, 2018 at 10:02 am
  Permalink

  सुंदर आणि विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  Reply
  • November 13, 2018 at 10:04 am
   Permalink

   धन्यवाद .. अधिक जलद माहितीसाठी आपले “अथातो ऑफलाइन” अँड्रॉइड app डाउनलोड इन्स्टॉल करावे ..

   Reply
 • November 1, 2017 at 10:47 pm
  Permalink

  धन्यवाद गुरुजी

  Reply

Leave a Reply

Don`t copy text!