शंकरगीता अध्याय १५ वा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:05:31
शंकर गीता अध्याय १५ वा
देखून महाराजांचे चरण । भारावून गेलो मी त्यांना शरण
पाठीवर माझ्या थाप मारुन । महाराज पाहू लागले ।।१।।
थाप बसता पाठीवरती । महाराज कृपेची ही पावती ।।
चट्दिशी कळली मजप्रती । आनंद मला वाटला ।।२।।
भाग चरित्राचा जो लिहिला । महाराजचरणी रुजू झाला ।।
महाराजांना फार आवडला । साक्ष याची मिळाली ।।३।।
ज्यांच्या पहा पाठीवर । महाराज थाप मारणार ।।
त्यांचे कल्याण होणार । नित्य अनुभवाची गोष्ट ही ।।४।।
पेंटर कडलासकरांची प्रमिला । बारामतीस मावशीकडे गेली ।।
तेथे भुताने झपाटली । भूत नाचू लागले ।।५।।
कधी ती आरडेओरडे । डोळे फिरवी इकडेतिकडे ।।
नंतर ती बेशुध्द पडे । घाबरुन गेली मावशी ।।६।।
देवर्षी अनेक उपाय केले । सारे अगदी व्यर्थ गेले ।।
सोलापुरी तीज आणून सोडले । सांगितले जे घडले ते ।।७।।
पेंटर, भस्मेंना म्हणाले । ’माझ्या मुलीस भूत लागले’ ।।
’दाखव देवर्षीस’ भस्मे वदले । पेंटर मनी हादरले ।।८।।
आपणच महाराज असताना । इतरत्र हिंडण्याच्या का यातना ?
कशास कोणापुढे याचना । महाराज समर्थ असताना ।।९।।
ऐसा त्यांनी विचार केला । दुस-या दिवशी एका लग्नाला ।।
जावयाचे होते परगावला । पत्नी - कन्येस आधी पाठविले ।।१०।।
लग्नास जाऊ लग्नादिवशी । ऐसा विचार करुन मनाशी ।।
महाराजांच्या फोटोपाशी । बसले दीप लावून ।।११।।
गहिवरुन आले पेंटरना । कळवळून म्हणाले महाराजांना ।।
आपण समर्थ असताना । भूत काढणे अशक्य का ? ।।१२।।
तुम्हीच माझ्या मुलीला तारा । अथवा तुम्हीच तिला मारा ।।
तुमच्या मनास येईल तसे करा । नाव राखा वा बुडवा ।।१३।।
ढसढसून पेंटर रडले । महाराजांचे स्तोत्र म्हटले ।।
’गुरुलीलामृत’ पारायण केले । नंतर गेले लग्नास ।।१४।।
इकडे व-हाडाच्या गोंधळात । प्रमिला मोठमोठ्याने ओरडत ।।
शंक-या मी जाते, मला सोड । मारु नकोस मजला रे ।।१५।।
पळत वेशीबाहेर गेली । शंक-या आता चालले रे मी ।।
ओरडत बेशुध्द पडली । बाधामुक्त जाहली ।।१६।।
गोंधळात झाला गोंधळ । हादरुन गेले व-हाड सकळ ।।
तेवढ्यात पेंटर झाले दाखल । आनंद काय वर्णावा ? ।।१७।।
हाक ऐकिली महाराजांनी । वृत्त ऐकले सर्वांनी ।।
कडलासकर गेले भारावूनी । म्हणाले ’जय शंकर’ ।।१८।।
एका बाईचे पाय आखडले । चालणे तिचे बंद झाले ।।
तिने साईबाबांस सांगितले । साईबाबा म्हणाले ।।१९।।
जा शंकरमहाराजांच्या दर्शनाला । दर्शनास येताच त्या बाईला ।।
व्याधिमुक्त झाल्याचा अनुभव आला । बाई अत्यंत हर्षली ।।२०।।
उपासनी महाराज साकोरीत । योगिराज, विदेही, सुविख्यात ।।
बुवाबाजी खटला कोर्टात । त्यांच्यावरती चालला ।।२१।।
काही समाजकंटकांनी । उपासनीमहाराजांस ठरविले भोंदू मुनी
गुंतविले त्यांना बूवा प्रकरणी । आनंदले कंटक ।।२२।।
नगरचे श्रोत्रीय वकील विख्यात । त्यांना महाराज सांगत ।।
तुम्ही ही केस घेऊन हातात । उपासनींना सोडवा ।।२३।।
श्रोत्रीय म्हणाले महाराजासं । मी दिवाणी असे वकील ।।
क्रिमिनल केस ही असत । कशी चालविता येईल ? ।।२४।।
महाराज म्हणाले श्रोत्रीयांस । तूच चालवली पाहिजे ही केस ।।
वंदून श्रोत्रियानी महाराजांस । केस तुफान रंगवली ।।२५।।
इतकी केस रंगवली । जज्जांची मती गुंग झाली ।।
प्रेक्षक मंडळी थक्क झाली । निर्दोष सुटले उपासनी ।।२६।।
पाहून श्रोत्री यांची बुध्दिमत्ता । अन् अर्ग्युमेंटची कुशलता ।।
दिपून गेले सर्व अवलोकिता । ब्रिटिश सरकार अपार ।।२७।।
समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारनी । श्रोत्रीयां चा सत्कार करूनी ।।
पदवी बार. अॅट. लॉ देऊनी । गौरविले श्रोत्रीया ।।२८।।
श्रोत्रीयांनी जाणले । अशक्य ते शक्य केले ।।
कोर्टात माझे जे भाषण झाले । जाणीव मज मुळी ना ।।२९।।
कोर्टात महाराजच बोलत । अशक्य ते शक्य करीत ।।
श्रोत्रीय महाराजांचे - चरणे धरत । प्रसन्न झाले महाराज ।।३०।।
श्रोत्रीयांस महाराज विचारत । ‘काय तुज माग हवे असत ?’ ।।
‘दत्त पादुका मज मिळाव्यात’ । श्रोत्रीय वदले लगेच ।।३१।।
गाणकापुरच्या भस्मात । महाराज हात घालत ।।
त्यातून पाषाणपादुका काढत । श्रोत्रीयांना दिल्याच ।।३२।।
अजूनही श्रोत्रीयांच्या घरात । दत्तपादुका उत्सव होत ।।
महाराज प्रभाव असा असत । अतर्क्य अपूर्व अगाध ।।३३।।
शेख अब्दुलरझाक बियाबानी । पोलिस खात्यात पोलीस असूनी ।।
धर्माचे ते असती ज्ञानी । पुणे शहरी वास्तव्य ।।३४।।
साध्या वेषात बियाबानी । दर्शनास गेले एके दिनी
तू पोलीस आहे म्हणूनी । महाराजांनी ओळखले ।।३५।।
थक्क झाले बियाबानी । त्यांचा गुरू कोण ? हेही सांगूनी ।।
गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी । त्यांना म्हणून दाखवला ।।३६।।
चकीत बियाबानी झाले । त्यांनी महाराजांना ओळखले ।।
महाराज प्रत्यक्ष अल्ला भले । उद्गार त्यांचे असतीच ।।३७।।
महाराजांच्या भव्यत्वाची । माहिती अत्यंत महत्वाची ।।
बियाबानी उत्स्फूर्तपणेची । आनंदाने सांगत ।।३८।।
मालपाठकांना दर्शन होत । राम कोराड यांच्या रूपात ।।
क्षणात राम कोराड दिसत । क्षणात प्रत्यक्ष महाराज ।।३९।।
नाना सोनटक्के यांच्या घरात । महाराज एकदा बसले असत ।।
एक दाढीवाला संन्यासी येत । महाराजांसमोर उभा तो ।।४०।।
सोनटक्क्यांना तो विचारत । महाराज कुठे आहेत ? ।।
सोनटक्के तर चकीत होत । पाहून कसा विचारतो ? ।।४१।।
संन्यासी तो निघून जात । महाराज सोनटक्क्यांना म्हणत ।।
आत्ताच दर्शन द्यावयाचे नसत । संन्याश्याला पहा या ।।४२।।
सोनटक्क्यांना महाराज दिसत । न दिसत संन्याशा, जरी ते असत ।।
एकाच वेळी या घटना घडत । एकमेकांविरूध्द ।।४३।।
महाराज गेले काशीत । ब्राह्मण महाराजांस अवलोकित ।।
ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत । असले कसले महाराज ?।।४४।।
वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून ।।
महाराजांस सांगती ठासून । काहीच करत तुम्ही ना ।।४५।।
नाही वैदिक आचार । नाही वैदिक विचार ।।
वेदाचे महत्व अपार । तुम्हा ठाऊक मुळी ना ।।४६।।
महाराज शांत ऐकून घेत । तिथेच एक मुलगी खेळत ।।
सागरगोटे होती झेलत । तिला महाराज पुकारित ।।४७।।
त्या मुलीस म्हणाले महाराज । हे भटुकडे जमले इथे आज ।।
वेदांचे ज्ञान त्यांना पाज । सांग वेद समजावून ।।४८।।
मुलगी अशी बोलत होती । जणू प्रगटला बृहस्पती ।।
जिभेवर नाचे सरस्वती । व्यासच जणू बोलत ।।४९।।
व्याख्यान तिचे ऐकून । वैदिक सगळे गेले थिजून ।।
महाराजांचे चरण धरून । शरण गेले तात्काळ ।।५०।।
अकलूज शुगर फॅक्टरीत । दरवर्षी बॉयलर बिघडत ।।
जर्मन कंपनीचा मनुष्य येत । नीट करून जातसे ।।५१।।
पाच - सहा दिवसात । काम तो पूर्ण करत ।।
रोजचा त्याचा पगार असत । एक हजार रूपयेच ।।५२।।
इतर खर्च सर्व वेगळे । दरवर्षी असेच चाललेले ।।
महाराजांनी हे पाहिले । निष्कारण हा खर्च का ? ।।५३।।
महाराज म्हणाले या वर्षी तर । नीट करून देतो हा बॉयलर ।।
घण आणून द्या मज सत्वर । महाराज नीट करत ।।५४।।
तीन दिवस रात्री बारा नंतर । घणाचे घाव घालून बॉयलर ।।
दुरूस्त केला तेव्हापासून तर । बॉयलर नाही बिघडला ।।५५।।
वाघोडला जेव्हा महाराज जात । तेव्हा तेथे सुगंध सुटत ।।
वाघोडास जेव्हा सुगंध येत । महाराज तेव्हा जात तिथे ।।५६।।
महाराज येणे, सुगंध सुटणे । यांचा अन्योन्य संबंध असणे ।।
लोक ओळखीत पुरतेपणे । महाराज येणे जाणत ।।५७।।
धनराज गिरजीस पैशाचे कोडे । म्हणून आले महाराजांकडे ।।
महाराज पैशाशिवाय घोडे नडे । पैसा द्याहो मजलागी ।।५८।।
महाराज धनराजास सांगती । पैशानेच समस्या वाढती ।।
नाना प्रश्न पैशानेच उद्भवती । पैसा कारण दु:खाचे ।।५९।।
पैशाने सुख शांती समाधान । यांच होत असे हवन ।।
पैशचा नाद दे सोडून । धनराज काही ऐकेना ।।६०।।
महाराजांनी धनराजास । अगदी पुष्कळ दिला त्रास
त्रास सोसूनही पैशाची आस । त्याची कमी न जाहली ।।६१।।
महाराज गेले त्याच्या घरी । बेफाम पडले आजारी ।।
बेडके पडती जमिनीवरती । साठवून ठेवण्या सांगितले ।।६२।।
धनराजांनी मोठे घमेले । महाराजांच्या बेडक्यास ठेवले ।।
घमेले बेडक्यांनी भरले । महाराज बेडके ओकत ।।६३।।
महाराज म्हणाले धनराजास । थुंकी बेडके पिऊन टाक ।।
धनराजांनी न करता विचार । पिऊन सर्व टाकले ।।६४।।
धनराजास म्हणाले महाराज । आता होशील तू ‘धनराज’ ।।
आणि खरोखरच ते बनले धनराज । अपार धन ते मिळाले ।।६५।।
काशीक्षेत्रातील एक सावकार । महाराजांचा भक्त फार ।।
महाराजांच्या कृपेने सुंदर । कन्यारत्न त्याला जाहले ।।६६।
कन्यारत्न सात वर्षाचे झाले । महाराज सावकाराला म्हणाले ।।
मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले । विवाह लाव माझ्याशी ।।६७।।
सावकारही कबूल झाला । महाराज म्हणाले सावकाराला ।।
सांग तशी दौंडी देण्याला । दौंडी पिटविली काशीत ।।६८।।
काशीविश्वेश्वराच्या मंदिरात । हा विवाह असे होत ।।
प्रचंड जनसमुदाय जमत । जो तो कुजबुजू लागला ।।६९।।
मुलगी सात वर्षाची छान । नवरा तर म्हातारा असून ।।
कसे आले हे जमून । हसती सारे म्हणून ।।७०।।
लग्नघटिका भरली । महाराजांनी तिज वंदन केले ।।
आणि तिला आई म्हटले । सावकारास सांगू लागले ।।७१।।
या मुलीचे वैधव्य टळत । ही पडेल राजघराण्यात ।।
धार संस्थानची तिज मागणी येत । राणी झाली संस्थानची ।।७२।।
मुलीचे वैधव्य जाणून । स्वत: लग्नास उभे राहून ।।
तिच्याशी लग्नही न करून । वैधव्य मुलीचे टाळले ।।७३।।
वैधव्य तिचे टाळून । राजाची राणी तिज बनवून ।।
सर्वस्वी केले तिचे कल्याण । लक्षात कुणाच्या येणार ? ।।७४।।
माळीनगरच्या शुगर फॅक्ट्ररीत । एकदा महाराज मुद्दाम जात ।।
फॅक्टरीचा बॉयलर पाडत । लोक पहात राहिले ।।७५।।
गहिनीनाथांच्या महाराजांनी । स्वयंभू पादुका तेथून काढुनी ।।
विधियुक्त त्यांची स्थापना करूनी । फॅक्टरी सुरळीत चालली ।।७६।।
नगरला जनार्दनबूवांचे कीर्तन । महाराज, श्रोत्यांची दाटी होऊन ।।
गोरा कुंभार चालले आख्यान । भलतेच अगदी रंगले ।।७७।।
नामदेवाच्या कीर्तनात । पांडुरंग स्वत: नाचत ।।
जनार्दनबुवांच्या कीर्तनात । महाराज नाचू लागले ।।७८।।
वीणा बुवांच्या हातातून । महाराजांनी हाती घेऊन ।।
गोरा कुंभार आख्यान । महाराज सांगू लागले ।।७९।।
महाराजांचे कीर्तन इतके रंगले । श्रोते गोरा कुंभार बनले ।।
दुस-या दिवशी महाराजांस पूजिले । बसली प्रसाद पंगत ।।८०।।
महाराजासं लागून ब्राह्मण । पलीकडे इतर बसले असून ।।
माझा बाब्या कोठे म्हणून ? । मधेच महाराज ओरडले ।।८१।।
बाबुराव रुद्रांना बसवीत । पलीकडच्या पंक्तीत ।।
महाराज रुद्रांना बोलावित । आपल्या पानावर बसविले ।।८२।।
दुस-या पानावर महाराज बसत । सुरू जाहली पंगत ।।
महाराज सारे ओळखत । पंक्तिप्रपंच ताठा हा ।।८३।।
महाराज विचार करती, याचा । उरतवू पंक्तिप्रपंच नक्षा ।।
म्हणाले माझ्या घासात हा । केस आला कोठून ? ।।८४।।
सर्वांच्याच पहा हातात । केस दिसला घासात ।।
पुढे महाराजा रागावून म्हणत । खडा घासात मज लागे ।।८५।।
सर्वाच्या तेव्हा घासात । खडा सर्वांना लागत ।।
लोक झाले सारे चकित । अघटित हे पाहून ।।८६।।
महाराज म्हणाले सर्वांना । सारेच भक्त प्रिय मला
गरीब, श्रीमंत, जात, बुरा, भला । भेद मजपाशी नसेच ।।८७।।
माझ्या भक्ताचा अपमान । तो माझाच महान अपमान ।।
कधी न करणार तो मी सहन । कळले ज्याचे त्यांनाच ।।८८।।
पंक्तिप्रपंच करणारे सगळे । महाराजासं शरण आले ।।
म्हणाले महाराज आमचे चुकले । क्षमा करावी प्रभुवरा ।।८९।।
शुभराय महाराज मठात । एक बेकार हॉल असत ।।
भस्मे, बुवा, रूद्र बसत । दादा फुलारी वगैरे ।।९०।।
या सर्वांनी ठरविले असत । अध्यक्षपद महाराजांस देत ।।
बेकार हॉलचे अध्यक्ष असत । त्रिनेत्रीधारी महाराज ।।९१।।
लोडास महाराज बसत । भोवती सारे बसत असत ।।
तेवढ्यात महाराज म्हणत । पान - सुपारी काढ बुवा ।।९२।।
बुवांचे खिसे रिकामेच असत । बुवा लगेच उभे रहात ।।
कोटाच्या खिशात हात घालत । खिसे सर्वही भरलेले ।।९३।।
बुवा अगदी चकित होत । खिसे तर सारे रिकामेच असत ।।
लगेच पानसुपारीने कसे भरत ? । नवल सर्वां वाटतसे ।।९४।।
पान - सुपारी - चुना - कात । तंबाखू सारे भरपूर निघत ।।
बुवा सर्व हे मधे ठेवत । बार भरती सर्वही ।।९५।।
सर्व पदार्थ हे कुटून । भस्मे महाराजासं देऊन ।।
भस्मे काहीच घेत न । देत सर्व महाराजा ।।९६।।
फिरावयाला जावयाचे असत । महाराज भस्मेंना बोलावीत ।।
त्यांच्या खांद्यावर महाराज बसत । जात फिरण्या नेहमी ।।९७।।
भगवान रामचंद्रास हनुमान । आपल्या खांद्यावर बसवून ।।
आकाशात करी उड्डाण । तोच प्रसंग इथेही ।।९८।।
असेच प्रसंग काही जुने । लेखणीस लिहावे वाटणे ।।
परी लेखणीवर काही बंधने । म्हणून एवढे पुरेच ।।९९।।
भस्मे यांच्या खांद्यावर बसत । महाराज वजन हलके करत
जशी पुष्पमाळ गळ्यात । भक्तास कष्ट देत ना ।।१००।।
रुद्र समाधीमठात रहात । एकदा थंडीचे दिवस असत
समाधीवर ठेवून हात । कुडकुडत होते थंडीने ।।१०१।।
मध्यरात्रीस समाधीतून । महाराज प्रत्यक्ष प्रगटून
रुद्रांना कडकडून भेटून । महाराज त्यांना म्हणाले ।।१०२।।
बाब्या चल फिरावायला । सर्व देश दाखवतो तुजला
बाबुराव म्हणाले महाराजांना । ‘रात्र फार जाहली ’ ।।१०३।।
मी असता तुज कसली भीती ? । चरण धर माझे घट्ट अती
बाबुराव घट्ट चरणे धरती । हवेतून निघाले महाराज ।।१०४।।
जो जो महाराज उंच जाऊ लागले । तो तो बाबुराव म्हणत राहिले
माझ्या पोटात ढवळू लागले । सोडा मजला भूवर ।।१०५।।
संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा । फिरवून आणले रुद्रांना
समाधीवर सोडून त्याच क्षणा । महाराज अंतर्धान पावले ।।१०६।।
प्रत्यक्ष महाराज प्रगटले । पृथ्वीप्रदक्षिणे घडवले
पुन्हा समाधीवर सोडले । धन्यता रुद्रांची केवढी ? ।।१०७
देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन । भारावून करून नमन ।।
पंधराव्या अध्यायाचे लेखन । या ठिकाणी संपले ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.